श्रीगणेशाय नमः ॥

हरिविष्णुलागीं सांगे भाऊ । आतां विलंब न करी बहु । आपा भोंवती चक्रव्युहू । परशरामें रचीला असे ॥१॥
हरिविष्णू मग ते अवलरीं । आपासाहेबास करीं धरी । तेव्हां क्रोध ह्रुदयांतरीं । आला अद्‌भुत नावरे ॥२॥
परंतु धैर्यापासूनी । अणुमात्र डगला नाहीं प्राणी । हरीविष्णुला भनस्वी त्यांनीं । नानाप्रकारें शिव्याचमका दिधल्या ॥३॥
तेव्हां हिय्या करोनी थोर । एक दोघांनीं धरले कर । अवघे मानकरी झाले चोर । वडिलावडिली चाकर जे ॥४॥
आणिले बाहेर बिचोब्याचे । मग कांहीं उपाय न चले त्याचे । वारंवार स्मरण बाबाचें । कोठें गेलास ये तरी ॥५॥
आपाची कुमक न करी कोणी । घेउनी चालिले चोरावाणी । तेव्हां आपा गहिवरोनी । गडबडा लोळे धरणीवरी ॥६॥
बाबा कोठें आहेस तरी । मला दुःखाचे डोंगरीं । टाकोनी कैसा गेला दुरी । कोण मजला तुज वेगळें ॥७॥
दादासाहेब जिवंत असते । ते तरी मजला सोडविते । किमपी हातीं न देते । आनंदीबाई तीही मेली ॥८॥
असते जरी नानाभाऊ । ते तरी येतसे सोडऊ । चुलते जनोबा बाबा भाऊ । तेही गेले स्वर्गातें ॥९॥
विश्वासराव । माधवराव । त्यांचेही फक्त राहिलें नांव । सोडविणार गेले नारायणराव धाकटे माधवराव तेही गेले ॥१०॥
अमृतरावही राहिले दूर । आतां मी जालों निराधार । शोकास आपल्या नाहीं पार । बाबावांचोनी किलवाणी ॥११॥
मी उघडाबोडका शरिरावर । धोतर व एक अंगवस्त्र । मायाबापामागें अंगिकार । बाबा तुम्ही केला असे ॥१२॥
जळावांचोनी जैसा मत्स्य । किं धेनुवांचुनी जैसें वत्स्य । तैसें आपा जहाले बिभित्स । दाही दिशा न्याहाळी ॥१३॥
आनंदीबाईनें शंकर । पूजिला भक्तिपुरःसर । त्यांचे फळ हें घोरांदर । मज भौवतें जहालें ॥१४॥
सभोंवता शत्रूचा संभारु । त्यामाजी अपा लेंकरुं । गडबडा लोळे त धरवे धिरु । बाबा मज कां टाकिलें ॥१५॥
आतां बाजीराव बाबाचें । पुनः दर्शन होणें कैचें । तीळ तुटले त्याचे आयचे । ऐसें मला वाटतें ॥१६॥
पालूखींत घालून आपा नेले । वर्तमान शिंद्याचे लष्करांत गेलें । कीं भाऊ इमानी कामा आले । श्रीमंतातें समजलें ॥१७॥
मग दवलतरायाशीं रावबाजीनें । वर्तमान केलें निवेदन । कीं चिमणा आपा घेऊन । गेलेत कोठें नकळें मला ॥१८॥
भाऊ जहाले कियाभ्रष्‍ट । हें शिंद्यास ठावकें नव्हतें स्पष्‍ट । ऐकूनी मर्जी जहाली रुष्‍ट । श्रीमंतांपाशीं बोलतसे ॥१९॥
दत्तपुत्र नाना घेणार । आम्ही त्याचा मोडूनि कार । आपुले मर्जीस्तव त्याशीं वैर । केवढा आम्हीं संपादिला ॥२०॥
तेव्हां निमकहरामी आम्ही । भाऊ निमकहलाल केले तुम्ही । वचनाचे साचे पराक्रमी । त्यांनींच केलीं हीं कर्में ॥२१॥
तेव्हां शिंद्याशीं श्रीमंत । पुनः मागुती बोलतात । चिमण्याचेंच दुःख अत्यंत । त्याही वरी तुझी शस्त्रें ॥२२॥
तुजवर आमचा विश्वास । नाहीं ऐसें म्हणतोस । भाऊवर फार विशेष । हें काय बोलणें ये वेळीं ॥२३॥
पानपता भाऊ मेले । पूर्वज तुमचे त्यासवें गेले । जर कसेंही स्वामींनीं वाईट केलें । तरी मरावें धन्यासंगे ॥२४॥
हा धर्म तुझा परंपरा । चालत असला महावीर । तर तुम्हीही कबूल करा । मागील काय आठवितोसी ॥२५॥
ऊठ करूं शत्रूचा पाठलागे । आपास परतोन आणूं मागें । मग शिंदा म्हणे उठा वेगें । चिमणाआपाचा शोध करुं ॥२६॥
शिंदे श्रीमंत दोघे वीर । पुढें होणार अश्‍वस्वार । इतक्यांत बाळोबा सत्वर । येऊन सांगे शिंद्याला ॥२७॥
म्हणे ही वेळ जावयाची नव्हे । रात्रौ मनसुबे राहूं द्यावे । उजेडल्या उपरांतीक शोधावे । आपासाहेब असतील तेथें ॥२८॥
पंचचामर वृत्त । बाळोबांनीं जावयाचा कार मोडिला जेव्हां । शिंदे बाजीराव जात होते राहिले तेव्हां ।
बाळोबास अंतरीं मनांतजाली बाहाली । फार चांगली बहुत कार्यसिद्धी जाहली ॥२९॥
शिंदे आणि श्रीमंत खलबता बैसले असे । सेवकाहातूनी दोघे बातमी आणितसे ।
बाळोबानें खेळ काय मांडलासे बाहेरी । पलटणें फौज आवळूनिया उभी करी ॥३०॥
बाहेर येतां करावे ठार दोघेही जण । शिंदे स्वामीलागी सांगतात हात जोडून ।
स्वामी आज लष्करांत माझियाच राहावें । स्वामीचा मी भृत्य चाकरी घडेल पहावें ॥३१॥
सेवकांनीं आणिले वळुनी स्वामी मागुती । असो चिमाआपास भाऊ घेऊनी पळालेती ।
कुच करोन मांजरीस शिंदे पेशवे आले । पुढें आपाचें वर्तमान पाहिजेच ऐकिलें ॥३२॥
बहिरोपंत सातार्‍यास भाऊ पाठवी जेव्हां । बळेंच राजापासूनी वस्त्रें आणिलीं तेव्हां । तेव्हां यशोदाबाईलागीं भाऊनीं बोलाविलें । तों बाईनीं निरोप धाडिला नव्हे हें चांगलें ॥३३॥
तुम्ही प्रबुद्ध थोर काय सांगावें तुम्हास रे । कसे आपास दत्त देतसां ते माझे सासरे । सुन त्यांची मी मला ते दत्त देतसा कसें । अयोग्य कर्म काय भाऊ वर्ततां तुम्ही असे ॥३४॥
पुनः यशोदाबाईला निरोप भाऊ पाठवी । सुनसासर्‍याची कल्पना मनांत ना ठेवी । तुम्ही स्वसंतोषें आलांत फार चांगलें म्हणे । न आलियास मग आम्ही आणूं तुम्हां बुरेपणें ॥३५॥
बाई भ्याली अंतरीं म्हणे हे अबरु घेतील । करुनीयां जुलूम दत्त चिमाआपास देतील । अबरु टिके कशी एतदर्थी बाई हो भारी । चिमाआपाविधानसमयीं खेद अंतरी करी ॥३६॥
द्त्तपुत्र मी न होय बैसले गडोनिया । मर्जी जाली तप्त राहिले आपा अडोनियां । फार फार आग्रह केला परंतु नायके । तरी करील काय तो मिळाले सर्व गायके ॥३७॥
तशांत राघोपंत ठोसरास भाऊ सांगतो । धरा बळें मुलास त्यास भाऊ काय सांगतो । करोनि दत्तविधान बळेंच पावतीस दिधले । वस्त्रें पेशवाईचीं दिलीं न मर्म शोधिलें ॥३८॥
फडक्यास भाऊ बोलतात सर्व जालें चांगलें । आतां अमृतरायजी धरावें पुरे चांगलें । त्याजलाही अर्गळा करावी पाठि लागले । व्यर्थ भाऊ भागलें न सत्क्रियेस लागले ॥३९॥ओव्या॥
मग भाऊशीं फडके बोलतात स्वयें । शिवनेरीस ठेवावें अमृतराय ।
कैद करोनी किल्ल्यास न्यावें । मग आपण निर्भय झालों ॥४०॥
बापुजीपंत जगन्नाथपंत । बापट बळवंतराव काशीसांगात । समागमें फौज आणि हुजरात । जरीपटका सोडोनियां ॥४१॥
कैद केले रावबाजी । दत्त बसविले चिमाआपाजी । आतां धरुं अमृतरायजी । मर्जी ऐशी सर्वांची ॥४२॥
भाऊनीं व परचुर्‍यांनी । पुण्यास आपा नेल्यावर त्यांनीं । थेउरचे मुकामीं वस्तवानीं । जप्त केली रावबाजीची ॥४३॥
इकडे जुनरास फौज येउनी । रावसाहेबास वेढिलें त्यानीं । दरवाजे लावून रावसाहेबांनीं । मग यांनीं शिडया लावल्या ॥४४॥
ज्यानीं ज्यानीं आपा ऐकले । तीतुके ही मागें पुढें गेले । धोंडीबा बाळोबा नानाही गेले । तीच अवस्था भाऊची ॥४५॥
आपासाहेब केले होते दत्त । त्यास देउनियां प्रायश्चित्त । पुनः दत्ताचे केले अदत्त । चिमणाची रघुनाथ पुनः केले ॥४६॥
मग शिंद्यांनीं आणोनी बाजीराव । राज्यसनीं केला गौरव । पुढें माजले जैसे कौरव । कोणास कोणी न मोजिती ॥४७॥
एकमेकांनीं आपआपसांत । एकमेकांचे योजिले घात । मसलत एकही न ठेविली पोक्त । म्हणुनि बैदा जाहला ॥४८॥
शिंद्यानें बांधला मल्हारराव होळकर । बाजीरायें वधिला त्याचा सहोदर । कापटय करुनी शास्त्री गंगाधर । देवद्वारीं मारला ॥४९॥
आपणही जाहले राज्यभ्रष्‍ट । एकही न केला शेवट । धरिली उत्तरपंथेची वाट । ब्रह्मावर्ती बैसेले ॥५०॥
प्रथमोध्यायीं कथा जाणा । शिंद्यानीं मृदु केले नाना । मोडूनिया दत्ताची या कसणा । सेवकपणा राखिला ॥५१॥
भाऊ धोंडिबा बाळोबानें । श्रीमंताशीं एकांत करुन । कीं धरावे बाळाजी जनार्दन । द्वितीयाध्यायीं हेचि कथा ॥५२॥
रायाजी पाटील येऊनी । भाऊस फजीत केलें त्यांनीं । कीं नेले आपालागुनी । तीच कथा तृतीयाध्यायीं ॥५३॥
चवथे अध्यायीं भाऊच्या मता । चिमणा बैसविले दत्ता । त्रिवर्गासही कैसे बहुत । भाऊ बाळोबा देतसे ॥५४॥
पंचमाध्यायीं जाणपां । जबरदस्तीनें चिमणाआपा । यशोदाबाईच्या ओटींत नृपा । अपाभूपातें दीधलें ॥५५॥
ही कथा बाजीरायें । आपुलें हस्ते लिहिली स्वयें । त्या प्रभूच्या लेखाअन्वयें । कविता केली कवीनें ॥५६॥
श्रीमाधवें टाकिली उडी । तेव्हांपासून मोडली घडी । त्या घडीची करुनीयां पुडी । अनंतफंदी निवेदी ॥५७॥
स्वस्तिश्रीमाधवकवन सुंदर । संमत बाजीरघुनाथपत्राधार । कवीचे ठिकाण संगमनेर । पंचमोऽध्याय गोड हा ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP