एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


केवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगाः ।

येऽन्ये मूढधियो नागाः सिद्धा मामीयुरञ्जसा ॥८॥

केवळस्वरूप जे संत । त्यां माझी संगती झाली प्राप्त ।

काय करिसी तप व्रत । भावार्थें प्राप्त मज जाहलिया ॥६॥

होआवया माझें पद प्राप्त । त्यांसी भांडवल भावार्थ ।

भावबळें गा समस्त । पद निश्चित पावल्या ॥७॥

ऐकोनि माझें वेणुगीत । गोपिका सांडूनि समस्त ।

निजदेहातें न सांभाळीत । मज गिंवसीत पातल्या ॥८॥

सांडूनि पतिपित्यांची चाड । न धरोनि वेदशास्त्रांची भीड ।

माझे ठायीं निजभाव दृढ । प्रेम अतिगोड गोपिकां ॥९॥

पुत्रस्नेह तोडूनि घायें । विधीतें रगडूनि पायें ।

माझे आवडीचेनि लवलाहें । गोपिका मज पाहें पावल्या ॥१०॥

त्याचपरी जाण गायी । वेणुध्वनीं वेधल्या पाहीं ।

व्याघ्रभय विसरल्या देहीं । माझ्या ठायीं विनटल्या ॥११॥

माझ्या वेणुध्वनीं वेधलें मन । वत्सें विसरलीं स्तनपान ।

मुखींचा कवळ मुखीं जाण । माझें ध्यान लागलें ॥१२॥

माझ्या वेणुश्रवणास्तव जिंहीं । निजवैर सांडूनि देहीं ।

येरयेरांवरी माना पाहीं । व्याघ्रहरिणें तींही विनटलीं ॥१३॥

म्यां उपडिले यमलार्जुन । ते तरले हें नवल कोण ।

वृंदावनींचे वृक्ष तृण । माझ्या सांनिध्यें जाण उद्धरले ॥१४॥

मयूर तरले मोरपिसीं । गुल्मलतातृणपाषाणांसी ।

जड मूढ वृंदावनवासी । मत्सानिध्यें त्यांसी उद्धारू ॥१५॥

माझे संगतीं अनन्य प्रीती । तेचि त्यांस शुद्ध भक्ती ।

तेणें कृतकृत्य होऊनि निश्चितीं । माझी निजप्राप्ती पावले ॥१६॥

माझेनि चरणघातें साचार । कालिया तरला दुराचार ।

नागनागिणी सपरिवार । माझेनि विखार उद्धरले ॥१७॥

आपली जे निजपदप्राप्ती । ते सत्संगेंवीण निश्चितीं ।

दुर्लभ हें उद्धवाप्रती । स्वयें श्रीपती सांगत ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP