देसोडुन तरी फंद वाऊगे-विषयाची तरी काय मजा । हरिनामाची लाव ध्वजा ।
पंढरीस कार्तिकी आषाढी दुवक्ता-येत जातजा । असार हा संसार त्यजा ।
तमोगुणाते द्यावी रजा । रजसत्वाची करी पुजा । क्षमाशांती मनीं धरीतजा ।
भगवीं वस्त्रें करुनि पोटभर भिक्षा मागे घर घर घर । येऊंदे वाचे अष्टौप्रहर कीं हर हर हर ॥१॥
वाहते गंगेंत हात धु आलबेली भली भलाई कर मग मर । ईश्वर भजनीं निमग्न राहावे विषयांतरीं वासना नको ।
नामामृत महामुर पिको । सहाणेवर मैलागिरी चंदन देह झिजो यमयातना चुको न चुको । भवपाशाशी मुको न मुको ।
सांगितले हे शिको न शिको । भजनाकडे झुको न झुको । धन ज्याला मृत्तिका तोची साधु, यम कापे थर थर थर ॥२॥
सोदे शिकविती चढी लावितील त्यांच्या नादी न लागावें । ईश्वरभजनीं जागावें ।
कामक्रोध मद मत्सर मोहो लाभ या साजणांशीं सांगावें कीं तुम्ही मार्गीं वागावें ।
असार तितके नागावे । सार असेल तें घ्यावें । जाणे मोक्षपदाशीं झर झर झर ॥३॥
भाव धरुनि मनीं हरीहर । म्हणशील तरी चुकेल चौर्यांशीचें चकर । ईश्वरपाई हा नीटकर ।
नरदेह धुतला पवित्र शेला उडून जाईल जसा सकर । दुसरा धंदा काहीं नकर । धर बळकट देवाचें शिखर ।
त्यामध्यें राहील तुझा वकर । अनंतफंदी म्हणे घाल विठ्ठलाशी घिरटया गर गर गर ॥४॥