उद्धव उवाच-
ज्ञानं विशुद्धं विपुलं यथैतद्वैराग्यविज्ञानयुतं पुराणम् ।
आख्याहि विश्वेश्वर विश्वमूर्ते त्वद्भक्तियोगं च महद्विमृग्यम् ॥८॥
विष्वक्सेना विश्वेश्वरा । विश्वमूर्ती विश्वंभरा ।
जेणें पाविजे ब्रह्मसाक्षात्कारा । त्या ज्ञाननिर्धारा मज सांगा ॥९८॥
नुसधें सांगती ज्ञान । ते केवळ मूढ जाण ।
सांग तूं वैराग्ययुक्ति तीक्ष्ण । जें छेदी बंधन जीवांचें ॥९९॥
ज्ञानेंवीण वैराग्य आंधळें । तें अरडीदरडी आदळे ।
वैराग्येंवीण ज्ञान पांगळें । युक्ति देखे परी न चले पुरुषार्थ ॥१००॥
विवेक वैराग्य दोनी । प्रवेशल्या हृदयभुवनीं ।
तों विषयावस्था निरसूनी । सोहंपणीं जीव वर्तें ॥१॥
जंव ज्ञानासी न भेटे विज्ञान । तंव न निरसे जीवपण ।
यालागीं सांगावें विज्ञान । जें जीवशिवपण निवारी ॥२॥
असंभावनादोषशून्य । तें बोलिजे `शुद्ध ज्ञान' ।
जें विपरीतभावनेवीण । त्यातें सज्ञान `विपुल' म्हणती ॥३॥
ऐसें विशुद्ध-विपुल-ज्ञान । तद्युक्त वैराग्य-विज्ञान ।
त्यांमाजींही श्रेष्ठ तुझें भजन । कृपा करून सांगिजे ॥४॥
ज्ञान-विज्ञान-वैराग्यस्थितीं । जुनाट तुझी भगवद्भक्ती ।
मज सांगावी सुनिश्चितीं । कृपामूर्ती श्रीकृष्णा ॥५॥
तुझे उत्तमभक्तिकारणें । साधु पडले गवेषणें ।
धरणें बैसले जीवेंप्राणें । ते भक्ती सांगणें मजलागीं ॥६॥
तुझी करितां उत्तम भक्ती । त्रिविध ताप क्षया जाती ।
आपुली लाभे निजमुक्ती । उद्धव ते अर्थीं विनवीत ॥७॥