झांशीवाली
भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात
रे हिंदबांधवा, थांब या स्थळीं अश्रु दोन ढाळीं,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली. ध्रु०
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणुं जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ! १
घोड्यावर खंद्या स्वार,
हातांत नंगि तर्वार,
खणखणा करित ती वार
गोर्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली. २
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुचीं लश्करें थिजलीं,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमिच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ! ३
मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळितिल नीर,
ह्या दगडां फुटतिल जिभा कथाया कथा सकळ काळीं ! ४
N/A
कवी - भा. रा. तांबे
जाति - महाकाली
स्थळ - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२९
Last Updated : October 11, 2012

TOP