॥ श्रीगणेशाय नमः ॥
मग म्हणे भारतरावो ॥ देवें इतुका कां धरिला भेवो ॥
मथुरा सांडूनि रिघाला देवो ॥ समुद्रजळीं ॥१॥
इतुकी सांडोनि वसुंधरा ॥ आणि गिरिदुर्गें महापुरां ॥
कृष्ण कां गेला कुशनगरा ॥ तें सांगा मज ॥२॥
मग ह्मणे ऋषेश्वर ॥ हृषीकेश तो पृथ्वीधर ॥
तेणें राहिजे ऐसा पवित्र ॥ नाहीं ठावो ॥३॥
येक दुर्लभ पृथ्वीवरी ॥ काशी जान्हवीचिये तीरीं ॥
तेथें राहिला त्रिपुरारी ॥ उमाकांत ॥४॥
मथुरे गोकुळीं उपजणें ॥ हें वृंदेचें फेडिलें उसणें ॥
जे आपुलेनि कुडेपणें ॥ नासली ते ॥५॥
तयेसि केली क्रीडातृप्ती ॥ लोकीं खेळे गोपिकांप्रती ॥
मग मथुरा हे नलगे चित्तीं ॥ कृष्णाचिया ॥६॥
जैसी भाक हे वृदांनीं ॥ तैसेंचि कुशें मागितलें चक्रपाणी ॥
कीण क्षणभरी मजवांचोनि ॥ न जावें देवा ॥७॥
ऐसा असे हा पुढार ॥ आणि ठाव नाहीं पवित्र ॥
तरि तो बोल करावया साचार ॥ हरि गेला द्वारके ॥८॥
मग पुसतसे नृपनाथ ॥ हा सांगाजी वृत्तांत ॥
कैसा पुढारला गोपीनाथ ॥ तया कुशासी ॥९॥
मुनि ह्मणे ते मुरदैत्यबंधु ॥ कुश प्रौढीनें महामदु ॥
नाना तपें करोनि खेदु ॥ लाहे शरीरीं ॥१०॥
तो महा शिवभक्त ॥ तया प्रसन्न जगन्नाथ ॥
येरें मागितले बहुत ॥ वरु तयासी ॥११॥
युध्दीं तुटतील धडमुंडे ॥ गात्रें होतील शतखंडें ॥
परि मागुतें जडावें धडें ॥ झुंजावयासी ॥१२॥
आणि सूर्याचे किरणीं ॥ जितुकी देखिजे हे मेदिनी ॥
तेथें मज समरांगणीं ॥ न व्हावा मृत्यू ॥१३॥
प्रसंग आलिया मरणकाळीं ॥ त्वां राखावें चरणाजवळी ॥
ऐसा वर चंद्रमौळी ॥ देई मज ॥१४॥
मग बोले चंद्रमौळी ॥ त्वां वसवावी कुशस्थळी ॥
या चक्रतीर्थाचे पाळीं ॥ राहें राखण ॥१५॥
येथें जे करितील स्नान ॥ ते यमा नागवती जन ॥
मग ठेविलें रक्षण ॥ कुशें तेथें ॥१६॥
तंव दुर्वास होता पुष्करीं ॥ तेथें नारद गेला ब्रह्मचारी ॥
नमस्कार करोनि परस्परीं ॥ बैसले दोघे ॥१७॥
दुर्वास ह्मणे हो नारदमुनी ॥ काहीं अपूर्व घाला कर्णीं ॥
आह्मां योगियांसि वचनीं ॥ सांगा काहीं ॥१८॥
मग ह्मणे नारदमुनी ॥ कुशस्थळ येक त्रिभुवनीं ॥
तेथें आहे पुण्यपाणी ॥ महातीर्थ ॥१९॥
गोमतीसिंधूच्या मेळीं ॥ तें दुर्लभ भूमंडळीं ॥
तेथें जरी लाभे आंघोळी ॥ तरी महाभाग्य ॥२०॥
मग निघाला अत्रिसुत ॥ तीर्थी जाहला सुस्नात ॥
तैं देखतां धांवला भृत्य ॥ कुशदैत्याचा ॥२१॥
दुसरेही पातले अमित ॥ साठीसहस्त्र रक्षणाइत ॥
दुर्वासाची केली बहुत ॥ अवकळा त्यांहीं ॥२२॥
बांधोनि मागुता बाहूंसीं ॥ तिहीं नेला कुशापासीं ॥
येरें तो जाणोनि तापसी ॥ नकरी वध ॥२३॥
परि मारिला असंख्यात ॥ आंगीं गळत असे शोणित ॥
ह्मणे आज्ञा भंगोनि सुस्नात ॥ जाहलासि कां ॥२४॥
मुनि शाप देऊं जंव विचारी ॥ तंव तयासि प्रसन्न त्रिपुरारी ॥
तो शांत देखोनि ब्रह्मचारी ॥ सोडिला असुरें ॥२५॥
निजमनीं विचारी दुर्वासा ॥ मज आहे एकाचा भरंवसा ॥
तोचि आतां वधील कुशा ॥ नारायण ॥२६॥
ह्मणोनि पाहतसे मेदिनी ॥ परि विष्णु न देखे नयनीं ॥
मग गेला अमरभुवनीं ॥ दुर्वास तो ॥२७॥
पाहिली ते अमतावती ॥ वैकुंठींही नाहीं श्रीपती ॥
यास्तव आला नारदाप्रती ॥ मुनिवर्य तो ॥२८॥
मग सांगितला वृत्तांत ॥ तों नारद जाहला हर्षित ॥
तेणें सांगितला अनंत ॥ बळीचे द्वारीं ॥२९॥
ऐसें जाणोनि पाताळीं ॥ रिघे द्वारकेच्या बिळीं ॥
वेगीं गेला विष्णुजवळी ॥ दुर्वास तो ॥३०॥
तंव तो बळिदैत्याचे द्वारीं ॥ काठीकर झालासे हरी ॥
भक्तजनांचा कैंवारी ॥ नारायण ॥३१॥
तो बळी भक्तशिरोमणी ॥ दुजा प्रल्हाद जाणोनि ॥
ह्मणोनि राहिला चक्रपाणी ॥ रक्षणाइत ॥३२॥
जो अगम्य योगेश्वरां ॥ होमहवनां सुरवरां ॥
तो सांपडला किंकरा ॥ भक्तिसौरसीं ॥३३॥
मग तो वोळखिला खुणें ॥ हें वेळोवेळां काय सांगणें ॥
प्रेमें गेला लोटांगणें ॥ दुर्वास तो ॥३४॥
तो जाणोनि ब्रह्मचारी ॥ हृदयीं धरिला श्रीहरीं ॥
येरु दाटला सात्विकभारीं ॥ नधरवे गहिंवर ॥३५॥
दोहों नेत्रींच्या जीवनीं ॥ पूजा करितसे विष्णुचरणीं ॥
तैं हरिहर भेटले दोनी ॥ परस्परें ॥३६॥
मग आपुले पीतांबरें ॥ नेत्र पुसिले सर्वेश्वरें ॥
नमस्कारोनि आदरें ॥ पुसता झाला ॥३७॥
ह्मणे यावया काय निमित्त ॥ कवणें केलासि दुःखित ॥
तें सांगावें पां निश्चित ॥ दुर्वास देवा ॥३८॥
येरु ह्मणे गा श्रीपती ॥ सिंधूचे तीरीं गोमती ॥
तेथें स्नानास्तव कुशदूतीं ॥ मारिलें मज ॥३९॥
मज बांधोनि बाहूंसी ॥ दूतीं नेलें कुशापासीं ॥
तेणें मारिलें गा हृषीकेशी ॥ सोटेवरी ॥४०॥
त्या कुशाचा करीं निःपात ॥ तरीच ब्राह्मणांचा होसी भक्त ॥
नातरी करीन अपघात ॥ तुजवरी देवा ॥४१॥
मग तयासि ह्मणे वनमाळी ॥ मी अधीन असें बळी ॥
वैकुंठ सांडोनि पाताळीं ॥ राहिलों असें ॥४२॥
हें बळीस पुसावे मुनी ॥ तो वदेल आपुले वचनीं ॥
तरि कार्य होईल तत्क्षणीं ॥ तुमचें सत्य ॥४३॥
तंव बळिरायासि ह्मणे मुनी ॥ तूं माझा हो जीवदानी ॥
कुशस्थळीवरी चक्रपाणी ॥ देई मज ॥४४॥
बळि ह्मणे गा ब्राह्मणा ॥ मी न सोडीं नारायणा ॥
जीवही कवणें जाइजणा ॥ दीधला नाहीं ॥४५॥
तो जाणावा दुराचारी ॥ जो कां सांपडला सोडील हरी ॥
कल्पतरु असतां द्वारीं ॥ सोडील कवण ॥४६॥
समीप असतां शार्दुल ॥ तया नातळे महाकाळ ॥
ह्मणोनि हा न सोडीं गोपाळ ॥ हृदयकमळींचा ॥४७॥
तंव विष्णु ह्मणे गा बळी ॥ नवंचें तुज मी वनमाळी ॥
सदैव आहें तुजजवळी ॥ हृदयमंदिरीं ॥४८॥
गेलिया यासी येईल धीरु ॥ नातरी क्षोभेल ऋषेश्वरु ॥
ऐसा ऐकतां विचारु ॥ जाणवलें बळीसी ॥४९॥
मग ह्मणे बळिराजा ॥ याचें कार्य करीं गरुडध्वजा ॥
परि तूं दारवंटा माझा ॥ सोडूं नको ॥५०॥
त्वरें बोलाविला फणिवर ॥ जया नाम बळिभद्र ॥
तयासि सांगितला विचार ॥ दुर्वासाचा ॥५१॥
मग बळीचेनि उत्तरें ॥ विष्णु वाढला उंच त्वरें ॥
द्वार पाडिलें वसुंधरे ॥ मस्तकें करुनी ॥५२॥
चरण तरी बळीचे द्वारीं ॥ परि द्वारके उमटला हरी ॥
मग दुर्वास आणि सहस्त्रशिरी ॥ आले तेथें ॥५३॥
मस्तकें पाडिलें द्वार ॥ ह्मणोनि द्वारका ह्मणती सुरवर ॥
जैसा आत्मा पाडी रंध्र ॥ दहावें तें ॥५४॥
हें प्रल्हादस्तंभीं असे ॥ परि पद्मपुराणीं अनारिसें ॥
बळीसि पुसोनि दुर्वासें ॥ आणिला हरी ॥५५॥
ऐसा तो महा लाघवी ॥ येका निजवी येका जागवी ॥
हें सांगितलें स्वभावीं ॥ कथेसारिखें ॥५६॥
येर्हवीं तो काय एकदेशी ॥ जो चौर्यायशींचे मानसीं ॥
तो आहे नाहीं हें कासयासी ॥ सांगणें लागे ॥५७॥
आतां असो हा परमार्थ ॥ कुशपुरा आला अनंत ॥
मग दुर्वासा ह्मणे सुस्नात ॥ होईं संगमीं ॥५८॥
तंव ह्मणे तो ब्राह्मण ॥ पैल बैसला दैत्यजन ॥
परंतु ह्मणे नारायण ॥ नकरीं चिंता ॥५९॥
मग दुर्वास करी आंघोळी ॥ तंव जनीं दीधली आरोळी ॥
त्वरें धाविन्नला सहस्त्रमौळी ॥ तयांवरी ॥६०॥
तो साक्षात सहस्त्रफणी ॥ राखणाइतांची केली धुणी ॥
साठीसहस्त्र पाडिले रणीं ॥ कुशजन ते ॥६१॥
तंव जाहला हाहाःकार ॥ ह्मणोनि धांवला दैत्य मुर ॥
मग चालिला शारंगधर ॥ तयावरी ॥६२॥
देवें सोडिलें महा चक्र ॥ तेणें तोडिलें मुराचें शिर ॥
तेंचि गुणनाम झालें पवित्र ॥ मुरारीं ऐसें ॥६३॥
मुराचा जाहलिया नाश ॥ मग धांविन्नला दैत्य कुश ॥
त्रिशूळें हाणितला हृषिकेश ॥ हृदयावरी ॥६४॥
तो हरीचे आंगीं त्रिशूळ ॥ जैसें गजा संघटे कमळ ॥
नातरी पर्वता आदळोनि शिळ ॥ जाय जैशी ॥६५॥
मग तें सोंडिलें सुदर्शन ॥ जें दैत्यकुळाचें दहन ॥
केलें कुशाचें खंडण ॥ धडमुंडांशीं ॥६६॥
तंव आले कुशकिंकर ॥ त्याणीं एकवटिलें धडशिर ॥
तैं सावध होवोनि असुर ॥ राहिला रणीं ॥६७॥
हरीसि वाटलें आश्चर्य थोर ॥ मागुती सोडिलें चक्र ॥
शतखंड केलें शरीर ॥ कुशदैत्याचें ॥६८॥
मागुतीं मेळविलें समस्त ॥ मिळाले धडमुंड हस्त ॥
तंव तो झाला सचेत ॥ दैत्यनाथ ॥६९॥
मग धांवला विष्णुवरी ॥ असंख्य वर्षोनि शस्त्रास्त्रीं ॥
थोर व्याकुळ केला मुरारी ॥ दैत्यें तेणें ॥७०॥
तंव तेथें पातला नारद ॥ ह्मणे हा शिवाचा वरद ॥
याचा अनारिसा आहे वध ॥ हृषीकेशा ॥७१॥
ऐसा मारिला सात वेळां ॥ युक्ती नचाले गोपाळा ॥
मग कापोनि मांसगोळा ॥ घातला भूमिगर्भीं ॥७२॥
परि फोडों पाहे भूमिका ॥ ह्मणोनि ठेविली शिवाची शाळुंखा ॥
मग तो मस्तकीं धरोनि त्र्यंबका ॥ राहिला स्थिर ॥७३॥
तयासि ह्मणे श्रीअनंत ॥ भलाभलारे शिवभक्त ॥
प्रसन्न जाहलों निवांत ॥ राहीं आतां ॥७४॥
देवासि ह्मणे दैत्यकुश ॥ मी सत्य गा शिवदास ॥
परि त्वांही करावा रहिवास ॥ मजजवळीं ॥७५॥
आतां मज करीं पावन ॥ काहीं द्यावें जी वरदान ॥
मग वर बोलिला नारायण ॥ तयालागीं ॥७६॥
तयासि विष्णु ह्मणे आपण ॥ तवरक्ताचें होईल तूण ॥
त्याविणें करिती संध्यातर्पण ॥ तें निर्फळ होय ॥७७॥
तुझा भूमंडिळीं होईल विस्तार ॥ तूं भूमिगर्भींचा अमर ॥
त्रिकाळीं मी ब्रह्मा आणि रुद्र ॥ येऊं येथें ॥७८॥
द्वापारी येईन नेमस्त ॥ तैं अहर्निशीं देईन सांगत ॥
ऐसें ह्मणोनि अनंत ॥ गेला बळी जवळी ॥७९॥
तेथें गणगंधर्व ऋषेश्वर ॥ स्नान करिती निरंतर ॥
गोमतीसंगमींचें नीर ॥ वंदिती देव ॥८०॥
जरी सांगों तीर्थें समस्त ॥ तरी विस्तारेम होईल ग्रंथ ॥
कीं शुक्ति सांडोनि मुक्त ॥ घेतलें ग्रंथीं ॥८१॥
मग मुनि ह्मणे गा भूपती ॥ तुवां पुसिली द्वारावती ॥
सांकडां कां निघाला श्रीपती ॥ समुद्रतीरीं ॥८२॥
तरि ऐसा आहे पुढार ॥ तो बोल करावया साचार ॥
ह्मणोनि मथुरेहूनि शारंगधर ॥ आला द्वारके ॥८३॥
ऐसी हे महा पुण्यकथा ॥ श्रवणें नाशी सकल दुरितां ॥
आणि द्वारका वाचे बोलतां ॥ होइजे पावन ॥८४॥
मग ह्मणे राजा भारत ॥ येवढा काय जी बळिभक्त ॥
तया निकट अनंत ॥ असे सदा ॥८५॥
हें मज करावें श्रुत ॥ कथा सांगावी समस्त ॥
बळी हा कवणाचें अपत्य ॥ तें सांगें मज ॥८६॥
याहरीचें गुणकीर्तन ॥ मज दुर्लभ गा स्तवन ॥
कीं कमळकंदासि जीवन ॥ आवडे जेवीं ॥८७॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ राया बरवा केला प्रश्न ॥
वैष्णवांमाजी अग्रगण्य ॥ बोलिजे बळी ॥८८॥
तरि तयाची मूळकथा ॥ तुज सांगेन गा भारता ॥
येरव्हीं तुझिया चित्ता ॥ नये जाण ॥८९॥
आतां ऐकें नरनाथा ॥ पूर्वीं हिरण्याक्ष नामें दैत्य होता ॥
तेणें पृथ्वी रसातळीं नेतां ॥ राखिली वराहें ॥९०॥
तो साक्षात यज्ञपुरुष ॥ श्वेतपर्वत पुण्यश्लोक ॥
शुध्दसत्वरूपें जैसा शंख ॥ नारायण ॥९१॥
तेथें झालें महा तुंबळ ॥ देव दैत्य मिळाले सकळ ॥
मग वराहें दंतशूळ ॥ रोविले दैत्या ॥९२॥
तैं रसातळा जातां क्षिती ॥ ते वराहें धरिली दंतीं ॥
ती कथा आहे पुढती ॥ हिरण्याक्षाची ॥९३॥
मग तयाचा धाकुटा बंधु ॥ हिरण्यकश्यप प्रसिध्दु ॥
तेणें देवांसि मांडिला विरोधु ॥ येणेंचि गुणें ॥९४॥
प्रसन्न केला उमावर ॥ थोर मागितला असे वर ॥
कीं पक्षीश्वापदां पासोनि संहार ॥ न व्हावा जी ॥९५॥
देव मनुष्य होकां राक्षस ॥ चेत अचेत ना रात्रिदिवस ॥
भूमिमंडळ आकाश ॥ नाहीं मृत्यु ॥९६॥
ऐसा तो लाधला वर ॥ तेणें देवां नावरे अनिवार ॥
तया जाहला प्रल्हाद कुमर ॥ विष्णुभक्त ॥९७॥
तो झाला महा वैष्णव ॥ सांडोनि दैत्यांचा भाव ॥
पातकाचा होय क्षय ॥ प्रल्हाद ह्मणतां ॥९८॥
मग ह्मणे जन्मेजयो ॥ हा वैष्णव व्हावया कवण उपायो ॥
ऋषि ह्मणे राया संदोहो ॥ न ठेवीं तुझा ॥९९॥
कोणे एके अवसरीं ॥ हिरण्यकश्यप गेला वनांतरीं ॥
पारधी खेळतां दिवस चारी ॥ लागले तया ॥१००॥
मग शून्य देखोनि नगर ॥ इंद्र आला सहपरिवार ॥
धाडी घालोनि स्त्री सुंदर ॥ नेली तयाची ॥१॥
सगर्भा होती सुंदरी ॥ प्रल्हाद होता तिचे उदरीं ॥
ते विलाप करितां नारी ॥ ऐकिलें नारदें ॥२॥
तंव आला ब्रह्मसुत ॥ इंद्रासि कोपला बहुत ॥
ह्मणे स्त्री आणिली हा पुरुषार्थ ॥ वाढला तुझा कीं ॥३॥
धाडीं सांपडे शत्रु वनिता ॥ ते परपुरुषें अभिलाषितां ॥
तो रौरव भोगी मागुता ॥ चंद्रार्कवरी ॥४॥
मग ते सोडविली नारदेम ॥ सहस्त्रनाम वदे विनोदें ॥
नगरा आणितां तये मुग्धे ॥ ऐकिलें गर्भें ॥५॥
तत्वमस्यादि महाव्याकरणें ॥ वेदभाष्यांचीं निरुपणें ॥
प्रणव त्रिगुणात्मक खुणें ॥ पुण्य वाखाणी ॥६॥
नवविधा प्रेमळभक्ती ॥ एक विष्णु सर्वांभूतीं ॥
ऐसी नारदें करितां स्तुती ॥ ऐकिली गर्भें ॥७॥
तोचि तयासि पूर्वसंस्कारु ॥ गर्भीं जाहला नारद गुरु ॥
मग मनीम घरिला निर्धारु ॥ हरिभक्तीचा ॥८॥
ऐसी नगरा आणिली वनिता ॥ हेंचि कारण गा भारता ॥
मग उत्पत्ति झालिया सुता ॥ लागला हरिछंद ॥९॥
महाराजा हिरण्यकश्यपु ॥ कोणी साहों नशके कोपु ॥
कीं देवांदानवां भयकंपु ॥ उदेला जो ॥११०॥
देखोनि पुत्रासि हरिछंद ॥ दैत्यासि वाटे विरोध ॥
नानाउपायें करितां वध ॥ न सांडी हरिचिंतन ॥११॥
पढों घातला गुरूजवळी ॥ परी त्यासि हरि मुखकमळीं ॥
बापें घातला अग्निज्वाळीं ॥ तरी न सांडी नाम ॥१२॥
मग पिता ह्मणे तयासी ॥ तुझा हरि आहे कोणे देशीं ॥
येरु ह्मणे तो हृषीकेशी ॥ सर्व व्यापक ॥१३॥
मग संतापें ह्मणे असुर ॥ या स्तंभीं आहे कीं सर्वेश्वर ॥
येरु होय ह्मणतांचि कर ॥ आपटिला तेणें ॥१४॥
तों गडगड झाली गर्जना ॥ नाद न माये त्रिभुवना ॥
स्तंभ भेदोनि पंचानना ॥ झाला प्रकाश ॥१५॥
परि हे भागवतीं अनारिसी ॥ अंतराळीं आला हृषीकेशी ॥
अर्धसिंह विकट तापसी ॥ नारायण ॥१६॥
अर्धनर तो पंचानन ॥ सूर्यास्तीं घेतला प्राण ॥
पद्मासन घालोनि जाण ॥ निजविला तेथें ॥१७॥
नखें घालोनियां उदरीं ॥ सुस्नात जाहला रुधिरीं ॥
हिरण्यकश्यप यापरी ॥ विदारिला देवें ॥१८॥
प्रल्हादें देखिलें निजरूप ॥ शंख चक्र आयुधें धनुष ॥
खङ्ग खेटक पद्मदेख ॥ अंकुशमंडित ॥१९॥
अर्धांगीं पाहे सिंधुबाळी ॥ प्रल्हाद स्तवी प्रेमळीं ॥
अभय देवोनि अंतराळीं ॥ वेंघे हरी तो ॥१२०॥
तया प्रल्हाद राज्य करितां ॥ नगरीं नाहीं व्याधी व्यथा ॥
हरिभक्तीविण सर्वथा ॥ नेणती कांहीं ॥
सदा सडे संमार्जनें ॥ घरीं तुळसीचीं वृंदावनें ॥
वेदश्रुति हरिकीर्तनें ॥ गगनगर्जे ॥२२॥
तेथें हरिहरांचे प्रसादें ॥ यति ब्रह्मचारी सुवृंदें ॥
मृगहरिणांचेनि बाधे ॥ आथीचना तो ॥२३॥
प्रल्हादासी राज्य करितां ॥ सदा हरिनामाची कथा ॥
नीतिमार्गाविण सर्वथा ॥ नचालती कदा ॥२४॥
तया प्रल्हादा जाहला कुमर ॥ विरोचन नामें महा असुर ॥
प्रौढ झालिया राज्यभार ॥ दधिला तयासी ॥२५॥
तो विरोचन राज्य करितां ॥ तेणें प्रसन्न केला सविता ॥
नाना तपदानीं तत्वतां ॥ तोषविला देवो ॥२६॥
मग तो प्रत्यक्षप्रमाणी ॥ प्रसन्न जाहलों ह्मणे वचनीं ॥
तंव येरु मागे समरांगणीं ॥ अभेद्य कवच ॥२७॥
मग आपुले माथांचा मुकुट ॥ सूर्यें तया दीधला वरिष्ठ ॥
कीं हा माथां असतां रणवट ॥ न भंगें तुझा ॥२८॥
देवांदानवांच्या पडलिया धाडी ॥ अथवा पुरुषांच्या लक्षकोडी ॥
परि मस्तकींचा हा न काढीं ॥ विरोचना तूं ॥२९॥
ऐसा तो लाधला वर ॥ मग तेथोनि गेला दिनकर ॥
आणि नगरा आला असुर ॥ विरोचन तो ॥१३०॥
मग इंद्रावरी केली धाडी ॥ झुंजतां न पुरे तेहतीस कोडी ॥
मृत्युलोकींचीं देशधडी ॥ केलीं राज्यें ॥३१॥
ऐसा तो मातला अनिवार ॥ जयासि भीती हरिहर ॥
मग वैकुंठपीठें करोनि विचार ॥ धरिलें रूप ॥३२॥
धरिली वैष्णवी माया ॥ जे पार्वती मोहिनी नाह्या ॥
स्त्रीरूप धरोनि काया ॥ आला भूमंडळीं ॥३३॥
तेथें कोणे एके काळीं ॥ पुष्पवृक्षांचे वनस्थळीं ॥
वापी कूप पूर्णजळीं ॥ हेलावती ॥३४॥
कमळीं नाचतीं मधुकर ॥ हंस सारसें मयूर चकोर ॥
कोकिळा गाती सुस्वर ॥ मधुरतेसी ॥३५॥
तेथें नाहीं सूर्यासि गमन ॥ जळ न देखे रविकिरण ॥
ऐसें देखोनि श्रृंगारवन ॥ तोखली माया ॥३६॥
ते लावण्याची रूपरेखा ॥ त्रिभुवन न पुरे तिचे नखा ॥
तया सरी करी आदिपुरुषा ॥ ऐसें दुजें कवण ॥३७॥
तंव कोणे एके दिवशीं ॥ विरोचन गेला पारधीसी ॥
मृग मारितां कटकेंशीं ॥ पडली तुटी ॥३८॥
तृषें झालासे पीडित ॥ वारू तापला धांवत ॥
वृक्ष देखोनि दैत्यनाथ ॥ आला तेथें ॥३९॥
तंव ते छाया सुशीतळ ॥ शेजीं सरोवर निर्मळ ॥
वारू बांधोनि मुखकमळ ॥ प्रक्षाळिलें उदकें ॥१४०॥
मग चूळ भरोनि अंजुळीं ॥ मुखीं घेवोनि सांडी गुरळीं ॥
वारू बांधोनि वृक्षातळीं ॥ विसंबला तो ॥४१॥
परवंटीचा घेतला विडा ॥ वरवंटी पाहे देवढा ॥
तंव सुंदरी देखिली पुढां ॥ वैष्णवी शक्ती ॥४२॥
पाहतां दृष्टीं दृष्ट मीनली ॥ मग तया पडली कामभूली ॥
मीन जैसा आमिष गिळी ॥ आसुडी व्याध ॥४३॥
अथवा अंगार अंगातळीं ॥ तो सांपडे कवणे काळीं ॥
तैसा तो विरहानळीं ॥ उठिला वेगा ॥४४॥
नातरी दीपकलिके पतंग ॥ नाना नादघटीं कुरंग ॥
कीं रतिरमणीं मातंग ॥ पावे मरण ॥४५॥
नानाद्रव्यांलागीं प्राणी ॥ मरण विसरे कोणी कोणी ॥
तैसा देखताम मोहिनी ॥ आला जवळी ॥४६॥
तंव ते लावण्यरूपकळा ॥ वैष्णवीमाया अबळा ॥
त्रैलोक्य व्यापूनि कळा ॥ सत्रावी जे ॥४७॥
जे समुद्रमंथनीं देवांदैत्यां ॥ रूपें मोहिलें कैलासनाथा ॥
तेंचि रूप गा भारता ॥ धरिलें देवें ॥४८॥
मग ह्मणे राजा भारत ॥ हा सांगा जी सर्व वृत्तांत ॥
कैसा अवतरला अनंत ॥ मोहिनीरूपें ॥४९॥
अनंतें समुद्रमंथनीं ॥ रूप धरिलें जें कामिनी ॥
तो वृत्तांत सांगा मुनी ॥ मजसी आतां ॥१५०॥
मग ह्मणे वैशंपायन ॥ राया बरवा केला प्रश्न ॥
तरी ऐके गा चित्त देवोन ॥ अपूर्व कथा ॥५१॥
जेणें कापिलें राहूच्या शिरा ॥ जेवितां उडविलें अंबरा ॥
ते ह्याळसा ऐका जी सत्वरा ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥५२॥
इति श्रीकथाकल्पतरू ॥ द्वितीयस्तबक मनोहरू ॥
मोहिनी विरोचन प्रकारू ॥ चतुर्थोऽध्यायीं कथियेला ॥१५३॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥