तानाह देवदेवेशः प्रणतान्प्रहसन्निव ।
आसामकेतमां वृङ्ध्व सवर्णां स्वर्गभूषणाम् ॥१४॥
तें अतिआश्चर्य देखोन । झाले कामादिक मूर्च्छापन्न ।
तयांप्रति नारायण । काय हांसोन बोलिला ॥८८॥
आम्हीं अवश्य पूजावें तुम्हांसी । कांहीं अर्पावें बलिदानासी ।
संतोषावया इंद्रासी । यांतील एकादी दासी अंगीकारा तुम्हीं ॥८९॥
यांचें सौंदर्य अतिथोर । म्हणाल होईल अपमानकर ।
तुम्हांसमान जे सुंदर । तिचा अंगीकार करावा तुम्हीं ॥१९०॥
म्हणाल यांत नाहीं हीन । अवघ्या सौंदर्यें संपूर्ण ।
कोणी न दिसे आम्हांसमान । केवीं आपण अंगीकारावी ॥९१॥
जरी नाहीं तुम्हांसमान । सकळ सौंदर्यें अतिसंपन्न ।
तरी एकीचें करावें वरण । होईल भूषण स्वर्गासी ॥९२॥
ऐसें नारायणाचें वचन । ऐकोनि हरिखलीं संपूर्ण ।
करूनियां साष्टांग नमन । मस्तकीं वचन वंदिलें ॥९३॥