मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय एकोणिसावा|

एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


आदरः परिचर्यायां सर्वाङ्गैरभिवन्दनम् ।

मद्‍भक्तपूजाऽभ्यधिका सर्वभूतेषु मन्मतिः ॥२१॥

`इंद्रिये' वेंचिलीं पूजाविधानें । `वाचा' वेंचली हरिकीर्तनें ।

`हृदय' वेंचलें माझोनि ध्यानें । `अष्टांग' नमनें वेंचले ॥२९॥

ऐसा अत्यादरे वाडेंकोडें । सबाह्य वेंचला मजकडे ।

माझे भक्त देखिल्या पुढें । हरिखें मजकडे येवोंचि विसरे ॥२३०॥

माझे भक्त भाग्यें येती घरा । तैं पर्वकाळ दिवाळी दसरा ।

तेथें तीर्थें धांवती माहेरा । जेवीं सासराहूनि कुमारी ॥३१॥

पहावया भक्तपूजेची आवडी । सनकादिकांची पडे उडी ।

नारदप्रल्हादादि भक्तकोडी । चढोवढी धांवती ॥३२॥

तेथ सिद्ध येती गा अलोटें । सुरवरांचे टेक फुटे ।

महानुभवांचा ढीग दाटे । पितर नेटेंपाटें धांवती ॥३३॥

वेदांसी रिघावा न घडे । विधि निर्बुजला मागें मुरडे ।

माझ्या भक्तपूजेचेनि कोडें । दारापुढें थाट दाटे ॥३४॥

मद्‍भक्तपूजेचिया उल्हासा । मज टक पडे हृषीकेशा ।

इतरांचा पाड काइसा । भक्तपूजनीं ऐसा महिमा आहे ॥३५॥

मागां सांडूनि माझी पूजा । जेणें मद्‍भक्त पूजिले वोजा ।

तेणें मज पूजिलें अधोक्षजा । परिवारसमाजासमवेत ॥३६॥

प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । भक्त माझ्या सचेतन मूर्ति ।

त्यांसी पूजिल्या मीं श्रीपती । यथानिगुतीं संतोषें ॥३७॥

जैसा मद्‍भाव मद्‍भक्तीं । तोचि भावो सर्वांभूतीं ।

नानाकार भूताकृती । परी आत्मस्थिती अविकार ॥३८॥

दिसे देहाकृती मुंडली । तीतें म्हणती हे रांडली ।

परी आत्म्याची रांड नाहीं जाहली । असे संचली आत्मस्थिति ॥३९॥

दीर्घ वक्र आणि वर्तुळ । दिसती भिन्न इंगळ ।

परी अग्नि एकचि केवळ । तेवीं भूतें सकळ मद्‌रूपें ॥२४०॥

चित्रांमाजीं नानाकृती । पाहतां अवघी एकचि भिंती ।

तेवीं मी चिदात्मा सर्वभूतीं । निजभावें निश्चितीं जाणावा ॥४१॥

सांडूनि अहंकार दुजा । सर्व भूतीं भावो माझा ।

हे उत्तमोत्तम माझी पूजा । मज अधोक्षजा पढियंती ॥४२॥

ऐशी जो माझी पूजा करी । तो मज पढियंता गा भारी ।

मी सर्वांगे राबें त्याच्या घरीं । तो मजवरी मिराशी ॥४३॥

त्याच्या चेष्टांची जे गती । तेचि माझी भजनस्थिती ।

हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती सांगता ॥४४॥


References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP