नरदेहामधिं येऊन नर हो साधन ऐसें करा जेणें भवसगर तरुनि सुखें व्हावें पैलतिरा ॥ध्रु०॥
संतारार्णवीं भिजा गडयांनो संसारार्णवीं भिजा । परंतु परमार्थ साधनातें साधा यांतच मजा ।
परनारीधन त्यजा गडयांनो परनारी० ।
मदमत्सर मीपणा सहित द्या तमोगुणाला रजा । भाव न ठेवुनि दुजा । गडयांनो० ॥
अकपट होऊनि थोर लहाना समदृष्टीनें पूजा । अन्यायपथें न जा ॥ गडयांनो० ॥
सदसद्विचार करुनी लोकीं सत्कीर्तींनें सजा । कोणा नच द्या इजा ॥ गडयांनो० ॥
परि आश्रय दुःखितांस द्याया तन मन धनें झिजा । संकटसमयीं धजा ॥ गडयांनो० ॥
सत्यवचन राखण्यास न ढळा कथितो ह्या हितगुजा । व्हा सावध नचि निजा ॥ गडयांनो० ॥
पळ घटका प्रहर दिवस, यांहीं होतें आयुष्य होतें वजा । जगदिशाला भजा ॥ गडयांनो० ॥
अनंतफंदी म्हणे तोचि मग तारिल देऊनी करा ॥१॥नरदेहामधि० ॥