निरंजन माधव - उद्गार पांचवा

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


निरजंनासि गंगावती । विनयनम्रा महासती ।

सदाचार झाली पुसती । कैसे वर्तिजे संप्रदायीं ॥१॥

या संप्रदायीं शिष्यगण । तेहीं आचारात्रा धर्म कवण ।

संसारीं असतां संसरण । दोषरहित कैसें घडे ॥२॥

संसारातीत जन । जे वैराज्यवंत महापावन ।

संन्यासधर्मप्रवीण । ऊर्ध्वरंतें अवधूत ॥३॥

ज्ञानसंपन्न स्वानुभवी । आत्माराम जे तरले भवीं ।

ते जीवन्मुक्त महादवी । भोगिती कैवला सुखाची ॥४॥

ते महानुभाव महापुरुष । संन्यासी ते परमहंस ।

योगी ज्ञानदीपप्रकाश । हदयीं प्रकाशे अखंड जया ॥५॥

ते तों मुक्ति सुंदरीकांत । अहैतुक भक्ति आचरत ।

-- रहित भगवंत । स्वाधीन केला भावबळें ॥६॥

नित्य भगवत्स्वरुपीं रमण । गुंता कोठेंचि नसे या कारणें ।

ते तों पद पावलें निर्वाण । पुनरागमन वर्जित ॥७॥

आतां संसारी असोनि निस्पृह । संसार करिती आश्रयोनि गेह

भार्यापुत्रादि समुदाय । पोषिती ईश्वरदत्त ते ॥८॥

ऋणानुबंधीं संलग्न । तयांसि पोषिती नुवगोन ।

कां जे जगदीश नारायण । त्याची माया जाणोनि ॥९॥

त्याची आज्ञा प्रमाण । म्हणोनि करिती पोषण ।

नसे स्नेहममताबंधन । निरभिमान जे ज्ञानी ॥१०॥

तेही मुक्त निर्धारीं । परि संसार कोजे परोपकारीं ।

जे वर्तती पर्वतापरी । जन्मजीवन परार्थ ॥११॥

देह पुत्र वनिता । तेही रक्षिती परहिता ।

परोपकारावांचोनि स्वार्था । न सेविति ते उदार ॥!२॥

चंद्र समस्त क्षितिमंडळ । स्वप्रकाशें करी धवळ ।

निजशरिरीं कळंक मळ । धुणें न घडे जयातें ॥१३॥

जे परनिष्ठ जन । महाज्ञानी सज्जन ।

ते स्वकार्यसाधनीं उदासीन । परोपकार परायण म्हणोनि ॥१४॥

जैसा जीवंत तरुवर । आपण वाहे फळपुष्पभार ।

पर्जन्य उष्ण हिम दुर्धर । साहे आंगीं परार्थ ॥१५॥

छाया त्वचा मूळफळ । पुष्पें पर्णै केवळ ।

परानुकूल वर्तिजे निश्वळ । जे कां वत्सल दीनाचे ॥१६॥

ऐसे जे परोपकारी । नारायण जाणोनि सर्वातरीं ।

आत्मपूजा गणोनि निर्धारीं । परोपकारीं सादर ॥१७॥

ऐसे जे परमपुरुष । तेचि मुक्तीचे प्राणपुरुष ।

ते पावले निजपदास । ज्ञानवैराग्यें परनिष्ठ ॥१८॥

ऐशियांस मुक्तिघटणा । चोहीं युगीं घडे सुजना ।

येथें संदेह मना । कांहींच नसे ॥१९॥

सांप्रत या कलिजनीं । उद्धार पावावा कैशानी ।

जे अखंड अहंता ममताभिमानी । भ्रांत मोहें माजले ॥२०॥

येहीं वर्तिजे कवण्या न्यायें । असावें कवण्या सांप्रदायें ।

यांसि मुक्तता कैशी होय । कैसे आचार आचरावे ॥२१॥

हें सर्व यथास्थित । संक्षेपें सांगावें कृपायुक्त ।

मी दीन म्हणोनि पुसत । सर्वज्ञ राया उद्धरावें ॥२२॥

ऐकोन प्रेमवतीचें वचन । निरंजन अतिहर्षित मन ।

आचार कथिती जे निपुण । आचरतां पावती निजपद ॥२३॥

अवो सुंदरी तुझा प्रश्न । जगदोद्धरार्थ वाटे जाण ।

सज्जन आचरती गुणसंपन्न । तेचि पावन या लोकीं ॥२४॥

साजणी कठिण कलियुग । येथें बहुत पापप्रसंग ।

वेदशास्त्रें पुराणें अनेग । कलिदोष वर्णिती अपार ॥२५॥

जयांत कांहींच शुद्धि । नसेचि द्रव्यक्रियादि ।

प्रायशा नव्हे बुद्धि । धर्माचरणीं कवणातें ॥२६॥

जिव्हेद्रियलोलुपता । साधिजे हेचि मुख्यता ।

जो कां मेळवी वित्ता । अन्यायधर्मे तो प्राज्ञ ॥२७॥

जो संग्रह करी धन । तो प्रमाणवंत निपुण ।

तोचि एक संसार करुं जाणे । म्हणवी प्रवीण या लोकीं ॥२८॥

स्त्रीपुत्रांचें पोषण । ममताभिमानें करी जाण ।

तयासी म्हणती धन्य धन्य । कुटुंबपोषक हा एक ॥२९॥

असो ऐसे सहस्रवरी । वर्तती प्राणी संसारीं ।

आसक्त होवोनि घरदारीं । गुंतले कोशकीटवत ॥३०॥

यांतही परद्रोह परवित्तहरण । परदारादिसंगीं निबद्धमन ।

सेविती पुनः पुन्हा वमन । तरी अन्तः करण विटेना ॥३१॥

मद्यमांसभक्षक । वृथाहिंसाकारक ।

परघातकी अनेक । पापकतें अविचारी ॥३२॥

कदाचित् सत्कर्म करिती । तरि कामाभिलाषे वृथा सांडिती ।

अथवा स्वर्गमुखार्थ मांडिती । उत्साह नाना ॥३३॥

किंवा धन आयुष्य पुत्रसंपदा । शत्रुजयार्थ कर्म सदां ।

करणें परंतु मोक्षपदा । नेछिती लोक कलीचे ॥३४॥

नेणती भगद्भक्तिगोडी । नसे निष्कामव्रताची आवडी ।

तीर्थभ्रमक कावडी । वाहती कष्टें कामार्थी ॥३५॥

तो काम सकळजन्मांतरीं । पशुकीटादिशरीरीं ।

सहजप्राप्त असतां परि । तरी कामिक तेचि इच्छिती ॥३६॥

बहुतां जन्माचे अंतीं । मनुष्यदेह दुर्लभ अति ।

पुरुषार्थदायक असोनि निश्चिती । मोक्ष घटक हा एक ॥३७॥

तत्रापि असे क्षणभंगुर । मृत्युसवेंचि संवचोर ।

यास्तव सावध होवोनि नर । आत्मविचार कां न करिती ॥३८॥

मनुष्यदेह होतां प्राप्त । सदां आत्मविचाररत ।

भगवद्भक्तिनिरत । परहित साधावें उचित हें ॥३९॥

धर्म आचरावा विहित । हेंचि मानोनि स्वहित ।

विषयाभीलषरहित । असावें सदा ॥४०॥

क्षणभंगुर नश्वर । देह चिंतावा निरंतर ।

घडीनें घडी आत्मविचार । करावा हाचि पुरुषार्थ ॥४१॥

न कीजे परनिंदाद्रोह । परधर्मउच्छेद निः संदेह ।

करुं नये अद्रोह । असावें भूतीं ॥४२॥

सर्व धर्माची सहायता । करावी सामर्थ्य असतां ।

आपुल्या धर्मविहिता । सदां फार जपावें ॥४३॥

परधर्माचें आचरण । कदापि न कीजे जाण ।

परंतु परधर्म पाहोन । संतोष मानावा मानसीं ॥४४॥

हें ईश्वराचें कौतुक । ईश्वर मायाचाळक ।

अनेकमार्गदर्शक । ईश्वर सर्व ॥४५॥

आनंदतुंदिलशोभिवंत । प्रणवमस्तक विराजत ।

अर्द्धमात्रा ते झळकत । चंद्ररेखा सद्भाळीं ॥४६॥

बिंदु किरीट सोज्वळ । सूर्यकोटि प्रकाश विमळ ।

अनेकदर्शनपन्नगकुळ । अंगीं मिरवी आभरणें ॥४७॥

सच्चिदानंद गणपती । ध्यावोनि पूजिला निश्चिती ।

आजि पूर्ण झाली चतुर्थी । पूर्ण फळ हें लाधलें ॥४८॥

हा ग्रंथ घनमोदक । नैवेद्य अर्पिला सम्यक ।

वक्रतुंड गणनायक । सुमुख सुप्रसन्न मज असो ॥४९॥

सरळ सरस कोमळ । मधुर वाणी दुर्वादळ ।

पद्यरुप अर्पूनि चरणकमळ । पूजिले भावें सानंदें ॥५०॥

सांप्रदायमाळा सहस्र ओवी । हे कल्पप्रसू नरासि बरवी ।

बोधसूत्रें बोवोनि सद्भावी । वनमाळा हे अर्पिली ॥५१॥

शब्दरत्नाचे अलंकार । नवरस कोंदणें निडार ।

करोनि भूषविला विघ्नहर । सर्वागसुंदर सुखदाता ॥५२॥

सरस सहस्र पद्यकमळें । अनुभवरसें रसाळें ।

सद्गुरुमहिमापरिमळें । घमघमिती जें ॥५३॥

तें एक भक्तिपूर्वक । अर्पोनी अर्चिला गणनायक ।

मंत्रपुष्पार्चन सम्यक । सर्वात्मका समर्पण ॥५४॥

हदयकमळीं आव्हानिला । द्विदळकमळी पूजिला ।

सहस्रदळीं स्थापिला । आत्मागणनाथ गुरुरुप ॥५५॥

आधारचक्रीं नमिला । स्वाधिष्ठानीं स्थापिला ।

मणिपूरीं बसविला । सिद्धीसहित ॥५६॥

अनाहतीं ध्यायिला । विशुद्धिचक्रीं गायिला ।

आसाचक्रीं पाहिला । ज्योतिरुप ॥५७॥

सहस्रदळीं निजनिर्मळ । भानुकोटिप्रकाश निखळ ।

कोटिचंद्रांचे कीळ । साम्यतेतें न पावती ॥५८॥

कोटिकंदपें लावण्य । समुद्रकोटिकारुण्य ।

भक्तकोटिशरण्य । परमेश्वर ॥५९॥

अनंतकोटि जीवमणी । व्यापोनि वसे सूत्रस्थानीं ।

तो सद्गुरु गणपती कोटिनमनीं । निरंजनदासें प्रार्थिला ॥६०॥

वक्रतुंड महाकाय । जयाची प्रभा कोटिसूर्य ।

निर्विघ्न करोनि ज्ञानैश्वर्य । देवोनि मातें प्रतिमाळीं ॥६१॥

नमो नमो सद्गुरुमूर्ती । नमो नमो पावनकीर्ती ।

नमो नमो चित्सुखस्फूर्ती । देवोनि दासा सांभाळी ॥६२॥

श्रीनिरंजन नमो नमो निर्गुणरुपा । नमो नमो ज्ञानदीपा ।

नमो नमो करोनि कृपा । पाददासां सांभाळीं ॥६३॥

निरंजन दासरचित । सांप्रदायपरिमळ महाग्रंथ ।

आजि पूर्ण होतां यथास्थित । सद्गुरुचरणीं अर्पिला ॥६४॥

इतिश्रीमत्सद्गुरु - संतति - संतान - लतिकायाः प्रबोध - मंजर्याः ॥

सदाचार - परिमळप्रकाशनं नाम पंचमोद्गारः ॥

श्रीमल्लक्ष्मीधरमहामौळीपूर्णानंदस्वरुपीं श्रीसुंदरकृष्णार्पणमस्तु ॥

॥ श्रीरस्तु सर्व जगतां ॥ शके १६८५ स्वभानुनामसंवत्सरे आश्विन मासे शुक्लद्वितीयायां बोधचंद्रदर्शनं स्थिरवारे चक्रावतीदुर्गे लेखनं समाप्तं ॥

श्रीमत् त्रिपुरसुंदर्वार्पणमस्तु ॥छ०॥ ग्रंथसंख्या प्रथम १५१ द्वितीय १९७ तृतीय २६१ चतुर्थ १६४ पंचम २१९ ॥ सर्व वोव्या ९९२

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP