मयूरध्वजाख्यान - मयूरध्वजाख्यान

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.


श्रीगणेशाय नमः ॥

श्‍लोक-

वंदूनि विघ्नहरणाप्रति पूर्णभावें ॥

सप्रेम कृष्णचरणां नमिलें स्वभावें ॥

संतांप्रती नमुनियां मग आदरानें ॥

सद्भक्त-कीर्ति वदतों अति सादरानें ॥१॥

दिंडी-

सोमवंशीं विख्यात भूपराणा ॥

पुण्यखाणी सात्वीक धर्म जाणा ॥

चौघे बंधू अनुकूल सेवनासी ॥

रमानाथ सर्वदा साह्य ज्यासी ॥२॥

साकी-

गोत्रवधोद्भवदुरितनिरसना तेणें हय-मेधातें ॥

आंरभुनियां अश्व सोडिला पृथ्वी जिंकायातें ॥३॥

पार्थासह श्रीकृष्णजी त्यातें रक्षित चालति मागें ॥

हंसध्वज अनुशाल्वादिक ते अपार भूपति संगें ॥४॥

ओंवी-

बब्रूवाहनाचें राज्य टाकून ॥ पुढें चालिला श्यामकर्ण ॥

तों तिकडून दुसरा यज्ञाश्च जाण ॥ आला मयूरध्वजाचा ॥५॥

ताम्रध्वज तयाचा सुत ॥ महाप्रतापी कीर्तिवंत ।

हयातें रक्षक अतिसमर्थ ॥ तेणें पांडवांश्च धरियेला ॥६॥

आर्या-

कृष्ण म्हणे पार्थातें समय पुढें मज कठीण हा वाटे ॥

ताम्रध्वज अतियोद्धा लाविल सकळांहि मृत्युच्या वाटे ॥७॥

दिंडी-

शिखीकेतू भूपती वीर साजे ॥ सत्यसंध प्राज्ञ जो महीं गाजे ॥

रत्‍नपूरींत नर्मदातटीं यज्ञ ॥ करी तेणें सोडिला श्यामकर्ण ॥८॥

आर्या-

ऐसें बोलत असतां ताम्रध्वज होय सोडिता बाण ॥

तें दुःसह वीरांतें होउन आकर्षिती क्षणें प्राण ॥९॥

श्लोक-

उभय दळ मिळालें कंदना घोर घायीं ॥

धडकति रणवाद्यें नाद व्योमीं न मायी ॥

धडधड रथ नेटें कंप तेव्हां क्षितीला ॥

उरगपति मनीं तो मानि मोठया भितीला ॥१०॥

साकी-

ताम्रकेतुनें वीर सर्वही बाणीं जर्जर केले ॥

ऐसें पाहुनि पुढें धांवला अनिरुद्ध तये वेळे ॥११॥

आर्या-

क्षोभुनि अतिशय तेव्हां मदनसुत वदेचि ताम्रकेतूतें ॥

सरलें त्वदायु येथें पाठविलें म्हणुनि अंतकें तूतें ॥१२॥

दिंडी-

असें भाषण बोलुनि तये वेळां ॥ दिव्य बाणें भेदिलें उरःस्थळा ॥

आलि तेणें त्या क्षणीं घेरि त्यासी ॥ तया संधीं भंगिलें वाहिनीसी ॥१३॥

सैन्य तेव्हां पाडिलें तीन क्षोणी ॥ रक्तसरिता वाहिल्या तये क्षणीं ॥

असें दृष्टी पाहतां ताम्रकेतू ॥ क्षोभुनीयां मांडिला प्रलय अंतू ॥१४॥

श्लोक-

बळें सोडुनी दिव्यशा सायकातें ॥

महीं पाडिलें त्या उखानायकातें ॥

असें देखतां कर्णसूनु प्रकोपें ॥

करी स्यंदना त्याचिया घातरोषें ॥१५॥

छंद-

मग दुजा रथीं राजनंदनू ॥ बसुनियां करी घोर कंदनू ॥

तोहि छेदिला त्रुटि न वाजतां ॥ यापरी शता गणति मोजतां ॥१६॥

साकी-

ऐसा जर्जर करुनि तयातें अपार वधिली सेना ॥

रक्त-नद्या बहु पुरें दाटल्या जाती निजपतिभुवना ॥१७॥

आर्या-

तेव्हां शिखीध्वजात्मज पावुनि अत्यंत जाण कोपातें ॥

पाडी असंख्य कटका करुनी मूर्छीत कर्णपुत्रातें ॥१८॥

श्लोक-

तेव्हां पार्थसुतें त्वरा करुनियां ताम्रध्वजा अंबरीं ॥

बाणें दिव्य तदा वरी उडवितां तो विस्मयें अंतरीं ॥

त्वेषें त्या उतरुन भूतळीं तयें बीभत्सु पुत्राप्रती ॥

पाडीलें शर दिव्य भेदुनि तदा मूर्छीत वेगें क्षितीं ॥१९॥

छंद-

सात्यकीवरी सोडुनी गदा ॥ पाडिला महा वीर तो तदा ॥

यौवनाश्चही पाडिला शरें ॥ नीलकेतुतें मारिलें त्वरें ॥२०॥

प्रलय मांडिला आजि बोलती ॥ पळति देखुनी वीर त्याप्रती ॥

काळदंडसे बाण सोडुनी ॥ पाडिली क्षणें सकळ वाहिनी ॥२१॥

ओंवी-

पार्थासी म्हणे जगज्जीवन ॥ आपण उरलों दोघेजण ॥

ताम्रध्वजचि प्रतापी गहन ॥ न चाले अभिमान यापुढें ॥२२॥

ऐकून कोपला किरीटी ॥ करी अमोघ बाणांची वृष्टी ॥

ताम्रध्वजातें हिंपुटी ॥ केलें उठाउठी तेधवां ॥२३॥

आर्या-

ताम्रध्वज कोपुनियां अद्भुत करिताचि जाहला करणी ॥

खगवत उडून गगनीं धरिला अवचीत पार्थ तो चरणीं ॥२४॥

स्कंधीं घेउन हरितें उडता झाला नभीं विहंग तसा ॥

क्रोधें श्रीपति लत्ता हाणुन पाडी तयास असुगतसा ॥२५॥

ताम्रध्वजास घेरी येतां पडिले तिघेही भूवरि ते ॥

जाणों प्राणगताच्या रीतीतें जाण जाहले वरिते ॥२६॥

श्‍लोक-

नरवरसुत तेव्हां मूर्च्छना सांवरोनी ॥

निजरथिं मग वेगेम चालिला आरुढोनी ॥

परम मुदित चित्तें घेउनी अश्वयुग्मा ॥

रहित कटक संगें पातला तो स्वसद्मा ॥२७॥

साकी-

पितयालागीं हर्षयुक्त तो सांगे थोर बढाई ॥

उभय कृष्ण ते जिंकुन समरीं केले मूर्छित ठायीं ॥२८॥

ओंवी-

वृषकेतु बब्रुवाहन मदन ॥ हंसध्वजादि सैन्य निवटून ॥

आणिले दोन्ही श्यामकर्ण ॥ झाले अष्ट यज्ञ आपुले ॥२९॥

छंद-

ऐकतां असें वृत्त भूपती ॥ कोपुनी वदे निजसुताप्रती ॥

निर्दयाधमा नष्ट तूं महा ॥ केविं दाविसी तोंड रे अहा ॥३०॥

पूर्णब्रह्म तो जाण श्रीहरी ॥ टाकिले कसे बाण त्यावरी ॥

आणितासि त्या प्रार्थुनी जरी ॥ धन्य मानितों तूज रे तरी ॥३१॥

पद-

भूपती बोलत कुमरा वोखटेंचि केलें भारी ॥भू०॥ध्रु०॥

विधिहरिहर सुरमुनि ज्यातें सप्रेमें हृदयीं ध्याती ॥

निगमागम आणि पुराणें किर्ति हे जयाची गाती ॥

त्या परमात्म्या शर तूं प्रेरिलेस पावून भ्रांती ॥

चाल-

तूं जरी प्रार्थूनि त्यातें ॥ आणितासी निजसदनातें ॥

तरी होतें बहु सुख मातें ॥ सर परता अनहितकारी ॥भू०॥१॥

कामदुघा सदनीं येतां निजकाष्ठें दंडीयलें ॥

निजभाग्यें अमृत मिळतां संमार्जन त्याचें केलें ॥

गवसल्या करीं परिसातें मूर्खत्वें झोंकीयलें

चाल-

हें विपरीत करणें जैसें ॥ भासतसे तव कृत तैसें ॥

बोलतां सुसद्गद ऐसें ॥ नेत्रांतून वाहे वारी ॥भू०॥२॥

बा ज्याच्या प्रीतीस्तव रे अश्वमेध केले साही ॥

परी तो हा प्राणविसांवा तुष्टलाचि आजवर नाहीं ॥

म्हणवुन सांप्रत हा रे ॥ मांडिला आणिक पाहीं ॥

चाल-

तो करुणाघन हृषीकेशी ॥ मम हेतु पुरवायासी ॥

येत होता अजि सदनासी ॥ जो कृष्णदास कैवारी ॥भू०॥३॥३२॥

आर्या-

इकडे रणांत तेव्हां सांडुन मूर्छेस भक्त कैवारी ॥

सावध करुनि पार्था करुणामृतदृष्टि दुःख तें वारी ॥३३॥

दिंडी-

कृष्ण बोले मारुनी सर्व सेना ॥ रिपू गेला घेऊनि श्यामकर्णा ॥

म्हणे जिष्णू राहिला तरी यज्ञ ॥ परी याची तुजप्रती लाज पूर्ण ॥३४॥

पदीं प्रेमें लागुनी दीनवाणीं ॥ वदे कर्ता सर्व तूं चक्रपाणी ॥

दीन आम्ही लागलों तुझ्या कांसे ॥ करीं आतां मानेल मना तैसें ॥३५॥

साकी

कृष्ण म्हणे तो मयूरकेतु सात्विक आणि दाता ॥

धैर्यवंत बहु सांप्रत तुजला दाखवितों चल आतां ॥३६॥

छंद-

अर्जुना प्रती वदुनि यापरीं ॥ नटत वृद्धसा विप्र तो हरी ॥

यष्टिका करीं घेतली तदा ॥ झोंक जातसे चालतां सदा ॥३७॥

श्‍लोक-

चंद्रार्धापरि वांकली वपु दिसे कांपे जरेनें अती ॥

पायीं साजति पाद्का सुबरव्या माथां जटा शोभती ॥

आंगीं लोंबत चर्म भग्न रद ते दाढी रुळे पांढरी ॥

कांसे चीर सुढाळ शुभ्र विलसे तैसेंचि आंगावरी ॥३८॥

करशिरपद कांपे बोलतां बोलवेना ॥

अवघड पदचालीं चालतां चालवेना ॥

मग करधृतयष्टी अग्निं तो शिष्यराणा ॥

धरुनि सुत पृथेचा चालिला शीघ्र जाणा ॥३९॥

आर्या-

कापटयवेष दोघे स्वीकारुन यज्ञमंडपा आले ॥

तेव्हां नृपसह अवघे पाहुन त्यांतें चकीत बहु झाले ॥४०॥

द्विजसमुदायासह नृप सन्मुख जाऊन त्यांस सन्मानें ॥

आणुन पूजा प्रीतीं केली सर्वोपचारि प्रेमानें ॥४१॥

दिंडी-

बद्धपाणी राहोनि उभा भूप ॥ द्विजा पाहे तो दिसे दुःखरुप ॥

सद्गदीत होउनी तये वेळां ॥ रडे स्फुंदस्फुंदुनी ढळढळां ॥४२॥

अश्रुधारा लोचनीं वाहताती ॥ पाहुनीयां शंकला भूप चित्तीं ॥

म्हणे काय जाहलें दुःख स्वामी ॥ त्वरें सांगा वारीन सर्व तें मी ॥४३॥

छंद-

स्फुंदतां हळू विप्र तो म्हणे ॥ वृत्त वर्तलें साच ऐकणें ॥

सांगतां मुखीं शब्द ना फुटे ॥ बोलतां बहू हुंदका उठे ॥४४॥

साकी-

सुन सुनो राजा द्वारवतीका द्विज है मै रहिवासी ॥

व्याहा पुतका होने खातर घुमत है परदेसी ॥४५॥

सुनकर तेरी सुरत साथे चेला पूतबि लेके ॥

आवतथे सो बनमो सिंगनें पकरे लरका आके ॥४६॥

मै तब जिनकों हात जुराकर बिनती ऐसी कीया ॥

किरिपा करके बछरा छोरो लेकर मेरी कैया ॥४७॥

पंचानननें वैसा कहियो तेरी तन है जरठा ॥

उनके पलट मै मंगेसो देव तो बच जा बेटा ॥४८॥

मयूरध्वज नृपकी करवतसे छिनकर आधी काया ॥

देवोंगे तबी छोर देउंगे उस कारन मैं आया ॥४९॥

पद-

सांगे द्विज तो नृपतीला ॥ घडल्या वृत्तातें ॥सांगें० ध्रु०॥

एकुलतें एक माझें बाळ ॥ त्यातें भक्षुं पाहे काळ ॥

उदार मोठा तूं भूपाळ ॥ होईं कृपाळ या समयीं ॥सांगे० ॥१॥

परिसुन तुझि बा कीर्ती फार ॥ धांवून येतां पथीं साचार ॥

वोढवला हा दुस्तर कहार ॥ न मिळे थार मज आतां ॥सांगे० ॥२॥

ऐसें बोलत असतां जाण ॥ दावी व्याकुळ झाला प्राण ॥

दुःखें शोक करी निर्वाण ॥ झाली हाण थोर म्हणे ॥३॥

दुसरें पद-भाषांतर ॥ कहते विप्रजी आप वृत्तांत ॥

सुन सुन नरनाथा ॥ कह० ॥ध्रु०॥

मेरा सदगुनी एकै लाल ॥ वाको ले जावत है काल ॥

धरमात्मा हो तुम भूपाल ॥ आपने पाल सतवचना ॥कह० ॥१॥

तेरी कीरत अपरंपार ॥ सुनकर आवत तेरे द्वार ॥

तनमनधनसे तूं उदार ॥ बिन आधार मै दुबला ॥कह० ॥५०॥

श्लोक-

अशी ऐकतां दीन ते विप्रवाणी ॥

नृपाच्या बहू लोचनीं येत पाणी ॥

म्हणे हो तरी हे तनू विप्रकाजीं ॥

समर्पून होईन मी धन्य आजी ॥५१॥

धन सुत पशु जाया सर्वही व्यर्थ माया ॥

क्षणिक मनुजकाया निश्चयें जाय वायां ॥

तरि चुकत अपाया त्याच कीजे उपाया ॥

म्हणउनि मनिं राया सौख्यसें देह द्याया ॥५२॥

ओंवी-

भूपाळ उदार देहदानीं ॥ करवत आणविला सभास्थानीं ॥

द्विज म्हणे स्त्रीपुत्र यांनीं ॥ गीत गाउनी करवतावें ॥५३॥

अश्रु आलिया तुझे नयनीं ॥ किंवा रडतां देखिलें कोणीं ॥

कीं मज दूषण लाविलिया झणीं ॥ उठुन जाईन तात्काळ ॥५४॥

पद-

विनवी सकळांसि ॥ भूपति विनवी सकळांसी ॥ध्रु०॥

सफलित माझा जन्म झाला ॥ न करा खेद मनासीं ॥भू०॥१॥

माझें सार्थक करणें आतां ॥ न पडा मायापाशीं ॥भू०॥२॥

तुमचें आजवर पालन केलें ॥ मान्य करा वचनासी ॥भू०॥३॥

चित्तीं विपरित मानुनि विप्रा ॥ न वदा दुःशब्दासी ॥भू०॥४॥५५॥

आर्या-

दानें अपार देउन नमिले द्विज ताम्रकेतुतातें हो ॥

झाला सिद्ध मराया मानिति बुध थोर विस्मयातें हो ॥५६॥

घालुनि मस्तकिं करवत ओढिति स्त्रीपुत्र खणखणा वाजे ॥

श्रीहरिनामोच्चारीं तरला नृप कीर्तिघोष नांवाजे ॥५७॥

दिंडी-

विप्र बोले तेधवां मुकाटयांहीं ॥ करवतीतां म्हणुनि मी जातों पाहीं ॥

तदा राजा स्त्रीसुतां खुणावी तें ॥ गावें तुम्हां येईल तशा गीतें ॥५८॥

छंद-

भूपवाक्य तें ऐशिया रितीं ॥ ऐकुनी बहू खेद मानिती ॥

कंठ दाटला स्तब्ध वैखरी ॥ येती हुंदके गिळिति ते परी ॥५९॥

म्हणुनि धन्य गा तूं शिखिध्वजा ॥ लाविली जगीं कीर्तिची ध्वजा ॥

कर्वतूनियां निजवपू सुखें ॥ अर्पिलें द्विजा बहुत हारिखें ॥६०॥

वांछिलें मनीं ब्राह्मणाप्रती ॥ कवण तो असा देइ पूढतीं ॥

बोलतां असें दुःख घोटिती ॥ बाह्य तें द्विजा परी न दाविती ॥६१॥

श्‍लोक-

नगरजन करीती थोर आकांत पाहीं ॥

रुदति सकल दुःखें ऐकतां वृत्त गेहीं ॥

अमरगण विमानीं घेउनी सिद्ध पुष्पें ॥

म्हणति अमित केली ख्याति हे विश्विं भूपें ॥६२॥

ओंवी-

मुखापर्यंत कर्वतिलें शिर ॥ तों नवल एक वर्तलें थोर ॥

नृपाचे वामनेत्रीं अपार ॥ अश्रुधार चालली ॥६३॥

साकी-

ऐसें दृष्टी पहातां द्विज तो क्रोधें झाला उठता ॥

म्हणे हा दुःखें रडतो यास्तव नेघें निश्चय आतां ॥६४॥

नृपका लरका और प्रिया तब ठाडी हात जुराई ॥

कहत भूपकों अपकों त्यजकर जाबत याचक साई ॥६५॥

मनमों चिंता राव करा रहै द्विज तोखा नहि पाया ॥

प्रपंचना परमार्थभी नही बिनारथ जावत काया ॥६६॥

विकल भया तबि बडे धरिसो अपने पास द्विजेंद्रा ॥

करसें करकें सौम्य पुकारतसे तब आकर ठेरा ॥६७॥

करजोरनसें नृप तब तिनको अरज करे निरबानी ॥

सुनो सुनोजी जिस कारनसो नयन न झरपत पानी ॥६८॥

सव्यांगाकों तुम ले जाते उनका सार्थक होवे ॥

वाम धडाके सार्थक नहिं सों उस कारनसे रोवे ॥६९॥

ओंवी-

ऐशी नृपाची दीन वाणी ॥ परिसुनी कळवळला चक्रपाणी ॥

दिव्यरुप चतुर्भुज प्रगटुनी ॥ हृदयीं धरिलें मयुरध्वजा ॥७०॥

करवत काढितांचि तत्काळ ॥ दिव्यरुप झाला भूपाळ ॥

जयजयकारें गर्जती सकळ ॥ सुमनें त्रिदश वर्षती ॥७१॥

दिंडी-

पूर्वरुपा अर्जुनें प्रकटियेलें ॥ नृपालागीं आदरें वंदियेलें ॥

समस्तांसीं घेउनी हरी संगें ॥ समरभूमी पातले जाण वेगें ॥७२॥

तदा देवें अद्‌भूत थोर केलें ॥ कृपादृष्टी सैन्य तें जीववीलें ॥

हर्षे सर्वहि गर्जति तये वेळीं ॥ रत्‍नपूरा पातले सौख्य मेळीं ॥७३॥

श्‍लोक-

हरि वदत नृपातें चाल गा धर्मभेटी ॥

तव कृत हयमेघें पावलों पूर्ण तुष्टी ॥

सदळ मग तयानें घेतलें साह्य संगें ॥

उभय हय पुढें ते सोडिले जाण वेगें ॥७४॥

ऐसें चरित्र बरवें हयमेधिं पाहे ॥

जन्मेजयास मुनि जैमिनि सांगताहे ॥

तें कृष्णदास वदला अति प्रेमभावें ॥

लाधे जनीं परिसतां सुख तें स्वभावें ॥७५॥

या प्रकारें ज्या पुरुषांनीं भगवत्पदीं मन लावून सकल इंद्रियें प्रभूचे सेवेस लाविली, ते पुरुष धनय होत. असे जे पुरुष तेच विष्णुलोकाचे अधिकारी. याप्रमाणें यमधर्म आपले दूतांप्रत सांगते झाले. यास्तव तुकोबा इंद्रियांची प्रार्थना करितात. ’घेईं घेईं माझे वाचे ॥ गोड नाम राघोबाचें’ ॥ याप्रकारें जनांस बोध होण्याचे उद्देशानें आपले इंद्रियांस सांगते झाले. वस्तुतः ते मुक्तच आहेत, परंतु जनांस मार्ग गोचर करण्याचा त्यांचा मुख्य हेतु होय. यास्तव सर्व जनांहि त्याच मार्गास अनुसरुन प्रभूजवळ वारंवार मागणें मागावें. ’हेंचि दान दे गा देवा ॥ तुझा विसर न व्हावा ॥ मंगलारती ॥ भजन ॥ पुंडलीकवरदा हरिविठ्ठल ॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥ जानकीजीवनस्मरण जयजयराम ॥ समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP