निरंजन माधव - उद्धार पहिला

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


श्रीसुंदरकृष्णाय सुंदरीप्रियाय नमः ॥ श्रीशैलनिलाय ( निलयाय ? ) श्रीनिवासाय नमः ॥ ॐनमो भगवते वासुदेवाय ॥ ॐ श्रीमन्महागणाधिपाय नमः ॥ ॐ श्रीशारदायै नमः ॥ ॐ श्रीमल्लक्ष्मीधरकालिदासगुरुभ्यो नमः ॥ श्रीमहामौळिगुरुभ्यो नमः ॥ॐ॥

 

उद्धार पहिला.

आधी श्रीइष्टदैवत श्रीकृष्णनाथ । सुंदर सुंदरीप्राणनाथ ।

तोचि माझा सद्गुरुनाथ । शारदागणनाथ तो नमिला ॥१॥

एकचि अनेक नामें धरी । एकत्वीं न फुटोनि बहुत्व वरी ।

बहुत्वीं बहुत क्रीडा करी । तरीं एकत्वा नुपेक्षी ॥२॥

असोनि एक दावी बहुत । स्वयोगमाया विस्तारित ।

नामरुपत्वें मिरवत । अस्तिभातिप्रियत्व आछादोनि ॥३॥

पटें आछादिलें सुत । अलंकारें कनकवत ।

तरीं पाहतां शाश्वत । सुत्रकनकत्व यथास्थित ॥४॥

वस्त्रालंकार दोनी । नसोनि भासती आहेपणीं ।

तैशीच योगमायेची करणी । नसोनि भासवी आपणा ॥५॥

ऐशी जयाची योगमाया । नमन करुनि तया सदगुरुदेवराया ।

जयाचे कृपें तरावी माया । तयासि प्रार्थिलें अतिविनयें ॥६॥

स्वामीशिष्यकुळें बहुतें । देखों येती आकुलचित्तें ।

सदगुरुसांप्रदाय कळावयातें । आर्त्त धरिती म्हणौनि ॥७॥

तयांसि सांप्रदाय करावा प्रकट । तेणें तयांचें अविद्याकपाट ।

उघडतां बोधदीप चोखेंट । प्रकाश करील हदयसद्मीं ॥८॥

चकोर चंद्रकिरणाविना । न करिती अन्यरसप्राशना ।

तैसें या सच्छिष्यां गुरुचरितकथना - । वांचोनि तृप्ति न मानें ॥९॥

वनीं असतां पुष्पघोंस । भ्रमर तये रसीं उदास ।

ज्याती - पुष्पांचा विकास । इछिती माधुर्य - रसवेते ॥१०॥

तैशा अनंत लोककथा । लोकीं असतां न मानिती चित्ता ।

सद्गुरुवंशचरितगाथा । अखंड आवडे जयातें ॥११॥

गुरुवंशसूर्योदय होतां । घडेल सुजनहत्कमळा विकासता ।

ब्रह्मरसमकरंद आयिता । बोधरुप स्रवेल ॥१२॥

तयाच्या सेवोनि परिमळ । तृप्त होतील शिष्यअळिकुळ ।

तयासि बोधरस केवळ । देयील पुष्टि स्वभावें ॥१३॥

म्हणौनि कृपावचनी मातें । आज्ञा करावी महामहंतें ।

' सांप्रदायपरिमळ ' ग्रंथातें । रचावया करुणाब्धी ॥१४॥

एवं विनवितां सद्गुरुचरणीं । मान्य करोनि माझी दीनवाणी ।

म्हणती अवश्य शिष्यमणी । कीर्तिपरिमळ प्रकटवीं ॥१५॥

सदां परोपकारकरणी । तुझी इछा विलसे मनी ।

चंद्र निववी जनालागुनि । सहजस्वभावें तद्वत ॥१६॥

पर्जन्य तोहीं उपकारार्थ । काळीं काळीं वृष्टि करित ।

मंद वाहे मलय मारुत । निववावया बहु जना ॥१७॥

ऐसाचि सज्जनाचा स्वभाव । तैसाचि तुझाहीं सद्भाव ।

प्रकट करी अवश्यमेव । सांप्रदायपरिमळ ग्रंथराज ॥१८॥

जेथें साधकषटपदां विश्राति । सज्जनहंस जेथें निवसती ।

सर्व जनाच्या मानस - गती । आकर्षती ज्याविषयीं ॥!९॥

आमुचा कृपावरदहस्त । तुझे मस्तकीं सदोदत ॥

छत्रप्रायें असतां उचित । जगतारण तां करावें ॥२०॥

म्हणवोनि आज्ञापितां स्वामि । साष्टांग दंडवत करोनि भूमि ॥

शिष्य गर्जत सद्गुरुनामीं । प्रेमाल्हादें नाचत ॥२१॥

अष्टभावपुरः सर । पुनः पुन्हा चरणकल्हार ।

नमोनि स्तवोनि अत्यादर - । युक्त परिमळ प्रकाशवी ॥२२॥

निरंजन योगी समाधिविरामीं । स्वानुभवसुखानंदपरमीं ।

रमोनि असतां चिद्धनधामीं । गंगा नमी पादपद्मा ॥२३॥

म्हणे '' कृपासुधाकरा । तूंचि जीवन शिष्यचकोरा ।

निजजनमनोरथमंदारा । चिंतामणी चिंतकां ॥२४॥

तूंचि विज्ञानधाराधर । संतप्त जगदानंदकर ।

माझें मानसकासार । पूर्णकर्ता तूं एक ॥२५॥

त्रिविधतापग्रीष्मतरणी । तापवी सदा देहधरणी ।

क्षणक्षणी चित्तपाणी । आटे तेणें गुरुवर्या ॥२६॥

देहबुद्धीचा कर्दम । एवढाच राहिला निः शीम ।

शिष्यजलौकसां अत्यंत श्रम । आला आतां परिसावा ॥२७॥

नव्हे बुद्धिकंजविकास । न थिरे विचारराजहंस ।

यमादिसाधनपक्षिकुळांस । वस्ती तेथें घडेना ॥२८॥

मनमीनासि उद्विग्नता । आशामकरी धांवती सर्वता ।

वासनाषटपदाची काय वार्ता । पुष्पितलता धुंडितां ॥२९॥

विषयकुटजें प्रफुल्लित । तद्रसीं होय आसक्त ।

इछा चातकाचा आर्त्त । पुरविता कोण स्वामीविना ॥३०॥

आतां करोनि करुणावृष्टि । मेघधारा कृपादृष्टी ।

वर्षतां बोधामृतपुष्टि । घडों सकेल सर्वातें ॥३१॥

बुद्धिकंजाचा विकास । क्रीडा करील विवेकहंस ।

मकरंद साधक षटूपदास । प्राप्त होयील सदोदित ॥३२॥

संसारपांथिकांचा हरेल श्रम । लसलसीत वाढेल बोधद्रुम ।

मुक्तिफळें अतिललाम । अर्पील सर्वा ॥३३॥

वृद्धि पावेल कवितालता । विज्ञानामोदमंडिता ।

सर्वही एक तुझी सत्ता । विश्रामदाता तूं एक ॥३४॥

ऐसें भावें विनवितां । प्रेम उचंबळे योगीनाथा ।

बद्धपाणि पतिव्रता । अनुव्रतापुढें लक्षोनि ॥३५॥

पुसे आवडि तुझे मनीं । काय असे वो भामिनी ! ।

पुसतां कथीन संशयमार्जनी । कथा विचित्र जे असे ॥३६॥

पाहोनि नाथाची प्रसन्नता । पुन्हा चरणीं ठेविला माया ।

म्हणे स्वामी कृपावंता । गुरुसांप्रदायकथा कथावी ॥३७॥

आपण रचिलीं ग्रंथरत्नें । तें म्यां केलीं हदयाभरणें ।

आतां स्वसांप्रदायकथन । शिरोभूषण मज द्यावें ॥३८॥

जगीं एकाच गुरुचे शिष्य । प्रकट दिसती अनंत लक्ष ।

सांप्रदाय तयांचे प्रत्यक्ष । आम्हीं पाहों या लोकीं ॥३९॥

आपण गुरुद्वयाचें स्मरण । सदैव करितां काय कारण ।

अद्वैतभावने एकपण । मानोनि गुरुपद अद्वय ॥४०॥

तथापि माझा संशयछेद । येवढा देवें कीजे विशद ।

माज्ञी प्रज्ञा आहे मंद । म्हणोनि छंद पुसायाचा ॥४१॥

दोंपणीं वस्तु एक । हेंही स्थळस्थळीं सम्यक ।

ग्रंथीं दाविला विवेक । तरी संशयीं हें मन ॥४२॥

हा उघडा दावोनि अर्थ । मनासि बोधितां परमार्थ ।

अढळपदीं विश्रांत । पावोनि राहेल अचंचळ '' ॥४३॥

ऐशी निजप्रिया मधुरवाणी । भक्तिनम्र ऐकतां श्रवणी ।

जितेंद्रिय महामुनी । अनासक्तपणी जो वर्ते ॥४४॥

दीनवत्सळ म्हणोन केवळ । असत, कांतासती प्रेमळ ।

गंगावती सदगुणशील । गुरुबोध विमळ दे तीतें ॥४५॥

म्हणे '' धन्य धन्य हो भामिनी । गुरुसांप्रदाय पुससी झणी ।

गुरुवंशतरणी तुझे कारणी । उदय करील प्रबोधकरें ॥४६॥

चक्रवाकीच्या आर्तीकारणें । उदय पावे सहस्रकिरण ।

त्रैलोक्याचें तमहरण । तया व्याजें होतसे ॥४७॥

एका चातकाचे आर्ती । महामेघ वर्षे जगती ।

तेणें सर्व जीवां जीवनप्राप्ति । सहज घडे तद्वत हें ॥४८॥

तुझें कारणीं कथितां । विश्राम होईल जना बहुतां ।

हाहीं उपकार तुझा तत्वता । झाला दिसे या लोकीं ॥४९॥

आम्हासि सदगुरुचरिताचें स्मरण । तुवां करविलें परमपावन ।

हा उपकार आम्हीं मानिला पूर्ण । त्याचें उत्तीर्ण न घडेचि ॥५०॥

गुरुसांप्रदायबोध । तुज मी करीन विशद ।

तेणें कांही घडेल सिद्ध । उत्तीर्णता सत्य या ललने ॥५१॥

पाहतां आमचा पंथ अगोचर । कोणासि न केला गोचर ।

रत्नें आपुलीं सागर । सांटवोनि असे तद्वत ॥५२॥

तुझ्याच अर्थी जाण । म्यां पूर्वी ग्रंथ रचिले पावन ।

आतां सांप्रदायप्रकाशन । करणें वल्लभे तुजसाठीं ॥५३॥

आतां होऊन सावधान । सांप्रत कथा करी श्रवण ।

आधीं निजवंशप्रकाशन । पूर्वजचरित दावोनि ॥५४॥

श्रीगोदावरीदक्षिणतीरीं । रामडोह नाम ग्रामांतरीं ।

श्रीसामराज क्षेत्रीं । जेथें संगम शिवनदाचा ॥५५॥

प्रतिष्ठानासि पश्चिमेसी । योजनद्वयीं विशेषीं ।

सिद्धेश्वराचे पूर्वेसी । सार्द्ध योजनी ॥५६॥

वरखेडाची शींव । रामडोह प्रसिद्ध नांव ।

ते मातृभूमि निः शीम । ग्रामलेखक ते स्थळीं ॥५७॥

हे वृत्ति असतां वडिलीं । व्यापारमुळें सोडिली ।

विज्यापुरीं वस्ती केली । कीर्ति मेळविली अपाडें ॥५८॥

तेथील पृथ्वीपतीचें सेवन । तेणे प्रतिष्ठा वाढली पूर्ण ।

परोपकारी धुरीण । सदाचारी अतिशयें ॥५९॥

माहदो बनाजी नाम प्रख्यात । वैष्णवामाजि धुरीण वर्त्तत ।

पूर्वी कथिले प्रल्हादादि भागवत । त्यांमाजि गणना जयांची ॥६०॥

चौघे पुत्र केले उत्पन्न । तेहीं साधू परमनिपुण ।

दीनवत्सल सज्जन मान्य । कुशल पंडित सकळकळीं ॥६१॥

तयांसि वोपुनि अधिकार । आपण झाले तीर्थचर ॥

यात्रा करोनि दक्षिणोत्तर । वैराग्यपूर्वक परमशीळ ॥६२॥

शूर्पार क्षेत्र कृष्णातीरीं । जेथें अश्वत्थरुपें वसे नरहरी ।

सेवोनि हरिभक्तिसुधामाधुरी । अंतीं निजधाम पावले ॥६३॥

त्यांचें करितां महत्व वर्णन । ग्रंथ अगाध वाढेल जाण ।

तत्रापि विष्णुभक्ताचे गुण । वर्णनीं कोण समर्थ ॥६४॥

जैसे नारायणाचे अगाध गुण । वर्णनी निगमहीं नव्हे निपुण ।

तैसें सद्भक्तांचें चरित्रवर्णन । नव्हे कोणासि निश्चयें ॥६५॥

चौघां पुत्रांमाजि मध्यम । तिमाजी पंडित हें जया नाम ।

तयांचेंहीं ऐसें कर्म । दुष्कर सर्वथा कलियुगीं ॥६६॥

विष्णुभक्त महोदार । परमगुणी परमचतुर ।

सव्यापसव्यविद्याप्रचुर । गायन गंधर्वसमान ॥६७॥

सकळकळारत्नाकर । वसती विज्यापुर नगर ।

तें टाकिलें अवांतर । होतां दिल्लीपतीचे ॥६८॥

श्रीशेषाचला जाउन । केलें कुळदैवत दर्शन ।

महत्व होतें केलें अर्पण । ज्या स्थळिचें त्या स्थळीं ॥६९॥

चौघे पुत्र एकी कन्या । गोदावरी ते अंगना धन्या ।

पतिव्रतांमाजि मान्या । अरुंधतीसमान ॥७०॥

रुपौदार्य भूतदया । स्वपरविषयीं समान माया ।

इतुकें कुटुंबसहित पायां । शरण गेले वेंकोबाच्या ॥७१॥

करोनि स्वामि पुष्करणीस्नान । संपादिलें श्रीचरणदर्शन ।

त्रिरात्रि क्रमितां स्वप्न । ज्ञालें यांसि ॥७२॥

ज्येष्ठ पुत्र भीमराय । चतुर्दश वर्षे त्याचें वय ।

तत्कनिष्ठ वेंकटेश माधवराय । त्याहोनि अवर ॥७३॥

त्याचे पाठी हनुमंतराव । कन्या भगवती शुद्धस्वभाव ।

पांच अपत्यें महानुभाव । देवगर्भवत कर्तृत्वें ॥७४॥

ज्येष्ठ पुत्रातें अधिकार । त्या देशीं कथोनि वेंकटेश्वरें ।

कर्नाटकीं केले स्थिर । स्वप्नीं दृष्टांत होवोनि ॥७५॥

न करितां मनुजांचें सेवन । तिमाजीपंतीं आमरण ।

भगवद्भजन पुस्तकलेखन । करोनि काळ दवडिला ॥७६॥

सर्वोपनिषदें भारत । गीताभागवतादि ग्रंथाच्या प्रति बहुत ।

लेखन करोनि ब्राह्मणातें । समर्पिल्या असंख्य ॥७७॥

त्यांचे पुत्र भीमराव । अधिकार करितां महानुभाव ।

स्थापिलें तेथतेथें भूमिदेव । विष्णुभक्त सदाचारी ॥७८॥

त्यांसि वृत्ति दिधल्या कल्पुन । ते अद्यापि भोगिती ब्राह्मण ।

जयासि आचंद्रार्क निधन । घडेचिना ॥७९॥

लोकां वाटे स्वल्प देणें । म्हणोनि चालविती अधिकारी जन ।

तेणें संतुष्ट ब्राह्मण । अन्नाछादन निश्चित ॥८०॥

असो; तेहीं केली कीर्ति । काशी रामेश्वर मध्यवर्ती ।

त्या समयीचे पुरुष नेणती । ऐसें नाहीं वर्त्तले ॥८१॥

त्यामाजि आमुचे जनक । धातुमाजि जैसें कनक ।

तद्वत हरिभक्त गुणविवेक । लेखनकर्मी अप्रतिम ॥८२॥

साधु संपन्न सकळगुणी । येकाकार अमत्सरें ॥८३॥

आमुची माता भागीरभी । पतिव्रता सद्गुणकीर्त्ति ।

देवभक्ता प्रसन्नमती । कुळदेवता भगवती प्रसन्न ॥८४॥

प्रत्यक्ष स्वप्रदर्शन । प्रत्यक्ष करावें भाषण ।

ऐसें महिमान गहन । असतां पावन तिचे कुसीं ॥८५॥

आमुचा जन्म तेथें होतां । कर्नाट देशीं असतां ।

कंचीप्रांतीं पुण्यसरिता । वेगवती अतिधन्या ॥८६॥

पक्षितीर्थसमीप भूमि । तेच आमची जन्मभूमी ।

तेथेंच पितरां वैकुंठधामीं । गमन करणें तें घडलें ॥८७॥

काळकर्मरणानुबंधें । तो देश सूटला सात्सिद्ध ।

आम्हा येणें घडलें शुद्ध । महाराष्ट्रदेशांतरीं ॥८८॥

शाहू भूपतीचा प्रधान । बाजीराव बल्लाळ पृथ्वीरत्न ।

परमयशस्वी पावन गुण । भूपाळमंडणशिरोमणी ॥८९॥

गुणरत्नाचा परीक्षक । स्वयें सद्वगुणपूर्ण अशेख ।

तेणें संग्रह केला सम्यक । ज्येष्ठ बंधूसह आमुचा ॥९०॥

त्यामुळें वसतां सप्तऋषी । शाहूनगर वायीं देशीं ।

राजधानी पुण्यविशेषीं । घडो आली प्रसिद्ध ॥९१॥

तेथें वसतां आमुची स्थिति । अल्पवयसा विद्यार्थी ।

संस्कृतविद्याग्रहणार्थी । आवडि जीवीं निःशीम ॥९२॥

आस्थापूर्वक सांगणार । न मिळती कोणी विप्रवर ।

सर्वहीं अर्थकामातुर । भरणें उदर मुख्य स्वार्थ ॥९३॥

तेणें न घडतां समाधान । पंडितशोध करितां ममें ।

नाम ऐकिलें परम पावन । लक्ष्मीघर स्वामि सद्गगुरुचें ॥९४॥

प्रातःकाळीं पुण्यवेळा । दर्शनार्थ जातां सदनाला ।

अमृतसिद्धियोग फावला । अकल्पित काकताळें ॥९५॥

असतां समाधिविरामीं । पद्मासनीं एकांतसद्मीं ।

साष्टांग नमन पादपद्मीं । केलें नामगोत्र कधोनि ॥९६॥

कथिला साकल्य वृत्तांत । विद्याभ्यासमनोगत ।

धन्य दिवस कीं समर्थ । लाभ घडला चरणाचा ॥९७॥

ऐकोनि आर्थिक विनवणी । मंदस्मितपूर्वक वाणी ।

बोलती गंभीर मेघध्वनि । मनमयूरा आनंदकर ॥९८॥

हातीं महारुद्र वीणा । स्वरें ज्ञानेश्वरीपारायणा ।

करित असतां आनंद मना । झाला ज्यांच्या श्लोकार्थे ॥९९॥

' अनन्याश्चिंतयंतो मां ' हा श्लोक । जेथें व्याख्यान सम्यक ।

त्याच समयीं मज दीनाचा उल्लेख । ऐकतां हरिख वाटला ॥१००॥

म्हणती अवश्य यावें नित्य । व्याकरण पढत जा पढवीन सत्य ।

हेंचि आमुचें आहे कृत्य । विद्या दीजे विद्यार्थियां ॥१०१॥

पूगीफळ अर्पिलें हातीं । निरोप दीधला गृहाप्रती ।

प्रारंभ कीजे सन्मुहूर्ती । ह्नणोनि काळ नेमिला ॥१०२॥

पुण्य दिवस सुमुहूर्तकाळीं । सिद्धांतकौमुदी आरंभिली ।

नित्य सहवासीं कळों आली । बुद्धि अर्थग्रहणाची ॥१०३॥

कुलशीळ आचार चातुरी । लीनता वचनमाधुरी ।

एकनिष्ठताही बरी । जाणों आली मानसा ॥१०४॥

कित्येक ब्राह्मण विद्यार्थी जन । नाना शास्त्रें करिती पठण ।

तयांत मज दीनावरि मन । विशेष बैसलें सप्रेमें ॥१०५॥

पूर्वजन्मकर्मयोगें । या देहीं कृपा घडली चांग ।

अंतरंग अथवा बहिरंग । सांगणें निः संग मज दीना ॥१०६॥

येकांतीं लोकांतीं असतां स्थिति । तेथेंही निः शंक माझी गति ।

कांकीं पाचारोनि प्रीति । बैसविती मज सन्निध ॥१०७॥

सहवासें सर्वार्थविशद । कळों आला परिशुद्ध ।

परस्परें मनाचा अद्वंद । प्रेमा वाढला चंद्रचकोरवत ॥१०८॥

षण्मासपर्यंत संघट्टणीं । कृपा उपजली अत्यंत मनीं ।

माझीही निष्ठा जडली चरणीं । महिमा देखोनि निः शीम ॥१०९॥

सकळविद्या सकळकळा । तेहीं येथेंचि आश्रय केला ।

सारांश मुख्य ज्ञानकळा । व्यासवशिष्ठवाल्मीकतुल्य ॥११०॥

मंत्रशास्त्रीं दक्षिणामूर्ति । व्याख्यानकथनीं बृहस्पती ।

स्वरुप पाहतां मदनमूर्ति । त्रैलोक्यप्रमदामोहक ॥१११॥

आचार महाऋषीप्रमाणें । नारद तैसं वीणावादन ।

आलाप गंधर्वासमान । कविता प्रत्यक्ष काळिदास ॥११२॥

ज्यांची कविता ऐकतां श्रवणी । ब्रह्मानंदस्वामि सद्गगुरुनीं ।

लक्ष्मीधर काळिदास या अभिधानीं । गौरविलें सत्कृपें ॥११३॥

ज्यांचे ग्रंथ गीतप्रबंध । सर्व गाताति गायक सुविद ।

जैसे पूर्वी रामानंद । वरदराज तत्तुल्य ॥११४॥

भूतदया निः संगता । संसारविषयीं अलोलुपता ।

लक्ष्मी आनंदी उभयता । महासती असतां कळत्र ॥११५॥

त्यांहीं परस्परें अभेदपणीं । प्रीतीनें वर्तती जैशा बहिणी ।

एकास एक न देखतां क्षणीं । हानि वाटे परस्परें ॥११६॥

श्रीमंत, कीर्त्तिमंत, प्रतापवंत । विद्या कुळशीळ आचारवंत ।

सर्व येवोनि संत महंत । नित्य दर्शन सेविती ॥११७॥

जितुके कळाधर पृथ्वीवरी । जे जे आले शाहूनगरीं ।

तेही प्रथम येवोनिया मंदिरीं । कृपा पावोनि उद्धरावें ॥११८॥

ऐशी अनंत गुणाची ख्याति । किती मी वर्णीन मूढमती ।

बरवे उपनाम कोंकणप्रांतीं । उत्पन्न चित्तपावन सत्कुळीं ॥११९॥

ज्ञानेश्वरीचा करोनि शोध । लोकीं केली प्रसिद्ध ।

ते गोविंदभट्ट बरवे सत्सिद्ध । तीर्थस्वरुप या स्वामीचे ॥१२०॥

प्रसिद्ध नाम बापुभट्ट । ऐसें आळविती श्रेष्ठ श्रेष्ठ ।

सकळ राजप्रधान इष्ट । दैवततुल्य मानिती ॥१२१॥

शाहु राजयाची परम प्रीति । ग्रामभूमि देउन स्थिति ।

चालविती जैशी निश्चिंती । घडे यांच्या तपाची ॥१२२॥

कोण्याविषयीं अपूर्णता । तेथें न वाटली चित्ता ।

मी रंक काय ते गुणगाता । होईन समर्थ एकमुखें ॥१२३॥

ऐसें वर्त्ततां शुभदिनीं । माझी उघडली भाग्यखाणी ।

तेव्हां आदरें बाहोनिं । कथिला दृष्टांत स्वप्नींचा ॥१२४॥

तुजवरि श्रीची कृपा पूर्ण । कळों आलें आम्हां निदर्शन ।

म्हणोनि केलें हस्तग्रहण । सानंदपूर्वक आलंगिलें ॥१२५॥

तेचि रात्रि उपः काळीं । मजही स्वप्नप्रतीति झाली ।

साक्षात् चित्कळा आनंदवल्ली । दृष्टी देखिली प्रसन्न ॥१२६॥

मंदस्मितपूर्वक बोलोनि । मछ दीधला माजे पाणी ।

तात्काळ जागृति झाली झणी । अद्यापि ते मूर्ति मनीं आहेचि ॥

काय वर्णु ते कळा । काय वर्णु ते बाळा ।

काय वर्णु ते लीळा । अद्यापी डोळां दिसतसे ॥१२८॥

ऐशी चित्कळासुंदरी । प्रत्यक्ष होतां स्वप्नांतरीं ।

तया आनंदाच्या लहरी । मानसी उठतां निः शीम ॥१२९॥

त्या आनंदाची होती मिठी । त्यांतचि पडली ऐशी गांठि ।

महा गुरुच्या मुखें गोष्टि । ऐकिली देवताप्रसादाची ॥१३०॥

म्याहीं पाहोनि प्रसन्नता । स्वप्नार्थ निवेदिला सदगुरुनाथा ।

प्रिये ! त्या समयीची आनंदउद्धोधता । झाली गुरुचित्ता काय वर्णु ।

तेच क्षणीं कृपा करुन । महानंदपुरः सर मनें ।

महाविद्या प्रदान । पंचाम्नाय तत्क्षणीं ॥१३२॥

सद्गगुरुसांप्रदायपूर्वक । वासुदेवविद्यांत अशेख ।

गुरुपादुका महावाक्य । चतुष्टयसह सम्यक उपदेशिलें ॥१३३॥

सर्व समुद्रजीवन । उदरीं सांठवोनि महाघन ।

एका चातकार्थ संपूर्ण । वृष्टी करी तद्वत ॥१३४॥

मीं दीन रंक पतित । अपात्र असतांहीं सद्गगुरुनाथ ।

महामेध वर्षत । खदिरनिंबचंपक हें न ह्नणतां ॥१३५॥

जो समद्रष्टा महाराज । त्याचें वर्षण एकचि काज ।

खदिरचंपक भेद नुपजे । कदापि त्यासि ॥१३६॥

जाति कुळ वयसा । हेही नाठवे तया पुरुषा ।

प्रसन्न काळीं जगदीशा । विष्णूसि तद्वत येथेंहीं ॥१३७॥

ध्रुव बाळक गजेंद्र पशु । अजामीळ पापाचा कळसु ।

गणिका पिंगळा तीचा दोषु । न पाहतां ते उद्धरिली ॥१३८॥

अनंतानंत जीव कोटी । उद्धरोनि वसविलें वैकुंठीं ।

तैशीच हेंहीं घडली गोष्टि । लक्ष्मीधरें माझा उद्धार केला ॥१३९॥

मी सहज असतां भेदमती । अल्पवयसा हीन मती ।

नसतां साधनचतुष्टय संपत्ति । मुमुक्षुता ते स्वप्नींहीं ॥१४०॥

नेणों काय घडली कृपा । दीनबंधु या नांवाची त्रपा ।

धरोनि अपल्या रक्षोनि पडपा । मीं रंक पापा उद्धरिलें ॥१४१॥

सहज घडतां कृपादृष्टि । जळोनि जन्मांतरपातकोटी ।

अधिकार घडला उठाउठी । महाविद्येची भेटी मज पामरा ॥१४२॥

हा करुणाकटाक्षाचा प्रसर । वांचोनि मत्साधनाचा नोहे प्रकार ।

म्यां कोणता संपादिला संस्कार । कीं मज महाविद्या ते द्यावी ॥१४३॥

कमळ पाहतां पंकजात । तत्रापि कंटकें वेष्टित ।

तेथें सूर्यानुग्रहें घडत । इंदिरावास तद्वत ॥१४४॥

मलय पर्वतीं उत्पन्न । कंटकीं वृक्ष अति दुर्गुण ।

तेहीं घडती चंदन । वायुप्रसादें ते स्थळीं ॥१४५॥

तैसा मीहीं रंक । नसतां योग्यतेचा अंश येक ।

कृपारसघनोदक । वृष्टि होतां उद्धरलों ॥१४६॥

लोह परिसाची भेटी । घडतां सहज सुवर्ण खोटी ।

तैशीच हेहीं महिमा मोठी । काळिमा निरसोनि सुवर्ण करी ॥१४७॥

असो सद्गगुरुमहिमा थोर । वर्णू नेणती ब्रह्महरिहर ।

तेथें मीं काय किंकर । वर्णु सकेन अल्पबुद्धि ॥१४८॥

आतां सद्गगुरुपरंपरा । तुज वर्णितां महोदारा ।

जे श्रवण करितां पापसागरा । शोषण घडे तात्काळ ॥१४९॥

म्हणोनि सुंदरी ! एकभावें । श्रवणी सादर असावें ।

जें श्रवण करितां स्वभावें । भुक्ति मुक्ति सत्सिद्ध ॥१५०॥

ऐसें गंगावतीप्रति । योगी निरंजन स्वकथा कथी ।

दास विनवी संतांप्रती । महिमा पुढती परिसावीं ॥१५१॥

इतिश्रीमत्सद्गगुरुसंततिसंतानलतिकायाः प्रबोधमंगळमंजर्याः ॥ प्रसादपरिमळवर्णनं नाम प्रथमोद्वारः ॥ श्रेसुंदरकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभमस्तु ॥ वोव्या ॥१५१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP