मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
आई, खरंच ग

पद - आई, खरंच ग

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : एडका मदन )
आई, खरंच ग । जें केलंस तें बरंच ग ॥ध्रु०॥
माझी धन - दौलत, बायको । तुझ्या मनांत वाटली नको ।
जन्माची फट्फट । कर्माची खट्खट ।
झटपट केलिस दूरच ग । आई, खरंच ग ॥१॥
काय विषयाचें सुख । रंधनांत भरलें विख ।
जिव जाण्याचं । नव्हे जगण्याचं ।
हें मरणाचं घरच ग । आई, खरंच ग ॥२॥
पायीं धरुनि मगर ओढिती । सर्वांगीं मत्स्य तोडिती ।
प्रपंच खोटा । दुर्धर मोठा ।
दुःखाचा सागरच ग । आई, खरंच ग ॥३॥
इथें नच कोणाचें कोणी । ही भ्रममाया देखणी ।
अवघेच लटके । बटीक बटके ।
कुटक्याचे चाकरच ग । आई, खरंच ग ॥४॥
अब मैं तो हुआ बेफिकीर । तगदिरसे बन गये फकीर ।
क्या कहूं प्यारी । कुदरत तेरी ।
मोरि पिछे रही डरच ग । आई, खरंच ग ॥५॥
तूं अनाथाची माउली । तूं कल्पतरुची साउली ।
मोठिच तळमळ । दीनाची कळवळ ।
बहु कोमल तुझें उरच ग । आई, खरंच ग ॥६॥
तूं ब्रह्मप्रणवरुपिणी । ब्रह्मांडपिंडव्यापिनी ।
तूं नरनारायण । नारायणी ।
पार्वती - शिव - शंकरच ग । आई, खरंच ग ॥७॥
श्रीमूळपीठनायके ! जय भवानि, माय, रेणुके ! ।
परम कृपाळे ! दीनदयाळे ।
ये आतां लवकरच ग । आई, खरंच ग ॥८॥
तूं मायच, मी लेंकरुं । नको माझी उपेक्षा करुं ।
नको प्रीत तोडूं । नको दुर दवडूं ।
नको सोडुं, हातीं धरच ग । आई, खरंच ग ॥९॥
तुझा छंद लागला मला । किति सांगुं माय, मी तुला ।
रुप पाहण्याचा । गुण गाण्याचा ।
दे भजनाचा वरच ग । आई, खरंच ग ॥१०॥
मजसाठीं घाबरुन मनांत । तूं आलिस भरल्या उन्हांत ।
नाहिं कुठं गमलिस । बहूत श्रमलिस ।
आला घाम दरदरच ग । आई, खरंच ग ॥११॥
तुझे चरणकमल पाहुं दे । तुझ्याजवळ मला राहुं दे ।
विष्णुदास म्हणे । अशीच जननी ! ।
मजवरी करुणा करच ग । आई, खरंच ग ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP