मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत फंदी|माधवाख्यान| प्रथमोध्याय माधवाख्यान प्रथमोध्याय द्वितीयोध्याय तृतीयोध्याय चतुर्थोध्याय पंचमोऽध्याय षष्ठोध्याय माधवाख्यान - प्रथमोध्याय अनंत फंदीने लावणीइतकाच आख्यान प्रकारही तितक्याच प्रभावीपणे लिहीला. Tags : anant phandimadhavakhyanअनंत फंदीमाधवाख्यान प्रथमोध्याय Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । शके सत्राशेंसत्रामाझारीं । राक्षसनामसंवत्सरीं । श्रीमाधव गेले कैलासपुरीं । राज्यभार सोडोनियां ॥१॥गणपतीच्या रंगमहालावरी । उभे ठाकले क्षणभरी । ते समयीं तो मोंगलारी । काय करिता जाहला ॥२॥धर्मराज्य होतां अखेर । पुढील जाणोनि सर्व भविष्योत्तर । तो श्रीनारायण कुमर । अवतार आपुला संपवी ॥३॥आश्विन शुद्ध द्वादशी । उडी टाकिली ते दिवशीं । श्रीमंत शुद्ध पौर्णिमेशीं । कैलासवासी जाहले ॥४॥एकाएकीं उडी आपुल्या सुखें । टाकिली त्या घाशीरामांतकें । प्रयत्नें ही केलीं बहुतेकें । परंतु असाध्य जाहलीं ॥५॥नानाशीं कळलें वर्तमान । श्रीमाधव पावले मरण । चिंताक्रांत बाळाजी जनार्दन । गोड कांहीं न लागे ॥६॥म्हणें हें काय उलटें जाहलें । आम्हांस कां येथें ठेविलें । अर्थातचि स्वराज्य संपलें । चांगलें न केलें श्रीमाधवें ॥७॥एकचि जाला हलकल्लोळ । नाना पिठीत वक्षस्थळ । जीवजंतु समस्त पक्षीकुळ । शोकार्णवीं पडियलें ॥८॥प्रजा लोकपाळ जितुके । शोकार्णवीं पाडील तितुके । श्रीमाधवें केलें इतुकें । पुढें दुःख कितुकें कळेना ॥९॥असो यापरी दुःख झालें जना । रुद्रभूमीस नेलें माधव नारायणा । सवें बरोबर मुख्य नाना । दहन करविलें रायाचें ॥१०॥शहराचा करोनि बंदोबस्त । लोकपाळ घरा गेले समस्त । नाना आपुलें सदनीं स्वस्थ । चिंताक्रांत बैसले ॥११॥म्हणें आतां कैसा करावा विचार । बोलावुनि शिंदे होळकर । अष्ट उमरावही समग्र । बोलाविले नानांनीं ॥१२॥आतां दत्तक घ्यावा म्हणे नाना । हें योग्य मानवलें समस्तजना । परंतु शिंद्याच्या नये मना । नानाशीं बोलतां जाहला ॥१३॥नानाशीं म्हणे दवलतराव शूर । धनी असतां उभयतां वीर । एकापरीस एक धुरंधर । मग दत्तक तो कासया ॥१४॥अदुग्ध नसतां मुलाची माय । मग दुधाचें कारण काय । जरी नसते आपा बाजीराय । मग दत्तक घेणेंचि प्राप्त ॥१५॥पदरीं असतां लाखों धन । मग कासया व्याजीं ऋण । टाकुनियां गंगाजीवन । कूपोदक तें कासया ॥१६॥सागवानी मोडूनि घर । उभे करावे येरंड शेर । जिवंत असतां लग्नवर । मग कां करावा पाटाचा ॥१७॥टाकुनियां धुवासाकर । गुळ कां व्हावा प्रियकर । पोळी असतां भाकर । कदन्नें कां भक्षावीं ॥१८॥हातें वस्त्र फाडोनि आपुलें । तुणवीत असावें देऊनि मोलें । क्षुधेनें पीडिलीं घरचीं मुलें । इतरां सांगे भोजना ॥१९॥मिळत असतां दुग्ध मांडे । मग कां खावे खोंडेक्रोंडे । बोलतां येत असतां तोंडें । मग मुक्यानें कां खुणवावें ॥२०॥लोणकढें सांडोनि वायां । मग वासाचें तें कासया । घरचा दीप विझंवुनियां । परगृहीं अग्नि कां मागावा ॥२१॥नवें वस्त्र असोनि नेटकें । दाटोनि कां नेसावें फाटकें । घरचीं असोनि भारतीं कटकें । मग मर्कटकें कां ठेवावीं ॥२२॥घरीं सुवर्ण असतां विपुल । मग कासया ल्यावें पितळ । असोनि वाळ्याचा पंखा शीतळ । मग रुमाल कां वारावा ॥२३॥टाकोनियां उत्तम चंदन । मग कां धुंडावें बाभुळवन । हिरा टाकोनियां दैदीप्यमान । मग कां गारा वेचाव्या ॥२४॥असतां अयसीं धोरणें । मग दंत तो कासया कोरणें । पळी असतां खोरणें । कासयाला पाहिजे ॥२५॥असो यापरी शिंद्यानें । केलें नानाशीं बोलणें । या वंशावांचूनि म्हणे । इतरास मुजरा हें ना घडे ॥२६॥ऐसा ठेवतांचि दस्त । मग नाना जाहले चिंताग्रस्त । जबरी पाहोनि टेंकले हस्त । केवढें प्रस्थ नानाचें ॥२७॥ऐशी लावूनिया निकट । शिंद्याचें सामर्थ्य पाहूनियां बिकट । नाना निस्तेज होऊनि फिकट । चिंताज्वरें व्यापिला ॥२८॥मग मनीं विचार करी नाना । जर दत्तकाची करावी योजना । तर शिंदा आमुच्या शहाणपणा । चालों नेदी सर्वथा ॥२९॥फौजही शिंद्याची महाबळ । चाळीस पलटणें पायदळ । राज्यांत होईल गोंधळ । शिंद्यापुढें बळ चालेना ॥३०॥तशांत जुन्नरास शिंद्याचीं पलटणें । दो चौ रोजा जाणार त्वरेनें । आणावया त्रिवर्गाकारणें । हें गुह्य समजलें नानाला ॥३१॥कीं शिंदा घेऊन येणार तिघांतें । मग संकट पडेल मातें । मग नानानीं परशुरामभाऊतें । मिरजकरातें बोलाविलें ॥३२॥कीं शिंद्याचीं पलटणें न पोंचतां । तुम्हीं जुन्नरास जावें आतां । घेऊनि यावें राघवसुतां । अमृतराय तेथेंचि ठेवावा ॥३३॥नानाची आज्ञा घेऊन । दिवसां दोनप्रहरीं पटवर्धन । करिते जाहले प्रयाण । माघ शुद्ध षष्ठीस सुमुहूर्तें ॥३४॥त्वरित भाऊ गेले जुन्नरातें । रथसप्तमींत पोंचले तेथें । अष्टमीस भेटोनियां त्रिवर्गातें । एकांतस्थानीं बैसले ॥३५॥परशुरामभाऊ जोडोनि कर । अमृतरायजीच्या समोर । विनंती करीत वारंवार । रावसाहेबाशीं आयका ते ॥३६॥कीं पुण्यास हीं दोन्हीं मुलें । नानांनीं सत्वर बोलाविलें । मग अमृतरायें उत्तर केलें । परशुरामभाऊशीं तेधवां ॥३७॥जैसें मला ठेवितां येथें । या दोघांस घेऊनि जातां तेथें । फूट पाडूं नका उभयांतें । दोघे एकत्र ठेवावे ॥३८॥मी जरी म्हणतों नका नेऊं । तरी तुम्ही बळें न्यावयास आलांत भाऊ । थोर नयातीत वृद्ध बहू । तुम्हाशीं मी काय सांगावें ॥३९॥नानाचे व तुमचे ओटींत मुलें । घालितों मी तुमच्या बोलें । आजपावेतों सांभाळिलें । आतां तुम्ही सांभाळा ॥४०॥मीं केले रजाचे गज । आतां सोडोनि जाताति मज । डोळां अश्रु आले सहज । साहेबांच्या तेधवां ॥४१॥मग भाऊ म्हणे मुलांची चिंता । तुम्ही न करावी सर्वथा । मी सेवक जिवंत असतां । मुलांस धक्का लागों न दे ॥४२॥उभयतांस मी वाजतें वारें । लागों न दे या राघवकुमारें । ऐशीं ऐकोनि भाऊचीं मृदूत्तरें । अमृतरायजी संतोषले ॥४३॥अमृतरायें उभयतां लागुनि । विडे दिधले तेच क्षणीं । आपुल्या हस्तें गुलाबपाणी । अमृतरायें शिंपिलें ॥४४॥विडे घालुनि मुखामाजीं । सजवोनि उभे केले वाजी । जातेसमयीं आपा व बाजी । निरोपास आले बंधूकडे ॥४५॥मग दोघे बंधू धरिले पोटीं । आतां तुमच्या आमच्या भेटी । तो घडवील तेव्हां जगजेठी । तेव्हांच खेटी होतील ॥४६॥पायांवरी ठेविली डोयी । आपा बाजी उभयतांही । दादासाहेब आनंदीबाई । त्यांचे ठायीं तुम्ही आहां ॥४७॥तूर्त काळीं आपुल्यावर । कोपला असे जगदीश्वर । परस्परें गहिवर । एकमेकांस समजाविती ॥४८॥तेरा वरुषें एकत्र । दादा साहेबाचे पुत्र । हे ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र । एकेठायीं होतों तिघे ॥४९॥आतां पडों पाहे अंतर । मला येथें ठेवितां दूर । असो होईल जयजयकार । जा अशीर्वाद दीधला ॥५०॥अमृतराय अमृतोत्तरें । समजाविलीं राघवकुमरें । निघतां जैसें रघुविरें । दशरथातें त्यागिलें ॥५१॥गोकुळीं टाकुनि तातमात । मथुरेसी गेला सिंधुजामात । मागें यशोदा आक्रंदत । तैसेंच येथें जाहलें हो ॥५२॥अथवा लहू घालुनि रथीं । घेउनी गेलासे शत्रुघ्ननृपति । गडबडां लोळे सीता सती । वाल्मीकाचे आश्रमीं ॥५३॥असो वाढेल कथा फार । उभयतां जाहले अश्वस्वार । परशुरामभाऊ बरोबर । घेउनी आले दोघांतें ॥५४॥खडकी पुलाजवळिकें । आणिलीं सुमुहूर्त पाहुनि निकें । नानांसीं भाऊ सांगतां मुखें । हर्ष न माये अंतरीं ॥५५॥ही कथा बाजीराव रघुनाथें । लिहोनि दिधली आपुल्या हातें । त्या पत्राबरहुकूम टीका येथें । कवित्व केलें कवीनें ॥५६॥याचा मागील कैसा दोरा । हें माहीत राघवकिशोरा । सारी सर्वत्रां लहान थोरां । आनंदफंदी ठाउका ॥५७॥स्वस्ति श्रीमाधवकवन सुंदर । संमत बाजीरघुनाथपत्राधार । त्या पत्रावरोनि हा विस्तार । प्रथमोध्याय गोड हा ॥५८॥ N/A References : N/A Last Updated : December 24, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP