मां विधत्तेऽभिधत्ते मां विकल्प्यापोह्यते त्वहम् ।
एतावान् सर्ववेदार्थः शब्द आस्थाय मां भिदाम् ।
मायामात्रमनुद्यान्ते प्रतिषिद्ध्य् प्रसीदति ॥४३॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे एकविंशोऽध्यायः ॥२१॥
माझी पावावया स्वरूपसिद्धी । मलिनाचिया चित्तशुद्धी ।
वेद स्वधर्म प्रतिपादीं । त्यागावी निषेधीं विषयातें ॥६१॥
तेथ अग्निहोत्रादि विधान । यज्ञान्त कर्माचरण ।
तें चित्तशुद्धीचें कारण । वैराग्य दारुण उपजवी ॥६२॥
दारुण वैराग्यउत्पत्ती । इहामुत्रविषयनिवृत्ती ।
तेव्हा साधकास माझी प्राप्ती । सहजस्थिती स्वभावें ॥६३॥
एवं कर्मकांडचिये स्थिती । विधिनिषेध वेदोक्ती ।
साधकांसी माझी प्राप्ती । जाण निश्चितीं या हेतू ॥६४॥
विषयीं परम बाधा देखती । परी त्यागीं नाहीं सामर्थ्यशक्ती ।
ऐशिया साधकांप्रती । वेदें मद्भक्ती द्योतिली ॥६५॥
येथ मंत्रमूर्ति-उपासन । माझे सगुण अनुष्ठान ।
तेथ करितां अनन्यभजन । रजतम जाण नासती ॥६६॥
मग केवळा सत्त्ववृत्तीं । श्रवणकीर्तनीं अतिप्रीती ।
तेणें मद्भावो सर्वांभूतीं । माझी चौथी भक्ती तेणें होय ॥६७॥
आतुडल्या माझी चौथी भक्ती । मद्भक्तां नावडे मुक्ती ।
अद्वैत भजनाचिया प्रीतीं । धिक्कारिती कैवल्य ॥६८॥
अद्वैतबोधें करितां भजन । मी अनंत अपार चिद्घन ।
भक्तीमाजीं आकळें जाण । ये मद्रूपण मद्भक्तां ॥६९॥
तेव्हा भज्य-भजक-भजन । पूज्य-पूजक-पूजन ।
साध्य-साधक-साधन । अवघें आपण स्वयें होय ॥४७०॥
माझी ऐश्वर्यसामर्थ्यशक्ती । तेही ये निजभक्तांच्या हातीं ।
अद्वैतभजनाचिया प्रीतीं । मत्पदप्राप्ती मद्भक्तां ॥७९॥
मी देव तो भक्त शुद्ध । हा बाहेरी नांवाचाचि भेद ।
आंतुवट पाहतां बोध । सच्चिदानंद निजऐक्यें ॥७२॥
हे उपासनाकांडस्थिती । साधकीं करूनि माझी भक्ती ।
यापरी पावले माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥
`मायाप्रतिबिंबित' चैतन्य । त्वंपदार्थें वाच्य जाण ।
ज्याच्या अंगीं जीवभिधान । अविद्या जाण उपजवी ॥७४॥
जेवीं स्वप्रामाजीं आपण । आन असोनि देखे अन ।
तेवीं आविद्यकत्वें जाण । `जीवपण' एकदेशी ॥९५॥
जें `मायासंवलित' चैतन्य । जो योगजन्य जगत्कारण ।
जो सर्वद्रष्टा सर्वज्ञ । सदा संपन्न ऐश्वर्यें ॥७६॥
जो सकळ कर्मांचा कर्ता । तो कर्ताचि परी अकर्ता ।
ज्याचे अंगीं स्वभावतां । नित्यमुक्तता स्वयंभ ॥७७॥
ज्याची अकुंठित सहजसत्ता । जो परमानंदें सदा पुरता ।
ज्यासी ईश्वरत्वें समर्थता । हे जाण वाचकता तत्पदार्थाची ॥७८॥
जीवाचें सांडोनियां अज्ञानत्व । शिवाचें सांडूनि सर्वज्ञत्व ।
दोंहीचें शोधित जें लक्ष्यत्व । ऐक्यें निजतत्त्व साधिती ॥७९॥
लग्नीं नोवरा निमासुरा । तोचि गेलिया देशावरा ।
विदेशीं देखिला एकसरा । तारुण्यमदभरा संपन्न ॥४८०॥
ते काळींची त्यजूनि बाल्यावस्था । आजिची नेघूनि तारुण्यता ।
पत्नी अनुसरे निजकांता । निजस्वरूपतास्वभावें ॥८१॥
तेवीं त्वंपदतत्पदवाच्यार्थ । दोंहीचा सांडावा निश्चितार्थ ।
ऐक्यें अंगीकारावा लक्ष्यार्थ । हा ज्ञानकांडार्थ उद्धवा ॥८२॥
जीवशिवांचेनि ऐक्यें जाण । माझे चित्स्वरूपीं समाधान ।
स्वयें पाविजे आपण । हें ज्ञानकांड संपूर्ण बोलिलें वेदें ॥८३॥
वेदा आदि-मध्य-अवसानीं । मातें लक्षितीं कांडें तीनी ।
तोचि अर्थ उपसंहारूनी । ग्रंथावसानीं हरि बोले ॥८४॥
उद्धवा वेदाचें वचन । अर्थगंभीर अतिगहन ।
तेथ शिणतां ऋषिजन । अर्थावसान अलक्ष्य ॥८५॥
तें वेदार्थाचें निजसार । माझे गुह्य ज्ञानभांडार ।
तुज म्यां सांगितलें साचार । पूर्वापरअविरोधें ॥८६॥
तें ऐकोनि देवाचें उत्तर । उद्धव चमत्कारला थोर ।
तेंचि वेदाचें निजसार । पुढती श्रीधर सांगो कां ॥८७॥
पान्हा लागतांचि तोंडीं । दोहक वांसरूं आंखुडी ।
त्यापरी अतिआवडीं । स्वयें चडफडी उद्धव ॥८८॥
जेवीं कां पक्षिणीपुढें । चारा घ्यावयाचे चाडें ।
पिलें पसरीं चांचुवडें । तेवीं कृष्णाकडे उद्धवु ॥८९॥
तें उद्धवाचें मनोगत । जाणोनियां श्रीअनंत ।
सकळ वेदार्थ संकळित । ग्रंथांतीं सांगत निजसारंश ॥४९०॥
नानाशाखीं अतिप्रसिद्ध । त्रिकांडीं वाढला जो वेद ।
तेथील नाना शब्दीं हाचि बोध । जो मी अभेद परमात्मा ॥९१॥
त्या मातें धरोनि हातीं । त्रिकांडीं चालिल्या श्रुती ।
त्या श्रुत्यर्थाची उपपत्ती । यथास्थितीं सांगेन ॥९२॥
मी कर्मादिमध्यअंतीं । मी कर्मकर्ता क्रियाशक्ती ।
कर्मफळदाता मी श्रीपती । हा इत्यर्थ निश्चितीं `कर्मादिकांडीचा' ॥९३॥
मंत्रमूर्ति आणि मंत्रार्थ । तेही मीचि गा निश्चित ।
पूज्य पूजक पूजा समस्त । मजव्यतिरिक्त आन नाहीं ॥९४॥
[ `शिवो भूत्वा शिवं यजेत्' श्रुति ]
देवें देवोचि पूजिजे । देव होऊनि देवा भजिजे ।
हें वेदींचें विजबीज माझें । हेंचि आगमीं बोलिजे मुख्यत्वें ॥९५॥
मीच देवो मीचि भक्त । पूजोपचार मी समस्त ।
मीचि मातें पूजित । हे इत्थंभूत `उपासना' ॥९६॥
हें उपासनाकांडींचें निजसार । आगमशास्त्रींचें गुह्य भांडार ।
माझ्या निजभक्तांचें वस्तीचें घर । ते हे साचार उपासना ॥९७॥
`ज्ञानकांड' तें अलौलिक । वेद आपला आपण द्योतक ।
अवघा संसाराचि काल्पनिक । तेथ वेद नियामक कोणे अर्थें ॥९८॥
वोस घरास वस्तीस पहा हो । निर्जीव पाहुणा आला राहों ।
त्याचा कोण करील वोठवो । तैसा भावो वेदाज्ञे ॥९९॥
[ श्रुति-`एकमेवाद्वितीयं ब्रह्म, नेह नानास्ति किंचन' ]
खांबसूत्रावरील पुतळीसी । तीतें बोडिलें जेवीं शिसीं ।
तेथें नाहीं निघणें पुढारे केंसीं । तेवीं शुद्धीं वेदासी ठाव नाहीं ॥५००॥
मूळ संसारचि मायिक । तेथ वेद तोही तद्रूप देख ।
मृगजळीं नाहीं उदक । परी वोलावाहि देख असेना ॥१॥
जेथ मूळीं मुख्य अद्वैतता । तेथ कैंचा वक्ता कैंचा श्रोता ।
कैंचें कर्म कैंचा कर्ता । वेदवार्ता ते कैंची ॥२॥
नाहीं दृश्य-दृष्टा-दर्शन । नाहीं ध्येय-ध्याता-ध्यान ।
नाहीं ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान । वेदवचन तेथें कैंचें ॥३॥
जेथ भ्रमाची राणीव । जेथ भेदाची जाणीव ।
तेथ वेदाची शहाणीव । गोड गाणीव उपनिषदांची ॥४॥
जंव भेदाची सबल स्थिती । तंव वेदाची थोर ख्याती ।
भेदु आलिया अद्वैतीं । वेद विराला `नेति' म्हणोनी ॥५॥
जळगार जळीं विरे । तेवीं वेदु अद्वैतीं मुरे ।
हें `ज्ञानकांड' साचोकारें । तुज म्यां खरें सांगितले ॥६॥
तेथ उपजला स्वयें अग्नी । त्या अरणी जाळूनि शमे वन्ही ।
तेवीं ज्ञानकांडनिरूपणीं । वेदु निज निर्दळणीं पर्वतला ॥७॥
एक ब्रह्म जें अद्वैत । येणें श्रुतिवाक्यें मिथ्या द्वैत ।
हें बोलूनि वेद हारपे तेथ । ब्रह्म सदोदित संपूर्ण ॥८॥
`मी ब्रह्म' हे शुद्धीं स्फुरे स्फूर्ती । तेथचि ॐकाराची उत्पत्ती ।
तोही ब्रह्मरूप निश्चितीं । त्यासी `बह्म' म्हण्ती एकाक्षर ॥९॥
त्या ॐकारापासोनि गहन । श्रुति शाखा स्वर वर्ण ।
झालें तें ब्रह्मरूप जाण । एवं वेद पूर्ण परब्रह्म ॥५१०॥
जेवीं सोन्याचे अळंकार । पाहतां सोनेंचि साचार ।
तेवीं श्रुतिशाखावेदविस्तार । तो अवघा ॐकार मद्रूपें ॥११॥
जो वेदप्रतिपाद्य पुरुषोत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम् ।
तो हें बोलिला मेघश्याम । आत्माराम श्रीकृष्ण ॥१२॥
तिंही कांडी निजसंबंध । पूर्वापर अविरुद्ध ।
हा वेदार्थ परम शुद्ध । तुज म्यां विशद बोधिला ॥१३॥
याहोनियां परता । वेदार्थ नाहीं गा सर्वथा ।
तो तुज म्यां सांगितला आतां । जाण तत्त्वता उद्धवा ॥१४॥
या वेदार्थाची निजखूण । हृदयीं भोगितां आपण ।
होय जीवशिवां समाधान । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥१५॥
हें ऐकोनि उद्धव जाण । झाला वेदार्थीं निमग्न ।
दोनी टंवकारले नयन । स्वानंदीं मन बुडालें ॥१६॥
चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठीं बाष्प दृढ अडी ।
लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥१७॥
शरीरीं स्वेद सकंपता । नयनीं स्वानंदजळ येतां ।
बोल बुडाला सर्वथा । मूर्च्छा येतयेतां सांवरी ॥१८॥
तंव हृदया आली आठवण । हें भलें नव्हे दुश्चित्तपण ।
झणीं निजधामा जाईल श्रीकृष्ण । येणें धाकें नयन उघडिले ॥१९॥
तंव घवघवीत । मुकुट कुंडलें मेखळा ।
कांसे झळके सोनसळा । आपाद बनमाळा शोभत ॥५२०॥
अंतरीं भोगी चैतन्यघन । बाहेरी उघडितां नयन ।
आनंदविग्रही श्रीकृष्ण । मूर्ती संपूर्ण संमुख देखे ॥२१॥
म्हणे श्रीकृष्ण चैतन्यघन । जैतन्यविग्रही श्रीकृष्ण ।
सगुणनिर्गुणरूपें जाण । ब्रह्म परिपूर्ण श्रीकृष्ण ॥२२॥
बाप भाग्य उद्धवाचें । सगुणनिर्गुण दोंहीचें ।
सुख भोगितसे साचें । हें श्रीकृष्णकृपेचें महिमान ॥२३॥
जेथ सद्गुरुकृपा संपूर्ण । तेथ शिष्याची आवडी प्रमाण ।
तो जैं मागे मूर्ति सगुण । तैं तेचि जाण गुरु देती ॥२४॥
पाहिजे निर्गुण निजप्राप्ति । ऐशी आवडी ज्याचे चित्तीं ।
तैं निर्गुणाचिये निजस्थितीं । गुरुकृपा निश्चितीं नांदवी ॥२५॥
सगुण निर्गुण स्वरूपें दोनी । भोगावया आवडी ज्याचे मनीं ।
तेही स्थितीच्या गुरु दानीं । कृपाळुपणीं समर्थ ॥२६॥
सद्गुरूचें अगाध महिमान । जें वेदा न बोलवेचि जाण ।
त्याची कृपा झालिया पूर्ण । दुर्लभ कोण पदार्थ ॥२७॥
ते कृष्णकृपेस्तव जाण । फिटलें उद्धवाचें दुर्लभपण ।
सगुण निर्गुण एक कृष्ण । हे खूण संपूर्ण बाणली ॥२८॥
जाणोनि कृष्णाचें पूर्णपण । त्याचे लक्षोनि श्रीचरण ।
धांवोनि उद्धव आपण । घाली लोटांगण हरिचरणीं ॥२९॥
तेव्हां सांवळा सकंकरण । चारी बाह्या पसरी श्रीकृष्ण ।
उद्धवासी प्रेमें उजलून । दीधलें आलिंगन स्वानंदें ॥५३०॥
त्या आलिंगनाचें सुख । अनुभवी जाणती देख ।
जो उद्धवासी झाला हरिख । त्याचा जाणता एक श्रीकृष्ण ॥३१॥
तो कृष्ण म्हणे उद्धवा । हा विसाव्याचा विसावा ।
माझ्या वेदाचा निजगुह्यठेवा । तो हा एकविसावा तुज एकविसावा तुज सांगितला ॥३२॥
जेणें मोडे लिंगदेहाचा यावा । जेणें जीवत्व नाठवे जीवा ।
तो हा विसाव्याचा विसावा । तुज एकविसावा निरूपिला ॥३३॥
जेणें मिथ्यात्व ये देहभावा । जेणें शून्य पडे रूपनांवा ।
तो हा विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥३४॥
जेथ अज्ञाना होय नागोवा । जेथ ज्ञान ये अभावा ।
तो विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥३५॥
जेथ वेदुही वेडावला । बोधही लाजोनि बुडाला ।
अनुभवो स्वयें थोंटावला । तो हा निरूपिला वेदार्थ ॥३६॥
हें वेदार्थसारनिरूपण । मज विश्वात्म्याचें निजनिधान ।
तुज म्यां सांगितलें संपूर्ण । हे जीवींची खूण उद्धवा ॥३७॥
कोटिकोटि साधनें करितां । गुरुकृपेवीण सर्वथा ।
हे न ये कोणाचे हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥३८॥
ते गुरुकृपेलागीं जाण । आचरावे स्वधर्म पूर्ण ।
करावें गा शस्त्रश्रवण । वेदपठण तदर्थ ॥३९॥
ते कृपेलागीं आपण । व्हावें दीनाचेंही दीन ।
धरितां संतांचे चरण । स्वामी जनार्दन संतुष्टे ॥५४०॥
गुरु संतुष्टोनि आपण । करवी भागवतनिरूपण ।
एका विनवी जनार्दन । कृपा नित्य नूतन करावी ॥४१॥
पूढील अध्यायीं गोड प्रश्न । उद्धव पुसेल आपण ।
प्रकृतिपुरुषांचें लक्षण । तत्त्वसंख्या पूर्ण विभाग ॥४२॥
त्याचें सांगतां उत्तर । जन्ममरणाचा प्रकार ।
स्वयें सांगेल शर्ङ्गधर । कथा गंभीर परमार्थी ॥४३॥
जे कथेचें करितां श्रवण । वैराग्य उठे कडकडून ।
येणें विन्यासें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥४४॥
घटाकाशें ठाकिजे गगन । तेवीं एका जनार्दना शरण ।
त्याचे वंदिता श्रीचरण । रसाळ निरूपण स्वयें स्मरे ॥५४५॥
इति भागवते महापुराणे भगवदुद्धवसंवादे एकादशस्कंधे
एकाकारटीकायां वेदत्रयविभागनिरूपणं नाम एकविंशोऽध्यायः ॥२१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥श्लोक ॥४३॥ओंव्या ॥५४५॥