एकनाथी भागवत - आरंभ

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


॥श्रीगणेशाय नमः ॥श्रीकृष्णाय नमः॥

ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमनें जीवत्व जीवा ।

नुरविसी, तेथें देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥१॥

जीवें घेउनि जीवा । देहत्व मोडूनि देहभावा ।

याहीवरी करविसी सेवा । हें लाघव देवा नवल तुझें ॥२॥

जीव घेऊनि शंखासुरा । त्याच्या वागविसी कलेवरा ।

तो तूं रिघोनि मजभीतरा । माझिया शरीरा वागविसी ॥३॥

शंख मधुर ध्वनी गाजे । तो वाजवित्याचेनि वाचे ।

तेवीं म्यां जें जें बोलिजे । तें तें बोलणें साजे तुझेनि ॥४॥

आतां माझें 'शरीर' जें चळे । तें तुझेनि आंगिकें मेंळें ।

'कर्में' निपजतीं सकळें । सत्ताबळें तुझेनि ॥५॥

माझे देहींचें जें 'मीपण' । तें तूंचि झालासी आपण ।

तुझेनि प्राणें 'प्राण' । माझाही जाण चळे देवा ॥६॥

'दृष्टी' जें जें कांहीं देखे । तें तें तुझेनि ज्ञान‍उन्मेखें ।

'श्रवणीं' जें जें कांहीं ऐकें । तें तें नेटकें अवधान तुझें ॥७॥

'रसना' जें जें कांहीं चाखे । तें तें तुझेनि स्वादमुखें ।

'बुद्धि' जाणपणें तोखे । तेहीं अतिनिकें वेदकत्व तुझें ॥८॥

'मन' मनपणें अतिचपळ । तेंही तुझेंचि आंगिक बळ ।

विवेका 'विवेकु' प्रबळ । अतिसोज्ज्वळ तुझेनि ॥९॥

'वाचा' जें जें कांहीं वदे । तें वाचिकत्व तुझेनि शब्दें ।

'बोधु' जेणें उद्बोधे । तो तुझेनि प्रबोधें प्रबोधु ॥१०॥

'जागृती' जागे तुझेनि हरिखें । 'स्वप्न' स्वप्ना तुझेनि देखे ।

'सुषुप्ती' सुखावे जेणें सुखें । पूर्ण संतोखें तुझेनि ॥११॥

मी जे जे 'विषय' भोगीं । तें भोक्तेपण तुझे अंगीं ।

तुझेनि निजसंयोगीं । मीपणें जगीं वर्तविशी मज ॥१२॥

माझें करूनि खांबसूत्र । तूं झालासी सूत्रधार ।

हालवूनियां निजसूत्र। कर्में विचित्र करविशी ॥१३॥

ऐशिया श्रीजनार्दना । जग चेतवित्या चिद्‍घना ।

कृपाळुवा जगजीवना । नमन श्रीचरणा तुझेनि तुज ॥१४॥

यापरी मजमाजीं तूं चाळिता । चाळकत्वें करविसी ग्रंथा ।

तेथें मी एक कवित्वकर्ता । हे जाणावी तत्त्वतां स्थूळबुद्धी ॥१५॥

एका एकु जनार्दनीं । कीं जनार्दनु एकपणीं ।

इये पृथक् नामांचीं लेणीं । लेऊनि एकपणीं मिरविसी तूं ॥१६॥

जेवीं कनकाचें भूषण । कीं भूषणीं कनकसंपूर्ण ।

तेवीं एका आणि जनार्दन । एकत्वें जाण जनार्दनचि ॥१७॥

ऐशी ऐकोन विनवणी । सद्गुरु तुष्टला संतोषोनी ।

येथें भिन्न भिन्न सोसणी । न लगे निरुपणीं करणें तुज ॥१८॥

जेव्हां कापुरा आगी झगटे । तेव्हांचि कापुरत्व खुंटे ।

सच्छिष्यासी सद्गुरु भेटे । तेव्हांचि फिटे भिन्नभेदु ॥१९॥

जेणें फिटे भिन्नभेदु । तो श्रीभागवतीं निजबोधु ।

वसुदेवाप्रती नारदु । सांगत संवादु इतिहासाचा ॥२०॥

ज्या इतिहासाचा अर्थ । परिसतां प्रगटे परमार्थ ।

स्वानंदबोध हृदयांत । श्रवणें सदोदित श्रोते होती ॥२१॥

तंव श्रोते संतसमुदावो । म्हणती कैसा नवलावो ।

सद्गुरुस्तवनीं ब्रह्मभावो । साधिला आवो अभेदत्वें ॥२२॥

हे सद्गुरुची विनवणी । कीं ब्रह्मसुखाची खाणी ।

परिसतां सप्रेम बोलणीं । रिझली आयणी सज्जनांची ॥२३॥

या देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी ।

बोल नव्हती हे स्पर्शमणी । लागतां श्रवणीं पालटे जीव ॥२४॥

यापरी श्रीभागवतीं । अनुपम अगाध स्थिति ।

ते कथेची संगति । लावी सुनिश्चितीं अर्थावबोधें ॥२५॥

ऐकोनि संतांचें वचन । शिरीं वंदोनि त्यांचे चरण ।

पुढील कथानिरुपण । श्रोतीं सावधान परिसावें ॥२६॥

येथें तृतीय अध्यायाचे अंतीं । निरुपितां तांत्रिक भक्ति ।

भजावें आवडेल ते मूर्ति । रायासी तदर्थी प्रश्न स्फुरला ॥२७॥

देवो एकचि त्रिजगतीं । त्याच्या किती अवतारमूर्ति ।

जन्म कर्म अनेक व्यक्ती । हेंचि मुनीप्रति पुसतु ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP