माधवाख्यान - चतुर्थोध्याय
अनंत फंदीने लावणीइतकाच आख्यान प्रकारही तितक्याच प्रभावीपणे लिहीला.
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीमाधव महापुण्यश्लोकी । ऐसा प्रभु नसे या लोकीं । तो प्रभूच गेला शिवलोकीं । म्हणोनी बैदा जालासे ॥१॥
ते जरी असते स्वस्तिक्षेम । मग वैद्याचें काय काम । कासया होती धामधूम । वायकरणी बैदा हा ॥२॥
असो कथा संपली तृतीयाध्यायीं । भाऊंनीं क्रियाशपथा समस्तही । तितुक्या केल्या जलप्रवाहीं । शेवटीं पडले बदलोनियां ॥३॥
भाऊस मनीं दुःख न वाटलें । आपास एकांतीं घरीं गांठलें । मग त्या समयीं रायाजीपाटलें । निषेध केला भाऊला ॥४॥
म्हणे तुम्हीं फक्त शिपाई तारा । बाहेरील शत्रु सर करा । पण आपास नेणें दूर करा । घरपुरुष फोडों नये ॥५॥
बाजीराव धनी येथें तरंगले । आपास नेतां हें नव्हे चांगलें । फडके जरी येउनी तुम्हांस मिळाले ।
तरी लोक पळाले । नाहींत हुजरातीचे ॥६॥
धन्यास टाकूनि तुम्हाकडे । समस्त होतील हें नाघडे । परंतु तुमचे प्राण रोकडे । मज वाटे जातील ॥७॥
पाठीसी धनी समर्थ असतां । मग तुम्हास कासया चिंता । असें उत्तर भाऊंनीं ऐकतां । तप्त जाहला अंतरीं ॥८॥
भाऊ म्हणे आम्हा अवश्यमेव करणें । आधीं आपासाहेबांस धरणें । रायाजीपाटील म्हणे हें बोलणें । अमार्गाचें दिसतें ॥९॥
घात जरी धन्याचा जाहला । धका लागल्यास दोन्ही मुलां । मग जिवंत कोण राहूं देणार तुम्हाला । मृत्यु मोलें घेतसां ॥१०॥
मग भाऊ म्हणे कशास ह्या दहशती । धनी जरी मारले गेलेती । तरी फार चांगलें म्हणती । हें रायाजीनें ऐकिलें ॥११॥म्हणे तुम्ही धन्याच्या बर्यावरी । पहिल्यापासूनि आहांत इतबारी । पूर्वकर्में भाऊचीं त्या अवसरीं । रायाजी पाटलें सांगितलीं ॥१२॥
गोपाळराव पटवर्धन । मोंगलास मिळाले जाऊन । तेव्हां त्याणीं जाळिलें पुणें । तुम्ही त्याचे वंशाचे ॥१३॥
वडिलांच्या चालीप्रमाणें । माऊ तुम्हीं न चालणें । मी मागतों इतुकें देणें । आपास नेणें ठीक नाहीं ॥१४॥
ऐकूनियां भाऊनीं त्याच घडी । धोंडीबास सांगितलें तांतडी । रायाजीनें कपाळा घातली आढी । आपासाहेबांस नेऊं नका ॥१५॥
मग धोंडिबा म्हणे युक्ती ऐका माझी । लष्कराबाहेरी काढावें रायबाजी । कळेल तसें मग चिमाआपाजी ।
स्वस्थपणें उचलावें ॥१६॥
ऐशी करोनि तेव्हां मसलत । धोंडीबाचा भाऊ राहुटींते । बाजीरायाकडे आले बकध्यानस्त ।
म्हणतों स्वामी आज्ञा मान्य आम्हा ॥१७॥
मग भाऊ सांगे धोंडिबास । कांहीं अर्जी करोनि श्रीमंतास । कीं आम्हा नाहीं खर्चायास । दवलतरायें पाठविलें ॥१८॥
मग बाजीराव म्हणे धोंडिबादादा । उतवळा होऊं न द्या शिंदा । दहा लक्ष रुपये तुम्हांस एकदां । आठा चौं रोजा मी देतों ॥१९॥
धोंडिबा गेले आज्ञा घेऊन । इकडे परशुरामभाऊन । मंडळी फितुरी मेळवून । प्रभूस बोलता जाहला ॥२०॥
परशुरामभाऊ बोले उत्तर । कीं नानाकरितां रोज किरकीर । स्वामीनीं एकांतावर । गोष्ट आणोन ठेवावी ॥२१॥
आज शिंद्याचे लष्करांत । आधीं स्वामींनीं जावें त्वरित । मग बोलताती श्रीमंत । रात्र होईल उदईक जाऊं ॥२२॥मग भाऊ म्हणे म्यां धोंडींबाशीं । वचन दिधलें निश्चयेशीं । आपण आजची या समयाशीं । तेथें गेलें पाहिजे ॥२३॥
मग बाजीरायें उत्तम ह्मणोन । स्वारी सिद्ध करविली जाण । मग भाऊ ह्मणे मागुतींन । सायंकाळीं आपा नेऊं नका ॥२४॥
तुम्हीच शिंद्याकडे जावें । आपास येथेंच राहूं द्यावें । मी जवळ असतां स्वयें । मग भय तें कासयाचें ॥२५॥
मग बाजीराव ह्मणे भाऊतें । आपा जरी न राहतील येथें । तरीं मी बळेंच रहावीन त्यांते । तुम्ही आहांत ह्मणोनियां ॥२६॥
अमृतरायाचे जागीं तुम्ही । ऐसे चित्तांत लेखितों आम्ही । मग चिमण्याचें भय तरी मी । कशास्तव बाळगूं ॥२७॥
तेव्हां निळकंठपरभु येऊनी । श्रीमंतास सांगितलें कानीं । कीं आज तुम्हीं येकल्यानीं । शिंद्याकडे जाऊं नये ॥२८॥
जरी आतांच जाणें सत्वर । तरी आपास न्यावें बरोबर । परंतु नायके सत्वधीर । भाऊ येथें आहेत म्हणे ॥२९॥
मग रायें सिद्ध करुनी स्वारी । आले डेरीयाचे बाहेरी । चिमणाआपाते परोपरी । रावबाजी शिकवितसे ॥३०॥
लष्करांत शिंद्याचे मी जातों । तुला भाऊपाशीं ठेवितों । माघारी इतक्यांत येतों । त्वां असावें येथेंची ॥३१॥
नानाचें व शिंद्याचें हाडवैर । द्वेषाद्वेष वाढला फार । म्हणोनी भाऊ मला लवकर । शिंद्याकडे पाठवितो ॥३२॥
मग आपासाहेब बोलतसे । म्हणे हें तो मला विपरीत भासे । जुन्नरापासून मी आपुल्यापासे । रावसाहेबापाशीं फूट पाडून ॥३३॥
दादासाहेब मेल्यावरी । होते आनंदीबाईचे उदरीं । तीही वारली गंगातिरीं । तुमचे पदरांत घालोनियां ॥३४॥
दादासाहेब आनंदीबाई । तुम्ही मला त्यांचे ठायीं । टाकोनियां जातां मज या समयीं । घात करीन प्राणाचा ॥३५॥
मिठी घालोनि गळ्यामाजीं । मांडीवर आपुल्या रावबाजी । बैसवूनी चिमा आपाजी । श्रमी उभयतां होता ती ॥३६॥
उभयतांचे वाहती अश्रुपात । प्रळय जाहला अत्यद्भुत । तुज टाकोन जातों येथ । पण वचनीं गुंतलों भाऊच्या ॥३७॥
कीं अपास येथें ठेवोनियां । मी जाईन शिंद्यास भेटावया । ऐसें आपाशीं बोलूनियां । रावबाजी उठले ॥३८॥
जे दिवशीं भेटसी चिमण्या मला । ते दिवशीं आजची बंधु झाला । ऐसें बोलोनियां कुच केला । गेले शिंद्याच्या लष्करांत ॥३९॥
मग बाळोबा पागनिसास हर्ष झाला । म्हणे सुघटका लाधली भाऊला । तोफा तीन सुटल्या कळवावयाला ।
परशुरामभाऊला संज्ञा ॥४०॥
ऐकोनि संज्ञा भाऊनीं । पचंग बांधिला ह्मातारपणीं । फडक्याकडे आले धांवोनी । ह्मणे कार्यसिद्धी जाहली ॥४१॥मग मंडळी जमा करोनि समस्त । आले खाशांच्या डेरियांत । मग बाबा फडके बोलतात । चिमाआपासी तेधवां ॥४२॥
शिंद्याचे लष्करांत गेले बाजी रघुनाथ । त्यांना विलंब जाहला बहुत । आपास घेऊनि या म्हणतात ।
तुम्हांस बोलविलें चलावें ॥४३॥
फडक्यास म्हणे चिमाआपाजी । जातेसमयीं रावबाजी । मला सांगोन गेले कीं त्याकाजी । बाजीची आज्ञा मान्य मला ॥४४॥
बाळाजीपंत पटवर्धन । मी धाडीन तुला बोलावून । इतरांच्या ह्मटल्या न येणें । मग आग्रह कां तुमचा ॥४५॥
बाळाजीपंतास घेऊनि या । मग मी तुम्हासवें चालतों जाऊनियां । परशुरामभाऊ म्हणे विचार करुनियां ।
जबरदस्तीनें आपा न्यावे ॥४६॥
नंतर आपा गेले भोजनाला । मग मंडळी इतर लोक जमावयाला । क्षण एक आपानीं आराम केला ।
बिचोब्यांत भाऊनीं गांठिलें ॥४७॥
आपास भाऊ जोडोनि हात । चला महाराज अर्जी करीत । तेव्हां आपा ह्मणे बाळाजीपंत । पटवर्धना घेउनिया ॥४८॥
भाऊ म्हणे अबरु कशास्तव तुला । व्यर्थ कां गमाविशी नुमजे तुला । मर्यादा टाकोनी बोलता झाला । अमर्यादा बहु केली ॥४९॥
आपास गहिंवरुन दाटे । काय करील अभाळ फाटे । डेर्यांत शिपाई अविंध मराठे । आपा सभोंती बैसले ॥५०॥
तेव्हां आपा विचोब्यांतरी । स्वस्थ बैसले तल्पकावरी । मग हरि विष्णूस भाऊ म्हणे ते अतसरी ।
मूल चालावयासी अमानीतो ॥५१॥
तेव्हां आपास भाऊ कैसा भासला देख । जणो सीता हरावया आला दशमुख । असो आपानीं पाहुनी गलबला अधीक । गोविंदराव पिंगळा किजबिजला ॥५२॥
चवथे अध्यायीं कथा सुरस । बोलावतील यशोदाबाईस । परशुराम भाऊ आपासाहेबास । चिमणाजी माधव करतील ॥५३॥
ही कथा राघवात्मजें । लिहिली आपुल्या स्वकरांबुजें । लेखाबरहुकुम काय जें । कवित्व केलें फंदीनें ॥५४॥
स्वस्ति श्रीमाधवकवन सुंदर । संमत बाजीरघुनाथपत्राधार । पदरचें यांत नसे अणुमात्र । चतुर्थोध्याय गोड हा ॥५५॥
N/A
References : N/A
Last Updated : December 24, 2007
TOP