एकनाथी भागवत - श्लोक १० वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


रामेण सार्धं मथुरां प्रणीते श्वाफल्किना मय्यनुरक्तचित्ताः ।

विगाढभावेन न मे वियोग तीव्राधयोऽन्यं ददृशुः सुखाय ॥१०॥

बळिभद्रासमवेत तत्त्वतां । अक्रूरें मज मथुरे नेतां ।

तैं गोपिकांसी जे झाली व्यथा । ते सांगतां मज न ये ॥२५॥

ते त्यांची अवस्था सांगतां । मज अद्यापि धीर न धरवे चित्ता ।

ऐसें देवो सांगतसांगतां । कंठीं बाष्पता दाटली ॥२६॥

सांगतां भक्तांचें निजप्रेम । प्रेमें द्रवला पुरुषोत्तम ।

जो भक्तकामकल्पद्रुम । कृपा निरुपम भक्तांची ॥२७॥

मज मथुरे जातां देखोनी । आंसुवांचा पूर नयनीं ।

हृदय फुटे मजलागुनी । प्रेम लोळणी घालिती ॥२८॥

पोटांतील परम प्रीती । सारितां मागें न सरती ।

धरिले चरण न सोडिती । येती काकुळती मजलागीं ॥२९॥

नवल भावार्थ त्यांच्या पोटीं । माझ्या रूपीं घातली मिठी ।

सोडवितां न सुटे गांठी । श्वास पोटीं परतेना ॥१३०॥

लाज विसरल्या सर्वथा । सासुरां पतिपित्यां देखतां ।

माझे चरणीं ठेऊनि माथा । रडती दीर्घता आक्रंदें ॥३१॥

मजवीण अवघें देखती वोस । माझीच पुनःपुन्हा पाहती वास ।

थोर घालोनि श्वासोच्छ्वास । उकसाबुकसीं स्फुंदत ॥३२॥

आमुचा जिवलग सांगती । घेऊनि जातो हा दुष्टमूर्ती ।

अक्रूरा संमुख क्रूर म्हणती । येती काकुळती मजलागीं ॥३३॥

उभ्या ठाकोनि संमुख । माझें पाहती श्रीमुख ।

आठवे वियोगाचें दुःख । तेणें अधोमुख विलपती ॥३४॥

ऐसिया मजलागीं आसक्त । माझ्या ठायीं अनन्यचित्त ।

विसरल्या देह समस्त । अतिअनुरक्त मजलागीं ॥३५॥

माझेनि वियोगें तत्त्वतां । त्यांसी माझी तीव्र व्यथा ।

ते व्यथेची अवस्था । बोलीं सांगतां मज न ये ॥३६॥

मजवेगळें जें जें सुख । तें गोपिकांसी केवळ दुःख ।

कैशी आवडी अलोलिक । मज हृदयीं देख न विसंबती ॥३७॥

मज गोकुळी असतां । माझे ठायीं आसक्तचित्ता ।

ते आसक्ती समूळ कथा । ऐक आतां सांगेन ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP