एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


क्षुत्तृट्‌त्रिकालगुणमारुतजैव्ह्यशैश्‍न्यानस्मानपारजलधीनतितीर्य केचित् ।

क्रोधस्य यान्ति विफलस्य वशं पदे गोर्मज्जन्ति दुश्चरतपश्च वृथोत्सृजन्ति ॥११॥

प्राणायामें प्राणापानीं । निजप्राणातें आकळोनी ।

वात वर्ष शीत उष्ण साहोनी । जे अनुष्ठानीं गुंतले ॥६९॥

क्षुधे तृषेतें नेमूनी । जिव्हा शिश्न आकळोनी ।

मज कामातें जिंतिलें मानूनी । निष्कामाभिमानी उन्मत्त ॥१७०॥

अल्प अपमानाहातीं । जे क्रोधासी वश होती ।

ते शाप देऊनि तपसंपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठा ॥७१॥

सकामाच्या अनुष्ठाना । मज कामसंगें स्त्रक्‌चंदना ।

भोग भोगिती स्वर्गांगना । अमृतपाना प्राशिती ॥७२॥

त्या मज कामातें उपेक्षिती । आणि क्रोधासी वश होती ।

ते निजतपा नागवती । शापदीप्तिअनुवादें ॥७३॥

जे अपार सागर तरती । ते गोष्पदोदकीं बुडती ।

तेवीं मज कामातें जिणोनि जाती । तेही नागविजेति निजक्रोधें ॥७४॥

मज कामाची अपूर्ण कामवृत्ति । तेचि क्रोधाची दृढ स्थिति ।

काम क्रोध अभक्तां बाधिती । हरिभक्तांप्रती तें न चले ॥७५॥

तुझ्या भक्तांप्रती जाण । न चले कामक्रोधादि बंधन ।

तो तूं भक्तपति नारायण । तुज आमुचें कामपण केवीं बाधी ॥७६॥

नेणतां तुझा महिमा । आम्ही करूं आलों निजधर्मा ।

तुजपासीं नित्य निजक्षमा । पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP