श्रीब्राह्मण उवाच ।
सुखमैन्द्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च ।
देहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः ॥१॥
श्रवणीं सादरता यदूसी । देखोनि सुख जालें ब्राह्मणासी ।
तेणें सुखें निरूपणासी । उल्हासेंसी करीतसे ॥१६॥
तो म्हणे राया सावधान । विषयसुखाचें जें सेवन ।
तें स्वर्गनरकीं गा समान । नाहीं अनमान ये अर्थी ॥१७॥
भोगितां उर्वशीसी । जें सुख स्वर्गीं इंद्रासी ।
तेंचि विष्ठेमाजीं सूकरासी । सूकरीपासीं निश्चित ॥१८॥
हें जाणोनि साधुजन । उभय भोगीं न घालिती मन ।
नेदवे प्रेतासी आलिंगन । तेवीं साधुजन विषयांसी ॥१९॥
जीत सापु धरावा हातीं । हें प्राणियांसी नुपजे चित्तीं ।
तेवीं विषयांची आसक्ती । साधु न धरिती सर्वथा ॥२०॥
जैसें न प्रार्थितां दुःख । प्राणी पावताति देख ।
तैसें न इच्छितां इंद्रियसुख । भोगवी आवश्यक अदृष्ट ॥२१॥
मज दुःखभोगु व्हावा । हें नावडे कोणाच्या जीवा ।
तें दुःख आणी अदृष्ट तेव्हां । तेवीं सुखाचा यावा अदृष्टें ॥२२॥
ऐसें असोनि उद्योगु करितां । तेणें आयुष्य नाशिलें सर्वथा ।
यालागीं सांडूनि विषयआस्था । परमार्था भजावें ॥२३॥
केवळ झालिया परमार्थपर । म्हणसी आहारेंवीण न राहे शरीर ।
येच निर्धारीं साचार । गुरु 'अजगर' म्यां केला ॥२४॥