सोळा  - सहस्त्र - सदनीं यदुराज नांदे
सत्कीर्ति तारक करुनि जगीं जनां दे
वेदोनियां पद शिरीं वरदा तयाचें
वर्णीन तें गुण - गणाऽमृत दातयाचें ॥१॥
भौमासुरा वधुनियां रण - संगतातें
स्त्रीवृद षोडश - सहस्त्र अनंग - तातें
द्वारावती - पुरिस देउनि दिव्य यानें
त्या धाडिल्या नृप - सुता अजि अव्ययानें ॥२॥
एके घडीसचि धरी सकळां करीं तो
आत्माचि जो जडजिवां सकळां करीतो
जो भूमि - पुत्र मुरुदैत्य वरा हरीतो
सोळा - सहस्त्र नवर्‍या नवरा हरी तो ॥३॥
सोळा - सहस्त्र - वरही जळजाऽक्ष झाला
तें कायसें अजि अशक्य अधोक्षजाला
सस्त्रीक षोडश - सहस्त्रचि देवदेवें
केले विवाह समयीं वसुदेव देवें ॥४॥
देवकी प्रति - गृहीं वर - माय जो जगांत नवरा वर - माय
तोचि हा प्रति - गृहीं नवरा हो जो मनीं म्हणति मानव राहो ॥५॥
घर - बापही प्रतिगृहीं वसुदेव प्रतिमंदिरीं सकळ - रुपहि देव
यदुवीर आप्त अवघे प्रतिगेही हरि दाखवी इतर लोक उगेही ॥६॥
जोशी - पुरोहितहि तोचि मुकुंद झाला
जे सावधान म्हणताति तया अजाला
एक्याच लग्नसमयीं अवघ्या - करीं तो
हातें धरी जगहि जो निमिषें करीतो ॥७॥
मोजितां दशशतें  - द्विअष्टकें मंदिरें सकळ मंगळाष्टकें
व्यापिली प्रभु - गुणाऽमृताक्षरीं व्याप्त जेविं हरि तो क्षराक्षरीं ॥८॥
गर्जती द्विजचि ते श्रुभ - नादी अन्य मौनपर बंदिजनादी
मंगळत्व इतरत्व न साहे मंगळप्रद कथा परिसा हे ॥९॥
नरक अद्वय पाश जो हरी वरि तयां युवतींस तो हरी
द्विज तयाच सुमंगळाऽष्टकीं रमतिं तेच जगीं अभीष्ट कीं ॥१०॥
दुर्गें सर्व चुरा करी सहमुरा मर्दूनि भौमासुरा
निर्दाळी असुरां सुखी करि सुरां साधूजना भूसुरां
भौमाच्या कुमरा समर्पुनि धरा जाऊनि त्याच्या घरा
धाडी स्वाऽत्मपुरा स्त्रिया निजपुरा सोळासहस्त्रा वरा ॥११॥
भौमक्ष्माधिपती - स्त्रिया कुळवती सोळासहस्त्रा सती
आणी शौर्यगंती हरुनि कुमती तों पावला श्रीपती
युद्धीं दैत्यपती वधूनि युवती धाडी स्व - गेहाप्रती
त्यांतें द्वारावतीमधें हरि अति प्रेमें वरी येरिती ॥१२॥
श्रीमद्वारवती पती खग - पती - स्कंधीं बसे श्रीपती
बामांकीं सुदती अलंकृतवती श्रीसत्यभामा सती
एवं दैत्यपती वधूनि युवती सोळासहस्त्रा कृती
आणी हंसगती वरी यदु - पती नामेंचि जो दे गती ॥१३॥
रुक्म्याची अनुजा समुद्र - तनुजा दे पत्र रामाऽनुजा
धाडी गुप्त अजासमीप नृपजा नामें सुदेवा द्विजा
तेव्हां श्री - गिरिजा - गृहीं स्व - सहजा आणी सुधा सिंधुजा
मर्दी अश्वगजा चमू निज - भुजा - वीर्ये हरी पद्मजा ॥१४॥
भावाच्या मरणीं मुकुंद - करणी सत्राजितें स्थापुनी
घाली आळजनीं स्यमंतक - मणी नेला म्हणे चोरुनी
ऋक्षाच्या सदतीं वनीं हुडकुती आणी हरी त्याक्षणीं
प्रायःश्वित्त मनीं करी सह - मणी श्री - सत्यभामाऽर्पणीं ॥१५॥
माझा राम धणी यदुत्तमपणीं आला न जाणें घृणी
झोंबे त्यासि रणीं कळोनि करणी पायीं स्व - चूडामणी
अर्षी श्री - चरणीं स्यमंतकमणी तो जाबवान् सद्गुणी
वंदी पायवणी पदांबुज धणी घे ऋक्ष - कन्यार्पणी ॥१६॥
कालिंदी यमुना फणींद्र - दमनावांचुनि ते अंगना
अन्यातें वरिना म्हणूनि वचना या बोलिली अर्जुना
आली कृष्णमना गजेंद्रगमना आणूनि चंद्राऽनना
पाहोनी सुदिना वरी सुनयना आनंद सर्वा जना ॥१७॥
आतेचा पति जो अवंति नृपती तत्कन्यका श्रीपती
जाणोनि स्वरती स्वयंवर गती श्रीमित्रविंदा सती
आणी द्वारवतीप्रति क्षितिपती जिंकोनि जे वर्जिती
भाऊ दुष्टमती तिचे परतती दुर्यो धनाचे व्रती ॥१८॥
वज्राचे दिसती वईल असती बांधे तया हे सती
कन्या नाग्नजिती म्हणे क्षितिपती देईन ऐशा व्रती
बांधे विश्वपती म्हणोनि सुमती अर्पी सुता त्याप्रती
आणी द्वारवती प्रियेस नृपती जिंकोनि मार्गी किती ॥१९॥
आतेची दुहिता तिच्या निज हिता जाणोनि माता पिता
भाऊ त्याच मता धरुनि विहिता मार्गीच ते सु - स्मिता
देती कीं चरिता स्मरोनि जनिता पावे गती तत्वता
तो हा विश्व - पिता वरु निजसुता भद्रावती सुव्रता ॥२०॥
कोणी एक करीं धनुष्यचि धरी जें सज्ज कोणी करी
एवं भूप वरी न राजकुमरी जो विंधिला यापरी
त्या चापेंचि हरी स्वयंवर वरी लक्षूनि नीरीं वरीं
विंधी मत्स्य वरी तयास नवरी श्रीलक्ष्मणा सुंदरी ॥२१॥
त्याच्याचि वैवाहिक मंगळाष्टकें गाती विवाहीं द्विज मंगळाष्टकें
हें आयके माधव देव सुद्विजां सोळासहस्त्री वरि दे वसु द्विजा ॥२२॥
ज्या मंगळें मंगळ याजनाचें चरित्र तें रम्य निरंजनाचें
भावें अशा वर्णिति मंगळाला मुखें जयाच्या रस हा गळाला ॥२३॥
सावधान हरि संत - रक्षणीं त्यासि दे न कधिं अंतर क्षणीं
सावधान म्हणती द्विजन्म ते यानिमित्त असि बुद्धि जन्मते ॥२४॥
अंतिंचे घडिस अंबुजेक्षणीं अंतरी बुडवि अंबु जे क्षणीं
कामिनी बुडविती मनास त्या मानि ती सफल कामना सत्या ॥२५॥
जडत्व भ्रांतीचें कपट सरलें अंत्रपट तो
दिसे सच्चित्तंतू प्रगट नयनीं निष्कपट तो
सहस्त्रें सोळाही प्रकृति वरिती सत्पति सत्या
अनन्या चिच्छक्ती वरिति सगुणा श्रीपतिस त्या ॥२६॥
माइका कपट - अंत्रपटातें वारिती युवति निष्कपटातें
आत्मतंतु शतधाच पहाती अक्षता मणिमयांकितहातीं ॥२७॥
भ्रांति - अंतरपटा विरहातें वारितां मग परस्पर हातें
अक्षताच शिरिं अक्षत - मोतें अर्पिताति नवलान गमो तें ॥२८॥
जई त्या चतुर्वक्त - अष्टाक्ष - तातें स्त्रियांच्या शिरीं अर्पिलें अक्षतांतें
तंई ऊठती नाद वाद्यांत नाना द्विजीं मंत्र गंधर्व - वृंदीं तनाना ॥२९॥
मृदंगादि नाना ध्वनी गायनाचे सुरस्त्री - नटी - वृंदही गाय नाचे
दिशा व्यापिल्या सर्वही अंबराच्या असा नाद लग्नांत पीतांबराच्या ॥३०॥
मुक्ताफळातें द्विज अक्षतांतें श्री कुंकुमें रंगुनि अक्षतांतें
करुनियां अर्पिति वेद - वादी ते पाहती कौतुक यादवादी ॥३१॥
लाधल्या नवरिया हरिला ज्या होमिती सकळ सुंदरि लाज्या
हस्त हस्त - कमळीं युवतीचें श्रीपती धरि नितंबवतीचें ॥३२॥
द्याकार दे धनद बैसुनि दक्षणातें
संतोषवी नवरियां कमलेक्षणातें
दातृत्व देउनि दरिद्रपणास त्याला
धाडी दिगंत वरितो हरि त्या सत्यांला ॥३३॥
कामें करी दशशताक्ष हरी समोर
देखूनि नृत्य करि जेविं घनास मोर
सर्वाऽग - लोचन मयूर सुरेंद्र साचा
घे लाभ मेघ - तनु - कृष्ण - कृपा - रसाचा ॥३४॥
जे ते गृहीं मणिमयांऽक  - विवाह - वेदी
जो तो अहेर सुर देव - बरा निवेदी
गाती मुकुंद - गुण गायक सार वेदीं
कीजे तसें स्तवन मूर्ति धरोनि वेदीं ॥३५॥
सोळासहस्त्र - सदनीं हरि भोजनातें
अन्नें सुधामय चतुर्विध भो जनातें
स्त्रीरुप हें धरुनि आणि स्व - अन्न पूर्णा
सर्वास वांटुनिहि वाटित अन्नपूर्णा ॥३६॥
भाज्या साठि भरी तयांत हि परी रांधूनि शाकंबरी
पात्रें तेचि करीं धरी तदुपरी वाटी स्वशाकंबरी
वामांकीं नवरी घराप्रति हरी दिव्यासनाऊपरी
त्यातें हें अमरी असे सुखकरी वाढूनि कोशिंबरी ॥३७॥
पात्रें सुवर्ण - मणि - निर्मित्त विश्वकर्मा
मांडूनि दाखवि तया निज - शिल्पिकर्मा
बैसावया जडित पाट पुढें चवाया
ताटातळीं इतर बैसुनि आंचयाया ॥३८॥
गंगा स्वयें मूर्तिमती जनाला दे वारि जैं बैसति भोजनाला
स्नानें जिच्या मुक्ति अजी वदावी ते तीर देहें यदुवीर दावी ॥३९॥
संतोष हो हरिचिया पद - सारसातें
भावें अशा वरुण घेउनि सारसातें
वाटी जिभेसि रुचि दे बरवी जनाच्या
ऐशा गती रस - पती करि भोजनाच्या ॥४०॥
सद्यपक्क रस जे गिरिजा ते आणि हे धरणि वाटित जाते
शर्करादिक दलाम्र - रसाचा दाखवी वरुण आदर साचा ॥४१॥
श्री कामधेनु पुरवी जन हो रसातें
स्त्रीमूर्ति होउनि घृतादिक - गोरसातें
दुग्धादि तें जडित पात्र करुनि घाली
वाढावया भुवन - सुंदरि ते निघाली ॥४२॥
साय आणिक दत्द्यां दुधताका वाढिते मदत - केतु पताका
दे स्वरुप - रस जे रसिकांजी जीपुढें रतिहिजे रशिकांजी ॥४३॥
जें शक - दुर्लभ तसें निज तक वाढी
नासूनि जें अरुचि दे सुरुचीस वाढी
पंक्तीतया घमघमी ठिकरी तयाची
वाढी विभूति असि हे यदुराजयाची ॥४४॥
ब्राम्हणा मुखिं ध्वनी मिटक्यांची दक्षिणा अमित सोनटक्यांची
तारका गणिति भूमि दिसेना मोहरीहि उदरांत धसेना ॥४५॥
नद्या अग्नि होउनियां उष्ण पाणी मनुष्याकृतीनें अहोपात्र पाणी
जयां देति सर्वस्वही ओचवाया बसायासि देऊनि तेथें चवाया ॥४६॥
जसी मेघचक्रांत सौदामिनीची असी कृष्णरुपीं प्रभा कामिनीची
हरी श्याम गोर्‍या स्त्रिया त्या सुवर्णा विवर्णत्व देती स्ववर्णे सुवर्णा ॥४७॥
तैलंग - कर्नाटक - गुर्जरांतें कर्‍हाड - कोल्हापुर - निर्जरांतें
आनंद गोदा - तटिंच्या द्विजांला वधूवरां देखुनि पूर्ण जाला ॥४८॥
तांबूल दे पति शशांक वनस्पतींचा
जोका स्वयेंचि मन सर्व - जगत्पतींचा
सर्वत्र दोंदिल गणाधिप वेत्रहस्ती
कामें करी नरतनूमुख जेविं हस्ती ॥४९॥
निरोप दे त्यांस चतुर्थ होमीं म्हणे हरी कीं तुमचा अहो मी
श्रीमूर्ति ही हे पुरुषोत्तमातें तसी न विप्र प्रिय जेविं मातें ॥५०॥
दे द्विजां हरि निरोप जेक्षणी प्रेमअंबु भरिं अंबुजेक्षणीं
वंदितां पद जगद्गुरु निघे जो किरीटहि न सांवरुनि घे ॥५१॥
प्रेम - विव्हळ पदांबुरुहातें मस्तकीं धरि जगद्गुरु हातें
ब्रम्ह - भक्ति सुगुणाऽर्णव दावी प्रीति ते किति म्हणूनि वदावी ॥५२॥
विवाह लोकांत अलोकरीती करी तरी लोक जसे करीती
जें वामन ध्यान - पथेंचि पाहे वर्णी तयाचीच अजी कृपा हे ॥५३॥
एवं यथायोग्यचि सर्वलोका दावूनियां लेश कृपावलोका
निरोप गोविंद तया जनां दे सोळासहस्त्रीं यदुराज नांदे ॥५४॥
सोळा - सहस्त्र - सदनीं निज - देह केले
ज्याच्या कथामृतरसा जन हे भुकेले
हा द्वारका - विजय - नामक ही हरी तो
दिव्य प्रबंध करितो भव जो हरी तो ॥५५॥
द्वारका - विजय - काव्य जयांत स्वामिचे विजय त्या विजयांत
हा विवाह - विजय प्रभुला हो अर्पिला हरिकथामृत लाहो ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 29, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP