निरपेक्षं मुनिं शान्तं निर्वैरं समदर्शनम् ।
अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यङ्घ्रिरेणुभिः ॥ १६ ॥
अनन्य करितां माझें भजन । माझ्या स्वरूपीं झगडलें मन ।
सकळ वासना गेल्या विरोन । वृत्तिशून्य अवस्था ॥६२॥
आटाटीवीण न प्रार्थितां । अयाचित अर्थ प्राप्त होतां ।
तोही हातीं घेवों जातां । निरपेक्षता बुडाली ॥६३॥
अर्थ देखोनि जो लविन्नला । तो जाण लोभें वोणवा केला ।
तोही उपेक्षूनि जो निघाला । तो म्यां वंदिला सर्वस्वें ॥६४॥
मार्गीं अर्थ पडतां । कोणी नाहीं माझा म्हणतां ।
तोही स्वयें हातीं घेतां । निरपेक्षता बुडाली ॥६५॥
वृत्तिशून्य जे अवस्था । ती नांव जाण निरपेक्षता ।
ते काळींची जे मननता । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६६॥
वेदशास्त्रार्थें परम प्रमाण । ते माझें सत्य स्वरूप जाण ।
ते स्वरूपीं निजनिर्धारण । त्या नांव मनन बोलिजे ॥६७॥
करितां स्वरूपविवेचन । स्वरूपरूप झालें मन ।
तेथें धारणेवीण मनन । न करितां स्मरण होतसे ॥६८॥
या नांव मननावस्था । सत्य जाण पां सर्वथा ।
याहीवरी शांतीची जे कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥६९॥
काम क्रोध सलोभता । समूळ मूळेंसी न वचतां ।
देहीं आली जे निश्चळता । ते न सरे सर्वथा येथ शांती ॥१७०॥
मत्स्य धरूनियां मनीं । बक निश्चळ राहिला ध्यानीं ।
ते शांति कोण मानी । अंतःकरणीं सकाम ॥७१॥
देहीं स्फुरेना देहअहंता । विराली कामक्रोधसलोभता ।
हे शांति बाणे भाग्यवंता । मुख्य शांतता या नांव ॥७२॥
उद्धवा जाण पां निश्चितीं । मजही मानली हेचि शांति ।
याहीवरी जे समतेची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥७३॥
विचित्र भूतें विचित्र नाम । विचित्राकारें जग विषम ।
तेथें देखे सर्वीं सर्व सम । परब्रह्म समत्वें ॥७४॥
फाडाफाडीं न शिणतां । तडातोडी न करितां ।
माझेनि भजनें मद्भक्तां । सर्वसमता मद्भावें ॥७५॥
मद्भावें समता आल्या हाता । खुंटली भूतभेदाची वार्ता ।
भेदशून्य स्वभावतां । निर्वैरता सहजेंचि ॥७६॥
जंववरी द्वैताचें भान । तंववरी विरोधाचें कारण ।
अवघा एकचि आपण । तेथ वैरी कोण कोणाचा ॥७७॥
गगन गगनासी कैं भांडे । कीं चंद्रा चंद्रेंसीं झुंझ मांडे ।
कीं वायूचेनि वायु कोंडे । कीं जिव्हेचीं दुखंडें जिव्हा करी ॥७८॥
जें भेदाचें निराकरण । तेंचि निर्वैरतेचें लक्षण ।
उद्धवा सत्य जाण । निर्वैरपण या नांव ॥७९॥
निरपेक्षता आणि माझें मनन । शांति आणि समदर्शन ।
पांचवें तें निर्वैर जाण । पंचलक्षण हें मुख्यत्वें ॥१८०॥
असो पंचलक्षणकथा । एक निरपेक्षता आल्या हाता ।
पायां लागे सायुज्यता । पूर्णब्रह्मता ठसावे ॥८१॥
निरपेक्षाचें निश्चळ मन । निरपेक्ष तो निर्वैर जाण ।
निरपेक्ष तो शांत संपूर्ण । निरपेक्षाची जाण सेवा मी करीं ॥८२॥
कडेकपाटीं न रिघतां जाण । न सोशितां अतिसाधन ।
हें हाता आल्या पंचलक्षण । विश्वउद्धरण त्याचेनी ॥८३॥
ऐशिया भक्तांचें दर्शन । झाल्या तरतीं हें नवल कोण ।
त्यांचें करितां नामस्मरण । उद्धरण जडजीवां ॥८४॥
हें पंचलक्षण आल्या हाता । मजहोनि अधिक पवित्रता ।
जोडली माझ्या निजभक्तां । मीही वंदीं माथां चरणरेणु ॥८५॥
समुद्रोदक मेघीं चढे । त्यासी मधुरता अधिक वाढे ।
जग निववी वाडेंकोडें । फेडी सांकडें दुकाळाचें ॥८६॥
तेंचि उदक समुद्रीं असतां । उपयोगा न ये गा सर्वथा ।
तेवीं माझेनि भजनें मद्भक्तां । झाली पवित्रता मजहुनी ॥८७॥
केळी चाखतां चवी नातुडे । तिचींच केळें अतिगोडें ।
तेवीं मजहूनि माझ्या भक्तांकडे । पवित्रता वाढे अनिवार ॥८८॥
माझ्या ठायीं जें पवित्रपण । तें भक्तांचेनि मज जाण ।
यालागीं भक्तांमागें मी आपण । धांवें चरणरेणू वंदावया ॥८९॥
भक्तचरणरेणु वंदितां । मज केवढी आली पवित्रता ।
माझें पायवणी वाहे माथां । जाण तत्त्वतां सदाशिवू ॥१९०॥
एवं माझ्या भक्तांचें जें सुख । सुखपणें अलोलित ।
तें सुख नेणती आणिक । तें बोलावया मुख सरेना ॥९१॥