निरंजन माधव - उद्गार दुसरा

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


॥ श्रीमत्तुलजापुर - निल्लयायै नमः ॥

निरंजन म्हणती प्रेमवती । श्रवण करावी कथा पुढती ।

सद्गगुरुपरंपरा निगुती । जे महामहंती मानिली ॥१॥

ज्यांचें करितां स्मरण । अखंड चुके जन्ममरण ।

भुक्ति मुक्ति धडे पावन । योगशासन बाणें आंगीं ॥२॥

सकळ दुष्कृताच्या रासी । तूलाचलवत क्षणमात्रेंशीं ।

जळोनि जाति निश्वयेशीं । प्रतापंद्रीपस्पर्शमात्रें ॥३॥

जो आदिगुरु नारायण । क्षीराब्धिवास शेषशयन ।

जो धराइंदिरेचा रमण । अखंड पूर्ण अद्वय जो ॥४॥

जो सच्चिदानंदपदवाचक । जो सकळ निष्कळ स्वरुपक ।

जो जगल्लीलानाटक । मायानायक तद्भिन्न ॥५॥

जयाचे भ्रूमंगलीलामात्रें । माया सृष्टि रची विचित्रें ।

अनुग्रहें पाळोनि सर्वत्रें । उपेक्षितां विनाशी ॥६॥

ऐसा जो इंदिरामण । योगनिद्राविलासी आपण ।

असतां करी जगत्कलन । व्यापकत्वें सर्वसाक्षी ॥७॥

तोचि स्वस्वरुपबोधनार्थ । हंसदत्तशिवादि स्वरुपें घेत ।

ब्रह्मकुमरांदिकां बोधित । ब्रह्मातत्त्व तें अकलंक ॥८॥

जयांचा बोध होतां जीवा । मायाबंध नुरोनि पावती अनुभवा ।

ऐक्य घडोनि जीवाशिवां । निर्वाणपदा पावती ॥९॥

तें निर्वाणपद निरामय । अगाध अच्युत अव्यय ।

सच्चिदानंद बोधमय । माया तत्कार्यशून्य तें ॥१०॥

अखंड प्रकाश अखंड रस । मुक्तिधाम तें अविनाश ।

जेथें पावतां प्रवृत्ति नसे । निवृत्ति न भासे भिन्नत्वें ॥११॥

ऐसे जें पद अनंत । तेचि पावती सदोदित ।

तब्दोधनार्थ स्वयें घेत । गुरुरुपें अमित प्रतियुगीं ॥१२॥

यामाजि मुख्य दत्तमुनि । जो संभवला अनसूयागर्भरत्नीं ।

अत्रीतपाचें फळ भर्वसेनी । जगतारक तो आदिविष्णु ॥१३॥

अवधूतवेषें विराजत । वातरशन तो परमशांत ।

भस्मांगराग जया शोभत । व्याघ्रचर्म परिधान ॥१४॥

अक्षमाला कमंडल । उभयहस्तीं शोभे विमल ।

हें निदर्शन कीं मज्जप निर्भळ । करितां फळ त्यां अमृत मीं दातां ॥१५॥

माथां विलासे जटाजूट । अत्यंत विमल हेम पिंगट ।

मंदस्मितें वोष्टपुष्ट । शोभती नेत्र कारुण्यें ॥१६॥

वाराणसीपुरीस वसणें । कोल्हापुर ते जपस्थान ।

मातापुरीं भिक्षाटन । सह्याद्रिशयन सदोदित ॥१७॥

व्यापक असोनि सर्वस्थानीं । ऐशी क्रिडा दाखवी जनीं ।

तो आदिगुरु दत्त महामुनी । सांप्रदाय कल्पतरुमूळ ॥१८॥

जो स्वानंदबोधमकरंदतुंदिल । जयाचें परिशुद्ध हदयकमळ ।

विलासपराम सोज्वळ । महिमा परिमळ जगद्भरित ॥१९॥

ऐसा जो दत्त आदिगुरु । तच्चरणपंकजीं साष्टांग नमस्कारु ।

जो अनादि विद्या बोधी सादरु । विमलानंदमुनीतें ॥२०॥

तया विमलानंद मुनीस नमस्कार । जो विलसे चिद्गगनाकार ।

ज्ञानविज्ञानपरपार । स्वप्रकाशपर परंज्योति ॥२१॥

जना सच्चिदानंद बोधाकारणें । शिवावतार प्रत्यक्ष पूर्ण ।

म्हणोनि विमलानंद अभिधान । शोभे महा गुरुवर्या ॥२२॥

अमृतानंद योगीराज । तेथोनि प्रकटले बीजाद्वीज ।

तैसें स्वरुप अनुभवोनि निज । अनुभव देत निजशिष्यां ॥२३॥

दीपापासोनि दीपज्योति । प्रकाश विलसे एकस्थिती ।

पराविद्या स्वयंज्योति प्रकाश करिती । ब्रह्मानंद मुनीस नमन माझें ॥

ते ब्रह्मानंद महामुनी । ब्रह्मावबोधमकरंदपानी ।

सदां डोलती निजस्थानी । महा उन्मनी भोगवंत ॥२५॥

आत्मानुभूति सुंदरी । विलासे क्रीडती हदयमंदिरीं ।

व्यापक असोनि सर्वातरीं । जगदोद्धरार्थ संचार लोकीं ॥२६॥

जयाच्या अंगवातस्पर्शे । सकलजनमनमळां घडे नाश ।

तयांचे सेवनीं निः शेष । त्रैलोक्यसाम्राज्यपद प्राप्त ॥२७॥

घडतां त्यांचा अनुग्रह । तोचि घडे आनंदविग्रह ।

तदां माया भवग्रह । कैंचा उरे बाधक ॥२८॥

येहीं पाहतां अज्ञ । तेहीं घडती मुमुक्षु ॥२९॥

पुन्हां विमलानंद नामक । तेहीं शिष्य करितां सम्यक ।

त्यांपासोनि प्राप्त विवेक । सच्चिदानंद मुनिराज ॥३०॥

जो सच्चिदानंद निष्कळ । तोचि हावतार सकळ ।

जेणें चराचर अखिल । सच्चिदानंदमय दाविलें ॥३१॥

योगियांमाजि शिरोमणी । परमदक्ष षटचक्रभेदनी ।

पराप्रासादचिंतनी । शांभवी मुद्रा अनुकूळें ॥३२॥

सहस्रदळीं अखंड ज्योती । भोगितां न पावे परावृत्ति ।

त्रैलोक्यसाम्राज्यविभवस्थिति । निजानुभूति भोगित ॥३३॥

षण्मास वर्ष वर्ष गणीं । अखंडसमाधि एकासनी ।

कर्ध्वास्नायचिंतनीं । काळ गणी तैं कोण ॥३४॥

जया समाधीच्या पोटीं । हारपती ब्रह्मांडाच्या कोटी ।

दशा भोगिती जीच्या देंठीं । हरिहर ब्रह्मादि ईश्वरत्वें ॥३५॥

यीचा करितां विस्तार । ग्रंथ वाढेल फार ।

ज्ञानसुधेमाजि प्रकार । आहे पूर्वी बदला हा ॥३६॥

गोकर्णमहाबळ समीप प्रांतीं । समीप पश्चिम आपांपती ।

शुभोदा तटिनी विलसे अति । पुण्यजळा पावन ॥३७॥

तीच्या तटीं महावनीं । तप आचरतां महामुनी ।

माध्यान्हकाळीं समाधिउत्थानी । श्रीनारद मुनी पातले ॥३८॥

देखोनि मुनीचा आश्रम । हरला नारदाचा भ्रमणश्रम ।

क्षणभरि येथें करावा विश्राम । ऐसें समर्था आवडलें ॥३९॥

प्रवेषता आश्रमांत । देवऋषी झाले हर्षित ।

स्थळ सोज्वळ अत संमार्जनोपलेपनी ॥४०॥

स्थळस्थळीं सरोवरें । मंडित कुमुदकळहारें ।

सर्वरुतु फळभारें । तरुवरशाखा अतिनम्र ॥४१॥

आश्रमा आकल्पित नारद मुनी । पातले समर्थ जाणोनि ।

पूजनार्थ फळें घेवोनि । नम्र पुढें तें वितिष्ठतीं ॥४२॥

कासारी कमळविकास । देखोनि वाटे नारदास ।

अतिथी मीं पाहोनि उल्हासें । हास्य करी वनराज ॥४३॥

कोकिलादिकांचें कूजन । ऐकोनि मानिलें नारदमनें ।

यावें ह्नणोनि आकारण्झ । क्रिती मातें सद्विज ॥४४॥

लता गळित सुमनें । होतां मानी मुनीचें मन ।

पुरसुंदरीवत लाजावर्षण । करिती ऋषिराज मीं प्रवेषतां ॥४५॥

मंदवातें कदळींआंदोलन । तेंचि वाटलें परभव्यजन ।

कोविदार तरु चामर समर्पण । तेथें उठती वेण्स्वर ।

तो वाद्यवादनप्रकार । घडे आगमनी श्रेष्ठांच्या ॥४७॥

ऐसें नानाविध उपचार । वनराज अपी भक्तिपुरः सर ।

सच्चिदानंदयोगीश्वर । सहवासें सद्वुद्धि जडातें ॥४८॥

नारद मुनी दिव्यदर्शन । उटज प्रवेषतां पावन ।

सच्चिदानंदीं लोचन । उघडितां पुढें अकस्मात ॥४९॥

गगनीहुनि अमृतफळ । अकल्पित पडे तात्काळ ।

तेंवि तें नारददर्शन केवळ । प्राप्त झालें मुनिवर्या ॥५०॥

मस्तकीं जटाजूट पावन । तप्तजांबूनदसमवर्ण ।

आंगीं भस्मोद्धूलन । शुभ्रवर्ण अति विलसे ॥५१॥

ब्रह्मचर्यवेषें मंडित । सहजसमाधिस्थ अखंडित ।

ब्रह्मवीणा स्कंधीं शोभत । सामगान नामपूर्वक ॥५२॥

मुकुंद हरी नारायण । वासुदेव संकर्षण ।

प्रद्युम्न अनिरुद्ध वामन । दशरथनंदन रघुपती ॥५३॥

गोपीरमण मदनमूर्ति । कृष्ण विष्णु परंज्योति ।

नृसिंह भार्गव वराहमूर्ति । हयग्रीव दत्त शिव नामें ॥५४॥

सप्तस्वंरीं हा उच्चार । सदां चालिला मंद्र स्वर ।

ऐसा योगियांमाजि शेखर । भक्ताग्रेसर ज्ञानमणी ॥५५॥

मुनिजनांचें शिरोभूषण । तापसांचें परम निदान ।

कर्मठांचें बुद्धिभेदन । करोनि दाखवी निजपंथ ॥५६॥

ऐसा अनंतगुणरत्नाकर । देखतां प्रत्यक्ष ऋषिवर ।

सच्चिदानंद मुनि सादर । साष्टांग करी नमनातें ॥५७॥

ऐकोनि गंगा विस्मित । प्राणनाथ प्रश्न करित ।

म्हणे स्वामी मनुष्यांसि प्राप्त । देवदर्शन दुर्लभ ॥५८॥

या चर्मचक्षुसि देवतादर्शन । नव्हे ऐसें प्रत्यक्षप्रमाण ।

कधीं नसे केलें श्रवण । कैसें हें संघट्टण वदावें ॥५९॥

तत्रापि नारद देवरुपी । तयाचें दर्शन मानवासि ।

अतिदुर्लभ जो हषीकेशी । कलावतार वर्णिला ॥६०॥

जो व्यासवाल्मीकां गुरु । जयाचा त्रिलोकांत संचारु ।

ऐसा नारद रुषेश्वरु । प्रत्यक्ष केविं मुनिवर्या ॥६१॥

ऐकोनि सतीचा प्रश्न । निरंजन मुदितमनें ।

उत्तर देती प्रसन्न । अंतः करण जयांचें ॥६२॥

कमळमुखी । तुझा आक्षेप । ऐकतां निवे त्रिविधताप ।

आतां न धरोनि विक्षप । मानस की सावध ॥६३॥

योगियां देवतादर्शन । घडे प्रत्यक्षप्रमाण ।

पतंजली वदले आपण । तेहीं परिसें प्रिये तूं ॥६४॥

सिद्धासन शांभवी मुद्रा । लक्ष लागतां योगींद्रा ।

पक्षमास स्थिर होतां निद्रा । हारपोन अनिमिषत्व प्राप्त घडे ॥६५॥

तेव्हां देवतादर्शन । योगिया घडे जाण ।

ऐसें असें शासन । योगपंथीं ॥६६॥

जो अखंड समाधिस्थ चिदानंदमुनि । समाधि तुयंदशेचा धणी ।

तयासि नारदें कृपा करोनि । दर्शन दीधलें यथार्थ ॥६७॥

याविषयीं नवल । तां न मानिज केवळ ।

योगी तोचि देव निखळ । त्यासि देवतादर्शन दुर्लभ नसे ॥६८॥

असो सकळ योगियांचा राजा । नारद त्रिलोकीं याच काजा ।

फिरोनि भगवद्भक्ति वोजा । प्रकट करी सज्जना ॥६९॥

तो आदिगुरु नारद । पाहतां मुनीभाव शुद्ध ।

सर्वोपचारी पुजोनि सविध । बद्धपाणी विनवित ॥७०॥

स्वामी त्रैलोक्यप्रकाशका । दर्शन देवोनि मज रंका ।

उद्धार केला भवपंक । शोषणकर्ता तूं दिनमणी ॥७१॥

गंगा लोटली अळसियावरि । तेचि येथें झाली परि ।

मीं पामर तूं कृपालहरी । अमृतनिधीची प्रत्यक्ष ॥७२॥

अनंतकोटिजन्माच्या लाभ । आजि मज झाला सुलभ ।

जो तुं त्रैलोक्यदुर्लभ । प्राप्त झालासि मद्भाग्वें ॥७३॥

सुरासुरनमस्कृत । देवरुषी तुं ब्रह्मसुता ।

तुझा महिमा अनंत । अनंत तोहीं तुज वश्य ॥७४॥

तुझें स्वरुप अच्युत । अच्युतानंद भगवंत ।

तुंचि सनातन सदोदित । मायानिरस्त तूं एक ॥७५॥

आतां माझा उद्धार । करावया प्रत्यक्षतर ।

तूंचि पातालासि चक्रधर । वीणाधर होवोनि ॥७६॥

जैसा सूर्यनारायण । लोकोपकारार्थ करी भ्रमण ।

स्वामी तुझेंही संचरण । दीनोद्धारण कराया ॥७७॥

आतां माझा उद्धार ! होय तो कथावा प्रकार ।

स्वामि समर्थ सर्वेश्वर । भक्त परम सर्वेश्वराचे ॥७८॥

ऐकोनि सच्चिदानंद मुनिवचन ! देखोनि योगी परम पावन ।

सर्वज्ञ ऋषी अंतः करणीं । निर्मळ जाणोनि सर्वेतरत्वें ॥७९॥

म्हणती तुं योग्य मुनी । योगा निपुण परमज्ञानी ।

परंतु भगवद्भजनीं । निष्ठा कांहीं धरावी ॥८०॥

या कलयुगीं परस्मार । तारक भगवद्भक्ति निर्धार ।

भक्तीवांचोनि अल्प प्रकार । लोकोद्धारक असेना ॥८१॥

कलियुगीं उत्पन्न जना । भक्तीवांचोनि अन्यसाधना ।

अधिकार सर्वथा असेना । कांजे तेहीं तूं परिसीं ॥८२॥

अल्प आयुष्यवळपौरुष । बुद्धिसाधन अशेष ।

पापवासना विशेष । इंद्रियलोलुपता परद्रोह ॥८३॥

जिव्होपस्य रसविषय । सर्वासि अभिमन हाच होय ।

सर्व तत्साधनीं उपाय - करणीं प्रवर्तती स्वच्छंद ॥८४॥

टाकोनि वेदशास्त्रांचे मार्ग । प्रजा वर्तती उन्मार्ग ।

वर्णसंकरप्रसंग । शूद्रप्रायशा धर्मवक्तें ॥८५॥

स्त्रिया व्यभिचाररत्न । पातिव्रत्यादि धर्मदूषित ।

होवोनि वर्ततील तयांचा प्रांत । नरकवास यां सर्वां ॥८६॥

ब्राह्मणादि त्रिवर्ण । तैं तों घडतील धर्महीन ।

शूद्र विलोभ नीचजन । आचार्य धर्मोपदेशक ॥८७॥

शूद्रांचें शिष्यत्व ब्राह्मण । अंगीकरोनि होतील धन्य ।

मंत्र देऊन अकुलीन । ब्राह्मणसेवन इछिती ॥८८॥

ऐसे अनंत दोष । कली प्रसवेल सावकाश ।

तेणें घडेल प्रजांचा नाश । पापाधिक्यें मुनिवर्या ॥८९॥

पूर्वयुगाप्रमाणें । योग यज्ञ धर्मदान ।

श्राद्धवत तीर्थ पावन । करुं न सकेति याजना ॥९०॥

या युगीं मुख्य सार । भगवद्भक्ति पावन निर्धार ।

कैशीहीं आचरतां नर । पावे परपार भवाब्धीचा ॥९१॥

ह्नणोनि मुख्य भगवद्भक्ति । आचरोनि प्रकटिजे लोकांप्रती ।

हेंचि तारी निश्चिती । नाव होवोनि कलिजना ॥९२॥

येथें नसे क्रमहानि । प्रत्यवाय न धडे कैशानी ।

स्वल्पहीं धर्म महाभयापासुनि । रक्षण करील निर्धारें ॥९३॥

योगी आपण एकटा एक । पावे परमात्मध्यानसुख ।

भोगी समाधि सम्यक । ब्रह्मबोध निष्टंक पावोनि ॥९४॥

तयांसि परांचा उद्धार । करणें न घडे साचार ।

ब्रह्मबोधग्राहक चतुर । असती कलियुगीं दुर्लभ ॥९५॥

कठिण योगीं कोणाची मति । रीघ करुं न सके पुरती ।

ह्नणोनि बहुतेक भ्रष्टती । योगप्राप्ति दुर्लभ ॥९६॥

कलियुगीं भगवज्रजन । हेंच मुख्य सार जाण ।

ऐक पूर्विकाचें वचन । भक्तिमार्गसाधक ॥९७॥

ज्ञानयोगसहस्त्राद्धि भक्तियांगो विशिष्यते ।

इति सचिंत्य भक्तिरग्रे कृता बुधैः ॥छ॥

याच कारणें योगसिद्ध । तुज पाहोनि परम शुद्ध ।

मी पातलों प्रसिद्ध । कलियुगीं भजन प्रवर्तविजे ॥९८॥

तूं आहेसि अधिकारवंत । अध्यात्मनिष्ठ योगपारंगत ।

सकळसटुणमंडित । महापंडित धर्मज्ञ ॥९९॥

आतां वासुदेवद्वादशाक्षर । मोक्षविद्या परमसार ।

जपति सात्वतवृंद थोर । भीष्मोद्धवादि हरिजन ॥१००॥

विधिसनकादि प्रजापती । अस्मदादि देवर्षी इंद्रादि दिग्पती ।

सप्तऋषीहीं श्रेष्ठ अति । तेहीं जपती हे विद्या ॥१०१॥

वागीश्वरादि सुरगुरु । ज्योतिश्चक्रचाळक धुरु ।

म्यांच उपदेशिला उत्तानपादकुमारु । जो विष्णुपद पावला ॥१०२॥

ऐसे ऐसे महानुभाव । सात्वत महाऋषी देव ।

लोकीं जयांचा प्रभाव । अद्भुत वर्णिती पुराणें ॥१०३॥

ऐशी संपादोनि सिद्धी । लोकीं पावले प्रसिद्धी ।

शेखीं शोभती विष्णुपदीं । सारुप्यसायुज्यपदलाभें ॥१०४॥

जे किंचिद्भेदें भजले । ते सारुप्यपद पावले ।

अभेदभजनें विराजले । सायुज्यमुक्ति हरिरुप ॥१०५॥

वासुदेवः सर्वभिति । अद्वैतबोध जयाप्रति ।

तयांसि सायुज्यमुक्तिप्राप्ति । भगवद्वचन प्रत्यक्ष ॥१०६॥

ह्नणौनि सर्व प्रकारें । वासुदेवभजन करोनि नरें ।

मुक्ति पाविजे अविचारें । हेंच सांगतों तुज मुनि ॥१०७॥

व्यासवाल्मीकांसि पूर्वी ऐसा । म्यांच उपदेश केला द्विजेशा ।

वेदविभागसामर्थ्य व्यासा । आलें पुराणाचार्यत्व ॥१०८॥

वाल्मीकें मूळरामायण । गायत्रीअर्थप्रतिपादन ।

करोनि मारिलें विश्व तेणें । वाशिष्ठरामायणहीं करोनि ॥१०९॥

बत्तीस सहस्त्र ग्रंथ सिद्ध । अध्यात्मबोध प्रसिद्ध ।

राजयोगपदवी अगाध । उपदेश तयांत परोपरी ॥११०॥

सारांश हेंच सांगणें । वासुदेवविद्या परमगहत ।

तें तुं करीं ग्रहण । मुक्ति पावन करतळीं ॥१११॥

ऐकोनि नारदाचें आदेशवचन । सच्चिदानंद करिती विज्ञापन ।

देवा आजि करुणाधन । वोळलासि मज दीनावरि ॥११२॥

स्वामी माझा संशयनिरास । करोनि यावा उपदेश ।

तुझिया भाषणें अत्यंत कलुषा । बुद्धि माझी पावली ॥११३॥

स्वामी दत्तादि गुरुपरंपरा । महाविद्या षोडशाक्षरा ।

उर्ध्वाम्नाय उपासना धुरा । पंचाम्नायपूर्वक ॥११४॥

अनुत्तरादि पूर्वाम्नाय । जे जे आले सांप्रदायें ।

तयांचा जप यथान्यायें । करोनि वसें परम सुखी ॥११५॥

तत्प्रभावें षडचक्रभेदन । सामर्थ्य पावलों अतिगहन ।

आतां तव पादपद्मदर्शन । तत्प्रभावें मज घडलें ॥११६॥

परमशिवविद्या हे श्रेष्ठ । हेंचि मुक्तिचें मूळपीठ ।

नाहीं यासम वरिष्ठ । सर्वेष्टसुखसार हें ॥११७॥

भुक्तिमुक्तिदायक पावन । जें पावतां सर्वज्ञपण ।

प्राप्त होय निः संशय जाण । महिमा वर्णन करी कोण याचा ॥११८॥

शिवब्रह्मजीवैक्यभावन । येणें मन घडलें उन्मन ।

महासुखपदवी पूर्ण । भोगीतसें जी गुरुकृपें ॥११९॥

देवऋषीं हें परमसार । जेणें पद पावलों अगाधतर ।

तयासि सांडोनि द्वादशाक्षर । ग्रहण करणें केवि घडे ॥१२०॥

परम शिवमय झालें मन । परशिवमय झालें ज्ञान ।

परशिवमय ध्यान । सर्वेशिवमय हें जग ॥१२१॥

सर्वशिवभावन । अखंडाद्वयबोध गहन ।

प्राप्त असतां गुरुकृपेनें । तत्त्याग करणें केवि घडे ॥१२२॥

गुरुत्याग उपासनात्याग । पूर्वील त्यागोनि अनेग ।

संपादिजे नूतन प्रसंग । हाहिं कैसा ऋषिराया ॥१२३॥

मंत्रत्यागें अधोगती । गुरुत्पागें रौरवप्राप्ति ।

अंधतमीं ते नर पडते । अपुनरावृत्ति जेथुनि ॥१२४॥

असूर्यनामक ते लोक । अंधतमें दाटले देख ।

ते पावती निः शंक । गुरुसांप्रदायथागकर्ते ॥१२५॥

असूर्यानाम ते लोका अंधेत तमसावृता ऐशी श्रुती ।

जे लोक सांगे तत्प्राप्ति ।

घडतां ह्नणिजे अधोगती । श्रुतिस्मृतिप्रमाण ॥१२६॥

गुरुमंत्रद्रोही नर । तें स्थळ पावती निर्धार ।

करतळीं मुक्ति प्राप्त असतां इतर । उपासना ते किं समर्थ ॥१२७॥

आरोहण करोनि शिखरीं । अधः पतन तयापरीं ।

हाहीं भाव निर्धारीं । वाटे मजला सर्वज्ञा ॥१२८॥

या दोषा नातळतां । मंत्रविरोध न होतों

योगचर्या न पावतां । पराभव समर्था ॥१२९॥

अविरुद्ध मंत्र द्वादशाक्षर । प्राप्त होतां अंगीकार ।

विरुद्धे तया नमस्कार । अप्राप्त मातें ह्नणोनि ॥१३०॥

शिवविष्णुभेदप्रतिपत्ति । उपासना भिन्न यथास्थिति ।

असतां ऐक्य घडे केंवि निगुतो । कृपा करोनि वदावें ॥१३१॥

ऐकोनि सच्चिदानंद वचन । नारद अत्यंत प्रहष्टमन ।

परमरहस्यउपदेश गहन । करिते झाले कंजाक्षी ! ॥१३२॥

शिवविष्णुऐक्यप्रतीति । बोध केला यथास्थिति ।

तोचि प्रसंग तुजप्रति । कथितों सती ! श्रवण करीं ॥१३३॥

नारद ह्नणती चिदानंदा । निगमागमविशारदा ।

सत्यवादी योगसिद्धा । शुद्धबुद्धा तूं ऐकें ॥१३४॥

परा प्रसाद चिंतन । परम शिवस्वरुप गहन ।

तेथें वेधलें तुझें मन । समरस भान ( भनि ? ) जीवशिवा ॥१३५॥

झाली परमानंदप्राप्ति । विवेकबळें निश्चित्ती ।

योगमार्ग हीं षडचक्रपंथीं । भेद करोनि सहस्रारीं ॥१३६॥

शिवज्योतिशीं संयोग । जीवशक्ति कुंडलिनी अव्यंश ।

ऐक्य पावोनि अभंग । झालासि जिंतोनि कळीकाळा ॥१३७॥

जन्ममृत्युजरादि व्यवहार । हाहीं झाला परिहार ।

परि राहिला किंचित पदर । भेदबुद्धीचा ॥१३८॥

शिवविष्णु भिन्नमती । हे तुज राहिली निश्चिती ।

याची व्हावया शांति । उपदेश सुमती करितसें ॥१३९॥

भेदभावना काळकूट । तया परिहारोनि सुभट ।

अमृतपान शुद्धवट । करवीन अद्वैतश्रवण करीं ॥१४०॥

शिव विष्णू वांचोनि कांहीं । चराचरीं अन्य नाहीं ।

हें जग उभयात्मक निश्चयीं । विवेकें विलोकी सादरें ॥१४१॥

पराप्रासादविद्या गहन । शक्तिस्वरुप निर्वाण ।

तोचि विष्णु आदिकारण । शक्तिरुपें प्रकाशत ॥१४२॥

पुरुषरुप जो साक्षी । तोचि कूटस्थ शिव अनुलक्षीं ।

चंद्रचंद्रिकाभेदपक्षीं । प्रमाण मानिजे कैसेनि ॥१४३॥

दीपज्योति सूर्यप्रभा । गगनगगनीचा गाभा ।

द्विधा केवि मानिजे शुभा । भेद नसतां तद्वत ॥१४४॥

निष्कळ ब्रह्म परिपूर्ण । धरितां सृष्टिकरण स्फुरण ।

शिवशक्तिस्वरुपचिंतन । करोनि होणें द्विविधत्वें ॥१४५॥

आपणचि पतिपत्नी घडोन । क्रीडे विश्वरुप धरोनि पूर्ण ।

पत्नी शक्ति ते विष्णु जाण । पुरुष आपण परमात्मा ॥१४६॥

शिवशक्त्यात्मक जग रची । उभयस्वरुपें आपुणचि ।

विलसती चराचरीं हेचि । प्रत्यक्ष चिन्ह अवलोकीं ॥१४७॥

योनिलिंगावांचोनि कांहीं । चराचरीं अन्य नाहीं ।

यदर्थी श्रुति प्रमाण तेहीं । परिसीं ताता ॥१४८॥

विष्णुर्योनि कल्पयतु । ऐसा श्रुतीचा सिद्धांतु ।

स्मृतिवाक्यार्थहीं व्यक्तु । परिसें आतां ॥१४९॥

योनिरुपो भवेद्विष्णुलिंगरुपी सदाशिव इति ।

ऐसीं प्रमाणें असंख्याती ।

उभयचिन्हप्रतीति । लोकीं दिसे आवीटां ( ? ) ॥१५०॥

यां उभयांवांचोनि कांहीं । चराचरीं अन्य नाहीं ।

ब्रह्मांडांतर्बाह्य पाहीं । अन्य नसे याविना ॥१५१॥

प्रकृति पुरुष दोनी । नाम मात्र भर्वसेनी ।

प्रकृतिपुरुषां विष्णुशिवपणीं । अभिन्न वतेणें उभयतां ॥१५२॥

जें आठरुपें प्रकृतीचीं । तेंचि आठरुपें शिवाचीं ।

अष्टमूर्ती हे भवाची । परिसे बापा ॥१५३॥

भूमि आप अनळानिळ । आकाश चंद्र सूर्याग्नि केवळ ।

शिवाष्टमूर्ती निवळ । वर्णिवी शास्त्रें ॥१५४॥

भूमिरापोनलो वायुः । खंमनो बुद्धिरेव च ।

अहंकार इनीये मे । भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥१५५॥

गीतासंमति ऐसी । अष्टधा भिन्नत्व प्रकृतीसि ।

ते माझी ह्नणोनि हषीकेशी । कथिली पार्था ॥१५६॥

तूं म्हणसी मनबुद्धि अहंकार । तेथें भिन्न व्यवहार ।

सूर्याग्नि चंद्रासि ऐक्यत्व कवण्या प्रकारें । साधेल ऐसें ॥१५७॥

मन तोचि निशाकर । बुद्धि ते दिवाकर ।

जाठर तो अहंकार । जाणिजे सिद्ध ॥१५८॥

एवं अष्टधापणी । तोचि विराजे पिनाकपाणी ।

तोचि शक्तिरुप चक्रपाणी । भेद कवणी मानिजे ॥१५९॥

ऐशी अनंतानंत प्रमाणें । शिवविष्णुऐक्यविषयीं जाण ।

उभयभेदभावन । तेंचि पतन सर्वथा ॥१६०॥

तेचि हानि तोचि क्षय । तोचि मृत्यु तेंचि भय ।

उभय ऐक्य मोक्ष अभय । येथें संशय न धरी तुं ॥१६१॥

न करितां पूर्वगुरुत्याग । न करितां परता राजयोग ।

उपासना अव्यंग । असतां भजें विष्णूतें ॥१६२॥

याचें हेंचि कारण । तुज निवेदितों जाण ।

मोक्षदाता नारायण । नेम केला ॥१६३॥

बंधशक्तीनें बंधन । करोनि जीवा संसृतिभ्रमण ।

करवौनि मोक्ष शक्तिगुणें । मुक्ति देणें विष्णूचें ॥१६४॥

॥ श्लोक० ॥ बंधको भवपाशेन भवपाशाच्च मोचकः ।

कैवल्यदः परंब्रह्म विष्णुदेव सनातनः ॥

उभयशक्तिस्वरुपें । बंधमुक्तिपटणरुपें ।

जीवांसि चेष्टवी अरुपें । असतांहीं ॥१६५॥

अळंकार असतां पूर्ण । धरिजे विशेषें शिरोभूषण ।

तैशी सर्वोपासना मुकुटमंडण । महाविद्या हे मुनी ॥१६६॥

ऐकोनि नारदादेशवाणी । परमानंदनिर्भर सच्चिदानंद मुनी ।

साष्टांग लाटेला नारदचरणी । धन्य मानोनि आपणातें ॥१६७॥

म्हणे स्वामी करुणासिंधु । तुम्ही यथार्थ दीनबंधु ।

तुमच्या दर्शनें संसारसिंधु । वत्सपाद मानावा ॥१६८॥

सहज तुमचें आगमन । जया सदनी काकताळप्रमाणें ।

तया नरा सकळ कल्याण । साधन सर्वा सिद्धिचें ॥१६९॥

मोक्ष तुमचा अज्ञाधार । कृपा होतां स्वल्पतर ।

त्या नरा सेवी सत्वर । ऐशी उदार हे पदमहिमा ॥१७०॥

शिवविष्णुसामरस्य । प्रत्यक्ष बोधिलें रहस्य ।

अट्यबोधप्रकाश । सर्वथा घडला ॥१७१॥

चिदग्रंथि भेदोनि स्वल्पतर । उरला होता पदर ।

तोहीं झाला परिहार । रहस्यबोधें आपुलिया ॥१७२॥

पूर्व उपासनेहुनि । विशेष लाभ मजलागुनि ।

आजि पडतां उपेक्षिजे काय म्हणोनि । दीनोंद्धरणीं रक्षितां ॥१७३॥

असतां सकळ संपत्तीं । निधी जोडिला अकल्पितीं ।

तथा उपेक्षी ऐसा मूढमति । कोणी न दिसे त्रिभुवनीं ॥१७४॥

म्हणोनि शरणागतवत्सला । द्वादशाक्षरी उपदेशिजे मला ।

मस्तक चरणीं ठेविला । का न वोडविला सन्मुख ॥१७५॥

नारदें मस्तक स्पर्शोनि पाणी । सादर अवलोकोनि कृपे करुनि ।

द्वादशाक्षरी विद्यामणी । हदयपेटिके ठेविला ॥१७६॥

प्राप्त होतां महामनु । उब्दोघ दाटला अतिगहनु ।

अष्टभावें भरला पूर्णू । सागरपर्वी उचंबळत ॥१७७।

तैसा उद्वोध वाढला । तो स्वस्वरुपीं सांठविला ।

अनूर्मि सिंधुवत राहिला । गंभीराशय निजबांधें ॥१७८॥

पुन्हा नारदाप्रति विज्ञप्ति । मुनी करी बद्धहस्तीं ।

दीनबंधु ब्रह्ममूर्ति । वचन माझें परिसिजे ॥१७९॥

आजिपर्यंत शिवध्यान । हदयीं ठसावलें गहन ।

आतां चिंतिजे नारायण । श्रीनिरंजन वासुदेव ॥१८०॥

विना कांहीं अवलंबन । न घडे वाटे सकळ ध्यान ।

यास्तव ध्येयमूर्ति पावन । द्यावी मजलागोनि योगींद्रा ॥१८१॥

सकळ ध्यानावांचोन । निष्कळ सर्वथा नोहे पूर्ण ।

म्हणोन मूर्तीवांचोन । नव्हे मनन ध्यानरुप ॥१८२॥

ऐसे ऐकतां श्रवणी । मस्तक तुकोनि नारदमुनि ।

बद्ध भ्रुकटी चिंतनी । त्रिभुवनभुवनी तो पाहे ॥१८३॥

एक मुहूर्त संपूर्ण । नारद ध्यातां अविकंपन ।

तत्समयीं स्मरलें जाण । प्रियतमे ! तया सर्वज्ञा ॥१८४॥

तेव्हां प्रफुल्लिता वदन । मुनिमुखा करोनि अवलोकत ।

म्हणे तुझें भाग्य गहन । सूचलें निधान अकस्मात ॥१८५॥

तुवां इछिली मूर्ति । ते अद्भुत आहे यथास्थिति ।

जे पूजी मुचकुंद नृपती । विंध्यपर्वतीं अभिनव ॥१८६॥

तें मी तुज करवीन प्राप्त । मजसवें चालावें निश्चित ।

ऐसें वदतां विस्मित सत्मित । मुनी पुसत देवऋषीतें ॥१८७॥

स्वामी मुचकुंद तो कवण । कोणी नृपाचा नंदन ।

तो करी अर्चन । ते मूर्ति कवण वदावी ॥१८८॥

तो कां देयील मजप्रति । निजाराधित भगवन्मूर्ति ।

तेयासि जाहली तत्प्राप्ति । ते कथा निगुतीं वदावी ॥१८९॥

तेणेंकरुनि हें मन । विशेष पावेल समाधान ।

श्रीकृष्णमहिमा गहन । वाढेल पूर्ण या लोकीं ॥१९०॥

मज दीनाचा उद्धार । दर्शनमात्रें घडला साचार ।

उरला नाहीं स्वल्पतर । संदेह किमपि उदारा ॥१९१॥

ऐकोनि मुनीची आदरवाणी । म्हणे कथा परिसे श्रवणीं ।

जे ऐकतं पापधूणी । घडे सहस्रां जन्माची ॥१९२॥

हे कथा पावन । तात्काळ सोडी भवबंधन ।

तुझें देखोनि प्रेम गहन । वाटे कथन करावें ॥१९३॥

ऐसें बोलोनि सादर वचन । सन्मुख मुनीस घेउन ।

नारद कथा कथे पूर्ण । ते मी वदेन पुढिल्या प्रसंगीं ॥१९४॥

कांतें । तूंही सादर मनें । कथा परिसें अतिपावन ।

मुमुक्षुजना जीवन । भवजीवनतारणनौका हे ॥१९५॥

हे कृष्णकथा परमसार । साधककुळां मंदार ।

हे मुक्तिफळदातार । महाबल्ली अमृतमय ॥१९६॥

इति श्रीसद्गुरुसंततिसंतानलतिकायाः प्रबोधमंगळमंजर्‍याः अनुग्रहपरिमळप्रकाशनं नाम द्वितीयोद्वारः ॥ श्रीसुंदरकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP