क्रीडन्तस्तानुपव्रज्य कुमारा यदुनन्दनाः ।
उपसंगृह्य पप्रच्छुरविनीता विनीतवत् ॥१३॥
यदुनंदन समस्त । क्रीडाकंदकु झेलित ।
एकमेकांतें हाणित । ठकवून पळत परस्परें ॥४३॥
ऐसे नाना क्रीडाविहार । करीत आले यदुकुमार ।
अंगीं श्रीमद अपार । औद्धत्यें थोर उन्मत्त ॥४४॥
अतीत-अनागत-ज्ञानवंत । ऋषीश्वर मीनले समस्त ।
ज्यांचें वचन यथार्थभूत । त्यांसिही निश्चित ठकूं आम्ही ॥४५॥
जैं अघडतें येऊनि पडे । तैं यांचें वचन कैसें घडे ।
म्हणोनि ऋषीश्वरांपुढें । मांडिलें कुडें यदुकुमरीं ॥४६॥