मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एते यमाः सनियमा उभयोर्द्वादश स्मृताः ।

पुंसामुपासितास्तात यथाकामं दुहन्ति हि ॥३५॥

दोंही श्लोकीं यम नियम । निरूपिले उत्तमोत्तम ।

बारा बारा यांचें वर्म । गुह्य परम शास्त्रार्थी ॥१३॥

पुरुष यांचें उपासन । जरी करी सकामन ।

तैं कामधेनूच्या ऐसें जाण । करिती पूर्ण सकळ काम ॥१४॥

हेचि पैं गा यम नेम । पुरुष उपासी निष्काम ।

तैं त्यासी माझें निजधाम । अतिसुगम निजप्राप्ती ॥१५॥

आतां शमदमादिक तुझे प्रश्न । जेणें हाता पावे ब्रह्मज्ञान ।

तें सांगेन गुह्य निरूपण । सावधान उद्धवा ॥१६॥

प्रश्नोत्तर सांगेल श्रीकृष्ण । तें अवधारितां सावधान ।

तत्काळ होय ब्रह्मज्ञान । हें परम प्रमाण अतिगुह्य ॥१७॥

तृप्त व्हावया बालकासी । निजकरें माता ग्रास दे त्यासी ।

तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मज्ञानासी देतसे ॥१८॥

जो रसु गोड लागे पित्यासी । तो बळेंचि पाजी बालकासी ।

तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मरसासी देतसे ॥१९॥

आधींचि तानयाचें प्रेम मोठें । वरी लागतां त्याचें मुखवटें ।

मग स्वानंदाचेनि नेटें । पान्हा लोटे अनिवार ॥४२०॥

तेवीं स्वयें श्रीकृष्ण । दाटूनि देतसे ब्रह्मज्ञान ।

तेथें उद्धवें पुशिलें प्रश्न । तेणें अधिक जाण तुष्टला ॥२१॥

आधींच पर्जन्य खरा । वरी मीनलासे वीजवारा ।

मग अनिवार वर्षे धारा । खणोनि धरा वाहतसे ॥२२॥

तेवीं द्यावया ब्रह्मज्ञान । मिष उद्धवाचे प्रश्न ।

स्वानंदें तुष्टला श्रीकृष्ण । ब्रह्म पूर्ण देतसे ॥२३॥

निमोले देतां मिठाचे खडे । चिंतामणी हातीं चढे ।

कां विटेसाठीं परीस जोडे । न घे तो नाडे निजस्वार्था ॥२४॥

तेवीं उद्धवाचे थोडे प्रश्न । तेणें आतुडे ब्रह्म पूर्ण ।

एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥२५॥

उद्धवाचे चौतीस प्रश्न । त्यांत यम नियम जाहले जाण ।

उरले बत्तीस गुण । तेंही विवंचन अवधारा ॥२६॥

प्रश्नीं दयेचें प्रतिउत्तर । न सांगेचि शारंगधर ।

त्या अर्थीं भावगर्भ सार । षड्‍गुणैश्वर्य बोलिलें ॥२७॥

एही विखींचें व्याख्यान । पुढें सांगेल श्रीकृष्ण ।

दयेच्या ठायीं भाग्य संपूर्ण । कोण कारण सांगावया ॥२८॥

एवं उरले एकतीस प्रश्न । आधिक एक सांगेल श्रीकृष्ण ।

`कर्मस्वसंगम शौच' जाण । कार्यकारणसंबंधा ॥२९॥

ऐसे हे तेहतीस प्रश्न । व्याख्यान सांगेल श्रीकृष्ण ।

तें करतळीं ब्रह्मज्ञान । उद्धवासी जाण देतसे ॥४३०॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP