कहाणी बुध-बृहस्पतीची

हिंदू धर्मातील पुराणे अतिप्राचीन असून त्यातील कहाण्या उच्च संस्कृतीच्या प्रतिक आहेत.


ऐका बुध-बृहस्पतींनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला सात मुलगे होते. सात सुना होत्या. त्यांच्या घरीं रोज एक मामाभाचे भिक्षेस जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र आलं. सर्वांचे हात रिकामे झाले. मामाभाचे पूर्वीप्रमाणें भिक्षेला आले. सर्व सुनांनीं सांगितलं, असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हां दिलं नाहीं, आतां नाहीं म्हणून नाहीं, ब्राह्मण विन्मुख जातात. ती त्यांच्या पायां पडली. त्यांना सांगूं लागली, आम्ही संपन्न असतां धर्म केला नाहीं ही आमची चुकी आहे, आतां आम्हीं पूर्वीसारखीं होऊं, असा कांहीं उपाय सांगा ! ते म्हणाले, श्रावणमासीं दर बुधवारी आणि बृहस्पतवारीं जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पति प्रवासीं जाऊन घरीं येत नसल्यास दाराच्या पाठीमागं दोन बाहुलीं काढावीं. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावीं. त्यांची मनोभावं पूजा करावी, अतिथींचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात ! त्याप्रमाणं ती करूं लागली.

एके दिवशी तिला स्वप्न पडलं. ब्राह्मण जेवीत आहेत, मी चांदीच्या भांड्यांत तूप वाढते आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनीं तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला ! तिचा नवरा प्रवासाला गेला होता, त्या नगरचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाहीं, म्हणून तेथील लोकांनीं काय केलं? हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरांत फिरविली. ज्याच्या गळ्यांत माळ घालील, त्याला राज्याभिषेक होईल, अशी दवंडी पिटविली. हत्तिणीनं ह्या बाईच्या नवर्‍याच्या गळ्यांत माळ घातली. मंडळींनीं त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरविली, पुन्हां त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे तीनदां झालं. पुढं त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हां तीं अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली.

मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारों मजूर खपूं लागलें. तिथं त्याचीं माणसं आलीं. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्यें संतोष झाला. तिनं बुध-बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली. देवानं देणगी दिली, पण जावांनीं थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनांत ठेविली. ब्राह्मणभोजनाचा थाट केला. हिच्या हातांत चांदीचं भांडं दिलं, तूप वाढूं सांगितलं, ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनीं तें पाहिलं. त्यांचा सन्मान केला, मुलंबाळं झालीं, दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. जशी त्यांच्यावर बुध-बृहस्पतींनी कृपा केली, तशी तुम्हां आम्हांवर करोत ! ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP