आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण होता. त्याला दोन सुना होत्या; एक आवडती होती व दुसरी नावडती होती. आवडतीला घरांत ठेवीत. चांगलं चांगलं खायला-प्यायला देत, चांगलं ल्यायला नेसायला देत, तसं नावडतीला कांहीं करीत नसत. तिला गोठ्यात ठेवीत, फाटकं-तुटकं नेसायला देत, उष्टं माष्ट खायला देत, असे नावडतीचे हाल होत असत. एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला, तशी ब्राह्मणाच्या बायकोनं बोडणाची तयारी केली. सवाष्णींना बोलावणं केलं. पुढं तिनं देवीची पूजा केली. सगळ्याजणींनी मिळून बोडण भरलं, कहाणी केली. पुढं देवीला नैवेद्य दाखविला. नंतर सर्व माणसं जेवलीं. नावडतीला उष्टंमाष्टं वाढून दिलं. तेव्हा तिला समजलं की घरांत आज बोडण भरलं. नावडतीला रडूं आलं कीं, मला कोणी बोडण भरायला बोलावलं नाहीं. सर्व दिवस तिनं उपास केला. रात्रीं देवाची प्रार्थना केली, नंतर ती झोपी गेली. रात्रीं नावडतीला स्वप्न पडलं. एक सवाशीण स्वप्नांत आली, तिला पाहून नावडती रडूं लागली. ती नावडतीला म्हणाली, मुली, मुली, रडूं नको, घाबरूं नको. पटकन् उगी रहा कशी. रडण्याचं कारण सांग ! नावडती म्हणाली, घरांत आज बोडण भरलं, मला कांहीं बोलावलं नाहीं, म्हणून मला अवघड वाटलं. सवाष्णीनं बरं म्हटलं. नावडतीला उगी केली तिला सांगितलं उद्या तूं गोठ्यांत दही दूध विरजून ठेव. एक खडा मांड, देवी म्हणून त्याची पूजा कर. तूं एकटीच बोडण भर. संध्याकाळीं गाईगुरांस खाऊं घाल. इतकं सांगितलं. पुढं ती नाहींशी झाली. नावडती पुढं जागी झाली, जवळपास पाहूं लागली, तों तिथं कोणी नाहीं. नावडती मनांत समजली की देवीनं मला दर्शन दिलं. पुन्हां तशीच निजली.
सकाळीं उठली. सवाष्णीनं सांगितलं तसं दही-दूध विरजून ठेवलं. दुसरे दिवशीं पहाटेस उठली, अंग धुतलं, एक खडा घेतला. देवी म्हणून स्थापना केली. पानं फुलं वाहून पूजा केली. नंतर लाकडाची काथवट घेतली. विरजून ठेवलेलं दहीदूध त्यांत घातलं. देवीची प्रार्थना केली. पुढं एकटीनंच बोडण भरलं. देवीला नैवेद्य दाखविला. घरांतून आलेलं उष्टंमाष्टं जेवण जेवली. भरलं बोडण झांकून ठेवलं. दुपारी गुरांना घेऊन रानांत गेली. इकडे काय मजा झाली, नावडतीचा सासरा गोठ्यांत आला. झांकलेलं काय आहे म्हणून पाहूं लागला तों लाकडाची काथवट सोन्याची झाली. आंत हिरेमाणकं दृष्टीस पडलीं. बाहेर उडालेल्या ठिपक्यांचीं मोत्यें झालीं. तीं त्यानं आंत भरलीं. मनांत मोठं आश्चर्य केलं ! नावडतीनं ही कुठून आणली म्हणून त्याला काळजी पडली. इतक्यांत तिथं नावडती आली. मुली, मुली म्हणून तिला हांक मारली. काथवट तिच्यापुढें आणली. हिरेमोत्यें दाखविलीं. हीं तूं कोठून आणलीस म्हणून विचारलं. नावडतीनं स्वप्न सांगितलं, त्याप्रमाणं मी बोडण भरलं, ते हें झांकून ठेवलं, त्याचं हें असं झालं. काय असेल तें पाहून घ्या, म्हणून म्हणाली. सासरा मनांत ओशाळा झाला. नावडतीला घरांत घेतली. पुढं तिजवर ममता करूं लागला. तर जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली तशी तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.