निरंजन माधव - उद्गार तिसरा

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


श्रीशाकंमर्यैन्नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥

आतां तृतीय उद्गार । परिसिजे कथा अतिमधुर ।

निरंजन प्रेमपुरः सर । कथी सतीस प्रमोदें ॥१॥

म्हणे पूर्णसशांकमुखी ! । नारद देवऋषी हरिखीं ।

कथा वदले बोधसुंखीं । असतां स्मरोनि श्रीकृष्णा ॥२॥

म्हणे मुनी सच्चिदानंदा । मांधातराजपुत्र मुचकुंदा ।

देवीं पार्थोनि नेला स्वपदा । रक्षणार्थ सुरलाका ॥३॥

दैत्याकांत स्वर्गलोक । पाहोनि भूपती स्वरक्षक ।

ठेविला इंद्रें अनेक । वर्षे मानें देवांच्या ॥४॥

लोटलीं युगाचीं युगगणें । मुचुकुंदें रक्षिले देवगण ।

युद्धीं जिंतिले दारुण । दानवनायक भूपाळें ॥५॥

दैत्य पळोनि पाताळलोका । जाते झाले मुनितिलका ।

देव पावले अशोका । स्वर्गमुखा निश्चिंत ॥६॥

झालें कंटक - निरशन । देव झाले प्रसन्न ।

गौरवोनि दिव्यभूषणें । वर माग ह्नणती नृपातें ॥७॥

मुचुकुंद ह्नणे देवेंद्रासि । मी मनुष्य असतां स्वर्गवासीं ।

निद्रा त्यजोनि अहर्निशी । रक्षक झालों युगगणना ॥८॥

मजला निद्रा पीडा करी । मनुजत्व आहे शरीरीं ।

धैर्यावलंबोनि राहिलों परि । निद्रा परिहारीं असमर्थ ॥९॥

कृपा करोनि मजप्रति । भूमिस्थळ योजिजे निश्चिती

तेथें पावतां सुषुप्ति । भंग न घडे तो जैसा ॥१०॥

माझी निद्रा करील भग । त्याचाच घडावा शरीरभंग

ऐसा वर सांग । द्यावा मातें सुरांहीं ॥११॥

ऐकोनि भूपाळवचन । अवश्य ह्नणे पाकशासन ।

तुझी निद्रा करील भग्न । तो तात्काळ दान होईल ॥१२॥

तुझिया नेत्राग्नीचेनि तेजें । शरीर दग्ध घडेल सहजें ।

जावोनि भूपती सुखों निजे । सहपर्वतीं गुहेसी ॥१३॥

ऐसें देवोनि वरदान । दाविली गुहा अतिगहन !

जैसें विस्तीर्ण गगन । तैशी तेहीं अनंत ॥१४॥

देखोनि ते महादरी । मुचुकुंद सानंद निद्रा करी ।

वर्षे लोटली असंख्य तरी । नये उजगरी भूपाळा ॥१५॥

श्रीकृष्णाराम द्वारारांतीं । भूभाभूगळनाशनाथीं ।

अवतार यादवकुळांतीं । वसुदेवगृहीं प्रसिद्ध ॥१६॥

बहुत मारिले दैत्य प्रबळ । कंसकेशीचाणूरमल्ल ।

गोकुळीं प्रलंबकधेनुकादि अतुळ । मारिले दैत्य विरोधी ॥१७॥

अठरा वेळ जरासंघ । करुं पातला द्वंद्ववृद्ध ।

तयासि न मारितां गोविंद । जीवमात्रें सोडिला ॥१८॥

काळयवन दुर्मद । लोकीं फिरे द्वंद्वयुद्ध ।

अपेक्षुनि ह्नणे मीं प्रसिद्ध । योद्धा पाहेन समान ॥१९॥

स्वर्ग मृत्यु पाताळ । त्रिलोक धांडोळीं अतिप्रबळ ।

परंतु आपणांसमान बळ । न देखतां विव्हळ मनीं घडे ॥२०॥

माझी दोईडकंहूनि । शमनकर्ता वीर आति ।

म्यां न देखिला त्रिलोकवर्ती । व्यर्थ जीवन हें माझें ॥२१॥

नमोनि मातें यव पती । वीर पुसे त्रिलोकसीं ।

स्वामी देवर्षी सर्वज्ञ मूर्ति । आर्ति माझी पुरवावी ॥२३॥

मजसमान वीर धरणी । अथवा असेल पाताळभुवनीं ।

स्वर्गी सुरामाजि कोणी । असेल तरि तो कथावा ॥२४॥

तयासीं करोनि द्वंद्वसमर । भुजदंड - कंडूचा परिहार

घडे ऐसा रणचतुर । महावीर तो दावीं ॥२५॥

ऐकोनि तयाची भारती । दुर्वार गर्वै न लेखी सुरपति ।

तयासि मीं वदलों गा यवनपत्तीं । अति बळवीर क्षिती असे एक ॥२६॥

जो वसुदेवाच्या नंदन । जेणें मर्दिले असुर दारुण ।

तो एक मथुरेमाजि श्रीकृष्ण । कंडू हरण तो करील ॥२७॥

तयासमान बळी । न देखे कोणी वसुधातळीं ।

स्वर्ग पाताळ देवदान कुळीं । म्हणोनि बळी अर्पिती भयें तया ॥२८॥

तयासीं करिसी द्वंद्वयुद्ध । तेव्हां जिरेल तुझा मद ।

ऐसें ऐकोनि परम मोद । पावता झला काळयवन ॥२९॥

काळ काळें ग्रासिला । काळ तयासि समीप आला ।

तत्काळ सुकाल वाटला । काळ पाहोनि समराचा ॥३०॥

त्रिकोटियवनाधीश्वर । परम उग्र जे रणशूर ।

तयांशीं वेढिलें मथुरापुर । युद्धभिलाषें मदत्तत ॥३१॥

देखोनि यवन महाबळी । द्वारका समुद्रीं वसविली ।

आपण निरायुध प्रातः काळीं । निघाला बळी श्रीकृष्ण ॥३२॥

द्वारदंशींहुनि एकला । निघतां वीर तेणें देखिला ।

सर्वलक्षणी घनसांवळा ! श्रीवत्स गळां कौस्तुभ ॥३३॥

अतिविशाळ वक्षस्थळ । नेत्रारुण कमळदळ ।

माथां शोभती अलिकुंतळ । किरीट सौज्वळ मस्तकों ।

भुजचतुष्ट्य लंबायमान । दिगिभशुंडादंडसमान ।

पीताबर परिधान । वैजयंती वनमाला ॥३५॥

कस्तूरीतिलक भाळ । अधराऊणबिंबफळ ।

चरणयुगुल रातत्पळ । नखचन्द्र किरळ फांकती ॥३६॥

ऐसा सर्वलक्षणगुणी । परि निरायुध चालिला चरणी ।

सकळ देवांचा मुकुटमणी । देखे लोचनीं यवनेश ॥३७॥

नारदें कथिला तो वीर । श्रीकृष्ण हाचि निर्धार ।

आयुध वाहन नसतां पाश्चार । फीरे निमित्त नेणवे ॥३८॥

असो मींहीं तयाप्रती । निरायुध भिडेन मुष्टिघातीं ।

पादचारी न बैसतां रथीं । धरीन यातें धावोनि ॥३९॥

ऐसा करोनि संकल्प । पाठीं लागला यवनभूप ।

जयासि योगी निष्कंप । मानसें ध्यातां नातुडे जो ॥४०॥

तयासि धरीन ह्नणोन । पाठलाग करे यवन ।

जयासि दुर्मदाभिमान । वारिधी वाढला गर्वाचा ॥४१॥

ह्नणे युदुकुळओरसुतवीरा । न पळतां राहे सामोरा ।

द्वंद्वयुद्धार्थ मीं आलों धुरा । धिरा धिरा बळवतां ॥४२॥

नारदें कथिली तुझी खुण । तेचि तु श्रीकृष्ण प्रमाण ।

युद्ध न देतां पलायमान । होणें न धर्म क्षत्रियां ॥४३॥

कांहीं करी स्तवन । कांही करी निर्भर्छन ।

कांहीं करी धावन । हांतीं धरीन ह्नणोनि ॥४४॥

कृष्ण न बोलतां कांहीं । पुढें चाले लवलाहीं ।

धरिला धरिलासि पळसील कायि । ह्नणोनि लागे पाठीसीं ॥४५॥

विष्णुमायामोहित । मागें फिरु न सके चित्त ।

काळें आयुष्य हरिलें भ्रांत । मृगलुब्धका लोधे तेंवि ॥४६॥

ऐसें चाळवीत चाळवीत । नेला मुचकुंद गुहेआंत

तेथें पुरुष निद्रित । देखोनि पीतांबर । कृष्ण समजोनि लत्ताप्रहर ।

करितां जागृत नृपवर । क्रोधें पाहतां तो यवन ॥४९॥

भस्म झाला तत्काळ । कर्पूरासि झगटतां अनळ ।

तेंचि परि जाहली भंवाळ । सर्व शरीरा ते क्षणीं ॥५०॥

आश्चर्य मानी मुचकुंद । हा कोण पापी झाला दग्ध ।

वर्तमान न कळतां संदिग्ध । स्तब्धपणें राहिला ॥५१॥

तंव गुहा देखिली प्रकाशित । साश्चर्य पाहे लोकनाथ ।

तंव घनशाम अकस्मात । मदनसुंदर देखिला ॥५२॥

सकळलक्षणी लक्षित । जो कां साक्षात लक्ष्मीकांत ।

श्रीवत्सकौस्तुभें मंडित । पीतांबर परिधान ॥५३॥

पदक कुंडलें विराजमान । मकराकृति सूर्यैदुसमान ।

कपोलयुग मुकुरायमान । तेजें सघन शोभती ॥५४॥

जाणोनि साक्षात परमपुरुष । मुचकुंदास झाला हर्ष ।

साष्टांग नमन करोनि संतोष । प्रश्न करी कृष्णातें ॥५५॥

ह्नणे स्वामी आपण कवण । सूर्यकोटिप्रकाशपूर्ण ।

स्वरुपीं जयाचे असित मदन । वोवाळणी सांडिजे ॥५६॥

हा कोण दग्ध झाला पापी । स्वकृत पापें अपापीं ।

तूं गा कोण दिव्यरुपीं । कथन देवा करावें ॥५७॥

म्हणोनि पुन्हा नमितां चरणीं । मंदस्मितें चक्रपाणी ।

भक्ति नम्र नृपमणी । तयासि कथनी तो कथी ॥५८॥

सांप्रत जन्मकर्म - नामरुपा । अंत नसे माझिया नृपा ।

भूमिरजातें मोजिता सोपा । परि माझ्या पडपा न गणवे ॥५९॥

यादव वसुदेवसुत । देवकीगर्भसंभूत ।

भूभार करावया शांत । अवतरलों मीं आदिविष्णु ॥६०॥

मारिले कंसादि असुर । जरासंध - सेना - परिवार ।

हा काळयवन दुर्धर । दुग्ध झाला तव नेत्रानळें ॥६१॥

मारीन पृथ्वीचे नुपकुमार । जे गर्वी अत्यंत शूरं ।

आतां पांडवपक्ष करोनि इतर । नाश करीत बहुतां मिसें ॥६२॥

करोनि कौरव निमित्तधारी । अठरा अक्षौहिणी भारी ।

सेना मारवीन अठरा वासरीं । पार्थाकरीं मीं चाळक ॥६३॥

बाण भौमादि असुर । तयांचा करीन संहार ।

मारीन शिशुपाळ दंतवक्र । क्रूर शाल्वशृगालादिक ॥६४॥

अनेकलीला भुवरी । करोनि परिणीन सोळा सहस्रनारी ।

लग्न लावीन एका वासरीं । सर्वाघरीं मीं मुहूर्ते एका ॥६५॥

अंतीं यादवकुळाचा नाश । करीन विप्रशापमिसें ।

उद्धव पार्था उपदेश । करीन आत्मज्ञानाचा ॥६६॥

कलिजनासि कीर्ति नौका । भवतारिणी करोनि लोकां ।

तारीन भाविकां अनेकां । कलिदोषपंका नातळतां ॥६७॥

अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण । वासुदेव मीच नारायण ।

चतुर्व्यूह उपासन । प्रकट करीन सात्वतां ॥६८॥

जया नरां जेथें आवडी । अधिकारपत्वें बुद्धि गाढी ।

होतां संसार संकटवेडी । तुटे धडफुडी तात्काळ ॥६९॥

आतां येथें यावया कारण । पुण्यश्लोक तूं मद्भक्त पूर्ण ।

तुज द्यावया दर्शन । करणे तुझा उद्धार ॥७०॥

अलभ्य माझें दर्शन । अलभ्य माझें भजन ।

अलभ्य माझें कीर्तन । पावन करील मद्भक्ता ॥७१॥

अनंत जन्माच्या कोटी । सरतां तयाच्या सेवटीं ।

अकस्मात माझी होतां भेटी । घडे तुटी संसारा ॥७२॥

माझें होतां दर्शन । तात्काळ घडे पापदहन ।

भक्ती घडे शुद्ध ज्ञान । तेणें जन्ममरण विनाशे ॥७३॥

जन्ममरण विनाशतां । मुक्ति चतुर्धा होती प्राप्ता ।

भेद भजका सालोक्य सामीप्य सरुपता ।

अभेदीं सायुज्यता निवाड ॥७४॥

सर्वहीं माझें भजन एक । घडे मुक्तिसंपादक ।

मींच एक मुक्तिदायक । हाचि विवेक आदरी तुं ॥७५॥

असो आतां नरेंद्रा । पुरली तुझी महानिद्रा ।

माझिया ध्यानें गुणसमुद्रा । सायुज्य माझें पावसी ॥७६॥

आतां तुज उपासन । कृष्णमंत्र घे पावन ।

तेणें तुझें पाप गहन । दग्ध होईल जपमात्रें ॥७७॥

ध्यान जपें तुतें मुक्ति । ऐशी कथिली युक्ति ।

दीधली करतळीं जीवन्मुक्ति । प्रापक विद्या प्रत्यक्ष ॥७८॥

जो मंत्र कृष्ण पडक्षर । मुंचकुंदासि उपदेशी जगदीश्वर ।

ह्नणे सेवीं विंध्य गिरिवर । तेथें आचार अनुष्ठान ॥७९॥

या मंत्रमूर्तीचें उपासन । हाचि जप हेंचि घ्यान ।

करितां घडेल कलुषहरण । होसि पावन नृपवर्या ॥८०॥

माझें करितां भजन । होईल अपरोक्ष्य परमज्ञान ।

जेणें मज सनातन । देखसी सर्वत्र जनीं वनीं ॥८१॥

ऐसा करिता उपदेश । मुचकुंद मानी परम हर्ष ।

ह्नणे हाचि महापुरुष । जगदीश आदिनारायण ॥८२॥

याचें करावया स्तोत्र । उद्युक्त झाला यौवनाश्चपुत्र ।

मुचकुंदराव पवित्र । गगे वचना स्मरोनि ॥८३॥

मुचकुंदस्तुतिः--

विमोहितो यजनं ईशमायया । त्वदीयया त्वां न भजत्यनर्थदृक् ।

सुखाय दुःखप्रभुवषु सज्जते । गृहेषु योपित्पुरुषेषु वंचितः ॥१॥

भगवंता ईश्वरा नारायणा ! पुराणापुरुषा करुणाघना ।

पावन केलें पुरातना । मज दर्शना देवोनि ॥८४॥

तुझिया भाये मोहित जन । न करितां तुझें भजन ।

अनर्थ दृष्टिते अर्थ जाणून । दुःखप्रभवीं सज्ज होती ॥८५॥

गृहीं होती आसक्त । सुखातें इछोनि अनुरक्त ।

स्त्रियानी वंचिले असक्त । पाशीं गुंतले ममतेच्या ॥८६॥

लब्धा जनो दुर्लभमंत्रमानुषं । कथंचिदव्यंगमयत्नतोऽनघ ।

पदारविंद नं भजत्यसन्मति - । र्गृहांधकूपे पतितो यथा पशुः ॥२॥

यालोकीं पावोन जनन । सर्व मुखाचें आयतन ।

मनुष्यत्व द्विजत्वहीं असोन । तूर्ते नभजो नवंचले ॥८७॥

परम यत्नें नव्हें प्राप्ती । ते सहजं पावोनि रमापती ।

तुझे पादारविंदाप्रती । न भजोनि गृहांधकूपीं ते पडले ॥८८॥

असोनि मनुष्यत्व काय तया । पशूच जाणावे देवराया ।

भारवाही विषय लोभियां । निर्गति घडे तेथोनि ॥८९॥

ममैष कालो जितनिष्फलो गतो । राज्यश्रियांन्नद्धमदस्य भूषते

मर्त्यात्मबुद्धेः सुतदारकोशभूष्वासज्जमानस्य दुरंतचिंतया ॥३॥

हे अजिता माझा काळ । आजिवरि सर्व गेला विफळ ।

राज्यश्रियें उन्मत्त केवळ । इच्छोनि सुतदारद्रव्यकोश ॥९०॥

भूमिराज्य आसक्त बुद्धि । अमित चित्तीं वाहोनि आधी ।

सज्ज जाहलों प्रमादीं । अर्थकामुक अभिमानी ॥९१॥

कलेवरेऽस्मिन्घटकुड्यसंन्निंभे । निरुढमानो नरदेव इत्यहं ।

वृतोरथेभाश्वपदात्पनीकपैर्गो पर्यटन् त्वामगणव्य दुर्सदः ॥४॥

हें कळेवर मृत्तिकामय । भित्ती सदृश रुपकार्य ।

येथें रुढला अभिमान कार्य । नरनाथ मी देव ह्नणोनि ॥९२॥

रथकुंजर अश्व पदाती । चतुरंग सेना सभौवती ।

पृथ्वी भ्रमोनि मंडळवर्ती । राजें सर्वहीं जिंतिले ॥९३॥

तेणें वाढला दुर्मद । तूंतें विसरलों आतमद ।

न गणोनि तुजला स्वछंद । विषय विषें भूललों ॥९४॥

प्रमत्तमुच्चैरितिकृत्य चिंतया । प्रवृद्धलोभं विषयेषु लालसें ।

त्वमप्रमत्तः सहसानिपद्यसे । क्षुल्ले लिहानोहिरिवाखुमंतकः ॥५॥

भान न धरोनि शरीरीं । इतिकर्तव्य चिंता अंतरीं ।

प्रवृद्ध लोभें निरंतरीं । विषयांधकारीं गुंतलों ॥९५॥

अत्यंत गोड विषयसुख । मानितों असतां महादुःख ।

असावध असतां अंतक । तुझा प्रेरित पातला ॥९६॥

महाकाळ तो जिभा । चाटित पुढें झालों उभा ।

क्रूर भुजंगं जैसा क्षोभा । पावोनि मूषका कंवटाळीं ॥९७॥

पुरारथैहमपरिष्कृतैश्वरन् । मतंग तुरगीं वेष्ठित अती ।

पादाक्रांत शत्रू भूपती । करीत फिरे मी नरनाथ ॥९८॥

अस्मिन्न वसरीं तुझा प्रेरित । काळ येवोनि अकस्मित ।

तेणें योजिला अनर्थ । तो तुं परिसे भगवंता ॥९९॥

विष्टा कृमी भस्म भावत्रय । देहासि पावविलें निश्चयें ।

कोठं नेली साम्राज्यमय । नरदेव पदवी कळेना ॥

निर्जित्य दिक्चक्रमभूत विग्रहो । वरासनरथः समराजवंदितः ।

गृहेषु मैथुन्यमुखेषु योषितां । क्रीडामृगो पुरुष ईश नीयते ॥७॥

नूतन नूतन निर्मोनि कलह । अष्ट दिशेचे भूप समूह ।

जिणोनि सिंहासनी निः संदेह । समराज वंदना लाविले ॥१०१॥

बाह्यप्रताप उत्कर्ष । मनी न माय महाहर्ष ।

गृहांतरी मैथुन सुखाभिलाष । धरोनि प्रमदांस वश झालों ॥१०२॥

तेहीं नेत्रकटाक्ष पाशीं । बांधोनि मातें अनयासीं ।

मर्कटप्राय करोनि देहासि । नाचविती त्या विनोदें ॥१०३॥

करोति कर्माणि तपः सुनिष्ठितो । निवृत्त भोगस्तदपेक्षया ददत् ।

पुनश्च भूयेहमहं स्वराडिति । प्रबुद्धते न स्वसुखाय कल्पते ॥८॥

निष्ठा धरोनि करी तप । पंचाग्नि दहा उपवास अमुप ।

कर्मै करी साक्षेपें । यज्ञ याग ते कष्टसाध्य ॥१०४॥

भोग टाकोनि करी व्रत । परि अंतरीं महाभोग स्वार्थ ।

इंद्र होऊं इच्छित । स्वर्ग भोग सुख कामी ॥१०५॥

अथवा सार्वभौम पृथ्वीवरी । वरावयाचा हेत धरी ।

प्रवृद्ध तृष्णा अंतरीं । तयासि सौख्यतें घडेना ॥१०६॥

मत्रापवगों भ्रमतो यदा भवे - । ज्जनस्य तच्युततत्समागमः ।

सत्संगमोयहिंतदैवसद्गतो । परावरेशेत्व विजायते मतिः ॥९॥

ऐसा भ्रमतां संसारगव्हरीं । अच्युता तुझी कृपा होय जरी ।

मोक्षसिद्धि तयासि वरी । त्वज्जन संगमा पावतां ॥१०७॥

त्वज्जनसंगाची महिमा ऐशी । तात्काळ फिरवोनि दुर्बुद्धीसि ।

तुझिया चरणारविंदीं मतीसी । षटपद करोनि जे बसवी ॥१०८॥

मोक्षदाता तुं जगदीश्वर । त्याचा निदारिसी संसार ।

महादुःखाचा पार । निदर्शक तुं परमात्मा ॥१०९॥

मन्ये ममानुग्रह ईशते कृतो राज्यानुबंधापगमो यदृछया ।

यः प्रार्थ्यते साधुभिरेकचर्यया वनं विविक्षुद्भिरखंडभूमिपैः ॥१०॥

मीं मानितों ईशा मजवरी । अनुग्रह केला सर्वेपरी ।

यदृछेचि झाला दुरे । राज्यानुबंध तो परमात्मा ॥११०॥

साधु राजर्षी सत्वसंपन्न । सेऊं इछिती महावन ।

संपत्ती बंधापासून मोचन । तूज प्रार्थिती परेशा ॥१११॥

तें मज घडलें अनायासें । तुझिया करुणा कटाक्ष लेशें ।

अखंड मुख तें सावकाशें । भोगुं सके मीं आतां ॥११२॥

न कामयेन्यं तव पादसंवनादकिंचन प्रार्थ्य तमाद्वरं विभो ।

आराध्यकस्त्वांह्य पवर्गदंहरे वृणीत आयों परमात्म बंधन ॥११॥

तुझिया पादसेवनावांचोनि । अन्य वासना न धरीं मनीं ।

उत्कृष्ट नसे यावांचोनि । आणीक दुसरें सुखनाम ॥११३॥

तुं निस्पृहाराध्य वरिष्ट । आराधोनि सकळेष्ट ।

पुन्हां इछील निकृष्ट ऐसा अनार्य तो कोण ॥११४॥

जेथें पुन्हा पुन्हा बंधन । जेथें पुनः पुन्हा पतन ।

तुज भजो न इछील कोण । साधु संपन्न शुद्धसत्व ॥११५॥

तस्माद्विसृज्याशिष ईशमक्षरं । रजस्तमः सत्वगुणानुबंधनाः ।

निरंजनं निर्गुण मद्वयं परं । त्वां ज्ञतिमात्रं पुरुषं व्रजाम्पहे ॥१२॥

आतां सकळ टाकोनि आशा । त्रिगुण बंध विनाशा ।

तुज आधाधितों जगदीशा । मोहपाशा संहारी ॥११६॥

तुं निरंजन निर्गुण अद्वय । चिन्मात्र पुरुष ज्योतिर्मय ।

तुंचि परात्पर निश्चय । अनंतपार परपार ॥११७॥

तव पदाची प्राप्ति इछोनि । आजि निघालों भर्वसेनी ।

जेथें पावलिया प्राणी । पुनरागमनी घडतीना ॥११८॥

चिरमिह वृजिनार्यस्तप्यमानो नुतापै रवितृषडमित्रो लब्धशांतिं कथंचित् ।

शरणदसमुपेतस्त्वत्पदाब्जं परात्मन्न भयमृतशोकं पाहिमपन्नमीश ॥१३॥

मीं चिरकाळ दुःखसागरीं । त्रिविधतापवडवाग्निदाहाभीतरी ।

पडोनि अखंड नरहरे । व्यथा अत्यंत पावलों ॥११९॥

षडवैरी ते नक्रगण । अतिक्षुधित दारुण ।

पीडाकर ते कठिण । सांप्रत शांतींते पावले ॥१२०॥

तुझिया पादांबुजा शरण । मीं पातलों परमदीन ।

तुं अशोक अमृत सत्यसंपन्न । पाहि पाहि मज जगदीश ॥१२१॥

ऐसा मुचकुंदें स्तविला हरी । परम तोषोनि कृपा करी ।

म्हणे राया तरोनि संसारीं । माझिया पदा पावसी ॥१२२॥

ऐसें कथोनि नारायण । तात्काळ घडला अंतर्धान ।

मुचकुद नृपाळ प्रेमसंपन्न । जाता जाला तेथोनि ॥१२३॥

नृपाळ बोलिला पुढारीं । विंध्याचळी वस्ती करी ।

ध्यानद्रव्यें पूजी हरी । हदयकल्हारीं चिंतोन ॥१२४॥

परि ध्याननिष्ठा बहुत धरी । मानसीं न प्रकटे श्रीहरी ।

तदां पुन्हा क्लेशसागरीं । मज्जन पावे तो नृप ॥१२५॥

ऐशिया समयीं अकस्मात । माझें दर्शन झालें प्राप्त ।

बहुतां दिवसां विंध्यपर्वत । पाहावया पातलों ॥१२६॥

अकल्पित मुचकुंद । आश्रम देखीला विशुद्ध ।

जयासि प्रसन्न गोविंद । तयासि भेटणें मज इष्ट ॥१२७॥

पाहतां मातें हर्षित । पूजोनि बैसवी यथास्थित ।

कथोनि सर्व वृत्तांत । ध्यान साधन पुसे मातें ॥१२८॥

म्हणे देवर्षी तपोधन । मीं संकटसागरीं पावतां मज्जन ।

अकस्मात करुणाधन । तारक आलासि धावोनि ॥१२९॥

म्हणोनि देवा गुणनिधाना । मूर्ति आकळे जैशी ध्याना ।

तैसा उपाय विज्ञानधना । कथन कीजे दयाळे ॥१३०॥

ऐकोनि नृपाचें भाषण । म्यांच उपाय कथिला पूर्ण ।

आधीं मूर्ति करोनि स्थापन । सन्मुख ध्यान धरी तूं ॥१३१॥

तेणें तुज न घडतां भ्रम । ध्यानसिद्धि घडेल परम ।

अभ्यासितां निः शीम । मूर्ति हदयीं प्रकटेल ॥१३२॥

पुन्हा पुसे भूपती । मज मूर्ति कैशी घडेल प्राप्ती ।

तेहीं वंदिजे कृपामूर्ति । दीनवत्सल तूं एक ॥१३३॥

ऐकोनि तयाचें वचन । मूर्ति कथिली परम पावन ।

ब्रह्मा विधाता चतुरानन । मृष्टिकर्ता जो विश्वाय ॥१३४॥

तयाचिये हदयकमळीं । जे मूर्ति सदोदित सांवळीं ।

जे ध्यानद्रव्यें पूजिली । मानसपूजाउपचारें ॥१३५॥

करोनि ब्रह्मयाचें आराधान । ते मूर्ति पावसी संपन्न ।

तेव्हां तुझें बैसेल ध्यान । अन्यसाधन असेना ॥१३६॥

ऐसा करोनि तयास उपदेश । गगनपंथें नामघोष ।

करित चालिलों अत्यंत हर्ष । घडला साधूचिया दर्शनें ॥१३७॥

तदा मुचकंद राजर्षी । तपें ब्रह्मयासि उपासी ।

एक हर्ष निराहारेंशीं । वायुभोजनमात्रें तो ॥१३८॥

होतां ब्रह्मा प्रसन्न । राया द्यावया वरदान ।

मजसहित विंध्याचला लागुन । येता झाला विधाता ॥१३९॥

राजा करोनि दंडवत । प्रणाम भूमंडळी पतित ।

पूजा करी यथास्थित । भक्तिरसें जो अतिआर्द्र ॥१४०॥

देखोनि तयाची शुद्धमती । अनुग्रह करी सत्यलोकपती ।

पाचारोनि विश्वकर्म्याप्रति । मूर्ति निश्चिती करविली ॥१४१॥

अखंड हदयीं जीचें स्थान । अखंड हदयीं जीचें ध्यान ।

ते मूर्ति परम पावन । कृष्णरुपिणी सुंदर ॥१४२॥

बाळभाव जीच्या शरीरीं । काळीयमर्दन कंडुक करीं ।

सर्वाभरण भूषित बरी । मूर्ति घडी विश्वकर्मा ॥१४३॥

बाळभावाचा अर्थ । हाचि कीं परिणाम नसे जेथें ।

तारुण्यजरादि गणना तेथें । नसे सर्वथा हें दावी ॥१४४॥

काळ तोचि काळीय सर्प । सर्व जगीं ज्याचा दर्प ।

स्वभक्तांचिये अनुकंपें । मर्दिला तो काळ्या ॥१४५॥

स्वभक्ता बाध न घडो त्याचा । ह्नणोनि पादतळीं पीडिला साचा ।

यास्तव भजका काळाचा । बाध न घडे त्रिकाळीं ॥१४६॥

हातीं विराजे कंडुक । याचा अर्थ अनेक ।

कंदुकप्राय ब्रह्मांडगोळक । होय तथा करतळीं ॥१४७॥

अथवा कंटुकक्रीडन । भक्ताशीं करी नारायण ।

भक्त तयांसीं अभिन्न । गडी पूर्ण तयाचे ॥१४८॥

बाळभावीं नित्यानंदता । नित्यानंदीं क्रीडापूर्णता ।

हें जाणोनि विश्वकर्ता । मूर्ति करी निर्माण ॥१४९॥

घडली अभिनवमूर्ति । त्रिभुवनीं ऐशी झाली ख्याति ।

पाहूं पातले दिक्पती । सिद्ध साध्य गंधर्व ॥१५०॥

चारण विद्याधर अप्सरागण । मनु मानव पितृगण ।

तेथे पावला पंचबाण । रतीसहित सानंदें ॥१५२॥

पाहोनि मूर्तीचें दिव्यरुप । हरपला कंदर्पाचा दर्प ।

मोह पावला तद्रूप । ठसावलें त्याहदयीं ॥१५२॥

म्हणोनि मदनमोहन । देवीं केलें नामाभिधान ।

सुंदर रुप देखोन । सुंदर कृष्ण हे दुसरें ॥१५३॥

काळीयदमन तृतीय । वासुदेव चतुर्थ नाम होय ।

मुचकुंद वारद पांचवें होय । नाम पावन देवाचें ॥१५४॥

काळयवन निपात केला । म्हणोनि काळयवनांतक नाम पावला ।

गोपिकांसीं करी लीला । गोपीवल्लभ श्रीकृष्ण ॥१५५॥

नंद गोपकुमार । हें अष्टम नाम निर्धार ।

विश्वकर्मनिर्मित सादर । नवम नाम ॥१५६॥

पार्थसारथी दशम । उद्धववरदा एकादशम ।

भक्तेष्टदायक द्वादशम । नामसुंदर जयाचें ॥१५७॥

जो अनंत नामीं आळविला । तोचि द्वादश नामें पावला ।

पाहतां नांवांनिराळा । ठाव रुपाला कैंचा तेथें ॥१५८॥

जेथें नामरुपा ठाव नाहीं । तेथेंचि सर्व दिसे पाहीं ।

सकळ निष्फळपणें दोहीं । वसणें जगत्कारणत्वें ॥१५९॥

सारांश हाचि आत्मा हरी । सच्चिदानंद अनेक परीं ।

लीलाविलासी क्रीडा करी । मायाधारी प्रेमक ॥१६०॥

ऐशी मूर्ति जे घडली । तया नृपास दीधली ।

तेणें ते बहुतकाल अर्चिली । ध्यानीसिद्धि घडली तयातें ॥१६१॥

सगुण साधीनि निर्गुण । ध्यान पावला मांधान नंदन ।

कार्यसिद्धि घडली पूर्ण । झाला मुक्त संसारीं ॥१६२॥

तो अपेक्षी परलोकगमन । म्हणे मूर्ति द्यावी कवण ।

हेंचि चिंती गुणनिधान । चल जाऊं ते स्थळीं ॥१६३॥

तुजलागि ते दिव्यमूर्ति । जाण अर्पील भूपति ।

ऐसें कथोनि चिदानंदाप्रति । नेलें विध्यपर्वती नारदें ॥१६४॥

जेथें राजर्षीचे स्थळ । तपोवन पवित्र केवळ ।

तेथें पातले योगशील । उभयतां हे योगिराज ॥१६५॥

मुचकृंदें देखोनि नारद । विष्णुभक्तिविशारद ।

वंदिला पूजिला भावशुद्ध । सच्चिदानंदसमवेत ॥१६६॥

नारदमुखें सकळार्थ । कळतां तुष्टला नरनाथ ।

म्हणे पात्र झालें प्राप्त । दैवयोगें सुरमुनि ॥१६७॥

मूर्ति बोलिली मुनीहातीं । योगाग्निदग्ध देह निगुती ।

जाळोनि केली विभूती । गेला ब्रह्मभुवनासि ॥१६८॥

नारदगुरुसि करोनि वंदन । दिव्यदेही नृपनंदन ।

स्वर्गा गेला विमानें । बाळसूर्यासन्निमें ॥१६९॥

नारदस्वामीही आपण । पाहूं इच्छोनि ब्रह्मभुवन ।

जात सच्चिदानंदवंदन । करुनि पातले स्वस्थळीं ॥१७०॥

त्यानंतर ते परममूर्ति । पुजिति सच्चिदानंद अतिभक्ती ।

झाली सर्वलोकीं ख्याति । सर्व देखती अभिनव ॥१७१॥

तयांच्या प्रसादें कलिजना । भक्ति लाधली सद्गुणा ।

तरले जे भजले अनन्या । भक्तियोगें पावनें ॥१७२॥

तयांनीं शिष्य ब्रह्मानंद । परम सत्वगुण विशुद्ध ।

अनुग्रह करोनि योगसिद्ध । मूर्ति तया अर्पिली ॥१७३॥

तेही बहुत काळवरी । मूर्ति पूजोनि द्वादशाक्षर ।

येही बहुत शिष्य उदार । केला श्रीविद्याप्रदानें ॥१७५॥

तयां शतांमाजि एकु । मीही उद्धरलों रंक ।

श्रीविद्या प्राप्त झाली सम्यक । द्वादशाक्षर समवेत ॥१७६॥

ब्रह्मानंद पुत्र साक्षात । शिवानंद ते परम भक्त ।

ते स्वमटीं असतां पूजित । बैलूर ग्रामीं यथोचित ॥१७७॥

तेही शिष्य न करितां । सांप्रदाय विस्तार न पावतां ।

देहावसान प्राप्त होतां । जाते झाले शिवपुरा ॥१७८॥

संपूर्ण लक्ष्मीधरावतार । घडतां त्यागिलें पार्थिव शरीर ।

परंतु मूर्ति सुस्थिर । मठीं असतां बैलूरीं ॥१७९॥

मात्र राहिला प्रमदाजन । पूजाधिकार अन्यासि नसोन ।

घडलें कपाट दृढबंधन । नुघडे कवणा बळवंतां ॥१८०॥

बहुत करिती यत्न । परि न घडे कपाट उद्धाटण ।

जाहलें निशिकाळीं स्वप्न । तत्रत्य जनालागुनि ॥१८१॥

येतां पूजाधिकारी । कपाट उघडेल निर्धारीं ।

आतां पूजन करा द्वारीं । भक्तिमंती साक्षेपें ॥१८२॥

तदा सर्वही लोक । द्वारपूजा करिती सम्यक ।

ऐशीं वर्षे कितेक । क्रमलीं तेथें ॥१८३॥

सती अत्यंत माझिया मना । उच्चाट वाटे जाइजे श्रीपाददर्शना ।

दक्षिणयात्रा भ्रमणा । जाऊं गोकर्णा सुतीयां ॥१८४॥

पाहूं बैलूर मूळस्थान । जेथें विराजे सुंदर कृष्ण ।

सर्वजनमनमोहन । मदनमोहन जो होय ॥१८५॥

परंतु बाजी भूपाळनंदन । नानाप्रभू अति प्रवीण ।

तत्सेवनीं रात्रिदिन । अवकाश न घडे सुटाया ॥१८६॥

सर्व संस्थानीं मजप्रति । पाठवितांझ राजकार्यार्थी ।

दाक्षिणात्य सर्व नृपति । करिती प्रीति गुणाग्राही ॥१८७॥

बहुत कार्यभागभार । सुटावया नसे अवसर ।

चित्तीं ध्यास लागला फार । तीर्थयात्रा घडावी ॥१८८॥

अस्मिन्नवसरी पिशुनजनीं । असत्य भाषणें कथोनि ।

अप्रीति उत्पन्न केली मनीं । बाळाजी पंडित प्रधानवर्या ॥१८९॥

हेही देवमाया घडली । संदेह नसतां चित्तवृत्ति फिरली ।

पर्ववत न देखतां ममता झाली । बुद्धि उद्विग्र माझीही ॥१९०॥

इंगितें भाव कळतां जाण । तेंच निमित्त करोनि पूर्ण ।

केलें दक्षिणदेशाटण । तीर्थाटण मुख्यत्वें ॥१९१॥

काशीप्रयागादि त्रिस्थळीं । यात्रा पूर्वीच होती केली ।

दक्षिणयात्रा करणं राहिलीं । मानसीं होती उत्कंठा ॥१९२॥

श्रीशैल वेंकटेश रामेश्वर । मध्यें तीर्थे अनेक तर ।

कांची काळहस्ती चिदंबर । अरुणाचल वृद्धाचलादि ॥१९३॥

श्रीस्वेत वराह उत्तम । सिंह्याळी वैद्यनाथ परम ।

गौरी मायूर निः सीम । मध्यार्जुन कुंभकोण ॥१९४॥

शाङ्गंपाणी चक्रपाणी । नागेश कुंभेश आदिकरुनि ।

चोलमंडळीं नाना स्थानीं । पंचनदादि चंदाउरीं ॥१९५॥

मनार कृष्ण दक्षिणद्वारका । राजगोपाळ मोक्षदायका ।

सेतुंबंधांत अनेक । कमलालयादि सत्क्षेत्रीं ॥१९६॥

सर्व देवतादर्शनें । महानदीतीर्थस्नानें ।

महाक्षेत्रसंवनें । पाप हरलें जन्माचें ॥१९७॥

श्रीरंगशायी भगवान । जंबुकेश्वर आपलिंगस्थान ।

कपिलासंगम गरळपुरीदर्शन । श्रीरंगपट्टणीं श्रीरंग ॥१९८॥

मेलकोट वेलूरचंन केशव । मार्कडेय महाशिव ।

नानास्थळीं नानावैभव । हरिहरमूर्तिदर्शन ॥१९९॥

श्रिंगेरी शंकर शारदांबा । सुब्रह्नण्य अन्नदानशोभा ।

उडपी कृष्ण तो उभा । वैष्णवा मोक्षदायक ॥२००॥

कलूर मूकांबादिशक्ती । त्याहि नमिल्या अत्यंत भक्ती ।

पूजन करोनि यथाशक्ती । गोकर्ण प्रांत पावलीं ॥२०१॥

जेथें आदिगुरुत्थान । बैलूरग्राम परम पावन ।

देखतां झालें समाधान । सिद्धस्थान तें रमणीय ॥२०२॥

जेथें श्रीचक्रप्रतिष्ठापन । सच्चिदानंदकृतदैदीप्यमान ।

तेथील महिमा गहन । वर्णितां मौन वाचेसि पडे ॥२०३॥

केरळ देशिचे मंत्रज्ञ । जे सामर्थ्यवंत महाप्राज्ञ ।

ते असतांही अभिज्ञ । मुद्राधारी या मतिचे ॥२०४॥

संशयाचा परिहार । येथें घडे निश्चयतर ।

ह्नणोनि येती महाचतुर । पुसावया संकटीं ॥२०५॥

ऐसें प्रसिद्ध गुरुपीठ । तें पाहिलें परम इष्ट ।

श्रीचक्रदर्शन करोनि श्रीकृष्ण । देवालया नमस्कारितां ॥२०६॥

अमाप कपाटबंधन । मुक्त होतां झालें दर्शन ।

तत्रत्य जना निदर्शन । घडतां आल्हाद सर्वासि ॥२०७॥

बहुतकाळ पूजा विवर्जित । असतां ह्नणती तेथील समस्त ।

पूजा तुह्मी श्रीकृष्णनाथ । यथान्यायें उपचारें ॥२०८॥

अवश्य म्हणोनि शतदिन । तेथें राहिलों लाभ मानोन ।

त्यांची कृपा संपादीन । आनंद पूर्ण मानसीं ॥२०९॥

स्वप्न झालें तेथिल्यांसी । हे मूर्ति अर्पिजे निरंजनासी ।

हे नेवोनि महाराष्ट्रदेशी । प्रसिद्ध करितील मद्भक्ति ॥२१०॥

अवश्य म्हणोनि तत्रत्य जनी । आमुची वृत्ति ही पाहोनी ।

श्रीकृष्ण वरद जाणोनी । श्रीकृष्ण मूर्ति अर्पिली ॥२११॥

सांप्रदाय संकेत । सर्वासि कळला वृत्तांत ।

लक्ष्मीधरानुग्रहीत । पूर्वपुण्यें असतां कीं ॥२१२॥

शतवार वसतां ते स्थानीं । सर्वासि अत्यंत प्रीति मनीं ।

उत्पन्न झाली देखोनि । लीनता माझी दीनाची ॥२१३॥

वेदांतग्रंथश्रूवणें । अर्थ ऐकतां अति गहन ।

मानिती परम साधन । धन्य ह्नणोनि पूजिती ॥२१४॥

तयांसि होतां निदर्शन । प्रतिमालाभ परम पावन ।

होतां निघालों तेथुन । गोकर्ण स्थान पावलों ॥२१५॥

श्रीमत्पश्चिमरत्नाकर - तीरीं महाबळेश्वर ।

कोटितीर्थ सरोवर । ताम्रगौरी महानदी ॥२१६॥

गोकर्णप्रमाण शिवलिंग । जेथील महिमा अभंग ।

अष्टादशपुराणें सांग । वर्णिती सर्वही आगमें ॥२१७॥

त्रिलोक्यप्रसिद्ध गोकर्ण । सिद्धिस्थळ परम पावन ।

त्रैलोक्य राज्य संपत्ति रावण । पावला गणत्व तदर्चनें ॥२१८॥

तेथील तीर्थविधि संपादोन । महाबळेश्वर पूजन ।

यथा सामर्थ्यकरुन । चालतां तेथुन स्वदेशा ॥२१९॥

अकस्मात एका ब्राह्मणें । तेणें अर्पिला लक्ष्मीनारायण ।

तोही महालाभ गहना । महास्थळीं अकल्पित ॥२२०॥

ऐशी होतां देवता प्राप्ति । संतोषा कोण मापील किती ।

तेथोनि देशी आलों निश्चिती । कोल्हापुरासि श्रीक्षेत्रीं ॥२२१॥

करोनि महालक्ष्मी दर्शन । करवीर क्षेत्र पावन ।

पुन्हा पुण्यनगर निवासस्थान । जेथें सुजन आपुले ॥२२२॥

करोनि महा समाराधन । केलं यात्रांग विसर्जन ।

मंदिरीं स्थापोनि श्रीकृष्ण । यथाशक्ति पूजितां ॥२२३॥

बाळाजी पंडित प्रभुवर । मुख्य प्रधान परिराजेश्वर ।

कृपा करोनि महत्तर । स्वाधिकार यथापूर्वक ॥२२४॥

शिविकादि सकळ संपदा । देवोनि अर्पिलें महत्पदा ।

श्रीरंगपट्टनीं नियोग धंदा । कथिला जेणें ॥२२५॥

महाकार्यभाग घटणा । प्रारब्धप्रवाहें घडली पूर्णा ।

परिमुख्य विश्रांति या मना । अध्यात्म चिंतन हरिभक्ति ॥२२६॥

नित्य ब्राह्मण सहवास । अखंड असतां अध्यास ।

कवितां प्रेरणा मनास । घडविलास शारदेचा ॥२२७॥

आधीं कृष्णानंद सिंधु । रचावया हा प्रबंधु ।

उल्हास घडला सीच्च - । स्वप्न श्लोक स्फुरण होतां ॥२२८॥

पुण्यग्रामीं ग्रंथोत्पत्ति । श्रीरंगपट्टणीं समाप्ति ।

कृष्णानंद सिंधु श्रेष्ठ आति । आनंद दाता सर्वजना ॥२२९॥

समाप्त पावतां हा ग्रंथ । चिद्वोध रामायण उद्वोध घडत ।

निरंतर अंतर स्थित । प्रेरणा करी या मना ॥२३०॥

अध्यात्म रामायण टीका । चिद्वोध रामायण ग्रंथ निका ।

जो आवडतां रघुनायका । प्रेरिला तेणें या वाचे ॥२३१॥

जडवाणी मतिहीन । नसतां कदापि काव्यस्फुरण ।

महाग्रंथ रामायण । अनायासें विरचिला ॥२३२॥

श्रीरंगपट्टणीं आरंभ ग्रंथ । पुण्य नगरीं समाप्त ।

मान्य बहुतां पंडितांत । होतां तोही पाहिला ॥२३३॥

सुंदर कांड पावतां सिद्धि । रामवरद होउनि सत्सिद्धी ।

आपणा पंडित विद्यानिधी । रुपें होवोनि प्रत्यक्ष ॥२३४॥

राममंत्र षडाक्षर । तो उपदेशिला महत्तर ।

रामरहस्य समग्र । प्रकट दाविलें महंतें ॥२३५॥

वर्षद्वय समागम चांग । घडोनि आला प्रारब्धयोगें ।

निरंजन रामायण सांगा । तत्संनिधानी विरचिलें ॥२३६॥

लक्ष्मीधर बाप देव दोन्ही । या रुपें अवतार पावोनि ।

उद्धरावया कृपा करोनि । कळवावया रामतत्त्व ॥२३७॥

आत्माराम मंत्र गहन । षडक्षर तारक ॥२३८॥

जो शिव काशीपुरीं । उपदेश करोनि जन उद्धरी ।

तो मंत्र आह्मासि असतां घरीं । ब्रह्मरुपें अर्पिला ॥२३९॥

शांतदांत पावन गुण । सर्वज्ञ सर्वकळानिपुण ।

रामचि होवोनि आपणा अभिदान । वेदशास्त्रसंपन्न वेदिक ॥२४०॥

रामतत्त्व विचक्षण । अमाय व्यवहार संपूर्ण ।

सर्व जगात्मित्रता पूर्ण । सर्व संपन्न गुणरासी ॥२४१॥

चिद्वोध रामायण । तत्संमतें झालें पूर्ण ।

हें सर्व महिमान गहन । श्रीकृष्ण प्रेरण घटण करितां ॥२४२॥

तेणें मज दीनासाठीं । केवढी केली अटाटी ।

माझी करुणा तयासि मोठी । वाटली दीन उद्धरावा ॥२४३॥

ह्नणोनि अनेक गुरुरुपें । ब्रह्मतत्त्व केलें सोपं ।

सर्व जग आत्माराम रुपें । प्रत्यक्ष देखें अभिज ॥२४४॥

नाना देश संचार करितां । नानास्थळीं फिरतां ।

नानापरिचें सत्पुरुष संता । पाहोनि झालों कृतार्थ ॥२४५॥

भिन्न भिन्न ज्ञान कळाकुसरी । अभिनव बोध चमत्कारीं ।

डोलती आनंद निर्भरीं । परिपूर्ण अंतरीं अनुभवें ॥२४६॥

कोणी राजयोगी हठयोगी । कोणी मंत्रयोगी लययोगी ।

कोणी देखिले शिवयोगी । धुरंधर जे शिवमया ॥२४७॥

निस्पृह कोणी निरभिमानी । कोणी ब्रह्मविद्ये साभिमानी ।

कोणी प्रपंची असोनि । पद्मपत्र समान ॥२४८॥

कोणी लक्ष साधनी दक्ष । कोणी विहंगम मार्ग ।

कोणी लंबिकायोगी दक्ष । प्राशन करिती सुधेचें ॥२४९॥

मंत्र तंत्र साधनी । ते तो अनंतानंत देखिले नयनीं ।

तयातें दुरोनि वंदोनि । सेविले पूर्वील सत्पुरुष ॥२५०॥

याची एक एक कळा । विशेषात्कारें पडलीं डोळां ।

त्यांची कृपा संपादोनि निर्मळा । संग्रह केला त्या विद्येचा ॥२५१॥

जे विद्याब्रह्म वियेसि अनुकूळ । जीच्या साधनीं अनंत फळ ।

दावी प्रत्यक्ष आनंदकल्लोळ । परम सोज्वळ सांप्रदायीं ॥२५२॥

तेचि कळा कळा ह्नणिजे । साजणी इतर नातळिजे ।

जीणें पूर्णता न भजिज तरि ते कळाही अवकळा ॥२५३॥

सकळ कळापूर्ण लक्ष्मीधर । महामौळीचे चरणकल्हार ।

त्याचें करितां स्मरण मात्र । परमानंद मज वाढे ॥२५४॥

ह्नणोनि अहर्निशीं जाण । करोनि तत्पादुकाचिंतन ।

अखंडानंद परिपूर्ण । असों उन्मन सदोदित ॥२५५॥

लोक व व्यवहार । वाद्य दावोनि निरंतर ।

अंतरीं निस्पृह जगदाकार । ब्रह्म देखोनि सुख पूर्ण ॥२५६॥

जेणें स्थिती नये शोच्यता । जेणें स्थिती नये उद्विग्रता ।

जेणें स्थिती राहतां । क्रामक्रोध चित्तां न स्पर्शती ॥२५७॥

जेणें चिंताभिमान । नोहे मोह ममता दारुण ।

अभिलाष वैर मित्रतादि दुर्गुण । जेथे दिसों न सकती ॥२५८॥

ऐशिया स्थितीनें वर्तनां । पाविजे संसारसिंधु पारता ।

याहोनि उपाय कोणता । भवीं तारिता नेणवे ॥२५९॥

त्वां जें पुसिलें रमणी । आह्मी तें घातलें श्रवणीं ।

पुढती आवड असें मनीं । तें तूं पुस प्रियतसे ॥२६०॥

ऐसें निरंजन निजसतीतें । कथन करी प्रेमें बहुतें ।

दास विनवी सज्जनातें । पुढें कथा परिसावी ॥२६१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP