एकदा काही पाखरे एका घुबडाला म्हणाली, 'तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस ? त्यापेक्षा हिरव्यागार झाडांवर बांधलंस तर किती चांगलं होईल !'
त्यावर घुबड म्हणाले, 'अरे वेड्यांनो, पक्षी धरण्याकरता झाडांवर चिकटा लावतात. तेव्हा अशा झाडावर राहाण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित जागी राहाणं हे अधिक योग्य नाही का ? आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी, पण इथे भीती नाही.'
पण त्या घुबडाचे म्हणणे त्या पाखरांना रुचले नाही. ती बाहेर एका झाडावर उड्या मारत राहिली. थोड्या दिवसांनी एका पारध्याने तेथील झाडावर जागोजागी चिकटा लावला. त्यात ती पाखरे सापडली. पारध्याने त्यांना धरले तेव्हा त्यांना घुबडाच्या उपदेशाची आठवण झाली. आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.
तात्पर्य - बैल गेला आणि झोपा केला !