कथाकल्पतरू - स्तबक ११ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥

मुनीसि ह्मणे नृपनंदन ॥ संगिं शल्यपर्वकथन ॥ तंव ह्मणे वैशंपायन ॥ ऐकें राया ॥१॥

कर्ण पडतां समरांगणीं ॥ दुर्योधन दुःखिया होवोनी ॥ सैन्यासह हिमाचळस्थानीं ॥ जाता जाहला रात्रिमाजी ॥२॥

मग दुःखोद्नार टाकोन ॥ ह्मणे सेनापती करावा कोण ॥ तंव बोले द्रोणनंदन ॥ शल्य असे राजेंद्रा ॥३॥

तरी रणवट बांधू तयासी ॥ तेणें जय होय आपणासी ॥ ऐसें ऐकोनि गांधारासी ॥ जाहला हर्ष ॥४॥

सर्व राजे शल्या भोंवते ॥ राहोनि जयकार जाहले करिते ॥ युद्धावेश धरोनि निरुते ॥ तयेवेळीं ॥५॥

मग दुर्योधन रणीं ॥ स्थस्थित उभा राहोनी ॥ शल्याप्रति प्रार्थनावचनीं ॥ बोलता जाहला ॥६॥

कीं मित्रामित्र परिक्षेचा ॥ हा काळ असे साचा ॥ तरी तूं सेनापति आमुचा ॥ होवोनि झुंजें ॥७॥

येरु ह्मणे ऐक वचन ॥ माझें घन राज्य प्राण ॥ तुझेचि प्रियार्थ असती जाण ॥ आज्ञा प्रमाण राजेंद्रा ॥८॥

यावरी सैन्याचा नायक ॥ शस्त्रास्त्रें देवोनि अनेक ॥ शल्यासि केला अभिषेक ॥ सेनापतित्वाचा ॥९॥

नानाद्यघोष जाहले ॥ वंदीजन स्तवूं लागले ॥ येरू सहर्षित बोले ॥ करीन सत्य प्रतिज्ञा ॥१०॥

हें वचन आइकोनी ॥ दुर्योधनाच्या सैनिकांनीं ॥ कर्ण निधनदुःख टाकोनी ॥ जाहले सोत्साह ॥११॥

ह्मणतीं शस्त्रास्त्रें शल्यासी ॥ साध्य असती निश्चयेंसीं ॥ आतां जय होईल आह्मासी ॥ ऐसी रात्री क्रमलीसे ॥१२॥

तंव ते दूतद्दारें वार्ता ॥ धर्में ऐकिली भारता ॥ मग श्रीकृष्णासी बोलता ॥ होय धर्म ॥१३॥

ह्मणे गांधारें मद्ररायासी ॥ रणवट बांधिला शल्यासी ॥ तरी सर्वसाह्य आह्मासी ॥ करिता तूंचि देवा ॥१४॥

हें ऐकोनि ह्मणे कृष्ण ॥ जेवीं भीष्मद्रोणकर्ण ॥ तैसाचि शल्य संग्रामी जाण ॥ संमत मज ॥१५॥

तरी तुजवांचोनि लोकत्रयीं ॥ शल्यासि मारी ऐसा नाहीं ॥ ह्मणोनि तुंचि पाडीं महीं ॥ त्या महारथिया ॥१६॥

ऐसा वर देवोनि त्या वेळां ॥ कृष्ण आपुले शिबिरीं गेला ॥ मग दळभर विसावला ॥ सुखशेजेसी ॥१७॥

यानंतरें दिवस उगवला ॥ गांधार सैनिकां बोलिला ॥ सन्नद्ध करा वीरां सकळां ॥ शस्त्रास्त्रेंसी ॥१८॥

राजे होवोनि साल्हाद ॥ चातुरंग करिती सन्नद्ध ॥ सेनापती असे प्रसिद्ध ॥ शल्य देखा ॥१९॥

मग दुर्योधनाप्रती ॥ मिळोनियां सर्व नृपती ॥ कैसी प्रतिज्ञा करिती ॥ ती ऐकें राया ॥२०॥

ह्मणती आतां येकेजणें ॥ पाडवांसीं न झुंजणें ॥ अवघे मिळोनि ससैन्यें ॥ करूं कार्यसिद्धी ॥२१॥

जो एकलाचि झुंजेल ॥ अथवा येखादा न झुंजेल ॥ तो निश्चयेंसीं होईल ॥ पंचमहापातकी ॥२२॥

तरी एकाऐकां राखोनी ॥ झुंजो येकत्र मिळोनी ॥ ऐसी प्रतिज्ञा करोनी ॥ चालिले शल्यासवें ॥२३॥

इकडे पाडव त्रिधा होवोनी ॥ केली कौरवांवरी उठावणी ॥ धर्मावरी तिये क्षणीं ॥ शल्यवीर धांवला ॥२४॥

हार्दिक्य आणि समसप्तकांप्रती ॥ पार्थ उठिला निर्घातीं ॥ भीम चालिला युद्धार्थ ॥ शारद्वतावरी ॥२५॥

नकुळ उठिला शकुनीवरी ॥ सहदेव उलुका पाचारी ॥ युद्ध जाहलें घोरांदरीं ॥ समरभूमीसी ॥२६॥

भीष्मद्रोण सूर्यसुत ॥ निर्धना गेलिया कौरवांत ॥ अकरासहस्त्र शेष रथ ॥ उरले देखा ॥२७॥

सहस्त्र येक मदोन्मत्त ॥ आगळे हस्ती शतें सात ॥ आणि पायदळ समस्त ॥ तीनी कोटी ॥२८॥

असिवार दोनी सहस्त्र ॥ उरले कौरवदळीं समग्र ॥ पांडवदळीं रहंवर ॥ सहस्त्र साहा ॥२९॥

तितुकेचि उरले कुंजर ॥ अश्वस्वार एकसहस्त्र ॥ पायदळ समग्र ॥ कोटी येकी ॥३०॥

ऐसें उभयदळीं थोर ॥ युद्ध जाहलें भयंकर ॥ पांडवीं झोडिला दळभार ॥ कौरवांचा ॥३१॥

हे उणीव देखोनि शल्यें ॥ पांडवदळ निरोधिलें ॥ तंव निर्वाण युद्ध मांडिलें ॥ नकुळें देखा ॥३२॥

ऐसें कौरवीं देखोनीं ॥ शल्यवीरा पुढें करोनी ॥ युद्ध करिते जाहले निर्वाणीं ॥ नकुळासवें ॥३३॥

मग पांडवही तत्काळ ॥ सात्यकीभीम सहदळ ॥ धर्मासि पुढें करोनि बहळ ॥ झोडीत उठिले ॥३४॥

तेणें कौरव भय पावले ॥ तयेवेळीं शल्यें वाइलें ॥ तंव युधिष्ठिरें बाणजाळें ॥ व्याकुळ केलें शल्यासी ॥३५॥

थोर पावविलें दुःख ॥ ह्मणोनि कृतवर्मा उलुक ॥ शारद्दत शकुनी सम्यक ॥ सौबळ द्रौणी ॥३६॥

दुर्योधनादि पातले ॥ ते शल्यातें रक्षिते जाहले ॥ भीमासि त्रिबाणीं विंधिलें ॥ कृतवर्मयानें ॥३७॥

कृप धृष्टद्युम्राप्रती ॥ झुंजता जाहला निर्घातीं ॥ अश्वत्थामा प्रेरी अती ॥ सायक दहा ॥३८॥

एकाएका द्रौपदेयातें ॥ विंधिता जाहलासत्राणघातें ॥ आणि भीमाशल्यासि तेथें ॥ गदायुद्ध प्रवर्तलें ॥३९॥

दुर्योधन धृष्टद्युम्नेंसीं ॥ झुंजतां जाहला आवेशीं ॥ यापरि उभयसैन्यासीं ॥ जाहला धडधडाट ॥४०॥

मागुता शल्य उठावला ॥ धांऊनि धर्मा विंधिता जाहला ॥ परस्परां थोर वर्तला ॥ संग्राम देखा ॥४१॥

युधिष्ठिरें तियेक्षणीं ॥ चतुर्दश लोहवाणीं ॥ शल्य विंधोनि मर्मस्थानीं ॥ केला मूर्च्छित ॥४२॥

परि तो मूर्छना भंगोनी ॥ सर्वेंचि उठिला आयणी ॥ तेणें विंधिलें क्रोधें करोनी ॥ धर्मरायासी ॥४३॥

मग सात्यकी भीमसेन ॥ माद्रिपुत्र मुख्य करून ॥ धर्मासभोंवते राहून ॥ पीडिला शल्य ॥४४॥

त्यांहीं असंख्य सोडोनि शर ॥ शल्य केलासे जर्जर ॥ परि तो प्रचंड महावीर ॥ नाकळे कवणा ॥४५॥

येरीकडे महाझुंजार ॥ त्रिगर्त आणि द्रोणकुमर ॥ त्यांसी सन्नद्धला धनुर्धर ॥ पार्थ देखा ॥४६॥

असंभाव्य शर सोडोनी ॥ पार्थें विंधिलें द्रौणीलागोनी ॥ अश्व सारथीं पांचबाणीं ॥ केलें मूर्छित ॥४७॥

तंव अश्वत्थामें मुसळ ॥ पार्थावरी टाकिलें प्रबळ ॥ येरें छेदोनी तत्काळ ॥ केलीं सात खंडें ॥४८॥

येरीकडे धृष्टद्युम्रेंसीं ॥ दुर्योधन झंजें आवेशीं ॥ तंव धृष्टद्युम्नें गांधारासी ॥ पराभविलें ॥४९॥

इकडे धडमुंडीं धरणी दाटली ॥ अशुद्धें नदी वाहावली ॥ ऐसी झुंजारी जाहली ॥ शल्या आणि युधिष्ठिरा ॥५०॥

चापें अलातचक्रापरी ॥ झळकती दोघांचिये करीं ॥ विमानें दाटलीं अंबरीं ॥ धर्मयुद्ध पहावया ॥५१॥

यावरी धर्में ते अवसरीं ॥ शल्यवध योजोनि अंतरीं ॥ ब्रह्मशक्ती काढिली बाहेरी ॥ जे अप्रतिम त्रिलोकीं ॥५२॥

जिये धर्म पूजी त्रिकळ ॥ जाणों प्रळयाग्नीची ज्वाळ ॥ ते सोडिली तत्काळ ॥ शल्यावरी तेघवां ॥५३॥

वीरां न पाहवे शक्ती ॥ कितीयेक भयें पळती ॥ तंव आली शीघ्रगती ॥ शल्यकंठ लक्षोनी ॥५४॥

पर्वतीं होय वज्रपात ॥ तैसी बैसली हृदयांत ॥ मग जाहली भूमिग्रस्त ॥ शल्यप्राणा घेवोनी ॥५५॥

शल्य पडतां समरांगणीं ॥ हर्ष पावली पांडववाहिनी ॥ कौरवभार मय पावोनी ॥ पळों लागले ॥५६॥

तंव कौरवांकडिल वीर ॥ शाल्वनामें म्लेच्छनृपवर ॥ तो उठावला सत्वर ॥ गजारूढ पांडवांवरी ॥५७॥

तयावरी पांचाळ लोटला ॥ शरीं महागज विंधिता जाहला ॥ येरें बाणसंघ सोडिला ॥ धृष्टद्युम्रावरी ॥५८॥

जंव तयासि पाडावें धरणीं ॥ तंव सात्यकीयें शक्तिबाणीं ॥ म्लेच्छपतीचें शिर पाडोनी ॥ केला सिंहनाद ॥५९॥

तेणें कौरवदळ पळालें ॥ देखोनि कृतवर्में वाइले ॥ तेणें सात्यकीसी मांडिलें ॥ घोरयुद्ध ॥६०॥

येरीकडे शकुनी धांवला ॥ तया सहदेवो विंधीत चालिला ॥ शकुनीयाच्या दळा केला ॥ मोड तेणें ॥६१॥

असो कृष्णासि ह्मणे पार्थ ॥ देवा शीघ्र प्रेरीं रथ ॥ आजि कौरवदळाचा निःपात ॥ करणें सत्य ॥६२॥

पाहें पां भीष्मद्रोणकर्ण ॥ श्रुतायुध जळसंध विकर्ण ॥ भुरिश्रवादि वीर जाण ॥ शल्य शाल्व ॥६३॥

अवंतीदेशींचे वीर ॥ भगदत्तादि थोरथोर ॥ कांबोजदेशस्थ झुंजार ॥ दक्षिणात्यादी ॥६४॥

आणि दुःशासनादि बंधु ॥ या सकळांचा केला वधु । तरीही दुर्योधन दुर्मदु ॥ वृथा युद्ध करितसे ॥६५॥

भीष्मद्रोणविदुरांचें ॥ वाक्य नायकीलें साचें ॥ निर्मूळ जाहलें कुळाचें ॥ परि राज्य नेदीच हा ॥६६॥

पूर्वीचे विदुरें मातें ॥ निश्वयाचें कथिलेम होतें ॥ कीं राज्यभाग नलभे तुह्मातें ॥ जंव जीवंत गांधार ॥६७॥

तरी कौरवांसी युद्ध करितां ॥ मागेंपुढें न पहावें सर्वथा ॥ दुर्योधनादिकां मारितां ॥ धर्म साच रक्षिला ॥६८॥

आजि कौरव निःशेष मारोनी ॥ धर्मविजय करीन रणीं ॥ हें ऐकोनि चक्रपाणी ॥ प्रेरी रथ सत्वर ॥६९॥

तेव्हां अर्जुनैं कौरवदळा ॥ कल्पांत प्रळयो माडिला ॥ कितीयेकें पळ काढिला ॥ भ्रातृपुत्रससैन्य ॥७०॥

कितीयेक भ्रात्यापित्यांतें ॥ टाकोनि पळाले प्राणार्थें ॥ पाणी पाजोनि घायाळातें ॥ नेलें शिबिरीं कितीयेकीं ॥७१॥

कितीयेक सज्ज होवोनी ॥ झुंजती धृष्टद्यु भ्नेंसिं रणीं ॥ येक अर्जुनातें बाणीं ॥ विंधित जाहले ॥७२॥

दुर्योधन आणि शकुनिया ॥ तीनीसहस्त्र गज प्रेरोनियां ॥ पांच पांडवां वेढोनियां ॥ केलें व्याकुळ ॥७३॥

तयेवेळीं सकळ गजांतें ॥ लोहबाणीं भेदिलें पार्थें ॥ भीमें हाणिलें गदाघातें ॥ कुंभस्थळीं ॥७४॥

यावरी कौरवपांडवां युद्ध ॥ प्रवर्तलेंसे बहुविध ॥ सैनिकही शोक विविध ॥ करिते जाहले ॥७५॥

ते सैन्य‍आटनी देखोनी ॥ आवेशें उठावला शकुनी ॥ सहदेवेंसीं समरांगणीं ॥ झुंजता जाहला ॥७६॥

शकुनीयें सहदेवांतें ॥ शिरीं हाणिलें भल्लघातें ॥ मूर्छागत केलें तयातें ॥ तंव पातला वृकोदर ॥७७॥

नाराचबाण भीमें प्रेरिला ॥ तेणें शकुनीया पळविला ॥ तेव्हां सैनिकां मोड जाहला ॥ कौरवांचे ॥७८॥

सहदेव ह्मणेरे शकुनीमामा ॥ स्थिर होवोनि राहें संग्रामा ॥ पृर्वी सभेंत द्यूतकर्मा ॥ प्रवर्तलासी आनंदें ॥७९॥

तैं हर्ष वाटला तुजसी ॥ त्याचें फळ आजि भोगिसी ॥ तूचि दुर्योधनाचे कुळासी ॥ अंगाररूंप ॥८०॥

आतां तुझे शिर पाडीन ॥ ऐसें बोलोनि सोडिले बाण ॥ छत्र ध्वज धनुष्य छेदोन ॥ पाडिलें देखा ॥८१॥

मग दिव्यबाण काढिला ॥ शिर छीदोनि शकुना पाडिला ॥ तें हाहाःकार प्रवर्तला ॥ पळाले कौरव ॥८२॥

श्रीकृष्ण आणि पांडव तेथ ॥ शंख स्फुरिते जाहले बहुत ॥ हर्षे सहदेव स्तवित ॥ धर्मराजा ॥८३॥

असो कांहींसें दळ उरलें ॥ तयासि दुर्योधन बोले ॥ अहो सैनिकहो भले ॥ सद्दंशज तुह्मी ॥८४॥

तरी पांडवांसी झुजोनी ॥ धृष्टद्युम्रा माराया लागुनी ॥ शीघ्र परतावें आयणी ॥ बाप माझे ॥८५॥

ऐसी राजाज्ञा ऐकोनी ॥ चालिले शिरसा वंदोनी ॥ सौबळसैनिकीं बाणीं ॥ वेष्टिले पांडव ॥८६॥

पांडव सृंजय उठावलें ॥ त्यांहीं अवघेचि वीर मारिले ॥ असो हें सर्वगणित जाहलें ॥ अकराअक्षौहिणी ॥८७॥

पांडवी वाद्यगजर केला ॥ दुर्योधन येकला उरला ॥ तेणें पांडवहर्ष देखिला ॥ स्वयें दळरहित ॥८८॥

त्यांचे सिहनाद ऐकोन ॥ मूर्छा पावला दुर्योधन ॥ यावरी पलायनीं मन ॥ करिता जाहला ॥८९॥

तो अकराअक्षौहिणीचा नाथ ॥ द्वैपायनडोहा गेला धांवत ॥ पाईचि असे चालत ॥ तिये प्रसंगीं ॥९०॥

विदुर धर्मशीळ ज्ञाता ॥ जेवीं भविष्य झाला सांगता ॥ तें चिंतूनि जाहला प्रवेशता ॥ र्‍हदामाजी ॥९१॥

पाडववीरीम कौरवसैन्य ॥ अवघेंचि मारिलें जाण ॥ परि उरले कोणकोण ॥ ऐकें राया ॥९२॥

दुर्योधन अश्वत्थामा ॥ कृपाचार्य कृतवर्मा ॥ संजयो धीरला साउमां ॥ सात्यकीयें ॥९३॥

दुर्योधनें जळ सेविलें ॥ येर तिघे वनीं पळाले ॥ परि संजयासी बांधिलें ॥ सात्यकीयें देखा ॥९४॥

तो धॄष्टद्युम्रें पाहिला ॥ मग सात्यकीप्रति बोलिला ॥ अगा संजयो बांधिला ॥ कवणकाज ॥९५॥

याचाही संहार करी ॥ ऐसें ऐकोनि झडकरी ॥ शस्त्र घेवोनिया करीं ॥ उगारिलें सात्यकीयें ॥९६॥

जंव वधावें संजयासी ॥ तंव पातले व्यासऋषी ॥ त्यांहीं सोडविलें तयासी ॥ प्रबोधोनी ॥९७॥

तंव सायंकाळ जाहला ॥ संजय नगरासी चालिला ॥ र्‍हदाजवळी घायाळ देखिला ॥ दुर्योधन ॥९८॥

पाहोनि संजयें शोक केला ॥ स्वबंधमोचन सांगता जाहला ॥ तंव दुर्योधन बोलिला ॥ तयाप्रती ॥९९॥

ह्मणे तुजवांचोनि कोणी ॥ जीवंत नाहीं समरांगणीं ॥ तरीं त्वां सांगावें जावोनी ॥ धृतराष्ट्रासी ॥१००॥

कीं दुर्योधन पांडवाहीं ॥ गांजिलें यास्तव रिघाला डोहीं ॥ आणि बंधमोक्ष सर्वही ॥ तूं सांगें आपुला ॥१॥

इतुकें बोलोनि दुर्योधन ॥ जलस्तंभिनी विद्या स्मरोन ॥ र्‍हदामाजी प्रवेशोन ॥ राहिला देखा ॥२॥

तंव संजयो मुनि झडकरी ॥ धृतराष्ट्रासि श्रुत करी ॥ कीं पुत्र प्रवेशला नीरीं ॥ निरुपायपणें ॥३॥

कृप कृतवर्मा आणि द्रौणीं ॥ यांवीण उरला नाहीं कोणी ॥ ऐसें ऐकतां अंध नयनीं ॥ दुःखाश्रु गाळिता जाहला ॥४॥

असो गांधाराचे वृद्ध प्रधान ॥ आणि राणिवसांचें रक्षकजन ॥ राजस्त्रियादि करून ॥ लहानथोर ॥५॥

हे नगरासि जाते जाहले ॥ युद्धकौतुकर्थ होते आले ॥ तेही बाळगोपाळ निघाले ॥ भयभीत होवोनी ॥६॥

हस्तनापुरीं जाते जाहले ॥ ऐसें वृत्त भविन्नलें ॥ तें युयुत्सुनें देखिलें ॥ मग गेला धर्माजवळी ॥७॥

कथिलें सर्व धर्मा भीमासी ॥ येरीं आलिंगलें तयासी ॥ मग पामकिलें संतोषणासी ॥ तया देखा ॥८॥

तो राणिवसां पातला ॥ परोपरी समजाविता जाहला ॥ मग सुर्यास्तीं नगरीं गेला ॥ रुदन करित ॥९॥

तेथ विदुरासी भेटला ॥ येरें पुत्रस्नेहें आलिंगिला ॥ ह्मणे थोर दैवें वांचला ॥ तुझा प्राण ॥११०॥

तरी सांडोनि दुर्योधनासी ॥ नगराप्रति कां आलासी ॥ येरें कथिलें सर्व वृत्तासी ॥ गांधाराचे ॥११॥

विदुर श्वासोश्वास टाकोनी ॥ सत्वर गेला राजसदनीं ॥ ऐसी शल्यपर्वीं आटणी ॥ जाहली कौरवां ॥१२॥

वैशंपायन ह्मणती नृपासी ॥ जें संजयें कथिलें अंधासी ॥ तेंचि कथिलें संक्षेपेंसीं ॥ कथन तुज ॥१३॥

धर्मरायें शल्य मारिला ॥ सहदेवें शकुनी पाडिला ॥ आणि गांधार घायाळ केला ॥ धूष्टद्युम्नें ॥१४॥

समस्त पांडव मिळोनी ॥ कौरव मारिलें समंरंगणीं ॥ दुर्योधन गेला पळोनी ॥ र्‍हदामाजी ॥१५॥

तो डोहीं गुप्त असतां ॥ येकी अपुर्व वर्तली कथा ॥ ते पुढें ऐकावी श्रोतां ॥ ह्मणे मधुकरकवी ॥१६॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ एकादशस्तबक मनोहरू ॥ शल्यशकुनीवधप्रकारू ॥ षष्ठाध्यायीं कथियेला ॥११७॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP