श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्य नमः ॥ इष्टदेवताकुलदेवताभ्यो नमः ॥
ॐ नमोजी नारायणा ॥ अनंता तूं शेषशयना ॥
सगुणनिर्गुणपरिपूर्णा ॥ विश्वव्यापका ॥१॥
जयजय परमानंदा ॥ अनादिसिद्धा गोविंदा ॥
गुणातीता शुद्धबोधा ॥ अक्षरा तूं ॥२॥
जयजयाजी भगवंता ॥ जयजयाजी अव्यक्ता ॥
परात्पर मोक्षदाता ॥ कैवल्यदानी॥३॥
जय मंगळनिधाना ॥ सकळकळापरिपूर्णा ॥
तुझा आधार भूतगणां ॥ देवराया ॥४॥
जयजयाजी ज्योतिलिंगा ॥ परमपुरुषा महाभागा ॥
जयजयाजी वेदगर्भा ॥ मुकुंदा तूं ॥५॥
तुझें केलिया नामस्मरण ॥ तेथें कैचें उद्भवेल विघ्न ॥
कीं अमृत करितां प्राशन ॥ मरण कैंचें ॥६॥
आतां असो हें स्तवन ॥ पुढें बोलणें हरिकीर्तन ॥
जैसें गंगे दीजे अर्घ्यदान ॥ गंगोदकाचें ॥७॥
अथवा अर्कासि दीजे आरती ॥ ते काय आणिकाची दीप्ती ॥
तैसी माझी गमली स्तुती ॥ तुह्मांचरणीं ॥८॥
ऐसिया तुज विश्वंभरा ॥ शरण आलों जी दातारा ॥
अज्ञातहृदयींच्या गाभारां ॥ पेरावें बीज ॥९॥
हृदयीं विरुढला कथाकल्पतरु ॥ तयाचा होईं तूं बनकरु ॥
भक्ति सुमनाचा मधुकरु ॥ तूंचि येथें ॥१०॥
या कल्पतरुचा पूर्वील स्तबक ॥ पूर्ण जाहला प्रथम विवेक॥
तरी आतां द्वितीयाचा उन्मेख ॥ बोलवीं मज ॥११॥
देवा तव कृपेवांचून ॥ मी न पावेंचि हें पेण ॥
कीं अमृतासही केलें उणें ॥ कृपामृतें तुझिये ॥१२॥
तरी कृपा करोनि श्रीहरी ॥ बीज पेरीं अभ्यंतरीं ॥
आतां ग्रंथ करावया शिरीं ॥ ठेवीं हात ॥१३॥
आतां गणेश कुळदेवता ॥ गुरु श्रोतयां विष्णुभक्तां ॥
वेदव्यासादिकां समस्तां ॥ केलें नमन ॥१४॥
मज द्यावाजी आयास ॥ ग्रंथकथेचा सौरस ॥
तुमच्या कृपाकटाक्षें नवरस ॥ बोलेन आतां ॥१५॥
जये कथेचें करितां श्रवण ॥ अघें नासती दारुण ॥
गजायूथांवरी पंचानन ॥ उडी जैसी ॥१६॥
जन्मेजय आणि वैशंपायन ॥ हा बोलती कथेचा प्रश्न ॥
तो ऐका चित्त देऊन ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥१७॥
इति श्रीकथाकल्पतरु ॥ द्वितीयस्तबक मनोहरु ॥
मंगलाचरणप्रकारु ॥ प्रथमोऽध्यायीं कथियेला ॥१८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥१८॥