अकृष्णसारो देशानामब्रह्मण्योऽशुचिर्भवेत् ।
कृष्णसारोऽप्यसौवीरकीकटासंस्कृतेरिणम् ॥८॥
कोणे एके पृथ्वीतळीं । मेघ न वर्षतां जळीं ।
पेरिलीं धान्यें सदा निळीं । वसुधा-जिव्हाळी ते म्हणती ॥८१॥
तेंचि पाहतां पृथ्वीवरी । एके भागीं गा उखरी ।
मेघ वर्षतां शरधारीं । अंकुरेना डिरी उखरत्वें ॥८२॥
तेवीं देशाची शुद्ध्यशुद्धी । तुज मी सांगेन यथाविधी ।
जेथ कर्मीं नोहे कार्यसिद्धी । तेथ कर्म त्रिशुद्धी न करावें ॥८३॥
कृष्णामृग जेथ नाहीं । ते जाण पां अपवित्र भुयी ।
कर्मादरु तिये ठायीं । न करावा पाहीं सर्वथा ॥८४॥
जेथ ब्राह्मणचि नाहीं । तो देश अपवित्र पाहीं ।
ब्राह्मण अकर्मीं जे ठायी । भूमी तेही अपवित्र ॥८५॥
जेथ ब्राह्मणाची अभक्ती । शेखों हेळूनि निंदिती ।
तो देश गा कर्माप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥८६॥
जे देशीं कृष्णमृग असती । परी नाहीं भगवद्भक्ती ।
तो देश कर्मप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥८७॥
भक्तिहीन देश प्रसिद्ध । कीकट कलिंग मागध ।
तेथ स्वधर्म नव्हती शुद्ध । जाण अशुद्ध ते देश ॥८८॥
नाहीं उपलेप संमार्जन । ते स्वगृहीं भूमी अशुद्ध जाण ।
कां जेथ वेदबाह्य असज्जन । तेंही स्थान अपवित्र ॥८९॥
जे भूमी केवळ उखर । ते जाण सदा अपवित्र ।
आतां काळाचें काळतंत्र । पवित्रापवित्र सांगेन ॥९०॥