मयूरध्वजाख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपणम्

कीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.


श्रीमन्महागणाधिपतये नमः ॥ इत्यादि नमन ॥

पद-

सच्चित्सुखधाम राधिका-रमण स्मराहो ॥

जो दीनजन-विश्राम ॥सच्चित्सुख० ॥

निशिदिनिं सेवी कथामृतातें ॥

सांडुनि सर्वहि काम ॥सच्चि० ॥१॥

जें जें भासे तें तें मिथ्या ॥ शाश्वत तो घनश्याम ॥सच्चि०॥२॥

दास म्हणे भवसागरतारक ॥ प्रेमळ मंगळ नाम ॥ सच्चित्सु० ॥३॥

भजन-

राधे गोविंद राधे गोविंद ॥ जयहरि गोपाल राधे गोविंद ॥

अभंग-

घेई घेईं माझे वाचे ॥ गोड नाम राघोबाचें ॥१॥

तुम्ही आईकाहो कान ॥ माझ्या राघोबाचे गुण ॥२॥

डोळे तुम्ही घ्याहो सुख ॥ पहा राघोबाचें मुख ॥३॥

मना तेथें धाव घेईं ॥ राहें राघोबाचे पायीं ॥४॥

तुका म्हणे माझ्या जीवा ॥ नको सोडूं या केशवा ॥५॥

अर्थ-

आदौ कीर्तनारंभाचे ठायी सत्पुरुषांची वाणी, तुकोबा महाराज साधकांप्रत सुमार्ग कळण्यास्तव आपले इंद्रियांस म्हणतात हे जिव्हे, राघवाचे गोड नाम ग्रहण कर. घेईं घेईं असें द्विरुक्तीनें अत्यादरें सांगतात. आणि दुसरें कारण जिव्हेचे ठायीं दोन इंद्रियांचीं कर्में आहेत. ज्ञानेंद्रियपणा आणि कर्मेंद्रियत्व, नामग्रहणादि आणि रसातें जाणणें अशीं दोन इंद्रियांचीं कर्में आहेत. म्हणून दोन वेळां "घेईं घेईं माझे वाचे ॥ गोड नाम राघोबाचें ॥ असें पद घातलें. कविजन म्हणतात

श्‍लोक-

हे जिव्हे रससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये ॥

नारायणाख्यपीयूषं पिब जिव्हे निरंतरं ॥२॥

हे जिव्हे, तूं सर्व रसांतें जाणणारी आहेस. साधू म्हणतात.

पद-

तूं गाईंगे रसने श्रीहरी ॥ सकल दुरित संहारी ॥ तूं गाईंगे ॥ध्रु०॥

दधि मधु द्राक्षा सुधारसादिक ॥ सेविसि निशिदिनिं तरी ॥तूं गा०॥

तूं सर्व रसातें जाणतेस आणि तुला सर्वकाल मधुर प्रिय आहे. यास्तव ’नारायनाख्यपीयूषं’ नारायणनामामृत निरंतर प्राशन कर. प्रभूचें नांव सर्व पदार्थांत माधुर्यानें वरिष्ठ आहे.

आर्या-

दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सितापि मधुरैव ॥

मधुरादपि तन्मधुरं मथुरानाथस्य नाम यद्गीतं ॥३॥

अर्थ-

दही तसेंच मधु आणि द्राक्षें त्या प्रकारें शर्करा इत्यादि पदार्थ मधुर आहेत. त्या मधुराहुन अत्यंत मधुरतर मथुरानाथ जो गोपालकृष्ण याचें नामग्रहण विशेष गोड होय. म्हणून तुकोबा म्हणतात. घेईं घेईं माझे वाचें ॥ गोड नाम राघोबाचें ॥ नारायणनामामृत हें स्वर्गस्थ अमृताहुन गोड असून त्याचा प्रतापहि विशेष आहे. साधु मुक्तेश्वर म्हणतात

ओंवी-

स्वर्गीं देव अमृतपान करिती ॥ परी ते कल्पांती नाश पावती ॥

जे नामामृत सदा सेविती ॥ ते अक्षयी अजरामर ॥४॥

अर्थ-

सुधेचा अंश चंद्र असून त्याचे ठायीं अमृत असतांही तो क्षय पावतो, तसेंच स्त्रीच्या अधरीं अमृत असून त्याचें सेवन भर्ता करितो. तथापि तो मृत्यु पावून स्त्रीतें वैधव्य प्राप्त होतें तसें नामामृत नव्हे. तें न कळतांही मुखांतून निघालें असतां पापनाश करतें, त्याची योग्यता काय सांगावी ? वामन म्हणतात.

श्लोक-

न कळतां पद अग्निवरी पडे ॥

न करि दाह असें न कधीं घडे ॥

अजित नाम वदो भलत्या मिसें ॥

सकल पातक भस्म करीतसे ॥५॥

अर्थ-

न कळतां अग्नीवर पाय पडला तरी तो दाह करण्यास सोडीत नाहीं. तसें हरिनाम कोणत्याही निमित्तानें मुखांत आलें असतां सकल पाप भस्म करितें. यास्तव तुकोबा म्हणतात. घेईं घेईं माझे वाचे ॥ गोड नाम राघोबाचें ॥ सर्व इंद्रियें सोडून तुकोबांनी प्रथमतः जिव्हेची प्रार्थना किमर्थ केली ? असें म्हणाल तर

श्लोक-

कलौ युगे कल्मषमानसानां नान्यत्र धर्मः खलु निश्चयेन ॥

रामेति वर्नद्वयमादरेण सदा जपन्मुक्तिमुपैति जंतुः ॥३॥

अर्थ-

कलीयुगीं जनाचीं कल्मषयुक्त मानसें, अन्यत्र धर्म निश्चयेंकरुन अवघड, यास्तव राम या दोन अक्षरांचे ग्रहणानें जन्ममृत्युतापापासून पुरुष मुक्त होतो. या कारणास्तव नामग्रहण करणें जिव्हेचे स्वाधीन, म्हणून प्रथम जिव्हेची प्रार्थना केली. जिव्हेच्या स्वाधीन फार कामें आहेत. तिचे योगानें चांगलेंही होतें. व वाईटही होतें.

श्लोक-

जिव्हाग्रे वसते लक्ष्मीर्जिव्हाग्रे मित्रबांधवाः ॥

जिव्हाग्रे राजसन्मानो जिव्हाग्रे बंधनं भवेत् ॥

जिव्हेच्या योगानें लक्ष्मी, तसेच मित्रबांधव, राजसन्मान इत्यादि फल प्राप्त होतें. यावर एक गोष्ट-कोणी एक सावकार कोटयाधीश होता. तो शरीरानें अत्यंत स्थूळ असे. तो दिपवाळीचे दिवशीं आनंदानें माडीवर दिवाणखान्यांत खिडकींत बसला असतां कोणा एका सराफाचा मुलगा त्या रस्त्यानें जात होता. त्यानें सावकाराचें दोंदील शरीर पाहून त्याजकडे पाहून हंसला. तेव्हां सावकारास हर्ष वाटला कीं, माझी श्रीमंती पाहून या मुलास आनंद वाटल्यानें हा हंसला असेल, यास्तव यास कांहीं बक्षीस द्यावें असें मनांत आणून त्यास आपले जवळ बोलावून आणिला आणि हंसण्याचें कारण सहज विचारिलें. तेव्हां तो मुलगा म्हणतो महाराज, आपलें शरीर अत्यंत स्थूळ आही आणि येथेंच प्राणोत्क्रमण झालें असतां खालीं काढण्यास संकट, म्हणून मला हंसूं आलें. असें ऐकतांच सावकारास अत्यंत क्रोध येऊन त्यास त्यानें प्रतिबंध करुन अटकेंत ठेविलें. नंतर त्याचे शोधार्थ त्याचा बाप आला. त्यानें सावकाराची विनवणी करुन म्हटलें महाराज , लेंकरस्वभावानें मुलानें अपराध केला असतां क्षमा करुन त्यास सोडावें. सावकार म्हणतो मूल झालें म्हणून काय भलतेंच बोलेल ? गृहस्थ म्हणतो असें काय बोलला ? सावकार म्हणतो असें बोलला कीं, तुम्हीं येथें माडीवर मृत झाल्यास स्थूळ शरीर खालीं कसें नेलें जाईल ? मुलाचा बाप म्हणतो, त्या लेंकराचा तर्क पोंचला नाहीं, कीं हात पाय तोडून नेतां येईल, म्हणून वेडेपणानें बोलला. या प्रकारें सावकारानें ऐकून त्यासही बद्ध करुन ठेविलें. उपरांत मुलाचा वृद्ध आजा तेथें येऊन त्यांस सोडविण्याविषयीं बोलूं लागला. तेव्हां सावकारानें दोघांचेंही बोलणें त्यास कळविलें. तें ऐकून वृद्ध म्हणतो, महाराज ते दोघेही अज्ञान. त्यांस कळलें नाहीं कीं, हवेलीसच अग्नी द्यावा, म्हणजे कांहीं विचाराचें कारण नाहीं. असें ऐकतांच त्या शहाण्यासही सुबद्ध केला. एवंच जिव्हेच्या योगानें तिघेही बंधन पावले.

भजन-

कृष्णा रामा रामा रामारे, रामा रामा राघोबारे ॥

एका समयीं जिव्हेचा आणि दांतांचा कलह होऊन उभयतांचें संभाषण झालें

दोहरा-

हम बतीस तूं अकेली असे हमारी माय ॥

जरा बाहेर निकले तो हमरो काटी जाय ॥

किंवा

जरासी कतर खाऊं तो फिराद किसे पास जाय ॥१॥

रसना कहे दसनहो तुम कहते हैं साच ॥

पर हम तो तेडी बात कहें तो बतीस पडे खांच ॥

किंवा

जरा तेडी बात कहूं तों बतीस गिरिजाय ॥२॥

जिव्हा वळविली तशी वळते. वाणीचें तप कोणतें ?

गीतेंत श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात.

श्लोक-

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्‌ ॥

स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्‌मयं तप उच्यते ॥८॥

अर्थ-

’अनुद्वेगकरं’ ज्या शब्दापासून दुसर्‍यास त्रास न होईल असें भाषण मधुर असावें. वामन पंडित म्हणतात.

श्लोक-

मधुर वचनायोगें विश्व विश्वास पावे ॥

मधुर वचनयोगें वैरि ते आप्त व्हावे ॥

मघुर वचनयोगें डुल्लती मत्त हस्ती ॥

मधुर वचनयोगें लोक सिद्धांति होती ॥९॥

मधुर वचनानें सर्व जनांस आनंद होतो. या अर्थीं दृष्टांत

श्लोक-

वाङ्‌माधुर्यात्सर्वलोके प्रियत्वं वाक्पारुष्यात्सर्वलोकेऽप्रियत्वं ॥

किंवा

लोके कोकिलेन प्रदत्तं को वा लोके गर्दभस्यापराधः ॥१०॥

अर्थ-

’मधुर वाणि लोकांस प्रिय वाटते आणि कठोर वाणी जनांस अप्रिय होते. कोकिलेच्या शब्दानें लोंकांस संतोष होतो. तिनें लोकांस कांहीं दिलें आहे काय ? किंवा गर्दभानें लोकांचा अपराध केला आहे काय ? कीं त्याचे शब्दानें लोकांस त्रास व्हावा. यास्तव कृष्ण म्हणतात ’अनद्वेगकरं वाक्यं’ दुसर्‍यास त्रासदायक न होय असें भाषण मधुर व सत्य, तसेंच प्रिय असून हितकारक आणि स्वाध्यायाभ्यसन या प्रकारें वाणीचें तप होय. यास्तव तुकोबा म्हणतात हे जिव्हे गे तूं काय कर ?

अभंग-

घेईं घेईं माझे वाचे ॥

गोड नाम राघोबाचें ॥

जिव्हा म्हणते मजकडे काय आहे ? डोळ्यांनीं पहावें व कानांनीं ऐकावें, उपरांत वदण्याचें काम माझें. असें ऐकून तुकोबा कानांची प्रार्थना करितात.

तुम्ही आइका रे कान ॥ माझ्या राघोबाचे गुण ॥१॥

कान हो तुम्ही माझ्या राघोबाचे गुणानुवाद श्रवण करा. वामन म्हणतात, हरिकथा ऐकत नाहींत ते कानच नव्हेत

श्‍लोक-

न कर्ण ते बीळचि युग्म वाटे ॥

कथा सुधा हे जरि त्या न वाटे ॥

जिव्हा जरी कृष्णकथा न वाची ॥

ते बेडुकाचीच न मानवाची ॥११॥

अर्थ-

कथा ही सुधा ज्या कर्णांस वाटत नाहीं ते कर्ण जशीं भिंतीस बिळें तसे होत. जी जिव्हा कृष्णकथा न वाचील ती मनुष्याची नसून बेडकाची जाणावी. कबीर म्हणतात.

दोहरा-

तबलग रसना साची भलीं कीं निकलत मुखसे राम ॥

नहिं तो काट डारीये कीं मुखमो भले नहि चाम ॥

म्हणून तुकोबा म्हणतात.

घेईं घेईं माझे वाचे ॥ गोड नाम राघोबाचें ॥

सकल इंद्रियांची प्रार्थाना तुकोबानींच केली असें नाहीं. भगवद्भक्त या प्रकारेंच म्हणतात.

श्‍लोक-

जिव्हे कीर्तय केशवं मुररिपुं चेतो भज श्रीधरं ।

पाणिद्वंद समर्चयाच्युतकथां श्रोत्रद्वय त्वं शृणु ॥

कृष्णं लोकय लोचनद्वय हरेर्गच्छांघ्रियुग्मालयं ॥

जिघ्र घ्राण मुकुंदपादतुलसीं मूर्धन्नमाधोक्षजं ॥१२॥

अर्थ-

हे जिव्हे, केशवाची कीर्ति गा, हे मना, मुररिपूतें भज, हे हस्त हो, श्रीधराचें अर्चन करा, हे कर्ण-द्वया, अच्युतकथा श्रवण कर, हे नेत्र हो, कृष्णमूर्ति अवलोकन करा. हे पदद्वया, श्रीहरीचे आलयाप्रत गमन कर. हे नासिके, मुकुंदचरणींच्या तुळसींचें अवघ्राण कर हे मस्तका, अधोक्षजपदीं लीन हो. या प्रकारें सर्व इंद्रियांची योजना भगवत्सेवेकडे झाली. शुकयोगींद्र राजा परीक्षितीप्रत सांगतात.

श्‍लोक-

भारः परं पट्टकिरीटजूष्टमप्युत्तमांगं न नमेन्मुकुंदं ॥

शावौ करौ नो कुरुतः समर्चां हरेर्ल्सत्कांचनकंकणौ वा ॥१३॥

अर्थ-

मुकुंदपदीं हें मस्तक नम्र होईना तर तें उत्तम पगडी किंवा किरीटादिकेंकरुन सुशोभित असेल तथापि या धडावर भाररुप जसा दगडावर दगड असें होय. तसेंच हरींची, पूजा न करणारे हस्त कांचनकंकणादिकें सुशोभायमान असतील तरी ते शवाचे करांसमान होत. पंत म्हणतात या हस्तांनीं काय करावें ? व यांचा धर्म कोणता ?

आर्या-

सद्गुरुचरण चुरावे देवार्चन हा स्वधर्म हस्तांचा ॥

समरीं दानप्रसंगी जेविं दणाणी प्रजन्य हस्ताचा ॥१४॥

देव, ब्राह्मण, संत व गुरुंची पदसेवा, श्रीकृष्णपूजा, हा हस्तांचा स्वधर्म होय. रणाचे ठायी तसेंच दानप्रसंगीं हस्तनक्षत्राचा पर्जन्य जसा दणाणतो त्या प्रकारें हस्तप्रभाव असावा. एके समयीं उभय हस्तांचा रणाचे ठायीं संवाद होता झाला.

श्लोक-

आकृष्टे युधि कार्मुके रघु पतेर्वामो ब्रवीद्दक्षिणं ।

दाने कर्मणि भोजने च भवतः प्रागत्भ्यसस्मिन्न किं ॥

वामान्यः पुनरब्रवीन्नममभीः प्रष्ठुंगतः स्वामिनं ।

छिंद्यां रावणवक्‍त्रपंक्तिमथवाप्येकैकमादिश्यतां ॥

अर्थ-

रावणातें मारण्याकरितां रामचंद्रानें कोदंड वाम करें धरुन उजव्या हस्तें कानापर्यंत शीत ओढिलें. ते समयीं डावा हस्त उजव्यास म्हणतो शाबास रे, दान देणें, सत्कर्म करणें, आणि भोजन करणें इतक्या समयीं तूं पुढें होतोस. सांप्रत मार घेण्यास मला पुढें करुन तूं मागें मागें पळत आहेस. याला काय म्हणावें ? असें ऐकून चतुराईनें उजवा हस्त उत्तर देतो कीं, गृहस्था मी भिऊन मागें सरतों असें समजूं नकोस. प्रभूला कांहीं मसलत विचारण्याकरितां मी कानाशीं लागलों आहें. तें कारण असें कीं, रावणाचीं दाही शिरें एकदम छेदूं ? किंवा एकेक पृथक्‌ छेदन करुं ? हें विचारण्याकरितां मागें आलों आहें. मार खाण्याचे भयानें पळालों नाहीं

भजन

कृष्णा रामारे रामा रामा रामा ॥ रामराया राघोबारे ॥

असो. तात्पर्य हीं इंद्रियें प्रभूनें कशास्तव दिलीं आहेत ? कबीर म्हणतात,

रेक्ता - नाककू बास सुबास दिया है, नयन दियो जग देखनको ॥

कान दियो सुनो बेद पुरान, मुख दियो भज मोहनको ॥

चेत दियो सब नेत दियो, पन पेट दियो पन खोवनको ॥१६॥

अर्थ-

प्रभूचे पदावरील निर्माल्याचा सुवास घेण्यास नाक दिलें आहे ॥ सर्वं विष्णुमयं जगत् ॥ हें जग पाहण्यास नेत्र दिले आहेत. वेद, पुराणें, हरिकथा श्रवण करण्याकरितां कान दिले आहेत. प्रभूचें यश आणि नाम गाण्यास मुख दिलें. याविषयीं कबीराचें

पद-

रामभजनकूं दिया कमलमुख हरिभजनकूं दिया ॥ध्रु०॥

खाया पीया सुखसे सोया ॥ उनुनी क्या कमाया ॥कमलमुख०॥१॥

लख चौर्‍याशीं गरके फिरके ॥ अवचट नरतन पाया ॥कम० ॥२॥

कहत कबीरा सुनो भै साधो ॥ आया वैसा गया ॥कम० ॥३॥१७॥

यासाठीं तुकोबा जिव्हेची प्रार्थना करितात

घेईं घेईं माझे वाचे ॥ गोड नाम राघोबाचें ॥

जिव्हा, कर्ण, नेत्रादि तुकोबास म्हणतात, आम्ही सर्व इंद्रियें मनाचे स्वाधीण आहोंत. मनाची वशता करुन घ्यावी. डोळ्यांनीं पाहिलें तरी व्यर्थ होतें. तसेंच कानांनीं ऐकिलें आणि मन तिकडे नसलें तर तें ऐकणें व्यर्थ होतें. याविषयीं गोष्ट-कोणी एक गृहस्थ श्रीमान होता. त्यापासून कांहीं धन प्राप्त व्हावें म्हणून धुंडीभट जो चतुर व आर्जवी असा होत्साता त्या श्रीमानाकडे जाऊन मनोरंजनीय गोष्टी सांगत बसला असतां, यजमानाचें लक्ष व मन गोष्टीकडे नाहीं, असें वाटल्यावरुन पुरतें समजण्याकरितां त्या भटानें आपलें घरची गोष्ट चालविली. महाराज, आमचे वाडवडिलांनीं विद्वत्तेवर पैसा मिळवून घर चांगलें सुंदर बांधिलें. यजमानाचें मन गोष्टीकडे नव्हतें; पण नुसता हूं असा हुकारा मात्र प्रत्येक शब्दास देत असे. धुंडीभट म्हणतो घर चांगलें बांधून बागही सुंद्र केला. हूं, मोठी विहीर बांधिली. त्या विहिरीस पाणी विपुल आणि गोड असें लागलें. हूं, परंतु ती विहीर घरापासून दूर होती. हूं, वडीलांचे मागें तें आम्हांस नीट पडेना. हूं, यास्तव तेथील विहीर उचलून आम्हीं घराचे नजीक आणून ठेविली. तरी हूंच म्हणतो. आतां पाण्याची सोय उत्कृष्ट झाली. तरी हूंच म्हणाला. तात्पर्य- श्रवणाकडे मन नसलें तर तें ऐकणें व्यर्थ होतें. तसेंच पाहणें, चालणें, बोलणें; सर्व व्यर्थ होतें. यास्तव मनाची अनुकूलता करुन घ्यावी. असें ऐकून तुकोबा मनास म्हणतात, ’मना तेथ धांव घेईं ॥ राहे राघोबाचे पायीं’ मन हें आत्म्याचें प्रधान आहे. वामन म्हणतात

श्लोक-

कोणी एक शरीरनाम नगरी तें राज्य आत्मा करी ॥

त्या लागीं मन हें प्रधान असतां दोघांसि मैत्री बरी ॥

रायाला न गमे मनास म्हणतो हा काळ जातो वृठा ॥

सांगे एक तरी रसाळ बरवी श्रीकृष्णजीची कथा ॥

मन हें कसें आहे

श्लोक-

मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः ॥

बंधाय विषायासक्तं मुक्‍त्यै निर्विषयं स्मृतम् ॥

अर्थ-

मनुष्यास मन हें बद्धतेस व मोक्षप्राप्तीसही मूळकारण होय. परंतु हें आंवरण्यास परम दुस्तर. याविषयीं अर्जुन म्हणतात

श्लोक-

चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढं ॥

तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं ॥१८॥

एकनाथ म्हणतात-

ओंवी-

आकाशाची करवेल चौघडी ।

महामेरुची बांधवेल पुडी ॥

शून्याची मुरडवेल नरडी ॥

परी या मनाच्या ओढी अनिवार ॥१९॥

जें घडण्यास अवघड तेंही घडेल; परंतु मनाचें आकलन होणें कठिण ! मोरोपंत म्हणतात.

आर्या-

मन हें ओढाळ गुरुं परधन परकामिनीकडे धांवे ॥

यास्तव विवेकपाशीं कंठीं वैराग्य-काष्ठ बांधावें ॥२०॥

हें मन ओढाळ गुरासारखें आहे हें परधन आणि परस्त्रियांकडे धांवतें, त्यास विवेक एतल्लक्षण पाश यांहींकरुन वैराग्य-काष्ठाचा लोढणा त्याचे कंठीं बांधावा. ओढाळ गुराचें लक्षण विशेषें करुन

ज्ञानेश्वरी॥ या मनाचें एक निकें ॥

जें देखिलिया गोडीच्या ठाया सोके ॥

म्हणोनि अनुभवसिद्धीचीं कौतुकें ॥ दावित जाई ॥२१॥

यासाठीं भगवत्सेवेला संवकलें म्हणजे वारंवार तेथेंच रममाण होईल. यास्तव तुकोबा म्हणतात-

मना तेथें धांव घेईं ॥ राहो राघोबाचे पायीं ॥

ज्या पुरुषांनीं भगवत्पदीं मन स्थिर करुन सकळ इंद्रियें प्रभूचे सेवेस लाविलीं, ते विष्णुलोकचे अधिकारी. त्या पुरुषांस यमाचें किंवा यमदूतांचें भय नाहीं यमधर्म दूतांप्रत सांगतात कीं, विष्णुसेवनीं जे तत्पर त्या पुरुषांकडे तुम्हीं अवलोकन करुं नये. तुम्हीं प्राणी कोणते आणावे तें सांगतों, श्रवण करा.

श्‍लोक-

जिव्हा न वक्ति भगवद्‌गुणनामधेयं ॥

चेतश्च न स्मरति तच्चरणारविंदं ॥

कृष्णाय नो नमति यच्छिर एकदापि ॥

ताननयध्वमसतौऽकृत विष्णुकृत्यान् ॥२२॥

अर्थ-

जे पुरुष जिव्हेकरुन भगवद्गुणकीर्तन व नामग्रहण करीत नाहींत, ज्यांचें चित्त भगवद्धयान, तसेंच प्रभूचे चरणाचें स्मरण व चिंतन करीत नाहींत, श्रीकृष्णाचे पदारविंदीं जे नमन करीत नाहींत, इत्यादि अभक्त जनांतें नरकालयाप्रत आणावें. यास्तव भगवत्सेवेंत तत्पर असावें. ज्या पुरुषांनीं प्रभूचे सेवेस इंद्रियें लाविलीं, त्यांचा देव अंकित होऊन व सर्वकाल साह्य होऊन त्यांचीं दुःखें व तशींच संकटें स्वतः दूर करितो. पहा, पहा, त्या पांडवांनीं सकल इंद्रियें भगवत्सेवेंत लाविलीं, तेणेंकरुन भगवान् त्यांचा ऋणी होऊन सर्वस्वें त्यांस साह्य करिता झाला. एतद्विषयी जैमिनीअश्वमेधांतील कथा कविजन निरुपण करितात.

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP