मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्री विष्णुदासांची कविता|भूपाळी आणि पदे|
असं नको करुं अंबाबाइ

पद - असं नको करुं अंबाबाइ

श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.


( चाल : विनंति करुनि चित्त. )
असं नको करुं अंबाबाइ । तुला जन हंसतील अग आइ ! ॥ध्रु०॥
पितांबर आइचा जरिकांठी । मुलाच्या वस्त्राला गांठी ।
तुला सोन्याची ताट - वाटी । मला जेवाया नरोटी ।
आइ, तूं श्रीमंतिण मोठी । दरिद्री आलों तुझ्या पोटीं ।
कल्पवल्लिच्या फळाला ही । कुहिरी फुटली नवलाई ॥ असं० १॥
तुला क्षिर, बेसन, दळ, करंज्या । बुंदि, श्रीखंड, पुर्‍या ताज्या ।
शर्करा, दधि, नवनीत, अज्या । सांडगे, वडे, पापड, भाज्या ।
आइच्या घरिं घन गडगंजा । मूल वाजवि फाल्गुन - बाजा ।
स्वेच्छित भोजन सर्वांही । म्हणसि कां मज दुर सर, पाही ॥ असं० २॥
गळ्यामधिं मुक्तहार डुलती । कुंडलें कानीं लखलखतीं ।
रवि, शशी, मुकुटापुढें दिपती । वंदिती पद अमराधिपती ।
आइ तुझि अगणित संपत्ती । अपरिमित माझी विपत्ती ।
तुझ्या गृहिं शत कोटी गाई । मला ताकाची महागाई ॥ असं० ३॥
त्रिभुवन राणीच्या गांवीं । अम्हीं काय भिक्षा मागावी ? ।
आरामी आइनें भोगावी । मुलाची ममता त्यागावी ।
कुणाला गोष्ट ही सांगावी । जगामधें काय महिमा गावी ? ।
विष्णुदासाची प्रार्थना ही । वंचना करणें बरें नाहीं ॥ असं० ४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP