जय देवा हनुमंता । जय अंजनी सुता ॥
ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ धृ. ॥
वानररुपधारी । ज्याची अंजनी माता ॥
हिंडती वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ।
धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिलीं कथा ॥ १ ॥
सीतेच्या शोधासाठीं । रामें दिधली आज्ञा ॥
उल्लंघुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ।
शोधूनी अशोकवना। मुद्रा टाकिलि खुणा ॥ २ ॥
सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिलें । मारिला अखया दारूण ॥
परतोनी लंकेदरी । तंव केले दहन ॥ ३ ॥
निजवळें इंद्रजित । होम करीं आपण ॥
तोही त्वां विध्वंसिला लघुशंका करून ।
देखोनी पळताती ॥ महाभूतें दारूण ॥ ४ ॥
राम हो लक्षुमण । जरी पाताळीं नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेशे केले ॥
अहिरावण महिरावण । क्षणामाजीं मर्दिले ॥ ५ ॥
देउनि भुभु:कार । नरलोक आटीले ॥
दीनानाथा माहेरा त्वां ॥ स्वामिसी सोडविले ॥
घेऊनि स्वामी खांदी । अयोध्येसी आणिलें ॥ ६ ॥
हनुमंत नाम तुझें । किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वठायी । हारोहारीं अंबरा ॥
एका जनार्दनीं ॥ मुक्त झाले संसारा ॥ ७ ॥