कथाकल्पतरू - स्तबक ११ - अध्याय ९

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नम : ॥

वैशंपायन ह्मणती रायासी ॥ ऐकें पृथूदकमहिमेसी ॥ होता ऋषंगु नामें ऋषी ॥ वृध्द बहुत ॥१॥

तेणें मरणेच्छा धरोनी ॥ आपणासि पुत्रांकरवीं नेववोनी ॥ पृथूदकीं स्नान करोनी ॥ त्यजिलें देहा ॥२॥

तेणें पुनर्जन्म चुकल ॥ जेथ ब्रह्मा लोकां सकळां ॥ पूर्वकाळीं स्त्रजिता जाहला ॥ ऐसें पृथूदकतीर्थ ॥३॥

आणि कृतयुगीं पूर्वकाळीं ॥ आर्ष्टिषेण श्रेष्ठ कुळीं ॥ वेदशास्त्र विद्या सकळी ॥ पढत होता ॥४॥

परि नव्हे विद्याप्राप्ती ॥ मग खेदखिन्न होवोनि चित्तीं ॥ तिये पृथूदकतीर्थी ॥ मांडिलें तप ॥५॥

तेणें सकळविद्या पावला ॥ तीर्थस्नानाचे पुण्यें वहिला ॥ अल्पप्रयत्नें बहुळा ॥ जाहली सिध्दी ॥६॥

तेथें सर्पभय नव्हे जाण ॥ ऐसें देवोनि वरदान ॥ स्वर्गी गेला आर्ष्टिषेण ॥ वेदविद्या संपादित ॥७॥

तेथ सिंधुद्वीप राजर्षी ॥ ब्राह्मण्य पावला संतोषीं ॥ दुजी महिमा विशेषीं ॥ ऐकें राया ॥८॥

गाधी नामें नृपवर ॥ त्याचा विश्र्वामित्र कुमर ॥ तयासि करोनि राज्यधर ॥ गाधी गेला स्वर्गासी ॥९॥

पुढें विश्वामित्रा साचें ॥ संरक्षण कराया पृथ्वीचें ॥ सामर्थ्य नाहीं बळाचें ॥ भयें राक्षसांचेनी ॥१०॥

मग तो पृथूदकीं येवोन ॥ विधी आराधिला तपेंकरुन ॥ ब्रह्मपणाचें मागोनि वरदान ॥ राक्षसां जिंकिता जाहला ॥११॥

यापरि ब्रह्मतेज पावला ॥ पृथ्वीचें राज्य करिता जाहला ॥ ऐसा थोर महिमा आथिला ॥ त्या पृथूदकतीर्थी ॥१२॥

तिये पृथूदकतीर्थी ॥ विधी सारोनि रेवतीपती ॥ मग गेला शीघ्रगती ॥ बकदाल्भ्यआश्रमीं ॥१३॥

एकदा घेवोनि मुनिवर्या ॥ बकदाल्भ्य याग करावया ॥ दक्षिणे कारणें राजया ॥ गेला मागों ॥१४॥

ते पांचाल्यरायें दीधली देखा ॥ एकवीस बैल आइका ॥ तंव त्या ब्राह्मणां सकळिकां ॥ ह्मणे बकदाल्भ्य ॥१५॥

अहो विव्दव्दर्य मुनी ॥ तुह्मी हे घ्या विभागोनी ॥ अन्य पशु भिक्षा मागोनी ॥ मेळवीन मी ॥१६॥

मग धृतराष्ट्राच्या गृहीं गेला ॥ द्रव्य पशु मागता जाहला ॥ परि तो अनादरें देता जाहला ॥ गाई मृतप्राय ॥१७॥

येरु मृत गाई देखोनी ॥ परम संतप्त होवोनि मनीं ॥ आला स्वाश्रमालगोनी ॥ सरस्वतीतीरीं ॥१८॥

मग यवपिष्टगाईचीं मासें ॥ कल्पोनि होम केला द्वेषें ॥ तंव देशविध्वंस विशेषें ॥ जाणितला धृतराष्ट्रें ॥१९॥

राव थोर दु:खित जाहला ॥ इतुक्यांत वैप्रश्र्निक मुनी आला ॥ तेणें वृत्तांत सांगीतला ॥ बकदाल्भ्य ऋषीचा ॥२०॥

ह्मणे गा धृतराष्ट्रा जाण ॥ तो मुनी तूं करीं प्रसन्न ॥ यावरी रायें शीघ्र येवोन ॥ क्षमाविला दाल्भ्य ॥२१॥

रायें तयासि नगरीं आणोनी ॥ देशस्वास्थ्या लागोनी ॥ शांतिक होम करवोनी ॥ गाई बहुता दीधल्या ॥२२॥

तिया सालंकृता पावला ॥ हर्षोनि दालभ्य स्वाश्रमीं आला ॥ त्या अककीर्णतीर्थी सारिला ॥ तीर्थविधी बलरामें ॥२३॥

मग गेला यायाततीर्थी ॥ जेथ नहुषात्मज ययाती ॥ याग करोनि सरस्वती ॥ वाहविली धृतप्रवाहें ॥२४॥

ते प्रसन्न होवोनि अंतीं ॥ सकळ काम जाहली देती ॥ तेथ विधि सारोनि त्वरितीं ॥ चालिला राम ॥२५॥

गेला वसिष्ठप्रवाह तीर्था ॥ तेथिंचा महिमा ऐकें भारता ॥ पूर्वी स्थाणु तप करिता ॥ जाहला सरस्वती पूजोनी ॥२६॥

भारता ते स्थाणुतीर्थे ॥ देवीं स्कंद केला सेनापती ॥ आणि विश्वामित्र वसिष्ठाप्रती ॥ जाहली स्पर्धा परस्परें ॥२७॥

ह्मणोनि पूर्वपश्र्विम भागीं ॥ तप आरंभिलें दोघीं ॥ परि वसिष्ठाचियें अंगीं ॥ थोर तेज ॥२८॥

मग तयासी मारावया ॥ विश्र्वामित्रें अगा राया ॥ मनीं द्वेष धरोनियां ॥ आज्ञापिली सरस्वती ॥२९॥

तो सरस्वती करवीं ॥ वसिष्ठासी जवळी आणवी ॥ येरी प्रवाहवेगें विनवी ॥ वसिष्ठातें ॥३०॥

प्रार्थना करोनि प्रवाहें आणिला ॥ तो विश्र्वामित्रें देखिला ॥ मग शस्त्रघावो उगारिला ॥ वसिष्ठावरी ॥३१॥

ब्रह्महत्या होईल थोर ॥ ऐसें जाणोनि वेगवत्तर ॥ सरस्वतीनें नेला शीघ्र ॥ वसिष्ठमुनी ॥३२॥

ऐसा विश्वामित्र वंचिला ॥ वसिष्ठ पूर्वदिशे नेला ॥ तंव तेणें थोर कोपला ॥ विश्वामित्र ॥३३॥

तेणें सरस्वती शापिली ॥ रुधिरप्रवाहें वाहविली ॥ ह्मणोनि रक्तमय जाहली ॥ तत्क्षणीं देखा ॥३४॥

तें अशुध्दरुपी जीवन ॥ राक्षसीं करोनियां पान ॥ मग ते प्रबळ होवोन ॥ उपद्रविती तापसां ॥३५॥

पुढें काळवशें गा भारता ॥ तापसी तीर्थयात्रा करितां तीथ आले तंव सरिता ॥ देखिली कुत्सित ॥३६॥

तंव ते जाहली कंपायमान ॥ जाणोनि द्रवले ऋषिजन ॥ मग शिवासि आराधोन ॥ प्रसन्न केला ॥३७॥

तेव्हां शिवें सरस्वती तत्काळीं ॥ शापापासोनि सोडविली ॥ सुप्रसन्नजळ जाहली ॥ ईशप्रसादें ॥३८॥

परि क्षुधातुर जाहले असुर ॥ त्याहीं प्रार्थिले मुनिवर ॥ यावरी त्यांसी दीधले आहार ॥ ऋषिजनांहीं ॥३९॥

केशकीटकमिश्रितान्न ॥ शिळें सूतकी पतितनिर्माण ॥ तेंचि दीधलें भोजन ॥ ऐसा भाग पावले ॥४०॥

पुढें राक्षसांची पापशांती ॥ करावया सरस्वती ॥ अरुणा जाहली क्षणांतीं कृपाळुपणें ॥ ४१॥

तिये अरुणेमाझारी ॥ स्नानें करोनि निशाचरीं ॥ देह त्यागोनि सत्वरीं ॥ गेले स्वर्गलोकीं ॥४२॥

ऐसी ते अरुणा पावन ॥ ब्रह्महत्यानाशक जाण ॥ हें जाणोनि आला आपण ॥ स्वयें इंद्र ते ठायी ॥४३॥

तेणेंही स्नान करोनी ॥ मुक्त जाहला हत्येपासोनी ॥ ते ब्रह्महत्या चित्त देवोनी ॥ ऐकें राया ॥४४॥

एकदां दैत्यांवरी सुरनाथ ॥ कोपला ह्मणोनि नमुची दैत्य ॥ भयें जावोनि सूर्यकिरणांत ॥ लपाला देखा ॥४५॥

मग इंद्रें तयापाशीं ॥ प्रतिज्ञा केली असे ऐसी ॥ कीं मी तुज न मारीं परियेसीं ॥ कोणे काळीं ॥४६॥

रात्रीं अथवा दिनीं ॥ शुष्कपदार्थे अथवा ओलेनी ॥ न मारीं हे सत्य वाणी ॥ माझी असे ॥४७॥

मग तो प्रकटला किरणातुनी ॥ तेव्हां नीहारीं स्पर्शोनी ॥ उदक बुडबुडा आला त्याचेनी ॥ शिर पाडिलें दैत्याचें ॥४८॥

परि तें इंद्रापाठीं लागलें ॥ येरें पलायन आरंभिलें ॥ त्यासी विधीनें उपदेशिलें ॥ जाई अरुणेसि ह्मणोनी ॥४९॥

इंद्रें अरुणा सरस्वतीये ॥ स्नान केलेंसे लवलाहें ॥ तंव नमुची शिर जाय ॥ अदृश्य होवोनी ॥५०॥

तो नमुची ब्रह्मराक्षस ॥ तेणें पापें लिंपला सुरेश ॥ तिये हत्येचा जाहला नाश ॥ स्नानमात्रें ॥५१॥

इंद्र गेला स्वर्गभुवनीं ॥ तंव मस्तके ही स्नान करोनी ॥ उत्तमलोकीं विमानीं ॥ बैसोनि गेलें ॥५२॥

तेथें विघी रामें सारिला ॥ मग सोमतीर्थाप्रति गेला ॥ जेथें सोमें यज्ञ केला ॥ अत्रीसि होता करोनी ॥५३॥

तेथ यागाचे प्रांतीं भलें ॥ स्कंदासि सेनापतित्व दीधलें ॥ तें तैजसतीर्थ केलें ॥ बलभद्रदेवें ॥५४॥

यावरी वरुणासि जेथ ॥ जलदेवतांचें आधिपत्य ॥ प्राप्त जाहलें रामें तेथ ॥ सारिला तीर्थविधी ॥५५॥

पूर्वी भृगुऋषीनें शापिला ॥ तेणें अग्नि भय पावला ॥ शमीचे गर्भी लपाला ॥ न दिसे देवां ॥५६॥

मग अग्नीतें न देखोनी ॥ देव चिंतावले मनीं ॥ ह्मणोनि अग्नितीर्थी वन्ही ॥ प्रकटलासे ॥५७॥

भारता तिये अग्नितीर्थी ॥ विधि सारोनि रेवतीपती ॥ पुढें ब्रह्मयोनी नामक तीर्थी ॥ जाता जाहला ॥५८॥

मग कौबेरतीर्थी गेला ॥ जेथ कुबरे तप आचरला ॥ तेणें यक्षराजत्व पावला ॥ धनाधिपत्य ॥५९॥

आणि पुष्पकविमान लाधलें ॥ तें तीर्थ रामें संपादिलें ॥ हें संक्षेपें सांगीतलें ॥ गदापर्वी ॥६०॥

पुढें जन्मेजया परियेसीं ॥ भारव्दाज नामें ऋषी ॥ देखोनि घृताची अप्सरेसी ॥ द्रवला वीर्य ॥६१॥

तें द्रोणांत असे धरिलें ॥ तेथें कन्यारत्न जन्मलें ॥ तिये नाम असे ठेविलें ॥ श्रुतावती ऐसें ॥६२॥

ते कुमारी ब्रह्मचारिणी ॥ इंद्र पति व्हावा ह्मणोनी ॥ प्रवर्तली तपाचरणीं ॥ तीव्रत्वपणें ॥६३॥

तैं वसिष्ठाचें रुप धरोनी ॥ येवोनि ह्मणे वज्रपाणी ॥ अगे ऐकें शुभकल्याणी ॥ करीं पाक बोरांचा ॥६४॥

येरियें बोरें रांधूं मांडिलीं ॥ बहुतशीं काष्ठें जाळिली ॥ परि बोरें नाहीं शिजलीं ॥ सरलीं काष्ठें ॥६५॥

ह्मणोनि तियें आपुले चरण ॥ अग्निमाजी घालोन ॥ जाळ करीतसे फुंकोन ॥ रांधावया ॥६६॥

देखोनि इंद्र संतोषला ॥ सत्यरुप दाविता जाहला ॥ मग तियेसि वर दीधला ॥ इच्छेनुरुप ।६७॥

ह्मणोनि बदरपाचन तीर्थ ॥ नाम जाहलें विरव्यात ॥ तेथें राम जावोनि त्वरित ॥ सारिला तीर्थविधी ॥६८॥

राया तेथेंचि अरुंधती ॥ तीव्रतपें जाहली करिती ॥ तंव आलासे पशुपती ॥ तिये वर द्यावया ॥६९॥

शिवें भिक्षा मागीतली ॥ येरीनें बोरें होतीं रांधिलीं ॥ तिंचि भिक्षार्थ दीधलीं ॥ शंकरासी ॥७०॥

जंव भोजन करी पशुपती ॥ तंव आठोळियाही शिजल्या असती ॥ मग वर दीधला तियेप्रती ॥ अपेक्षित ॥७१॥

स्वर्गी गेला पशुपती ॥ असो ते भरव्दाजकन्या श्रुतावती ॥ दीह त्यजोनि जाहली युवती ॥ स्वर्गी इंद्राची ॥७२॥

तेथ इंद्रे शतयाग केले ॥ ह्मणोनि शतत्र्कतु नाम जाहलें ॥ तये इंद्रतीर्थी वहिलें ॥ स्नान केलें बलदेवें ॥७३॥

तेथेंही तीर्थविधी सारिला ॥ मग राम रामतीर्थी गेला ॥ जेथें परशुरामें केला ॥ अश्र्वमेध ॥७४॥

येकवीसवेळां मेदिनी ॥ अविनाशें नि:क्षत्रीय करोनी ॥ स्वकीय उपाध्याय ह्मणोनी ॥ पुरस्कारिला कश्यप ॥७५॥

मग वाजपेय यज्ञशतें ॥ करोनि पृथ्वी ब्राह्मणातें ॥ दक्षिणा दीधली तेथें ॥ समुद्रसहित ॥७६॥

तेंही तीर्थ करोनि निघाला ॥ राम यामुनतीर्थी गेला ॥ जेथ राजसूय जाहला ॥ वरुणदेव ॥७७॥

तेथें तीर्थविधी सारिला ॥ मग आदित्यतीर्थी गेला ॥ जेथें सूर्य आधिपत्य पावला ॥ ज्योतिषाचें ॥७८॥

जिये तीर्थी नारायण ॥ मधुकैटभांसी वधोन ॥ पावला एकेचि स्नानें करुन ॥ पवित्रसिध्दी ॥७९॥

व्यासमुनी शुक इंद्र जाण ॥ विश्वेदेव मरुद्नण ॥ गंधर्वादि अप्सरा स्नान ॥ करोनि सिध्दी पावलीं ॥८०॥

तेचि आदित्यतीर्थी सत्य ॥ देवल जैगीषव्य असित ॥ योगयाग तप नेमस्त ॥ करिते जाहले ॥८१॥

तेथें तीर्थविधी सारिला ॥ राम सोमतीर्थी गेला ॥ पूर्वी राजसूय यज्ञ केला ॥ चंद्रें जेथ ॥८२॥

तेथोनि गेला सारस्वतीर्थी ॥ जेथ पूर्वी दधीची निगुती ॥ तप आचरिला तेणें सुरपती ॥ पावला भय ॥८३॥

तये ऋषीचें तप ढाळाया ॥ अलंबुषा अप्सरा त्या ठाया इंद्रें पाठविली लवलाह्यां ॥ श्रृंगारोनी ॥८४॥

तिये अलंबुषेतें देखोनी ॥ वीर्य द्रवला दधीचि मुनी ॥ तो रेतभाग तिये क्षणीं ॥ धरिला सरस्वतीयें ॥८५॥

तेणेंयोंग नदी उदरीं ॥ पुत्र जन्मला काळांतरीं ॥ नदीनें आणोनि झडकरी ॥ दीधला मुनीसी ॥८६॥

मग मुनीश्र्वरें उल्हासीं ॥ सारस्वत नाम ठेवोनि त्यासी ॥ द्विजत्व देवोनि तयासी ॥ पामकिता जाहला ॥८७॥

भारता तंव तियेचि समयीं ॥ देवांदानवांसीं पाहीं ॥ झुंज होवोनि शस्त्रघायीं ॥ पळाले देव ॥८८॥

देवां दैत्य न जिंकवती ॥ ऐसें जाणोनि सुरपती ॥ देवांसह दधीचिप्रती ॥ येता जाहला ॥८९॥

देवीं शस्त्रें ठेवोनि त्यापाशीं ॥ पाठी दीधली दैत्यांसी ॥ इकडे दैत्य अमरावतीसी ॥ करिती राज्य ॥९०॥

तंव येरीकडे तो मुनी ॥ शस्त्रें दैत्य नेतील ह्मणोनी ॥ मंत्रबळें उदक करोनी ॥ घेतली उदरांत ॥९१॥

तेणें शस्त्रमय नीरें ॥ अस्थी जालिया वज्रशस्त्रें ॥ तें जाणोनियां सुरेंद्रें ॥ सांगीतले देवांसी ॥९२॥

अहो दधीचिपाशीं जावोनी ॥ शस्त्रे मागावीं प्रार्थोनी ॥ मग येवोनियां सुरगणीं ॥ शस्त्रार्थी मुनी विनविला ॥९३॥

तेव्हां कामधेनुवक्त्रें ॥ प्राण वेंचोनि ऋषीश्र्वरें ॥ देवां दीधलीं शस्त्रास्त्रें अस्थिप्राय ॥९४॥

त्या शस्त्रांचिये बळें ॥ शौर्ये दैत्य असतां आगळे ॥ परि तयांसि मारु नि बळें ॥ सुरभवनें घेतलीं ॥९५॥

मागुती अमृतपानमंत्रें ॥ ऋषी उठविला देवेंद्रें ॥ ऐसीं पुरांणांतरीं उत्तरें ॥ विस्तृतें असती ॥९६॥

हेंचि कथानक संपूर्ण ॥ व्दितीयस्तबकीं असे जाण ॥ तंव बारावरुषें अवर्षण ॥ पडलें काळांतरीं ॥९७॥

क्षुधातुर जन जाहले ॥ सर्वऋषी पळतां देखिले ॥ ते सारस्वतें वांचविले ॥ देवोनि अन्नोदक ॥९८॥

तो वेद पढवी तयांसी ॥ ते साठीसहस्त्र ऋषी ॥ शुश्रूषा करिती अहर्निशीं ॥ त्या सारस्वत ऋषीची ॥९९॥

तें सारस्वततीर्थ करोन ॥ तेथोनि निघाला संकर्षण तीर्थ पावला पुण्यपावन ॥ वृध्दकन्या नामक ॥१००॥

जेथें कुणीक नामें मुनी ॥ नानातपसाधना करोनी ॥ मानसीक कन्या निर्मोनी ॥ स्वर्गासि गेला ॥१॥

तेही तपस्वी नंदिनी ॥ भ्रतारइच्छा सांडोनी ॥ वार्धकीं शरीर टाकोनी ॥ स्वर्गलोका चालिली ॥२॥

परि अविवाहित कुमरी ॥ सहस्त्रतपें केलीं जरी ॥ तरी परलोक नाहीं निर्धारी ॥ ऐसें बोलिला नारद ॥३॥

मग जें होतें तप केलें ॥ त्यांचे अर्धपुण्य वेंचिलें ॥ तेणें भ्रतारा मेळविलें ॥ परलोकप्राप्त्यर्थ ॥४॥

गालवऋषीचा कुमर ॥ प्रत्युद्रवा नामें थोर ॥ तयासि योजूनियां भ्रतार ॥ वरिला तियें ॥५॥

परि तो ह्मणे तियेतें ॥ येकरात्री तुजसांगातें ॥ मी राहेन ऐसा निरुतें ॥ केला नेम ॥६॥

मग तियेसिं विवाह करोनी ॥ क्रीडा केली येक रजनी ॥ येरीयें सकाळीं आज्ञा मागोनी ॥ केला देहत्याग ॥७॥

तियेसि स्वर्गलक जाहला ॥ तेथ रामें विधि सारिला ॥ मग तीर्थे करीत गेला ॥ स्यमंतपंचकी ॥८॥

कुरुक्षेत्रीं पावला वोजे ॥ विधीची उत्तरवेदी बोलिजे ॥ जे खेडिली होती कुरुराजें ॥ हलें करोनी ॥९॥

कुरुराजयानें खेडिलें ॥ ह्मणोनि कुरुक्षेत्र नाम जाहलें ॥ तेथें येक चरित्र वर्तलें ॥ तें ऐके राया ॥११०॥

तया कुरुरायाप्रती ॥ वारंवार येत सुरपती ॥ एकी सांगता जाहला स्थिती ॥ तें ऐकें राया ॥११॥

येथ राजे युध्दीं पडतील ॥ ते स्वर्गलोकीं जातील ॥ आणि देहत्याग करितील ॥ तयां ब्रह्मपदप्राप्ती ॥१२॥

येथ सुवर्ण दान कीजले ॥ तें सहस्त्रगुण वाढले ॥ आणि नित्यवास करितील ॥ तयां नाहीं यमयातना ॥१३॥

ऐसी महिमा आथिली ॥ तेथ रामें यात्रा केली ॥मग गेला सहस्त्रमौळी ॥ कारपंचकतीर्थासी ॥१४॥

यमुनेसि गेला तेथोनी ॥ विधिपूर्वक स्त्रान करोनी ॥ ऋषीश्र्वरांत बैसोनी ॥ कथा ऐकता जाहला ॥१५॥

तेथें नारदमुनी आला ॥ तो अर्घ्यपाद्यें रामें पूजिला ॥ तंव नारद बोलता जाहला रामाप्रती ॥१६॥

कीं भीष्मादिसपरिवार ॥ यांचा युध्दीं जाहला संहार ॥ हें ऐकोनि हलधर ॥ काय करिता जाहला ॥१७॥

आपणासवें जे आले होते ॥ तयां पाठविलें व्दारकेतें ॥ सरस्वतीमहिमा चित्तें ॥ आठविता जाहला ॥१८॥

श्र्लोक : सरस्वतीवाससमा कुतो रति: सरस्वतीवाससमा: कुतो गुणा : ॥

सरस्वतीमेत्य दिवं गता जना: सदा स्मरिष्यंति नदीं सरस्वतीं ॥१॥

सरस्वती सर्वनदीषु पुण्या सरस्वती लोकसुखावहा सदा ॥

सरस्वतीं प्राप्य जना: सुदुष्कृता: कदा न शोचंति परत्र चेह च ॥२॥

ऐसी बलदेवाची यात्रा वैशंपायनें कथिली नरेंद्रा ॥ पुढें अग्रकथा अवधारा ॥ ह्मणे मधुकरकवी ॥१९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ एकादशस्तबक मनोहरु ॥ बलदेवतीर्थयात्राप्रकारु ॥ नवमाध्यायीं कथियेला ॥१२०॥

॥ श्रीरस्तु ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP