सत्यदत्त व्रत कथा - अध्याय दुसरा

योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्‍ठ व पापनाशक असे माहात्म्य, श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे.


अध्याय दुसरा

श्रीदत्त॥ सूत उवाच ॥ इति दत्तोदितं ज्ञान श्रुत्वा सन्तुष्‍टमानसः ॥
नमः श्रीसत्यदत्तायेत्युक्‍त्वा नत्वावदच्च तम् ॥१॥
द्विज उवाच ॥ विराडादिस्थावरान्ता ईश्वरा बहवः श्रुताः ॥
एतुषे कतमोऽर्च्योऽत्र मोक्षसिद्धिप्रदश्च कः ॥२॥
श्रीदत्त उवाच ॥ मच्चिदंशयुतास्ते तु फलदाः स्वाधिकारतः ॥
किन्तु मद्भजनात्कामक्रोधाद्यन्तर्मलक्षतिः ॥३॥
मत्प्रसादात्ततश्चान्तस्तमोनाशस्ततोऽमृतम्‌ ॥
निर्गुणोपास्तितः सर्वान्कामानाप्त्वाऽमृतो भवेत् ॥४॥
तस्मात्त्यक्त्वाऽखिलान्धर्मान्मामेहि शरणं द्विज ॥
मत्प्रसादाद्विशुद्धोऽतो मोक्ष्यसे शान्तिमृच्छसि ॥५॥
श्रीदत्त । श्रीसूत असे म्हणाले की, "याप्रमाणे भगवान् श्रीदत्तात्रेयांनी कथन केलेले श्रवण करुन मन संतुष्‍ट झाले आहे असा तो ब्राह्मण श्रीसत्यदत्तास नमस्कार असो, असे बोलून व नमस्कार करुन श्रीदत्तांना असे म्हणाला की, ॥१॥
"विराटापासून अश्वत्थादि स्थावरांतापर्यंत ईश्वराची अनेक स्वरुपे शास्त्रामध्ये सांगितलेली दिसतात. त्यातील अर्चनीय व मोक्षसिद्धी देणारा कोण ते मला सांगा." ॥२॥
श्रीदत्त त्याला असे म्हणाले की, "माझ्या चिदंशाने युक्त असलेले ते सर्वही आपापल्या अधिकारानुरुप फल देणारे आहेत; पण सर्वरुप अशा माझ्या भजनामुळे चित्तातील कामक्रोधादि मलांचा नाश होतो. ॥३॥
आणि माझ्या प्रसादाने मूलकारण अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. निर्गुणाची उपासना केली असता त्या योगाने सर्व इष्‍टप्राप्ती होऊन मुक्तीही मिळते. ॥४॥
म्हणून हे द्विजा ! तू सर्व धर्म सोडून मला शरण ये; म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त होशील व तुला पूर्ण शांती मिळेल. ॥५॥
स्वस्त्यस्तु ते मदुक्तेस्त्वं सारमाधत्स्व शोधितम् ॥
मद्भक्तेष्वपि योगोऽयं प्रकाश्यो यत्नतस्त्वया ॥६॥
इत्युक्‍त्वा भगवान् दत्तो लीलया द्राक् तिरोदधे ॥
स द्विजः कृतकत्योऽभूत्तदुक्तयर्थविलोकनात् ॥७॥
सूत उवाच ॥ आजीवितं त्रयः सेव्या वेदान्तो गुरुरीश्वरः ॥
पूर्वं ज्ञानाप्तये पश्चात्कृतघ्नत्वनिवृत्तये ॥८॥
महानुशासनं चेत्थं मनस्यानीय स द्विजः ॥
व्रतं श्रीसत्यदत्तस्य चकार प्रेमनिर्भरः ॥९॥
तुझे कल्याण असो. माझ्या कथनाचे मनन करुन सार ग्रहण कर आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग तू प्रयत्नपूर्वक प्रकाशित कर." ॥६॥
असे बोलून भगवान् श्रीदत्तात्रेय लीलेने शीघ्र अंतर्धान पावले आणि तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाच्या निदिध्यासाने कृतकृत्य होता झाला. ॥७॥
सूत पुढे असे म्हणाले की, "हे ऋषीहो ! वेदान्तशास्त्र, गुरु व ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म करावे. ज्ञानप्राप्तीसाठी प्रथम करावे व नंतर कृतघ्नपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. ॥८॥
अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनात आणून तो ब्राह्मण, प्रेमनिर्भर होऊन श्रीसत्यदत्ताचे व्रत करता झाला. ॥९॥
पौर्णमास्यां च सङ्‌क्रान्तौ शुभे काले गुरोर्दिने ॥
समुपोष्योक्तकाले वै समाहृतसमर्हणः ॥१०॥
सप्तावरणसंयुक्तं दत्तात्रेय मुनीश्वरं ॥
कल्पोक्तेन विधानेन सत्यदत्तमपूजयत् ॥११॥
सितां गोधूमचूर्णं च घृतमेतत् त्रिकं समम् ॥
समादाय सपादं च सम्यक् क्षीरे विपाचितम् ॥१२॥
संस्कृतं चैलाद्राक्षाद्यैः स संयावं न्यवेदयत् ।
ब्राह्मणैर्बांधवैः सार्धं प्रसादं जगृहे ततः ॥१३॥
एवं श्रीसत्यदत्तस्य व्रतं कुर्वन् द्विजोतमः ॥
सद्भक्तयोपास्तयोगीन्द्रस्त्यक्तसर्वैषणो वशी ॥१४॥
दत्तोक्तज्ञानमाहात्म्यात्पुनरावृत्तिदुर्लभम् ॥
जगामान्ते द्विजश्रेष्‍ठाः सहसा महसां निधिम्॥१५॥
इतिश्रीहृत्पुण्डरीकाधिष्‍ठित श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य
श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते
श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने द्वितीयोऽध्यायः ॥२॥
॥श्रीदत्त॥
पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार अथवा कोणताही शुभकाल अशा समयी उपोषण करुन, गंधपुष्पादि सर्व पूजा साहित्य जमवून,
कल्पोक्तविधीप्रमाणे सात आवरणदेवतांसहित मुनीश्वर श्रीदत्तात्रेयरुपी श्रीसत्यदत्ताचे पूजन करता झाला. ॥१०-११॥
साखर, गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ समप्रमाणात, पण सव्वापट म्हणजे सव्वाशेर, सव्वापायली, सव्वा मण, सव्वा खंडी या प्रमाणात शक्तीप्रमाणे घेऊन आणि उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, बेदाणा, केशर इत्यादि घालून तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्रीसत्यदत्तप्रभूंस समर्पण केला आणि ब्राह्मण व आप्तबांधव यांच्यासह त्याने तो प्रसाद ग्रहण केला. ॥१२-१३॥
याप्रमाणे श्रीसत्यदत्ताचे व्रत करणारा तो ब्राह्मण शुद्ध भक्तिप्रेमाने योगींद्र श्रीदत्तात्रेयांची उपासना करीत राहून, त्या बलाने पुत्रेषणा, वित्तेषणा व लोकैषणा या सर्वही एषणा सोडून, इंद्रियविजयी होत्साता श्रीदत्तात्रेयांनी उपदिष्‍ट ज्ञानाच्या प्रभावाने शेवटी पुनरावृत्तिविरहित अशा तेजोनिधी श्रीदत्तात्रेयांच्या सायुज्यमुक्तीप्रत प्राप्त झाला. ॥१४-१५॥
॥इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्यान द्वितीयोऽध्यायः॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T21:07:30.4830000