कथाकल्पतरू - स्तबक ११ - अध्याय १०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥श्रीगणेशाय नम : ॥

वैशंपायनासि ह्मणे नृपमणी ॥ सांगा अग्रकथा विस्तारोनी ॥ तव बोलता जाहला मुनी ॥ राया प्रती ॥१॥

येणेप्रकारें तीर्थयात्रा ॥ करोनियां बलभद्रा ॥ येणें जाहलें हस्तनापुरान ॥ र्‍हदाजवळी ॥२॥

तया गांधारें कुशळ पुसोनी ॥ वंदिला करसंपुट जोडोनी ॥ तंव बोलिला हलपाणी ॥ दुर्योध नासी ॥३॥

अगा ये रणभूमिके पडिले ॥ ते उत्तमलोकीं गेले ॥ ऐसें पुण्यक्षेत्र वानिलें सकळतीर्थी ॥४॥

यावरी दुर्योधन आवेशीं ॥ नमन करोनि बलभद्रासी ॥ गदायुध्दं करावयासी ॥ भीमासवें उठावला ॥५॥

तंव उल्कापात जाहले ॥ देखोनि भीम धर्मासि बोले ॥ मीचि जय पावेन येवेळे झुंजतां यासीं ॥६॥

आजि तुमच्या हृदयांतुनी ॥ हें शल्य टाकीन काढुनी ॥ तुह्मालागीं सुखी निर्वाणीं ॥ करीन मीच ॥७॥

ययाउपरी परमावेशीं ॥ बोलता जाहला दुर्योधनासी ॥ अरे वस्त्राहरणीं द्रौपदीसी ॥ केला तुवां अपकार ॥८॥

आह्मां दु:ख दीधलें बहुत ॥ तयाचें फळ निभ्रांत ॥ पाववीन करोनि घात ॥ आजी तुझा ॥९॥

तुजनिमित्त भीष्मादिक ॥ वीर मारिले अनेक ॥ आतां गदघायें देख ॥ मारीन तुज ॥१०॥

मग ते परस्परें बोलोनी ॥ वर्मशब्द आळवोनी ॥ वचनयुध्द करोनी ॥ गदाघायीं प्रवर्तले ॥११॥

तें देखोनि हृषीकेशी ॥ बोलता जाहला पार्थासी ॥ हा दुर्योधन परियेसीं ॥ कपटयुध्दीं विशारद ॥१२॥

आणि भीम तरी सर्वथा ॥ धर्मयुध्द असे करिता ॥ ह्मणोनि जय नपवे पार्था ॥ भरंवसेनी ॥१३॥

त्याहीमाजी येकयेकासीं ॥ गांधारें झुंजावें स्वइच्छीं ॥ धर्मे केली प्रतिज्ञा ऐशी ॥ हें नीतिविरुध्द ॥१४॥

येणें जिंकाया भीमसेन ॥ तेरावरुषें वरी जाण ॥ गदअभ्यास केला दारुण ॥ लोहमय पुरुषासीं ॥१५॥

तरी कपटेंविण झुंजतां यासी ॥ हा जय पावेल निश्र्वयेंसीं ॥ ऐशा ऐकोनि कृष्णोक्तीसी ॥ काय करी अर्जुन ॥१६॥

आपुली डावी मांडी तत्वतां ॥ भीमसेनासी देखतां ॥ ताडन जाहला करिता ॥ मुष्टिघातें ॥१७॥

ते संज्ञाखुण जाणोनी ॥ भीमें गदा उचलोनी ॥ युध्द करीतसे विंदानीं ॥ गांधारेंसीं ॥१८॥

परि दुर्योधनही तेथ ॥ घाव डावा सांवरीत ॥ कळाकुसरी दावित ॥ नानापरी ॥१९॥

तळोपरी आडी देव्हडी ॥ विमुख सन्मुख घाय घडी ॥ तो धडधडाट ब्रह्मांडीं ॥ जाहला थोर ॥२०॥

तें सकळ युध्द सांगतां ॥ विस्तार होईल यया ग्रंथा ॥ उत्कंठा जाहली सुरां समस्तां ॥ गदयुध्द पहावया ॥२१॥

मग भीमें गदें करोनी ॥ वाममांडी हाणिली तत्क्षणीं ॥ दुर्योधन पाडिला मेदिनी ॥ ह्मणोनि लत्ताप्रहार ॥२२॥

हा उरुभंग दुर्योधनाचा ॥ भारतीं अध्याय शल्यपर्वीचा ॥ अन्वयो धरोनि कथेचा ॥ कथिला असे ॥२३॥

परि पुराणांतर विशेषीं ॥ कथा असे अनारिशी ॥ ते संक्षेपें परियेसीं ॥ गदापर्वोक्त ॥२४॥

शल्य पडतां सभरंगणीं ॥ गांधार पळाला जीव घेवोनी ॥ तया कृतवर्मा कृप द्रौणी ॥ ह्मणती झुंजों उदयिक ॥२५॥

दुर्योधन ह्मणे तयांसी ॥ मी गदापडताळोनि प्रयासी ॥ जरी झुंजेन भीमासी ॥ तरी पाडीन धरणीये ॥२६॥

भीम आगळा येकीपरीं ॥ कीं वज्रमय शरीरीं ॥ तेंचि अंग गदसमरीं ॥ घालितो पुढें ॥२७॥

तेथ घायाचें काहीं न चाले ॥ ह्मणोनि उपाया पाहिजे योजिलें ॥ आणि मृत्यंग आपुलें ॥ वांचवायासी ॥२८॥

तंव कृपाचार्य बोलिला ॥ एक विचार ऐकें भला ॥ अमृत असे करतळा ॥ गांधारीचे ॥२९॥

आणि पतिव्रता धर्मेकरोनी ॥ ते अमृत ओळंगे नयनीं ॥ ते तुज स्पर्शेल अवलोकोनी ॥ तरी होसील वज्रमय ॥३०॥

नग्न जावोनि उभा राहें ॥ ह्मणावें भामे मज दृष्टीं पाहें ॥ आणि स्पर्शे लवलाहें ॥ अंग माझें ॥३१॥

तरी ताया ममरथीं बैसोनी ॥ तूं जाई येचि क्षणीं ॥ येरें गुरुवाक्य मानोनी ॥ रथीं आरुढ जाहला ॥३२॥

पवनवेरगें निघाला ॥ हस्तनापुरीं प्रवेशला ॥ रथा वरोनी उतरला ॥ जावया माते जवळी ॥३३॥

तंव सर्वज्ञ हृषीकेश ॥ तेणें माव रचिली कैशी ॥ लज्जा उपजाया गांधारासी ॥ माळी जाहला आपण ॥३४॥

नानापुष्पांहीं गुंफोनी ॥ तो चोळणा हातीं घेवोनी ॥ उभा राहिला येवोनी ॥ दुर्योधना सन्निध ॥३५॥

येरु असे नग्न जाहला ॥ तेणें मनीं लाजिन्नला ॥ तंव माळियें पुढें ठेविला ॥ पुष्पचोळणा ॥३६॥

तो परिधान करोनी ॥ मग मातेजवळी जावोनी ॥ ह्मणे सर्व शत्रु मारोनी ॥ विजयी होवोनि पातलों ॥३७॥

माते मज दृष्टीं पाहीं ॥ हातें स्पर्शे सर्वदेहीं ॥ येरियें पुत्रस्त्रेहें लवलाहीं ॥ सोडिला नेत्रपट ॥३८॥

दृष्टीं अवलोकिला कुमर ॥ तंव तो उघडा दिगंबर ॥ मग भोवंडिला कर ॥ सर्वागीं तयाचे ॥३९॥

चोळणा घातलासे जांघे ॥ तेतुले ठाई दृष्टी न रिघे ॥ आणि स्पर्शितांही न लगे ॥ अमृतकर ॥४०॥

असो वस्त्रें लेवोनि गांधार ॥ ह्मणे येक उरला वृकोदर ॥ तयाचा कराया संहार ॥ माते जातों मागुता ॥४१॥

तंव बोलिली गांधारी ॥ बारे तो अर्धवज्रशरीरी ॥ असो तूं स्पर्शिलासि दृष्टिकरीं ॥ तितुका होशील वज्रमय ॥४२॥

राया होणार तें नटळे ॥ द्रौपदीसतीनें शापिलें ॥ आणि मैत्रेयेंही दीधलें ॥ शापदान ॥४३॥

ह्मणोनि मांडि कैवांडें ॥ देवें कापट्य रचिलें वेगाडें ॥ कां जे मरतेंअंग उघडें ॥ सर्वथैव ॥४४॥

मग रथीं बैसोनि निघाला ॥ कृपाचार्याजवळी आला ॥ सर्व वृत्तांत सांगितला ॥ तंव चिंतावला आचार्य ॥४५॥

ह्मणे चोळणा लेइलासी ॥ हे कुबुध्दी केली कैसी ॥ तेंचि मरतेंअंग परियेसीं ॥ वांचवावया प्रयत्न ॥४६॥

मग कृपासि रथ दीधला ॥ गांधार र्‍हदीं प्रवेशला ॥ याउपरी संग्राम जाहला ॥ प्रात:काळीं ॥४७॥

भीमें तेचि मांडी हाणोनी ॥ दुर्योधन पाडिला धरणी ॥ ऐसी ऋषिप्रणीत वाणी ॥ पुरांणांतरीं ॥४८॥

असो दुर्योधना पाडिलें ॥ मग अश्र्वत्थाम्यादि उरले ॥ ते शोकात्र्कांत जाहले ॥ हर्षले पांडव सोमक ॥४९॥

परि धर्मराज तयेवेळां ॥ वृकोदरासि ह्मणता जाहला ॥ कीं त्वां लत्ताप्रहार केला ॥ हें निंद्यकर्म ॥५०॥

आपुला बंधु गांधार ॥ कुरुदेशींचा नृपवर ॥ पडिला असतां पादप्रहार ॥ करुंनये मस्तकीं ।५१॥

तूं धार्मीक ह्मणविलासी ॥ मारुनि सकळ वैरियांसी ॥ कृतकृत्य जाहलासी ॥ परि केलें निंद्यकर्म ॥५२॥

मग ह्मणे दुर्योधनासी ॥ तूं आमुचें नायकिलेंसी बंधु पितामह पुत्र पौत्रांसी ॥ मारविलें वृथा ॥५३॥

आतां शोक नकरीं जीवीं ॥ आपुलिया कर्मस्वभावीं ॥ प्राप्तविपाक अनुभवीं ॥ धृतराष्ट्रपुत्रा ॥५४॥

ऐसें दु:खार्त बोलोनी ॥ श्र्वासोश्र्वास टाकोनी ॥ धर्म बहुत विलाप मनीं ॥ करिता जाहला ॥५५॥

तंव बळमद्र नीतिज्ञाता ॥ ज्यासी गदयुध्दीं निपुणता ॥ तो भीमासि त्र्कोधें धिक्कारिता ॥ जाहला निंदोनी ॥५६॥

अरे गदायुध्द करितां ॥ घाव न घालावा नाभीखालता ॥ ऐसें धर्मशास्त्र तत्वतां ॥ बोलत असे ॥५७॥

तरी तूं मूर्ख स्वेच्छाचारी ॥ ऐसें बोलोनि हल करीं ॥ उगारोनि भीमावरी ॥ गेला हाणावया ॥५८॥

हें श्रीकृष्णें देखोनी ॥ मुरडविला हातीं धरोनी ॥ कांहीं बोलला नीतिवचनीं ॥ बळदेवासी ॥५९॥

दादा प्रतिज्ञा पाळण करणें ॥ क्षत्रियधर्म सांभाळणें ॥ सभेमध्यें भीमसेनें ॥ हेचि प्रतिज्ञा केली होती ॥६०॥

कीं ऊरु भेदीन गदाघाई ॥ तैसाचि भैत्रेयाचा शापही ॥ जे भीम फोडील घाई मांडी दुर्योधनाची ॥६१॥

तरी नकरावा त्र्कोध ॥ हा ऐकोनि कृष्णशब्द ॥ तिये समयीं हलायुध ॥ बोलता जाहला ॥६२॥

भीमें अधर्मे करोनी ॥ दुर्योधन पाडिला धरणीं ॥ तरी हा जिह्मयोध्दा ह्मणोनी ॥ होईल अपकीर्ती ॥६३॥

कृष्णा पाहें पां दुर्योधन ॥ युध्ददीक्षित होवोन ॥ तेणें रणयज्ञ करोन ॥ होमिला स्वात्मा ॥६४॥

अमित्रवन्ही प्रज्वळिला ॥ यशोरुप अवभृथ पावला ॥ ऐसें बोलोनि राम गेला ॥ द्वारकेसी ॥ ६५॥

यादव पांडव पांचाळ ॥ सहर्षित जाहले सकळ ॥ परि धर्म चिंताग्रस्त तत्काळ ॥ जाहला असे ॥६६॥

तें देखोनि तये वेळां ॥ वासुदेव ह्मणता जाहला ॥ कीं भीमसेनें आचरिला ॥ क्षात्रधर्म ॥६७॥

भीमही धर्मासि तत्क्षणीं ॥ बोलिला नमस्कार करोनी ॥ आतां निश्र्विंतपणें राहुनी ॥ करीं पृथ्वीपाळण ॥६८॥

पांचाळ सृंजय हर्षोनी ॥ शिंगें शंख वाहवोनी ॥ भीमपरात्र्कम वर्णोनी ॥ करिती स्तव ॥६९॥

तंव कृष्ण बोलिल वचन ॥ हा नष्ट पापी दुर्योधन ॥ येणें मारविले भीष्मद्रोण ॥ आणि छळिलें पांडवां ॥७०॥

ऐसें वाक्य ऐकोनी ॥ दोनी हातें भूमी धरोनी ॥ गांधार बोलिला त्र्कोधवचनीं ॥ घायाळपणें कृष्णासी ॥७०॥

अरे तूं आथिलासि छळें ॥ छ्ळवादें सर्व मारिले ॥ कपटें करोनि जन्म गेलें ॥ तुझें सकळ ॥७२॥

ऐसीं परस्परें वर्मे ॥ बोलिलीं गांधारें मेघश्यामें ॥ येरयेरांसी संभ्रमें ॥ निंदिते जाहले ॥७३॥

तंव सायान्ह प्रवर्तलें ॥ मग सर्वराजे आपापले ॥ शिबिराप्रति जाते जाहले ॥ उत्साहेंसीं ॥७४॥

परि पांडव पांचजण ॥ जाहले गतोत्सव दीन ॥ दुर्योधनशिबिर देखोन ॥ गेले तेथ ॥७५॥

रथावरुनि उतरले ॥ तेथेंचि मेळिकार केले ॥ देवें रथींचे वारु सोडिले ॥ पार्थासह उतरला ॥७६॥

तंव पार्थरथध्वजस्थित ॥ अदृश्य जाहला हनुमंत ॥ तत्काळ रथ जळोनि त्वरित ॥ पडिला धरणीनये ॥७७॥

तें देखोनि पंडुकुमर ॥ आश्र्वर्य पावले थोर ॥ मग पुसती विचार ॥ श्रीकृष्णासी ॥७८॥

कीं हा रथ कां जळाला ॥ यावरी श्रीकृष्ण बोलिला ॥ रथ पूर्वीचि होता जळाला ॥ ब्रह्मास्त्रतेजें ॥७९॥

मी आणि वानरकेसरी ॥ जंव होतों रथावरी ॥ तोंवरी विशीर्ण होवोनि धरत्रीं ॥ नाहीं पडिला ॥८०॥

मी आणि वायुनंदन ॥ रक्षीत होतों स्यंदन ॥ तो सोडितांचि जाहला दहन ॥ संग्राम संपतां ॥८१॥

तंव युधिष्ठिरें बोलिलें ॥ देवा हें तुझे प्रसादबळें ॥ सर्वकार्य साधलें ॥ पुरला मनोरथ ॥८२॥

असो दुर्योधनशिबिरांत ॥ रत्नें मुक्तें दासी भृत्य ॥ अश्वगजादि वस्तुजात ॥ पावले पांडव ॥८३॥

राहिले वाहनें सोडोनी ॥ तंव बोलिला चत्र्कपाणी ॥ म्यां युध्दारंभी निर्वाणीं ॥ केला असे नवस ॥८४॥

ओधवती नदीतीरस्थ ॥ जंयती देवी असे नांदत ॥ तेथें पांचां पांडवांसहित ॥ रात्रीं राहेन जिंतिलिया ॥८५॥

ययाउपरी पांडव श्रीहरी ॥ जावोनियां शिबिरां बाहेरी ॥ ओघवतीनदीतीरीं ॥ तयेरात्रीं राहिले ॥८६॥

तेथे धर्मे तिये अवसरीं ॥ प्रार्थोनियां श्रीहरी ॥ पाठविला हस्तनापुरीं ॥ गांधारीजवळी ॥८७॥

कां जे पुत्रशोकें गांधारी ॥ विव्हळ जाहली असेल भारी ॥ तिये समजावया मुरारी ॥ जावें तुह्मीं ॥८८॥

ह्मणे ऐकें जी चत्र्कपाणी ॥ गांधारी परम तपस्विनी ॥ पतिव्रताशिरोमणी ॥ आथिली सामर्थ्ये ॥८९॥

छळयुध्दें तिचिये पुत्रांसी ॥ मारिलें हें ऐकोनि आह्मांसी ॥ शाप देवोनि सर्वासीं ॥ करिल भस्म ॥९०॥

तरी दु:खित गांधारीसही ॥ देवा तुजवांचोनि पाहीं ॥ समजावी ऐसा नाहीं ॥ कोणी आणिक ॥९१॥

प्रभू तूं सर्वलोककर्ता ॥ परमऐश्वर्ययुक्त तत्वतां ॥ कर्तु अकर्तु अन्यथा ॥ करणीय समर्थ ॥९२॥

तुजवांचोनि संकटीं ॥ आह्मां तारिता जगजेठी ॥ ऐसा दुजा कवण सृष्टी ॥ माजी असे ॥९३॥

हा धर्मशब्द परिसिला ॥ दारुकें रथ साजिला ॥ श्रीकृष्ण आरुढोनि गेला ॥ हस्तनापुरीं॥९४॥

तो धृतराष्ट्राच्या मंदिरीं ॥ जावोनि उतरला मुरारी ॥ तैं द्वारपाळें झडकरी ॥ निवेदिलें रायासी ॥९५॥

यावरी कृष्ण भीतरीं गेला ॥ तंव व्याससंजयो देखिला ॥ गांधारीसह धृतराष्ट्र बैसला ॥ असे दु :खित ॥९६॥

तयां नमूनि चत्र्कपाणी ॥ अंधासवें दु:ख करोनी ॥ मागुता स्वस्थ होवोनी ॥ त्यांसी बोलिला ॥९७॥

कौरवीं पांडवांसि राया ॥ कपटद्यूत करोनियां ॥ नानाविपत्ती करविलिया ॥ वनांतरीं ॥९८॥

मग म्यां आणि गंगासुतें ॥ कृपाचार्यें सोमदत्तें ॥ विदुरें द्रोणें द्रोणसुतें ॥ मिळोनि समस्तीं ॥९९॥

साम कराया बहुतांपरी ॥ तुज प्रार्थिलें समग्रीं ॥ परि तूं लोभें स्नेहें अंतरीं ॥ पावलासि मोह ॥१००॥

आतां राया परियेसीं ॥ बोल नाहीं पांडवांसी ॥ त्यांहीं न्यायें धर्मस्नेहांसी ॥ नाहीं अतित्र्कमिलें ॥१॥

राया युधिष्ठिराची भक्ती ॥ तुझेठायीं असे निरुती ॥ हें विदित तुज सर्वार्थी ॥ तरी देई आशीर्वाद ॥२॥

धर्म आपुले बांधवांचा ॥ तथा सोईरे सरव्यांचा ॥ क्षय देखोनि सर्वाचा ॥ असे व्याकुळ ॥३॥

आणि गांधारीची दीनता ॥ तैसीच तुझीही अवस्था ॥ जाणोनि अहोरात्र स्वस्थता ॥ नाहीं तयासी ॥४॥

दु:खेंकरोनी तुह्मांसी ॥ न येचि भेटावयासी ॥ ऐसें सांगोनि धृतराष्ट्रासी ॥ गांधारीसि ह्मणे कृष्ण ॥५॥

माते तूं दुर्योधनादिकां ॥ मजसमक्ष सकळिकां ॥ शिकवणी देवोनि अनेका ॥ प्रबोधिती जालीस ॥६॥

परि ते तुझें नायकती ॥ ह्मणोनि जाली हे फलप्राप्ती ॥ आतां शोक न करीं चित्तीं ॥ गांधारीये ॥७॥

पांडवांसी अनिष्ट काहीं ॥ तुवां न चिंतावें पाहीं ॥ तूं पतिव्रता तपें सही ॥ सामर्थ्याधिक ॥८॥

हे सचराचर पृथ्वी ॥ जाळावया आघवी ॥ त्र्कोधाग्नी असे स्वभावीं ॥ तुजजवळी सतीये ॥९॥

परि क्रुपाळुत्वें देयीं वरदान ॥ ऐसे बोधोनि उभय जन ॥ मग कृतकृत्य होवोन ॥ निघाला मुरारी ॥११०॥

तो हस्तनापुरींहूनी ॥ पांडवांपें शीघ्र जावोनी ॥ सर्ववृत्तांत सांगोनी ॥ तेथें राहता जाहला ॥११॥

वेदव्यासही नीतिवचनीं ॥ उभयतांसी आश्वासोनी ॥ त्र्कोधदु:ख मानसींहुनी ॥ दूरी करिते जाहले ॥१२॥

इकडे धृष्टद्युम्नादि पांचाळ ॥ उरलें पांडवांचें दळ ॥ तें शिबिरीं राहिलें सकळ ॥ दुर्योधनाचे ॥१३॥

पांचपांडवांसह मुरारी ॥ देवतेजवळी राहिला दूरी ॥ नवस फेडाया लोकाचारीं ॥ केली माव ॥१४॥

जेणें धृतराष्ट्रगांधारीचा ॥ त्र्कोधानल शमिला सुवाचा ॥ ऐसा सारथी पांडवांचा ॥ कृपाळु हरी ॥१५॥

असो इकडे दुर्योधन ॥ भग्नऊरु भूमीं पडोन ॥ धर्माची निंदा करोन ॥ सांडी श्वासोछास॥१६॥

मग आपनापाशींच बोले ॥ म्यां भीष्मद्रोणादि मारविले ॥ सहसैन्य निर्दाळिले ॥ महावीर ॥१७॥

मी असोनि अभोमानी ॥ परि काळवशें करोनी ॥ कपटें गदायुध्दें रणीं ॥ ऊरु भेदोनि पडियेलों ॥१८॥

पांडवीं अकीर्तिकर्म केलें ॥ ऐंसे सांगारे वहिलें ॥ युध्दीं माझे बंधु उरले ॥ असतील त्यांसी ॥१९॥

आजि माझे मातापितरां ॥ जावोनि सांगारे सत्वरा ॥ कीं धर्मयुध्दें अमित्रां ॥ मारिलें दुर्योधनें ॥१२०॥

अमित्रांसी बरवें केलें ॥ धर्मे परलोका संपादिलें ॥ क्षत्रियासि जें मरण बोलिलें ॥ तें पावला दुर्योधन ॥२१॥

अश्वत्थामा आदिकरोनी ॥ सांगा वृत्तांत त्यांलागुनी ॥ कीं भीष्मद्रोण कर्ण रणीं ॥ पडिले शकुनी वृषसेन ॥२२॥

जळसंध आणि भगदत्त ॥ सैंधव नामें जयद्रथ ॥ मत्पुत्र लक्ष्मण सोमदत्त ॥ दु:शासनादि बांधव ॥२३॥

हे पहिलेचि पडिले ॥ रण करोनि स्वर्गी गेले ॥ तयां मागें मीही ये वेळे ॥ निघालों जावया ॥२४॥

ऐसा थोर विलाप केला ॥ तो वृत्तांत हेरीं ऐकिला ॥ जावोनि सर्व श्रुत केला ॥ अश्वत्थामेयासी ॥२५॥

तो दुर्योधनप्रलाप ॥ ऐकोनि द्रौणी जाहला सकोप ॥ झुंजीं कृतवर्मा आणि कृप ॥ उरले होते ॥२६॥

ते गांधाराजवळी गेले ॥ तया दुर्दशास्थित देखिलें ॥ मग त्यासमीप बैसले ॥ भूमिकेवरी ॥२७॥

अश्वत्थामा तत्समयीं ॥ दुर्योधनासि ह्मणे पाहीं ॥ राया इये संसारीं काहीं ॥ नाहीं बरवें ॥२८॥

तूं अभिमानी शूर भला ॥ आजि भूमिकेवरी येकला ॥ धूळी माखोनियां पडिला ॥ अससी राया ॥२९॥

दु:शासन कर्णादिक ॥ महायोध्दे वीर अनेक ॥ सर्वही निमाले देख ॥ थोर दु:ख जाहलें ॥१३०॥

आतां पडलिया वीरांसी ॥ पुढें करोनि समस्तांसी ॥ तुवां जावें स्वर्गासी ॥ राजेश्वरा ॥३१॥

तंव ह्मणे दुर्योधन ॥ हा ऐसा काळ कठिण ॥ चतुर्मुखें केला निर्माण ॥ मज हतभाग्याचा ॥३२॥

ऐकें अश्वत्थामय विचार ॥ मज विषाद वाटतो थोर ॥ तये व्यथेचा दु:खभार ॥ दाटला सर्वागीं ॥३३॥

सत्वर प्राण जरी जाय ॥ तरी काहीं हर्ष होय ॥ हर्षविषाद होतां उभय ॥ मरण असे मजलागीं ॥३४॥

त्यावांचोनि नाहीं मृत्य ॥ ऐसाचि राहेन आपदा भोगित ॥ तंव बोलिला द्रोणसुत ॥ गांधारासी ॥३५॥

अगा पांचाळ सपरिवारीं ॥ निद्रिस्थ असती तुझे शिबिरीं ॥ त्यांसी मारितों येचि अवसरीं ॥ तरीच मी द्रोणात्मज ॥३६॥

परि पुराणांतरीं कथा ॥ अनारिसी असे भारता ॥ अश्वत्थामा बोलता ॥ जाहला ऐसें ॥३७॥

ह्मणे राया अवधारीं ॥ उदयीक पांडवां समरीं ॥ मारोनि शिरें झडकरी ॥ आणितों येथें ॥३८॥

त्या वासुदेवा देखतां ॥ सैन्यासह पंडुसुतां ॥ मारीन तरीच मी निरुता ॥ द्रोणात्मज ॥३९॥

ऐसा शब्द आयकिला ॥ गांधारें आधार मानिला ॥ मग कृपासि ह्मणे वहिला ॥ आणीं उदक ॥१४०॥

येरें कलश भरोनि आणिला ॥ दुर्योधनाजवळी ठेविला ॥ येरु ह्मणे बांधा वहिला ॥ द्रौणीसि रणवट ॥४१॥

मग कृप आणि कृतवर्मेनी ॥ अभिषिंचिला स्वयें द्रौणी ॥ अश्वत्थामा राजाज्ञें करोनी ॥ जाहला मान्यरुप ॥४२॥

जें होतें कलशोदक उरलें ॥ तें दुर्योधना करीं दीधलें ॥ येरें जळपान असे केलें ॥ बोलिला मागुतेनी ॥४३॥

ह्मणे उशीर न लावा येथ ॥ जा पूर्ण करा मनोरथ ॥ मी वाट असें पाहत ॥ उत्कंठितपणें ॥४४॥

ते तिघेही रथीं बैसोनी ॥ गेले वटातळीं तत्क्षणीं ॥ विचार करिती मिळोनी ॥ तिघे देखा ॥४५॥

तंव तिये रणभूमिके ॥ रण उठिलें शब्दघोषें ॥ भयंकर दिसती अनेकें॥ भूतप्रेतादी ॥४६॥

आतां तिये रात्रिआंत ॥ काय करील द्रोणसुत ॥ तो सांगिजेल वृतांत ॥ पुढिले पर्वी ॥४७॥

हें शल्यपर्वअंतर्भूत ॥ गदापर्व व्यासप्रणित ॥ दोहीं मिळोनि विरव्यात ॥ एकचि बोलिजे ॥४८॥

दुर्योधन पडिला रणीं ॥ नवपर्वे जाहलीं येथोनी ॥ पूर्वार्ध संपलें जाणीं ॥ भारताचें ॥४९॥

वैशंपायन ह्मणती भारता ॥ श्रीकृष्ण जयांचा साह्य कर्ता ॥ तयां संकटसमुद्रीं पोहतां ॥ भय नाहीं कदाही ॥१५०॥

त्याचिये चरणीं होता भाव ॥ ह्मणोनि विजयी जाहले पांडव ॥ तैसेचि तरती येर जीव ॥ दु:खसमुद्रीं ॥५१॥

तरी भावभक्ती धरुन ॥ अखंड कीजे भगवभ्दजन ॥ तेणें नासती दोष दारुण ॥ ब्रह्महत्या कायशा ॥५२॥

राया तुझिये सुखसंगतीं ॥ मजही धडली ईश्वरभक्ती ॥ व्हावया परमपदप्राप्ती ॥ सुगममार्ग ॥ ५३॥

त्या हरीचे वर्णितां गुण ॥ श्रोतावक्ता होती पावन ॥ अंतीं लहिजे पद निर्वाण ॥ वैकुंठींचें ॥५४॥

आतां असो हे भारती ॥ एकादशस्तबका जाहली समाप्ती ॥ पुढें व्दादशाची वित्पत्ती ॥ श्रोताजनीं परिसिजे ॥५५॥

हीं नवपर्वे संपतां जाण ॥ मृत उठिले नव ब्राह्मण ॥ त्यांहीं करोनि आशीर्वचन ॥ ब्रह्महत्या नाशिल्या ॥५६॥

वस्त्र उजळलें नवहात ॥ कुष्ठ गेलें नाभीपरियंत ॥ जन्मेजय जाहला पुनीत ॥ व्यासप्रसादें ॥५७॥

भारतीकथा म्यां आरंभिली ॥ पुराणांतर संमती घेतली ॥ गीर्वाण नकळे ह्मणोनि बोली ॥ बोलिलों प्राकृत ॥५८॥

ताम्रगोळा मृळ संस्कृत ॥ त्याचें पात्र घडिलें प्राकृत ॥ अज्ञानजडजीवोध्दरणार्थ ॥ सुगम नौका रचियेली ॥५९॥

संरव्या वाढेल कल्पतरुची ॥ ह्मणोनि कथिलें सारसारची ॥ श्वोतयां उपजावया रुची ॥ केला संग्रहो ॥१६०॥

मज उपसितां शब्दसिधुं ॥ राहिला असेल पदबिंदु ॥ तया अपराधाचा बाधु ॥ श्रोताजनीं क्षमा कीजे ॥६१॥

प्रद्युम्नाचे ज्येष्ठ कुमरें ॥ बहिरामश्याह नृपवरें ॥ आज्ञा दीधले ह्मणोनि आधारें ॥ रचिला ग्रंथ ॥६२॥

तया रायाचे सभेआंत ॥ चतु:शास्त्रवेते पंडित ॥ पुराणचर्चा अखंडित ॥ असे जयांसी ॥६३॥

म्यां तयांचे आज्ञाधारें ॥ ग्रंथ रचिला मतांतरें ॥ हें करविलें सर्वेश्वरें ॥ मज रंकाकरवीं ॥६४॥

माझी केतुली ती मती ॥ कीं साभिमानें बोलावें ग्रंथीं ॥ परि श्रवणमात्रें हरिभक्ती ॥ उपजे ज्ञानवैराग्य ॥६५॥

अनंतशास्त्रें पुराणमतें ॥ वेदाधारें ऋषिप्रणितें ॥ त्या सकळांचे आद्यंतातें ॥ पावे ऐसा कोणी नसे ॥६६॥

कृष्णयाज्ञवल्कीयें मार्ग दाविला ॥ तोचि म्यां पुढें चालविला ॥ अष्टमस्तबकापासोनि मांडिला ॥ कथाकल्पतरु ॥६७॥

कविमधुकरें कृपाळा ॥ प्रेमें स्तवोनि श्रीगोपाळा ॥ एकादशस्तबक संपविला ॥ ह्मणे मधुकरकवी ॥६८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ एकादशस्तबक मनोहरु ॥ शल्यगदापर्वसमाप्तिप्रकारु ॥ दशमाऽध्यायीं कथियेला ॥१६९॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ स्तबकओंव्यास्मरव्यां ॥१०५९॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP