श्रीदत्त ऋषय ऊचुः ॥ सूत सूत महाबुद्धे वद नो वदतां वर ॥
माहात्म्यं सत्यदत्तस्य यतः शुश्रूषवो वयम् ॥१॥
सूत उवाच ॥ कश्चिद्राज सोमवंश्य आयुर्नाम महामतिः ॥
सम्राट् दाता वशी धन्यः सोऽनपत्यत्वदुःखितः ॥२॥
श्रीदत्तात्रेयमाहात्म्यं श्रुत्वा मुनिसमीरितम् ॥
गुरुं शौनकमानम्य पुत्रार्थीं शरणं ययौ ॥३॥
राजेन्द्र सत्यदत्तस्य व्रतं कुरु यथाविधि ॥
तद्व्रतस्य प्रभावेण सुपुत्रं प्राप्स्यसि ध्रुवम् ॥४॥
श्रुत्वेत्थं स गुरोर्वाक्यं व्रतं चक्रे समाहितः ॥
प्रसादं जगृहे भक्तया भार्याबन्धुजनैः सह ॥५॥
श्रीदत्त ॥ श्रीशौनकादि ऋषी असे म्हणाले की, "श्रीसूतजी ! आपण अत्यंत बुद्धिमान् असून पौराणिकांमध्ये श्रेष्ठ आहात; तरी श्रीसत्यदत्ताचे माहात्म्य आम्हाला आणखी सांगा. कारण ते श्रवण करण्याची इच्छा करणारे आम्ही आहोत." ॥१॥
ते ऐकून श्रीसूत असे म्हणाले की, "चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान् दाता व जितेंद्रिय असा एक सम्राट् राजा होता; पण त्याला अपत्य नसल्यामुळे तो दुःखित होता. ॥२॥
मुनींनी सांगितलेले श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य श्रवण करुन अत्यंत विश्वासाने, नम्रतापूर्वक तो श्रीशौनक गुरुजींना पुत्रप्राप्तीसाठी शरण जाता झाला. ॥३॥
तेव्हा त्यास श्रीशौनक असे म्हणाले की, "हे राजेंद्रा ! श्रीसत्यदत्तांचे व्रत यथाविधी कर. त्या व्रताच्या प्रभावाने तुला सुपुत्र निश्चित प्राप्त होईल." ॥४॥
असे श्रीसद्गुरुंचे वाक्य ऐकून तो राजा एकाग्रचित्त होऊन, यथाविधी श्रीसत्यदत्तांचे व्रत करिता झाला आणि मोठया भक्तीने भार्या व बंधुजन यांच्यासह प्रसाद सेवन करिता झाला. ॥४॥
अथास्य महिषी स्वप्ने महापुरुषलक्षणम्॥
मुक्ताफलं चार्पयन्तं क्षीरपूर्णेन कम्बुना ॥६॥
स्वात्मानमभिषिञ्चंन्तं दृष्ट्वा पत्यै शशंस तत् ॥७॥
प्रातर्नुपोऽपि संशुद्धः स्वप्नं शौनकमब्रवीत्॥ शौनक उवाच ॥
अनसूयागर्भरत्नदत्तात्रेयार्पितं फलम्॥८॥
धर्मात्मा वैष्णवः पुत्रः श्रीसोमान्वयभूषणः ॥
भविष्यतीति स्वप्नेन सूचितं नात्र संशयः ॥९॥
अत्रान्तरे तु हुण्डस्य तनया नन्दनं वनम् ॥
वयस्याभिर्गता तत्र चारणानां परस्परम् ॥१०॥
भाषतां वचनादायोः पुत्रो हुण्डासुरान्तकः ॥
भविष्यतीति सा श्रुत्वा गत्वा पित्रे शशंस तत् ॥११॥
नंतर त्याच्या राणीस, महापुरुषांच्या लक्षणांनी संपन्न असा एक तेजस्वी पुरुष येऊन त्याने आपणास मोठे पाणीदार मोती दिले व दूध भरलेल्या शंखाने आपणावर अभिषेक केला, असे स्वप्न पडले. ते स्वप्न तिने राजास कथन केले. ॥६-७॥
राजाही प्रातःकालीन स्नानदानादि क्रियांनी शुद्ध होऊन, ते स्वप्न श्रीशौनकामुनींस सांगता झाला. ते ऐकून श्रीशौनकमुनी असे म्हणाले की, "अनुसूयेच्या गर्भातील रत्न असणार्या श्रीदत्तात्रेय प्रभूंनी हे फल अर्पण केले आहे. धर्मात्मा श्रीविष्णुभक्त, उत्तम अशा चंद्रवंशाला भूषण असा पुत्र होईल, हे या स्वप्नाने सूचित केले आहे, याविषयी काहीच शंका नाही." ॥८-९॥
याच वेळी हुंडासुराची कन्या मैत्रिणीसह नंदवनामध्ये गेली होती तेथे काही भाटस्तुतिपाठक लोक परस्परांमध्ये असे बोलत होते की, "हुंडासुराचा नाश करणारा मुलगा आयुराजाला होणार आहे." असे त्यांचे भाषण त्या मुलीने ऐकले आणि तात्काळ नगरात परत येऊन तिने ते वृत्त आपला पिता जो हुंडासुर त्याला कथन केले. ॥१०॥
दुरात्मा दानवो दुष्टः श्रुत्वैवं चकितोऽभवत्॥
नूनं शत्रुर्ममैवैष हन्तव्यो मे प्रयत्नतः ॥१२॥
इति निश्चत्ये न्दुमत्यै स दुस्वप्नानदर्शयत्॥
श्रीदत्तरक्षितो गर्भो नैव ब्रभ्रंश भाग्यवान् ॥१३॥
ततः सुशोभने काले तुङगस्थे ग्रहपञ्चके ॥
असूर्रगे महाभागमसूतेन्दुमती सुतम्॥१४॥
दुष्ट्वा तं सुभगं वालं ननन्देन्दुमुखी सती ॥
आयूराजापि तं श्रुत्वा पुत्रोद्भवमहोत्सवम् ॥१५॥
जातकर्माऽकरत्प्रेम्णा ददौ दानानि भूरिशः ॥
काचिदत्रान्तरेऽरिष्टाद्धात्र्येका बहिरागता ॥१६॥
दुरात्मा दुष्ट दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखरच हा माझा शत्रू आहे. याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे. ॥१२॥
असा निश्चय करुन तो राक्षस, इंदुमती राणीस दुष्ट स्वप्ने दाखविता झाला. तथापि श्रीदत्तांनी रक्षण केलेला तो इंदुमतीचा भाग्यवान् गर्भ नाश पावला नाही. ॥१३॥
इतकेच नव्हे; तर दिवसेंदिवस तो वृद्धिंगत झाला. पूर्ण दिवस भरल्यावर, शुभ काली, रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे पांचही ग्रह उच्चस्थानी असून अस्तंगत नसताना, महाभाग्यवान् अशा पुत्रास इंदुमती प्रसविती झाली. ॥१४॥
त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती आनंदित झाली. राजा श्रीआयूही पुत्रजन्माचा महोत्सव श्रवण करुन, प्रेमाने पुत्राचा जातकर्मसंस्कार करता झाला व अनेक प्रकारची दाने देता झाला. इतक्यात कोणी एक दासी प्रसूतिगृहातून बाहेर आली. ॥१५-१६॥
हुण्डासुरोऽपि मायावी तस्या अङंग प्रविश्य सः ।
नेतुकामो जजापेष्टां लघुप्रस्वापिनीं विधेः ॥१७॥
तत्र सुप्तेषु सर्वेषु देव्या संमोहितेष्वथ ॥
प्रादर्भूय स्वरुपेण दैत्यो बालं जहार सः ॥१८॥
अपहृत्त्याथ त बालं काञ्चनाख्यं पुरं स्वकम्॥
गत्वा प्रियां समाहूय तस्यै दत्वाऽसुरोऽब्रवोत् ॥१९॥
प्रिये समक्षमेव त्वं घातयित्वार्भमप्यमुम्॥
तन्मांसं प्रातराशाय सास्त्रं मे देहि पाचितम् ॥२०॥
तथेत्युक्त्वाऽसुरस्त्री सा बालमादाय निर्दयम्॥
प्राहैकलाख्यां सैरन्ध्रीं हत्वैनमविचारतः ॥२१॥
पक्त्वोत्तमं प्रदेहि त्वं प्रियभोजनहेतवे ॥
इत्युक्त्वाऽदाच्छिशुं सापि सूदहस्ते तथा ददौ ॥२२॥
मायावी हुंडासुर पण त्याच वेळी त्या दासीच्या अंगात प्रवेश करता झाला आणि बालकाला तेथून नेण्याची इच्छा करणार्या त्या राक्षसाने सर्वांना शीघ्र निद्रा यावी या हेतूने मंत्र विद्येचा जप केला. ॥१७॥
त्यामुळे राणीसह सर्व मोहित होऊन झोपले असता, हंडासुर दैत्य आपल्या खर्या रुपाने प्रकट होऊन त्या बालकाचे अपहरण करिता झाला. ॥१८॥
त्या बालकासह आपल्या कांचन नावाच्या नगरात जाऊन त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीला बोलाविले व तिच्या स्वाधीन ते बालक करुन दैत्य असे म्हणाला की, ॥१९॥
"हे प्रिये ! तू आपल्या समक्ष या अर्भकाला मारुन व त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी खाण्याकरिता मला दे." ॥२०॥
"बरे आहे", असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाकघरात गेली आणि तेथे असणार्या एकला नावाच्या दासीला तिने कठोरपणाने अशी आज्ञा केली की, "कोणताही विचार न करता या बालकाला मारुन व त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते तू दैत्यराजास खाण्यासाठी दे." असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हातात देऊन ती दैत्य स्त्री आपल्या महालात निघून गेली. त्या दासीनेही ते बालक मारुन शिजविण्यासाठी आचार्याच्या हाती दिले. ॥२१-२२॥
विश्वासेनैव हुण्डस्य प्रिया दत्वार्भकं स्वयम् ॥
जाता कार्यास्तरासक्ता सैरन्ध्र्येकात्र संस्थिता ॥२३॥
दिव्यं सद्योजातमपि दृष्ट्वा बालं स निर्दयः ॥
चिच्छेद सुशितास्त्रेण तथापि स न विव्यथे ॥२४॥
श्रीदत्तचक्रगुप्तत्वाच्छस्त्रं भग्नं स नो हतः ॥
भाविबालसुदैवेन शान्ता क्रूरापि सैकला ॥२५॥
हुंडासुराची स्त्री, विश्वासाने बालकाला मारण्यासाठी दासीजवळ देऊन दुसर्या कामाकरिता निघून गेली. तेथे फक्त ती दासी राहिली. ॥२३॥
नंतर त्या निर्दय आचार्याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्याकरिता त्याच्यावर शस्त्रप्रहार केला ! पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यथा झाली नाही. ॥२४॥
उलट श्रीदत्तांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने त्या आचार्याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षितच राहिले. ते पाहून या बालकाच्या सुदैवाने, ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली. ॥२५॥
सुदं प्राह त्वया बालो न वध्योऽयं महामते ॥
तथेत्युक्त्वा कृपाविष्टौ तदैवादाय तं द्रुतम् ॥२६॥
द्वाराब्दहिर्निधायर्षेर्वसिष्ठस्थागतौ पुनः ॥
मृगशावं निहत्यैकं पक्त्वा सूदः सुसंस्कृतम्॥ २७॥
तन्मांसं दैत्यराजाय धूर्तो विश्वासयन ददौ ॥
तदाऽसुरो हृष्टतरो भूत्वा मूढस्तदामिषम् ॥२८॥
भुक्त्वात्मानं कुधीर्मेने कृतकृत्यं हतान्तकम् ॥
ततः प्रभाते विमले वसिष्ठो ज्ञानिनां वरः ॥२९॥
बहिरेत्यार्भकं द्वारि ददर्श मुनिवृन्दयुक् ॥
दृष्ट्वा विल्मयमापन्न उवाचारुन्धतीपतिः ॥३०॥
आणि ती त्या आचार्यास असे म्हणाली की, "हे बुद्धिमान् पाचका ! तू या बालकाला मारु नकोस." त्याने ते कबूल केल्यावर ते दोघे त्या बालकासह नगराबाहेर गेले आणि श्रीवसिष्ठऋषींच्या आश्रमाच्या बाहेर त्या बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्याने एका मृग शिशूला मारुन ते मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक दिले. त्यावेळी तो मूर्ख हुंडासुर मोठया आनंदाने मांस खाऊन स्वतःला कृतकृत्य समजता झाला. त्यानंतर प्रभातकाळी, ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे श्रीवसिष्ठऋषी आपल्या आश्रमाच्या बाहेर येऊन पाहतात तो त्यांना एक दिव्य बालक एकटेच तेथे निजलेले दिसले. तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन बोलू लागले. ॥२६-२७-२८-२९-३०॥
मुनयः पश्यतात्रेष बालः कस्यास्ति सुन्दरः ॥
रात्रौ केन समानीय स्थापितस्तन्न विद्महे ॥३१॥
मुनयस्तं शिशुं दृष्ट्वा विस्मिता अपि तेऽभवन् ॥
वसिष्ठस्तु तदा ध्यात्वा योगी प्राह त्रिकालवित् ॥३२॥
आयोस्तु सोमवंश्यस्य दत्तसेवाफलोद्भवः ।
श्रीदत्तगुप्तः पुत्रोऽयमायुष्मान् राजलक्षणः ॥३३॥
हुण्डेन स्वान्तकं मत्वा हृतो दैवादिहागतः ॥
मैत्रावरुणिरित्युक्त्वा ज्ञानीशोऽपि विमोहितः ॥३४॥
कराभ्यां दययादाय स्वाश्रमं तमनीनयत् ॥
वसिष्ठ आह श्रीदत्तप्रसादादमरान्नरान् ॥३५॥
शीघ्रं विपद उद्धृत्य सम्राड् जिष्णुर्भविष्यति ।
इति ब्रुवति मौनीशे पुष्पाणि ववृषुः सुराः ॥३६॥
श्रीवसिष्ठमुनी असे म्हणतात की, "ऋषीहो ! हे कोणाचे सुंदर बालक, रात्री येथे कोणी आणून ठेवले ते समजत नाही." ॥३१॥
ते सर्व ऋषीही त्या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकालज्ञ श्रीवसिष्ठऋषी ध्यानाने सर्व जाणून बोलू लागले की, ॥३२॥
"हा सोमवंशातील आयूराजापासून श्रीदत्तसेवेचे फळ म्हणून उत्पन्न झालेला पुत्र असून श्रीदत्तात्रेय याचे नित्य रक्षण करीत असल्याने हा दीर्घायू व सर्व राजलक्षणांनी संपन्न असा आहे. ॥३३॥
हुंडासुराने हा आपला नाश करणारा आहे असे जाणून सूतिकागृहातून याचा अपहार केला. पण दैवाने हा तेथून सुटून येथे आला आहे." याप्रमाणे बोलून महान् तत्त्वज्ञानी श्रीवसिष्ठऋषीही त्या दिव्य बालकाला पाहून ईशमायेने मोहित
झाले ॥३४॥
आणि मोठया दयेने दोन्ही हातांनी त्या बालकाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये नेते झाले. आणि असे म्हणाले की, "श्रीदत्तप्रसादामुळे अमरांना व नरांना विपत्तीतून शीघ्र मुक्त करुन विजयी असा हा सम्राट राजा होईल." या प्रमाणे श्रीवसिष्ठऋषी बोलत असता देव पुष्पवृष्टी करते झाले. ॥३५-३६॥
ननृतुश्चाप्सरोवर्गा गन्धर्वाः सुस्वरं जगुः ॥
ऋषयोऽपि तदा हृष्टाः कुमारायाशिषो ददुः ॥३७॥
दीर्घायुरस्तु सततं सहओजोबलान्वितः ॥
नामकर्माऽथ विधिवद्वसिष्ठस्तस्य चाकरोत् ॥३८॥
न क्वापि बालभावैस्ते दूषितं यन्नराधिप॥
तस्मान्नहुषनाम्ने ते स्वस्त्यस्वमरपूजित ॥३९॥
अरुन्धती सती सापि बालमौरसवत्सदा ॥
ररक्ष दैवनाथं तं वात्सल्याल्लालनादिना ॥४०॥
अप्सरा नृत्य करत्या झाल्या व गंधर्व सुस्वर गायन करित झाले. त्यावेळी आश्रमातील ऋषीही संतुष्ट होऊन कुमाराला आशीर्वाद देते झाले. ॥३७॥
"हा बालक दीर्घायुषी व ओजबल यांनी संपन्न होवो" असा आशीर्वाद ऋषींनी कुमाराला दिला. नंतर श्रीवसिष्ठऋषींनी शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला. ॥३८॥
"बालभावांनी ज्या अर्थी केव्हाही तुझे अंतःकरण दूषित झाले नाही त्याअर्थी, हे देववंदिता ! तू नहुष या नावाने प्रसिद्ध होशील तुझे कल्याण असो." ॥३९॥
महासती श्रीअरुंधतीही वात्सल्यामुळे त्याचे लालनपालन करुन, औरस पुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करती झाली. ॥४०॥
प्राप्तेऽथैकादशे वर्षे यथाविध्युपनीय तम् ।
वेदमग्राहयत्साङंग शास्त्राणि च यथार्थतः ॥४१॥
सरहस्यं धनुर्वेदं सविधानं विशेषतः ॥
ज्ञानशास्त्रं राजनीतिं सेतिहासपुराणकम् ॥४२॥
बहुशोऽपि विनीतात्मा शिष्यत्वेन यथाविधि ॥
सिषेवे श्रीगुरुं भक्तया मनोवाक्कायकर्मभिः ॥४३॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्ठित श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य
श्रीवासुदेवानन्दयतिमतिकलिते श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने तृतीयोऽध्यायः ॥३॥ श्रीदत्त॥
श्रीनहुषाला अकरावे वर्ष लागले असता, क्षत्रियाला उचित अशा विधीने यथाशास्त्र त्याचे उपनयन करुन सांगवेद व सार्थशास्त्र
श्रीवसिष्ठऋषी त्याला शिकविते झाले. ॥४१॥
सरहस्य धनुर्वेद, विशेषतः सविधान अस्त्रविद्या, ज्ञानशास्त्र, राजनीती, इतिहास, पुराण या सर्वांचे अध्ययन त्याच्याकडून करविते झाले. ॥४२॥
या प्रमाणे विद्याग्रहण करीत असताना यथाविधी शिष्यत्व स्वीकारुन तो श्रीनहुष मन, वाणी, शरीरादिकांनी सद्गुरु श्रवसिष्ठांऋषीचे सेवन भक्तिपूर्वक करिता झाला. ॥४३॥
या प्रमाणे निर्मत्सर व सर्वगुणांनी पूर्ण असा नहुष, श्रीवसिष्ठाऋषींच्या प्रसादाने सर्व विद्यापारंगत झाला. ॥४४॥
॥इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने तृतीयोध्यायः॥३॥