परिक्षित राजा म्हणाला, - हे शुकमुने, सर्व भूतांचे हित करणारा, सर्वांना आवडणारा व सर्वांचे ठिकाणी समदृष्टि ठेवणारा असा जो भगवान् त्यानें इंद्राच्या पक्षपातानें केवळ शत्रूप्रमाणें दैत्यांचा वध स्वतः कसा केला बरें ? ॥१॥
कारण, साक्षात् परमानंदस्वरुपी अशा निर्गुण विष्णूला देवांपासून कांही कार्यभाग करुन घ्यावयाचा नसल्यामुळे, देवांवर त्याची प्रीति असणें जसें संभक्त नाहीं; तसेंच असुरांपासून त्याला भीति नसल्यामुळें त्यांच्याशीं द्वेष असण्याहि संभव नाहीं ॥२॥
असें असल्यामुळें श्रीनारायणाच्या या कृत्याविषयीं आम्हांला मोठा संशय झाला आहे. तेव्हां हे महामुने, तो संशय तूं दूर कर ॥३॥
शुक्राचार्य म्हणाले, - हे परिक्षित राजा, ज्यामध्यें अतिशय पुण्यकारक आणि ईश्वरभक्तीची वृद्धि करणारें असें भगवद्भक्त प्रल्हादाचें महात्म्य नारदादि ऋषिनी गायन केलें आहे, त्या अद्भुत हरिचरित्राविषयीं तूं फार उत्तम प्रश्न केलास; करितां व्यासमुनीला नमस्कार करुन ती हरिकथा मी तुला कथन करितों ॥४॥॥५॥
हे राजा, भगवान् मायातीत, निर्गुण, जन्मादिविकारशून्य व देहेन्द्रियादिरहित असा असतांहि, आपल्या मायेच्या सत्त्वादि गुणांमध्यें प्रवेश करुन शिक्षेस पात्र असलेल्या दुष्टांना शिक्षा करणारा होतो ॥६॥
हे राजा, सत्त्व, रज व तम, हे गुण प्रकृतीचेच आहेत, परमात्म्याचे मुळींच नाहींत. कारण, सत्त्वादि गुणांचा हास किंवा वृद्धि ही एकदम घडत नाहींत ॥७॥
सत्त्वगुणांच्या जयकाळीं परमात्मा त्या काळाला अनुकूळ होऊन देव आणि ऋषी यांच्या देहांमध्यें प्रविष्ट होतो व त्यांची वृद्धि करितो. तसाच रजोगुणाच्या जयकाळीं तो असुरांच्या देहांमध्यें प्रविष्ट होऊन त्यांची वृद्धिं करितो; आणि तमोगुणाच्या जयकाळीं यक्ष व राक्षस यांच्या देहांमध्यें प्रविष्ट होऊन त्याचा उत्कर्ष करितो ॥८॥
जसे अग्नि, उदक, आकाश, इत्यादि पदार्थ, काष्ठ, जलपात्र, घट, इत्यादिकांच्या ठिकाणी त्यांच्यात्यांच्यासारख्या वेगवेगळ्या रुपांनी भासतात, त्याचप्रमाणें भगवानहि देवादिकांच्या ठिकाणी समान होतो. परंतु जसा अग्नि काष्ठादिकांच्या ठिकाणी भिन्नत्वानें अनुभवास येतो, तसा मात्र तो अनुभवास येत नाहीं. तथापि ज्ञानी पुरुष, विचार करुन त्या परमात्म्याचे ज्ञान करुन घेतात ॥९॥
जेव्हां जीवाच्या भोगाकरितां परमेश्वराला शरीरें उत्पन्न करण्याची इच्छा होत्ये, तेव्हां तो आम्यावस्येमध्यें असलेल्या रजोगुणाला आपल्या मायेच्या योगानें निराळा करुन त्याची वृद्धि करितो. तसेंच जेव्हां त्याला चित्रविचित्र शरीरांमध्यें क्रीडा करण्याची इच्छा होते, तेव्हां सत्त्वगुणाला निराळा करुन तो त्याची वृद्धि करितो; आणि निद्रा घेण्याची जेव्हां त्याला इच्छा होत्ये, तेव्हां तो विश्वाचा संहार करण्याकरितां तमोगुणाला पृथक् करुन त्याची वृद्धि करितो ॥१०॥
हे राजा, निमित्तभूत असलेल्या प्रकृतिपुरुषांच्या योगानें सृष्टयादि सर्व व्यापार करणारा हा ईश्वर, प्रकृतिपुरुषांना साहाय्य करणारा असल्यामुळें त्यांच्या आश्रयभूत अशा काळाला आपण स्वतः च उत्पन्न करितो. हे राजा, हा जो काळ आहे तो सत्त्वगुणाची वृद्धि करितो, म्हणून त्याचा नियंता हा महाकीर्तिमान् देवप्रिय ईश्वरहि सत्त्वगुणप्रधान अशा देवसमुदायाची वृद्धि करितो, आणि रजोगुण व तमोगुण ज्यांत प्रधान आहेत असे जे देवांचे शत्रु असुर, त्यांचा वध करितो ॥११॥
हे राजा, ‘ ईश्वर द्वेषादिशून्य असतां त्यानें दैत्यांचा वध का केला ’ ह्याविषयीं राजसूयनामक महायज्ञाच्याप्रसंगी पूर्वी युधिष्ठिरानें प्रश्न केला असतां, देवर्षि नारदानें त्याला याविषयींचा इतिहास प्रेमानें सांगितला होता ॥१२॥
त्या राजसूयनामक महायज्ञामध्यें भगवान् वासुदेवाच्या ठिकाणी शिशुपाळाला प्राप्त झालेलें सायुज्यपद अवलोकन करुन, पांडुपुत्र धर्मराजाच्या मनाला आश्चर्य वाटलें, व सर्व मुनि ऐकत असतां त्या यज्ञप्रसंगी धर्मराजानें तेथें बसलेल्या देवर्षि नारद मुनीला पुढील प्रश्न केला ॥१३॥॥१४॥
युधिष्ठिर म्हणाला, - हे नारद मुने, हा शिशुपाळ श्रीकृष्णाचा नित्य द्वेष करीत असून, त्याला मायातीत अशा वासुदेवरुप तत्त्वामध्यें,एकनिष्ठ भक्तांनाही जी दुर्लभ, अशी सायुज्यमुक्ति प्राप्त व्हावी, हें मोठें आश्चर्य होय ॥१५॥
हे मुने, हा प्रकार काय आहे हें आम्हां सर्वांनां च जाणण्याची इच्छा आहे. कारण, भगवन्निदेमुळे वेनराजाला ब्राह्मणांनी नरकांत पाडिलें होतें ॥१६॥
असें असतां हा दमघोषाचा पुत्र, पापी शिशुपाळ तसाच त्याचा कनिष्ठ बंधु दंतवक्त्र, ( बालपणापासून ) बोंबडे शब्द उच्चारुं लागल्यापासून तों आतांपर्यंत भगवान् गोविंदाशीं मत्सरबुद्धीनेंच वागत आले आहेत ॥१७॥
अक्षय अशा परब्रह्मस्वरुप श्रीविष्णूची ते सारखी निंदा करीत होतें. असे असतां त्यांच्या जिव्हेवर कुष्ठ न उठतां किंवा ते घोर नरकामध्ये न पडतां उलट त्या दुर्लभस्वरुप भगवंताच्या ठिकाणी सर्व लोकांसमक्ष अनायासानें यांचा लय झाला ! हें अवलोकन करुन वायूनें भ्रमण पावणार्या दीपज्वाळेप्रमाणें माझी बुद्धि भ्रमण करीत आहे. मला हे अत्यंत आश्चर्य वाटत आहे ! यास्तव असा हा प्रकार होण्याचें कारण काय, तें तूं मला सांग. तूं सर्वज्ञ आहेस ॥१८॥॥१९॥॥२०॥
शुकाचार्य म्हणाला, - हे परीक्षित राजा, धर्मराजाचें तें भाषण श्रवण करुन भगवान् नारद ऋषि संतुष्ट झाला, आणि सर्व सभा श्रवण करीत असतां त्या धर्मराजाला सावध करुन तो ती कथा सांगूं लागला ॥२१॥
नारद म्हणाला, - हे धर्मराजा, निंदा, स्तुति, सत्कांर आणि तिरस्कार, ह्यांचे ज्ञान होण्याकरितां प्रकृतिपुरुषांचा भेद न मानितां शरीराची रचना झाली आहे ॥२२॥
हे धर्मराजा, त्या देहादिकांच्या अभिमानानें प्राण्याला त्याविषयीं वैषम्य उत्पन्न होतें, आणि त्या वैषम्याच्या योगानें ताडण व निंदा उद्भवतात. देहाविषयींचा अभिमान अतिदृढ झालेला असल्यामुळें त्या जिवाचा वध झाला म्हणजे प्राण्यांना वध केल्याचें पाप लागतें, तसें ईश्वरास मान्य नाही. कारण, तो सर्वाचा अद्वितीय आत्मा असल्यामुळें त्याच्या जवळ प्राण्यांसारखा अभिमान नाही. तो परमात्मा दैत्यांच्या हिताकरितांच काम करीत असतो; त्यामुळें त्याला त्या हिंसेचा दोष लागू शकत नाही. ॥२३॥॥२४॥
हे धर्मराजा ह्याकरितां वैरानुबन्ध, निर्वैर भक्तियोग, भय, स्नेह अथवा काम, ह्यांपैकी कोणत्याही उपायानें ईश्वराच्या ठिकाणी मन लावावें. कारण, तसें मन लावलें असतां पुरुषाला ईश्वरव्यतिरिक्त इतर वस्तु दिसेनाशी होत्ये ॥२५॥
मत्सर, वैर, द्वेष, या नित्य वैराच्या योगें मनुष्य जसा तन्मय होऊन जातो, तसा भक्तियोगानें होत नाहीं, असें माझें ठाम मत झालें आहे ॥२६॥
उदाहरण, ‘ कुंभारीण ’ नांवाच्या भ्रमरानें भिंतीवर घर बांधून त्यांत ठेविलेला कीटक त्या भ्रमरविषयाचा द्वेष व भय, यांच्या योगानें निरंतर त्याचें स्मरण करीत असल्यामुळें त्याला शेवटी भ्रमराचे स्वरुप प्राप्त होतें. त्याप्रमाणे मायेनें मनुष्यरुप धारण करणार्या भगवान् सदानंदरुप ईश्वराच्या ठिकाणी वैरभाव धारण करुन त्याचें वारंवार चिंतन करणारे कित्येक प्राणी निष्पाप होऊन शेवटी ईश्वरस्वरुपास प्राप्त झाले आहेत ॥२७॥२८॥
हे राजा, काम, द्वेष, भय, स्नेह अथवा भक्ति, ह्या साधनांनी ईश्वराच्या ठिकाणी मन लावून व त्या कामादिनिमित्तक पातकाचे निरसन करुन पुष्कळ लोक त्याच्या सायुज्य गतीला प्राप्त झाले आहेत ॥२९॥
कामाच्या योगानें गोपी, भयामुळें कंस, द्वेषानें शिशुपाळप्रभृति राजे, संबंधानें यादव, स्नेहामुळे तुम्ही पांडव आणि हे धर्मराजा, भक्तीनें आम्ही त्याच्या स्वरुपाला प्राप्त झालों आहों ॥३०॥
पण हे राजा, श्रीहरीचें चिंतन करणार्या या पांचांपैकी वेनराजा कोणीच नव्हता. तात्पर्य, कोणत्या तरी उपायानें श्रीकृष्णाच्याठिकाणीं मन तल्लीन झालें पाहिजे ॥३१॥
हे पांडुपुत्रा, शिशुपाळ आणि दंतवक्त्र हे जे तुम्हां पांडवाचे मावसभाऊ, ते मूळचे विष्णूच्या पार्षदगणांपैकी मुख्य होते. पण ब्राह्मणांच्या शापामुळे ते वैकुंठस्थांनापासून च्युत झाले होते ॥३२॥
युधिष्ठिर म्हणाला - हे मुने, श्रीहरीच्या भक्तांवरहि संकटें आणणारा असा तो शाप कोणत्याप्रकारचा होता, व तो कोणी दिला ? मला तर हा शाप अविश्वसनीय वाटतो. कारण श्रीहरीच्या एकनिष्ठ भक्तांना जन्म प्राप्त होणें हे असंभवनीय आहे ॥३३॥
जन्माला कारणीभूत असे देह, इंद्रियें व प्राण हे वैकुंठवासी पुरुषांना तर मुळींच नसतात. तेव्हां त्यांना देहाचा संबंध कसा घडला, तो वृत्तांत तुम्ही आम्हांला कृपाकरुन कथन करा ॥३४॥
नारद म्हणाला, - हे युधिष्ठिरा, एका वेळी सनत्कुमार, सनक, सनंदन आणि सनातन, हे ब्रह्मदेवाचे चार पुत्र त्रैलोक्यामध्ये संचार करीत करीत भगवदिच्छेनें वैकुण्ठास गेले ॥३५॥
मरीचिप्रभृति प्रजापतींच्याहि आधीं उत्पन्न झालेले ते मुनि, पांचसहावर्षांच्या मुलांसारखे दिसत असून नग्न होते, म्हणून दोघां द्वारपाळांनी त्यांस मुलें समजून आंत जाण्याविषयीं प्रतिबंध केला ॥३६॥
तेव्हां ते क्रुद्ध झाले व त्यांनी त्या द्वारपाळांस शाप दिला कीं, " तुम्ही रजोगुण आणि तमोगुण यांनी रहित अशा मधुसूदनाच्या चरणापाशीं नुसतें रहाण्यासहि योग्य नाही. ह्याकरितां हे मूढहो, अत्यंत पापी अशा असुरयोनींत तुम्ही सत्वर जा " ॥३७॥
असा शाप होतांच ते दोघे स्वस्थानापासून भ्रष्ट होऊं लागले. तेव्हां त्या दयाळू मुनींनी त्यांना पुनः असा उः शाप दिला कीं, तुमचे तीन जन्म झाले म्हणजे हा शाप समाप्त होऊन तुम्हांला पुनः स्वस्थानाची प्राप्ति होईल ॥३८॥
नंतर ते दोघे द्वारपाळ, दैत्य आणि दानव ह्यांना पूज्य, असे दितीचे पुत्र झाले. त्यांत हिरण्यकशिपू हा ज्येष्ठ असून हिरण्याक्ष हा त्यापेक्षां लहान होता ॥३९॥
श्रीहरीनें नारसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला आणि पृथ्वीचा उद्धार करण्याकरितां वराहावतार घेणार्या त्याच श्रीहरीनें हिरण्याक्षाचाहि वध केला ॥४०॥
हिरण्यकशिपूनें श्रीहरीची आवडीनें भक्ति करणार्या अशा आपल्या प्रल्हाद नामक पुत्राचा वध करण्याची इच्छा धरुन त्याला ठार मारण्याकरितां नानाप्रकारच्या उपायांची योजना केली; ॥४१॥
परंतु सर्वत्र सबाह्याभ्यन्तरी व्यापक ब्रह्मच आहे असें पहाणारा प्रल्हाद, सर्व भूतांचा आत्माच व द्वेषा. दिशून्य आणि ईश्वराच्या तेजानें व्याप्त असल्यामुळें, त्या अनेक उपायांनीं त्याचा वध करण्यास हिरण्यकशिपू समर्थ झाला नाही ॥४२॥
नंतर दुसर्या जन्मीं ते उभयतां विश्रवानामक ऋषीच्या केशिनीनामक स्त्रीच्या पोटीं जन्मास आले व रावण आणि कुंभकर्ण या नांवांनी प्रसिद्ध होऊन सर्व लोकांना पीडा देते झाले ॥४३॥
तेव्हांहि भगवंताने ब्राह्मणशापापासून त्यांना मुक्त करण्याकरितां रघुवंशामध्यें रामावतार धारण करुन त्यांचा वध केला. हे धर्मराजा, त्या भगवान् रामाचा पराक्रम मार्कण्डेय ऋषींच्या तोंडून तुला ऐकावयास मिळेल ॥४४॥
असो. पुढें तेच रावणकुंभकर्ण तिसर्या जन्मीं क्षत्रिय होऊन तुझे मावसबंधु शिशुपाळ आणि दन्तवक्त्र झाले; आणि श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्रानें निष्पाप होऊन ते नुकतेच ब्रह्मशापापासून मुक्त झाले ॥४५॥
ह्याप्रमाणें ते विष्णुपार्षद नित्यवैरामुळें घडलेल्या तीव्र ध्यानानें अच्युतस्वरुपी होऊन पुनरपि श्रीहरीजवळ गेले ॥॓६॥
युधिष्ठिर म्हणाले, - हे नारद मुने, महात्म्या अशा आपल्या प्रिय पुत्राविषयीं हिरण्यकशिपूचा इतका द्वेष होण्यास व त्या प्रल्हादाचें अच्युताच्या ठिकाणीं एकचित्त होण्यास कारण काय झालें ? तें तूं मला सांग ॥४७॥
॥ पहिला अध्याय समाप्त ॥१॥