दोन मांजरांनी एकदा खवा चोरून आणला पण त्याचे वाटे करण्यासाठी त्यांच्यात भांडणे सुरू झाली. तेव्हा आपणास सारखे वाटे करून द्यावे अशी त्यांनी एका वानरास विनंती केली. वानराने ती विनंती मान्य केली व त्या खव्याचे दोन भाग करून ते तराजूच्या दोन्ही पारड्यात घातले. त्यापैकी एक भाग मोठा असल्यामुळे त्या बाजूचे पारडे खाली झाले. तेव्हा त्यातील बराच खवा तोंडात टाकून त्या वानराने तराजू पुन्हा उचलला, तो दुसरे पारडे खाली बसले. त्यातील आणखी बराच खवा तो घेत आहे इतक्यात ती मांजरे म्हणाली, 'वानर दादा, आमची समजूत झाली, राहिलेला खवा आमचा आम्हाला द्या.' वानर म्हणाला, 'मूर्खांनो, तुमची समजूत झाली असेल पण न्यायदेवतेची समजूत झाली पाहिजे ना ? तुमचा खटला फार भानगडीचा असल्यामुळे तो इतक्या लवकर संपणार नाही.' असे म्हणून दर वेळी तराजू उचलावा व प्रत्येक वेळी त्यातला खवा खावा असे त्याने चालवले होते. खवा अगदी थोडा राहिला असे पाहून ती मांजरे अगदी काकुळतीला येऊन त्या वानराला म्हणाली, 'वानर दादा, आता राहिला आहे तेवढा खवा तरी आम्हाला द्या.' वानर हसत म्हणाले, 'मित्रांनो, माझ्या मेहनतीबद्दल मला काही बक्षीस नको का ?' आणि उरलेला खवा त्याने चटकन तोंडात टाकला.
तात्पर्य - थोडेसे नुकसान सहन करून आपल्या भांडणाचा निकाल आपापसात करणे चांगले.