अध्यायीं दुसर्या प्रताप - महिमा नामामृताचा स्वयें
श्रीवैकुंठपदाब्जभृंग कथिती नानापरी निश्र्वयें
गेला ज्या श्रवणें अजामिळहि तो जेथें स्वयें श्रीपती
आतां काय पहा मुनींद्र वदतो येथूनि रायाप्रती ॥१॥
शुक म्हणे इतुकी हरिकिंकरीं परिसतांयम - कींकर - वेरेवरी
सकळ - नीतिविशारद त्यांप्रती वदति आइक तें धरणीपती ॥२॥
अन्याय आचरण तें यमकिंकरांचें
हें बोलणें परम - धर्म - धुरंधुरांचें
ऐकोनि मानुनि मनीं हरिदास भारी
हे श्लोक पांच वदनी प्रभुया प्रकारीं ॥३॥
न पापी न दंडार्ह ऐशास जेथें करीती वृथा ये रिती दंड तेथें
अधर्म स्वयें स्पर्शतां धर्मवंतां अहो कष्ट ते वाटती थोर संतां ॥४॥
जे माय - बाप जन - शासन - दंड - धर्त्ते
जे साधु सर्व - सम जे नय - नीति - कर्त्ते
ऐशासही विषमता उपजेल जेव्हां
कोण्हास हे शरण जातिल लोक तेव्हां ॥५॥
अन्याय आचरति संत समर्थ जेथें
तेसेच सर्व जनही करितील तेथें
तेव्हां बुडेल जग भाव धरुनि ऐसा
हा श्लोक यावरि पहा वदतील कैंसा ॥६॥
जसा वर्ततां एक कल्याणकारी जगीं वर्तती सर्वही त्याप्रकारीं
वदे तो सदाचार शास्त्रार्थ जैसे जगीं वर्त्तती सर्वही लोक तैसे ॥७॥
श्लोकत्रयीं करुनि शासन दंडधर्त्ते
होऊनि हे नव्हति केवळ नीतिकर्ते
ऐसें वदोनिही अतःपर बोलती कीं
विश्वासघातकहि केवळ हे त्रिलोकीं ॥८॥
माझा मित्र सखा म्हणोनि दृदयीं विश्वासला जो असा
अंकीं ठेउनि मस्तकासहि निजे त्याला वधी तो असा
निष्पाया यमधर्मराज नरकीं घालूँ म्हणे जेधवां
विश्वासूनि अशास शुद्ध जन हे होती कसे तेधवां ॥९॥
निष्पाप केवळ अजामिळ नामघोषें
गेलीं जळोनि कृत - पाप - फळें अशेषें
याला कसें म्हणति पातक याचि भावें
नामप्रसंग वदतील महाप्रसंगें ॥१०॥
येथूनि नाममहिमा वदती हरीचा
ऐका विलास हरि - किंकर - वैखरीचा
प्रत्यक्ष - शब्द - उपभा - अनुमान - रीती
श्रोत्यांसि जेरिति घडे महिमा - प्रतीती ॥११॥
होतों भूत - भविष्य - पातक - कुळा जाळूनियां राहिला
कीं नारायणनाम जो विवशही होऊनियां बोलिला
कल्याणालय नामधेय हरिचें आलें मुखा जेधवां
याचे जे भवपाश ते हरियले श्रीमाधवें तेधवां ॥१२॥
म्हणाल पापघ्न म्हणूनि त्याचे आलें न नारायणनाम वाचे
झाला कसा नाश समस्तपापा म्हणाल ऐका तारित्या प्रतापा ॥१३॥
जेव्हां नारायणा ये म्हणउनि वदला अक्षरें चारि वाचे
प्रायश्र्वितें अशेषें सहजचि घडलीं नाशले दोष त्याचे
नावन्मात्रेंचि याचीं सकळहि दुरितें पातकेंही जळालीं
जेव्हां नारायणाची स्ववदन - सदनीं अक्षरें चारि आलीं ॥१४॥
नाशावया पापकुळासि कांहीं नामा असा अन्य उपाय नाहीं
म्हणोनि पद्य - द्वय धर्म - दूतां वारवाणिती तें हरिदास आतां ॥१५॥
मित्रद्रोही मद्यषी वित्तहारी स्त्री गो विप्र क्ष्मापती यांसि मारी
ऐसे नाना आणखी पापकारी याला शुद्धी देउनी नाम तारी ॥१६॥
या दोश्लोकीं पापिया शुद्ध घामें प्रायश्वित्तें बोलिलीं विष्णुनामें
येथें अंतीं दूसर्याच्या चतुर्थी पादीं पाहा बोलिलीं जीं समर्थी ॥१७॥
श्लोकांचिया त्रिचरणीं सकळांसि शुद्धी
अत्यंत जेथुनि पुन्हा अणु पापबुद्धी
तें हेंच कीं अजित - नाम म्हणाल कैसें
त्याचें निमित्तहि चतुर्थ - पदांत ऐसें ॥१८॥
विषय बुद्धिस होय रमायती म्हणति यास्तव तद्विषया मती
विषय बुद्धिस ज्याकरितां हरी परम उत्तम नाम अशापरी ॥१९॥
सकळहि अघबीजें नाशती अंतरींची
अनि - अघहर नामें यास्तव श्रीहरीचीं
हरि विषय मतीचा कीर्तनें होय जेव्हां
करतळगत त्याला चारिही मोक्ष तेव्हां ॥२०॥
वदनि तद्गुण - कीर्तन जेधवां मन तदर्थक तन्मय तेधवां
म्हणुनि कीर्तनिं तद्विषया मती विषय विष्णु मतीस असेरिनी ॥२१॥
विषयहि हरि होते बुद्धि तन्नाम जेथें
म्हणउनि दुसराही होतसे अर्थ येथें
परि उचित दुजा या प्रस्तुतीं अर्थ झाला
नकळत हरिनामें पाप - मेळा जळाला ॥२२॥
नारायण - स्मरण बुद्धिस पुत्र - भावें
झालें तथापि हरि दृष्टि पडे स्वभावें
एकास एक जन घेउनि नाम बाहे
तन्नासधारक दुजाहि तयास पाहे ॥२३॥
न पाचारितां आपणा जो स्वभावें स्वयें ओ म्हणे आणि पाहे स्वभावें
न सर्वज्ञ तो विष्णु सर्वज्ञ कैसा पहाता न जाणोनि संदेह ऐसा ॥२४॥
सर्वत्र हें कथियलें हरि सर्वसाक्षी
जेथें स्वनाम करुणेस्तव त्यास लक्षी
नामप्रताप हरि नाम कळोनि ऐसा
पाहे कृपेकरुनि त्यास हरी न कैंसा ॥२५॥
पाचारितो निजसुतासि मदीय - नावें
म्यां कां कृपेकरुनि त्यास अहो पहावें
सर्वज्ञही परि जना न असा उपेक्षी
नेणोनि नाम म्हणतांहि कृपाळु लक्षी ॥२६॥
जो कां दयाळु सुरव सर्वजना अपेक्षी
नाम - प्रताप समजोनि कसा उपेक्षी
नामें अघें जळति हें तरि सर्वसाक्षी
जाणें अशारिति अजामिळ - बुद्धि लक्षी ॥२७॥
जीवोद्धारनिमित्त जो अवतरे मत्स्यादि रुपें धरी
तीर्थे वेद पुराण शास्त्र अवघें ज्या कारणें जो करी
साक्षी आणि समर्थ आणि करुणासिंधु स्वयें जो हरी
तन्नामें भलत्या मिसें वदनि जे त्यांला कस नुद्धरी ॥२८॥
हा पूर्वपक्ष हरिला हरिनेंच येथें
आतां पुढें वदति - पार्षद काय तेथें
आणीकही म्हणति पाप - हरें विचित्रें
होती तरी न जसिं केवळ नाममात्रें ॥२९॥
प्रायश्र्वित्तें बहुत वदती वेदवक्ते तथापी
त्या त्या कर्मे करुनिहि जरी शुद्ध होतील पापी
रामा कृष्णा मुरहर हरे या पदीं शुद्धि जैसी
प्रायश्र्वित्तें इतर न कधीं शुद्धि देतील तैसी ॥३०॥
श्लोकीं असें कथुनि तींचरणेंकरुनी
तें बोलती जरि किमर्थ असें म्हणूनी
श्रीविष्णुदूत हरिनाम - गुणानुवादें
येथें निमित्त वदतील चतुर्थ - पादें ॥३१॥
हरति सकळ पापें उत्तम - श्लोक - नामें
नदु - परि रचितांतें रुचती विष्णुधामें
हरिगुण हरिनामीं पाहनां अर्थ त्याचा
मग विषयविषाचा अंतरी ताप कैंचा ॥३२॥
कडुवट बहु वाटे शर्करा पित्तरोग्या
परि परम सिताते पित्तनाशासि योग्या
सहज मधुरनेंही पित्त नासूनि देहीं
निज अति रुचि दाबी आवडों दे न कांहीं ॥३३॥
कडुवट हरिनामें वाटती पापियाला
परि दवडुनि पापें गोड होती तयाला
मग विषयसुखाची नाठवे त्यास वार्ता
म्हणउनि न पुन्हा तो होय अन्यायकर्ता ॥३४॥
हरुनि सकळ पापें गोड होतील नामें
मग मनिं अभिरामें सूचती विष्णुधामें
हरि सकळहि पापें तस्फळें दुःखनृंदें
हरि हरि म्हणबीलें यास्तव श्रीमुकुंदें ॥३५॥
न कळत हरि - नामें ना सती पापमात्रें
परि करिति कृतार्थ श्रीपतिप्रीति - नेत्रें
नदनुहरिकटाक्षें नाम जाणोनि घेती
गुणिं मिठि पडतां ते पातकी केविं होती ॥३६॥
मधुर मधुर नामें दाविती अर्थ दृष्टी
मधुरिपु - मय तेव्हां नामनिष्ठांस सृष्टी
वसति सकळ सूतें भूषणें जेविं हेमीं
हरिमयजग देखे वासदेवारव्यधामे ॥३७॥
नर पुरुष असीं हीं जीवनाचें अपारें
गुणमय नरतत्वें बोलिजे त्यांस नारें
अयन सकळ नाराधार आत्माच साचा
मुनिवर वदती हा अर्थ नारायणाचा ॥३८॥
मृषा सर्व आधार त्याला गुणाचा असा सर्व नारांसि नारायणाचा
जगत् व्यक्त अव्यक्त हें सर्व नारें प्रकाशी चिदात्मा तदाधार सारें ॥३९॥
व्यक्त प्रपंच नभआदिक पंचभूतें
अव्यक्त बुद्धि मन भीषण आणि चित्तें
नारें असीं अयन आश्रय यांच नारां
नारायण प्रभु खरा लटक्या विकारा ॥४०॥
नारांसि जो आश्रय याप्रकारें नारायणा आश्रय तेंचि नारें
नारांसि जो आश्रय ईश झाला तो जीव कीं आश्रय हे जयाला
नारायणाश्रित अशेषहि जीव नारें
भूमीवरी असति जेविं नदींत नीरें
पाण्यांत त्या दरडिं दीसति जीव तोही
नारायणात्मक दिसे प्रतिबिंब देही ॥४२॥
साक्षी विमुक्त - जन - आश्रय आणिरवीही
नारायणार्थ बहु बोलति अंत नाहीं
हीं ज्ञानगम्य हरिचीं गहनार्थ नामें
या वेगळीं सुगम जीं गुण - कर्म - धामें ॥४३॥
मेघश्यामल कोमलांग म्हणतो जो सांवळा कोंबळा
श्रीपीतांबर नाम दाखवि मनीं कासेस सोनेसळा
वाचे कौस्तुभकंठ नाम म्हणतां तें रत्न दावी गळां
भूभारांऽतक तो रणांगणि दिसे दंडी खळांच्या कुळां ॥४४॥
श्रीरामा म्हणतांचि जो करि धरी कोदंड सीतापती
गोपीवल्लभ वेणु लाउनि मुखीं दावी विचित्रा गती
लक्ष्मीवल्लभ विष्णु शेषशयनीं चक्रादि चिन्हें करीं
ब्रम्हा दाखचि पद्मनाभि म्हणतां तो नाभि - पद्मोदरीं ॥४५॥
या श्लोकीं अकराविया चरण हा चौथा कसा वाटतो
जैसा वामन - वामपाद गगनीं ब्रम्हांड तो वाटतो
गंगा त्यांतुनि ही जसी त्रिभुवनी टीका तयाची असी
येथें नामसुधा मधूनि निघने त्रेलोक्यकर्णी तसी ॥४६॥
नामीं असे अर्थ अनेक जेथें सिद्धांत हा जो ग्रथितार्थ एथें
कीं नाम नाशी अति पाप - राशी नामार्थ पापें सहमूळ नाशी ॥४७॥
स्फुरे अर्थ वाचेसि ये नाम जेव्हां हरी पातकें आठवे नाम तेव्हां
धरी कीर्तनीं चित्त नामार्थ गोडी सुखें सर्व सोडी तई पापखोडी ॥४८॥
प्रायश्र्वित्तें सर्वही व्यर्थ जेव्हां नामीं ऐसी शुद्धि अत्यंत तेव्हां
या श्लोकाचा अर्थ भावार्थ ऐसा चित्ताकाशीं चित्सुधारश्यि जैसा ॥४९॥