ते मे मतमविज्ञाय परोक्षं विषयात्मकाः ।
हिंसायां यदि रागः स्याद्यज्ञ एव न चोदना ॥२९॥
माझ्या वेदाचा अगम्य भावो । न कळोनि गूढ अभिप्रावो ।
तेणें सकामासी उत्साहो । स्वर्गातें पहा हो मानिती सत्य ॥९७॥
`रोचनार्थ' स्वर्ग बोले वेद । तो प्रगटार्थ मानूनि शुद्ध ।
मग स्वर्गसाधनें विविध । कामलुब्ध आदरती ॥९८॥
तेथ यज्ञ हें मिषमात्र जाण । स्वयें करावया मांसभक्षण ।
अविधीं करिती पशुहनन । अतिदृप्त जाण कामार्थीं ॥९९॥
त्यांसी पैं गा देहांतीं । मारिले पशु मारावया येती ।
हातीं घेऊनि गड्ग काती । सूड घेती यमद्वारीं ॥३००॥
तेथ कैंचें स्वर्गसुख । अविधि-साधनें महामूर्ख ।
पावले गा अघोर नरक । सकामें देख नाडले ॥१॥
यथेष्ट करावया मांसभक्षण । स्वेच्छा जें कां पशुहनन ।
त्यांसी वेदें केलें निर्बंधन । पशुहनन यज्ञार्थ ॥२॥
तेथही घातली जाण । देश काळ आणि वर्तमान ।
मंत्र तंत्र विधि विधान । धन संपूर्ण अतिशुद्ध ॥३॥
शक्त सज्ञान धनवंत । ऐसा कर्ता पाहिजे थेथ ।
मुष्टिघातें करावया पशुघात । पडे प्रायश्चित्त `मे' म्हणतां ॥४॥
ऐशी वेदाज्ञा नाना अवघड । घातलीं प्रायश्चित्तें अतिगूढ ।
तरी सकाम जे महामूढ । ते धांवती दृढ पशुहनन ॥५॥
ऐसें झाल्या पशुहनन । विभाग येईल कवळ प्रमाण ।
तेंचि करावें भक्षण । दांतांसी जाण न लागतां ॥६॥
विभाग भक्षितां आपण । जो करी रसस्वादन ।
त्यासीही प्रायश्चित्र जाण । हेंही निर्बंधन वेदें केलें ॥७॥
करावें मांसभक्षण । हे वेदाज्ञा नाहीं जाण ।
त्याचें करावया निराकरण । लाविलें विधान यज्ञाचें ॥८॥
स्वेच्छा पशु न मारावया जाण । यज्ञीं नेमिलें पशुहनन ।
न करावया मांसभक्षण । नेमिला प्रमाण यज्ञभाग ॥९॥
हेंही वेदाचें बोलणें । मूर्खप्रलोभाकारणें ।
येर्हवीं पशुहिंसा न करणें । मांस न भक्षणें हें वेदगुह्य ॥३१०॥