अमृतानुभव - प्रकरण सहावे बापु उपेगी...

अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्‌विलासानंद असेही नाव आहे.

प्रकरण सहावे

बापु उपेगी वस्तु शब्दु । जिया धरा सधर नादु ।

अमूर्ताचा विशदु । आरिसा नव्हे ॥१॥

जेणें गोचर झाला नाद असा शब्द फार उपयोगी ।

स्पष्टचि अरसा झाला आत्मा बघण्या अमूर्त निःसंगी ॥१॥

पाहातें आरिसां पाहे । तेथें कांहींचि निवल नव्हे ।

परी दर्पणें येणें होये । न पाहातें पाहाणें ॥२॥

पाहे प्रसिद्ध दर्पणिं पहणारा यांत नच नवल कांहीं ।

या दर्पणीं परंतु पाहं शके जो न देखणा तोही ॥२॥

वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योतकारु सूर्य जैसा ।

येणें एकें गुणें आकाशा । अंबरत्व ॥३॥

जो अव्यक्त पितामह तद्वंशा उन्नतीस जो आणी ।

सूर्यापरि कुलदीपक जेणें आकाश म्हणवि शब्दगुणी ॥३॥

आपण तंव खपुष्प । परी फळ दे जगद्रूप ।

शब्द मवीं तैं अमूप । कोण आहे ॥४॥

आपण खपुष्प असुनी देई हा शब्द फळ जगद्रूप ।

कवण असे या जगतीं वस्तू जीचें न शब्द करि माप ॥४॥

विधिनिषेधांचिया वाटा । दाविता हाचि दिवटा ।

बंधमोक्ष कळिकाटा । शिष्टु हाचि ॥५॥

मार्गां निषेधविधिरुप दाखविता हाचि एक कंदील ।

या बंधमोक्षकलहा मिटवाया शिष्ट पदवि शोभेल ॥५॥

हा अविद्येचा अंगीं पडे । तैं नाथिलें ऐसें रूढे ।

न लाहिजे तीन कवडे । साच वस्तु ॥६॥

धरि पक्ष अविद्येचा सत्य करी तैं जगासि जे मिथ्या ।

लाभे न तीन कवड्या इतुकेंही तें महत्व चितिसत्या ॥६॥

शुद्ध शिवाच्या शरीरीं । कुमारुचि हा जीउ भरी ।

जेवीं अंगें पंचाक्षरी । तेवींचि बोलु ॥७॥

शुद्ध शिवाच्या देहीं भूतापरि शब्द जीवभाव भरी ।

भूतप्रवेश जैसा पंचाक्षरि तो मनुष्यदेहिं करी ॥७॥

जीउ देहें बांधला । तो बोलें एकें सुटला ।

आत्मा बोलें भेटला । आपणयां ॥८॥

बद्ध शरीरें झाला जीव करी मुक्त त्यासि हा शब्द ।

शब्देंचि आपणाला आत्मा भेटे असें वदे वेद ॥८॥

दिवसातें चेववों गेला । तंव रात्रीचा द्रोहो आला ।

म्हणोनि सूर्यो या बोला । उपमा नव्हेचि ॥९॥

दिवस कराया जातो सविता तैं लोप होय रात्रीचा ।

म्हणुनी या शब्दाला दृष्टांत न योग्य होय सूर्याचा ॥९॥

जे प्रवृत्ति आणि निवृत्ति । विरुद्धा इया हातु धरिती ।

मग शब्देंचि चालती । एकलेनि ॥१०॥

कारण ज्यांच्या ठांई नांदतसे स्पष्ट नित्यचि विरोध ।

चालवि अविरोधें त्या प्रवृत्ति आणी निवृत्ति हा शब्द ॥१०॥

साहाय्य आत्मविद्येचें । करावया आपण वेंचे ।

गोमटें काय शब्दाचें । एकैक वाणूं ॥११॥

प्राणत्याग करी हा आत्मज्ञानीं सहाय करण्याला ।

ऐसे अनेक सद्गुण शब्दाचे केंवि वर्णु मी त्याला ॥११॥

किंबहुना शब्दु । स्मरणदानीं प्रसिद्धु ।

परि ययाही संबंधु । नाहीं येथें ॥१२॥

किंबहुना शब्दाची स्मृतिदानीं बहुत होय विख्याती ।

आत्म्यापुढें तथापी याची कुंठीत होय तीव्र गती ॥१२॥

आत्मया बोलाचें । कांहींचि उपयोगा न वचे ।

स्वसंवेद्या कोणाचें । ओझें आथी ॥१३॥

आत्मस्वरूपाच्या हा शब्द न येई मुळींच उपयोगा ।

वेद्य स्वतां असे जो कवणाचा तो अभारि हो सांगा ॥१३॥

आठवे कां विसरे । विषो हो‍ऊनि अवतरे ।

तरी वस्तूसी वस्तु दुसरें । असेना कीं ॥१४॥

आठव किंवा विस्मृति होण्याला वस्तु ती विषय व्हावी ।

जेथें द्वैतचि नाहीं त्या आत्म्या विषयता कसी यावी ॥१४॥

आपण आपणातें । आठवी विसरे के‍उतें ।

काय जीभ जिभेतें । चाखे न चाखे ॥१५॥

आपण अपणा विसरे किंवा अपणासि आठवें केंवी ।

जीभ जिभेनें कैसी चाखावी वा कसी न चाखावी ॥१५॥

जागतेया नीद नाहीं । मा जागणें घडे काई ।

स्मरणास्मरणें दोन्हींही । स्वरूपीं तैसीं ॥१६॥

निद्रा जागरिं नाहीं जागरही त्या दशेस कवण म्हणे ।

त्यापरि विसरचि नाहीं स्वरुपीं मग कायसी स्मृती होणें ॥१६॥

सूर्यो रात्री पां नेणे । मा दिवो काय जाणे ।

तेवीं स्मरणास्मरणें । वीण आपण वस्तु ॥१७॥

ठाउक नाहीं रविला रात्रचि मग तो कसा दिवस जाणे ।

तेंवी आठव विसरा वस्तू ती स्वप्रकाश आत्मपणें ॥१७॥

एवं स्मरणास्मरण नाहीं । तरी स्मारकें काय कायी ।

म्हणोनि इये ठायीं । बोलु न सरे ॥१८॥

एवं स्मरणास्मरण न जेथ स्मारक तिथें करिल काय ।

जे स्वप्रकाश वस्तू शब्दाचा तेथ होय निरुपाय ॥१८॥

आणीक एक शब्दें । काज कीरु भलें साधे ।

परी धिंवसा न बंधे । विचारु येथ ॥१९॥

शब्दाचा एक इथें होइल उपयोग ये असी शंका ।

परि नीट विचारांतीं योग्य म्हणाया न होय आवांका ॥१९॥

कां जें बोलें अविद्या नासे । मग आत्मेनि आत्मा भासे ।

हें म्हणतखेंवो पिसें । आलेंचि कीं ॥२०॥

शंका हीच अविद्या नष्ट करी शब्द वस्तु मग भासे ।

वस्तूनेंचि असें जो बोले त्या लागलेंचि खास पिसें ॥२०॥

सूर्यो रात्री पा मारील । मां आपणया उदो करील ।

हे कुडे न सरती बोल । साचाच्या गांवीं ॥२१॥

रात्री ते घालवुनी करितो मग आपुला उदय सूर्य ।

ऐकुनियां जल्पातें हसतिल ते तत्त्वदर्शि जे आर्य ॥२१॥

चेइलें निदे रुसे । ऐसी कें नीद असे ।

कीं चेइलें चेवों बैसे । ऐसे चेवणें आहे ॥२२॥

जागृत पुरुष जिच्यावरि रूसला ऐसी कुठें असे नीज ।

किंवा जागृति नाहीं जागविण्याची पडे जिला गरज ॥२२॥

म्हणोनि नाशापुरती । अविद्या नाहीं निरुती ।

नाहीं आत्मा आत्मस्थिती । रिगे ऐसा ॥२३॥

म्हणुनी नाहिं अविद्या मुळींच नाशावयासि योग्य अशी ।

आत्माहि तसा नाहीं जाणूं इच्छील जो स्वरूपासी ॥२३॥

अविद्या तंव स्वरूपें । वांझेचें कीरु जाउपें ।

मा तर्काचें खुरपें । खांडे कोणा ॥२४॥

होय अविद्या केवल वंध्येची कन्यका स्वरूपानें ।

तिज नाशाया होई शब्द कसा शक्त तर्कखङ्गानें ॥२४॥

इंद्रधनुष्या सितें । कवण धनवयीन घालिजेतें ।

तें दिसे तैसें होतें । साच जरी ॥२५॥

दिसतें तसेंचि असतें सत्य जरी हें धनुष्य इंद्राचें ।

कोण धनुर्धर न करी सज्ज तया बाण लाउनी साचें ॥२५॥

अगस्तीचिया कौतुका । पुरती जरी मृगतृष्णिका ।

तरी मार देतो तर्का । अविद्येसी ॥२६॥

असतें अगस्तितृष्णा भागविण्या जरि समर्थ मृगतोय ।

तरि तर्क अविद्येला मारायाला समर्थ तो होय ॥२६॥

साहे बोलाची वळघी । ऐसी अविद्या असे जगीं ।

तरी जाळूं ना कां आगीं । गंधर्वनगरें ॥२७॥

ही नाथिली अविद्या शब्दें उपपादनासि योग्य जरी ।

तरि गंधर्वपुरेंही अग्नी जाळूनि कां न भस्म करी ॥२७॥

नातरी दीपाची सोये । अंधारे कीर न साहे ।

तेथें कांहीं आहे । जावयाजोगें ॥२८॥

तेजापुढें दिव्याच्या नाहीं तमाला टिकावया ठाव ।

मग काय निवारावें दीपें जेथें मुळीं तमोऽभाव ॥२८॥

नातरी पाहावया दिवसु । वातीचा कीजे सोसु ।

तेव्हढाही उद्वसु । उद्यमु पडे ॥२९॥

अथवा पाहायाला दिवस जरी वातिचा खटाटोप ।

कोणीं केला तरि तो व्यर्थचि त्याचा असे उपद्वयाप ॥२९॥

जेथें साउली न पडे । तेथें नाहीं जेणें पाडें ।

मा पडे तेथें तेव्हडें । नाहींचि कीं ॥३०॥

जेथें छाया नाहीं पडली तेथें नसे तिचा भाव ।

पण जेथ पडे नच ती भासे केवल जरी तिचें नांव ॥३०॥

दिसतचि स्वप्न लटिकें । हें जागरीं होय ठाउकें ।

तेंवी अविद्याकाळीं सतुकें । अविद्या नाहीं ॥३१॥

दिसतेंवेळिंच लटिकें स्वप्न तसें जागरीं जरी ज्ञान ।

तेविंच खोटी ऐसें कळण्यापूर्वींहि खरी अविद्या न ॥३१॥

वोडंबरीचिया लेणिया । घरभरी आतुडलिया ।

नागवें नागविलिया । विशेष कायी ॥३२॥

दागीने जरि भरले विपुल घरीं इंद्रजाळिचे जेणें ।

कवडिहि हातिं न येई नग्ना लुटितांहि काय त्या मिळणें ॥३२॥

मनोरथाचें परिमळ । आरोगिजतु कां लक्ष वेळ ।

परि उपावासावेगळ । आनु आथी ॥३३॥

मनिंचे मांडे खासे ताजे जरि लक्ष वेळ भक्षियले ।

उपवासचि हा केवळ पोट जसेंचि तसें रितें उरलें ॥३३॥

मृगजळ जेथें नुमंडे । तेथें असे पां कोरडें ।

मा उमंडे तेथे जोडे । वोल्हांशु कायी ॥३४॥

मृगजळ जेथ न भासे ती जागा मात्र शुष्क न म्हणावी ।

पण जेथें भासे तें तेथें तरि आर्द्रता कवण दावी ॥३४॥

हें दिसे तैसें असे । तरी चित्रींचेनि पाउसें ।

वोल्हावतु कां मानुसें । आगरातळीं ॥३५॥

जैसें दिसतें हें जग तैसेंचि जरि यथार्थ तें असतें ।

तरि चित्रांतिल वृष्टीनें भिजलीं असतींच साळिचीं शेतें ॥३५॥

कालऊनि अंधारें । लिहों येती अक्षरें ।

तरी मसीचिये वोरबारें । कां शिणावें ॥३६॥

अंधाराचें काजळ खलुनी जरि वर्ण लीहितां आले ।

तरि ऐसें कां न म्हणू शाईचे शीण व्यर्थची गेले ॥३६॥

आकाश काय निळें । न देखतु हे डोळे ।

तेवीं अविद्येचि टवाळें । जाणोनि घेई ॥३७॥

बा नीलिमा नमाची अमुचे डोळे न पाहती काय ।

तेंवि अविद्यागारुडतर्काची तिजपुढें नसे सोय ॥३७॥

अविद्या येणें नावें । मी विद्यमानचि नव्हें ।

हे अविद्याचि स्वभावें । सांगत असे ॥३८॥

सांगे स्वयें अविद्या निजनावें विद्यमान मी नाहीं ।

कारण अर्थ अविद्या शब्दाचा पाहतां असा होई ॥३८॥

आणि इये अनिर्वाच्यपण । तें दुजेंही देवांगण ।

आपुल्या अभावीं आपण । साधितसे ॥३९॥

आणि अनिर्वाच्य असें लक्षण शास्त्रोक्त जें अविद्येचें ।

अपुला अभाव आपण कथुनि तिनें दाविलें इथें साचें ॥३९॥

कांहींचि जरी आहे । तरी निर्धारु कां न साहे ।

वरीं घटभावें भोये । अंकित दिसे ॥४०॥

जर कांहीं वस्तु असे निश्चय करवे कसा न तिजविषयीं ।

कुंभाच्या अस्तित्वें भूमीवरि खूण दृश्य जसि होई ॥४०॥

अविद्या नाशी आत्मा । ऐसी नव्हे प्रमा ।

सूर्या अंगीं तमा । जयापरी ॥४१॥

निरसूनि अविद्येसी आदी आत्म्यासि आत्मपण येई ।

हेंही न संभवे ती नाहिंच सूर्यांत तम जसें नाहीं ॥४१॥

हे अविद्या तरी मायावी । परी मायावीपणचि लपवी ।

साचा आली अभावीं । आपुली हे ॥४२॥

ही असुनी मायावी मायावी रूप आपुलें लपवी ।

परि तत्स्वभाव न लपे शब्द अविद्या अभावची दावी ॥४२॥

बहुतांपरी ऐसी । अविद्या नाहीं आपैसी ।

आतां बोलु हातवसी । कवणावरी ॥४३॥

बहुतांपरी पहातां नाहिं अविद्या असाचि सिद्धांत ।

आतां कवणावरि हा शब्द उगारील आपुला हात ॥४३॥

साउलिये तें साबळें । हालया भोंय आदळे ।

कीं हालेनि अंतराळें । थोटावे होतु ॥४४॥

मारूं जातां हातें छायेला हात भूवरी अदळे ।

किंवा हाणूं जातां आकाशाला हतासि काय मिळे ॥४४॥

कां मृगजळाच्या पानीं । गगनाच्या आलिंगनी ।

नातरी चुंबनीं । प्रतिबिंबाच्या ॥४५॥

मृगजळपान कराया आलिंगन द्यावयासि गगनातें ।

कोणीएक निघाला चुंबाया दर्पणांतिल मुखातें ॥४५॥

उठावला वोथरे तंवका । तो सुनाट पडे असिका ।

अविद्या नाशी तर्का । तैसें होये ॥४६॥

तरि तो प्रयत्‍न अवघा त्याचा जाईल सर्वथा वांया ।

तैसा तर्क शिणे हा व्यर्थ अविद्येसि ठार माराया ॥४६॥

ऐसी अविद्या नाशावी । हें वाहेल जो जीवीं ।

तेणें साली काढावी । आकाशाची ॥४७॥

जो नर चिंतिल ऐसें अशी अविद्या समूळ निरसावी ।

साल तया शहण्यानें आकाशाची खुशाल काढावी ॥४७॥

तेणे शेळी गळां दोहावी । गुढघां वास पाहावी ।

वाळऊनि काचरी करावी । सांजवेळेची ॥४८॥

तेणें अजागलाचें दोहावें दुग्ध दृष्टि गुढघ्याची ।

उपयोगार्थ करावी काचरि सुकवूनि सांजवेळेची ॥४८॥

जांभई वाटूनि रसु । तेणें काढावा बहुवसु ।

कालऊनि अळसु । मोदळा पाजावा ॥४९॥

वांटुनि रस काढावा जांभ‍इचा त्याचि दीड शहाण्यानें ।

पाजावा गवताच्या पुतळ्याला अळस कालवुनि त्यानें ॥४९॥

तो पाटा पाणी परतु । पडली साउली उलथु ।

वारियाचे तांथु । वळु सुखें ॥५०॥

न चुके ऐसा पंडित पाटाचा ओघही परतवाया ।

वळण्यासि वायुतंतू अपुली उलथावयासिही छाया ॥५०॥

तो बागुलातें मारु । प्रतिबिंब खोळें भरु ।

तळहातिंचे विंचरु । केश सुखें ॥५१॥

मारूं दे बागुल तो पदरीं प्रतिबिंब तो सुखें भरूं दे ।

तळहाताच्या केशा तो मतिसागर खुशाल विंचरूं दे ॥५१॥

घटाचें नाहींपण फोडु । गगनाचीं फुलें तोडु ।

ससयाचें मोडु । शिंग सुखें ॥५२॥

तो नास्तित्व घटाचें फोडूं दे गगनपुष्प तोडूं दे ।

काय अशक्य अशाला शिंग सशाचें खुशाल मोडूं दे ॥५२॥

तो कापुराची मसी करू । रत्‍न दीपीं काजळ धरू ।

वांझेचें लेंकरूं । परणु सुखें ॥५३॥

तो शाह कापुराची करूं दे मणिदीपिकाजळा धरूं दे ।

वंध्येच्या कन्येला मोहित हो‍उनि खुशाल तो वरूं दे ॥५३॥

तो अंवसेचेनि सुधाकरें । पोसु पाताळींचीं चकोरें ।

मृगजळींचीं जळचरें । गाळु सुखे ॥५४॥

अंवसेच्या चंद्रानें पाताळांतिल चकोर पोसु सुखें ।

मृगजळिंचे प्राणी तो पाळूं दे कीं सुखें मकर बदकें ॥५४॥

अहो हें किती बोलावें । अविद्या रचिली अभावें ।

आतां कायी नाशावें । शब्दें येणें ॥५५॥

काय बहुत सांगावें ही पुतळी बनविली अभावाची ।

खचित अविद्या नांवें एथ चले मात काय शब्दाची ॥५५॥

नाहीं तयाचे नाशें । शब्द न ये प्रमाणदशे ।

अंधारीं अंधारा जैसें । नव्हे रूप ॥५६॥

नसणाराला निरसे त्या शब्दाला प्रमाण कोण म्हणे ।

अंधारीं अंधारा काय असे रूप त्यासि कोण गणे ॥५६॥

अविद्येची नाहीं जाती । तेथ नाहीं म्हणतया युक्ती ।

जेवीं दुपारीं का वाती । आंगणींचिया ॥५७॥

नाहीं स्वतां अविद्या वस्तू तीचा अभाव साधाया ।

तर्क न चाले अंगणिं दीप जसा तम दुपारिं बाधाया ॥५७॥

न पेरितां सेतीं । जे कीं संवगणिया जाती ।

तयां लाजेपरौती । जोडी आहे ॥५८॥

शेतचि न पेरिलें जें तें कापायासि जाति जे लोक ।

लाज न कैशी वाटे काय तयाच्या हतासि ये पीक ॥५८॥

खवणियाच्या अंगा । जेणें केला वळघा ।

तो न करितांचि उगा । घरीं होता ॥५९॥

छायापुरुषांगा जो पुरुष मिठी मारण्यासि सिद्ध असे ।

याचा अर्थ असा कीं अपुल्या घरिं तो उगीच कीं बैसे ॥५९॥

पाणियावरी वरिखु । होतां कें असे विशेखु ।

अविद्या नाशी उन्मेखु । फांकावा तैसा ॥६०॥

होतां वृष्टी समुद्रीं त्यापासुनि पीक येतसे काय ।

नाशायासि अविद्या व्यर्थ तसा यत्‍न सर्वही जाय ॥६०॥

माप मापपणें श्लाघे । जंव आकाश मवूं न रिगे ।

तम पाहतां वाउगें । दीपाचें जन्म ॥६१॥

जोंवरि नभा न मोजे तोंवरि त्या माप नांव हें सार्थ ।

तम ज्याला दिसतें त्या दीपाचें सर्वही जिणें व्यर्थ ॥६१॥

गगनाची रससोये । जीभ जैं आरोगूं जाये ।

मग रसना हे होये । आडनांव कीं ॥६२॥

चाखुनि मिटक्या मारी पोळी जी मृदु उनून गगनाची ।

वारंवार रुचीनें जिव्हा ती जाण आडनांवाची ॥६२॥

नव्हतेनि वल्लभें । आहेवपण कां शोभे ।

खातां केळीचे गाभे । न खातां गेले ॥६३॥

नस्त्या पतिनें कुलिन, स्त्रीचें कैसें सवाष्णपण शोभे ।

सोलुनि सोलुनि आंतिल न भरेची पोट केळिच्या गर्भै ॥६३॥

स्थूळ सूक्ष्म कवण एकु । पदार्थ न प्रकाशी अर्कु ।

परी रात्रीविषयीं अप्रयोजकु । जालाचि कीं ॥६४॥

नाहीं दर्शित सूर्यें ऐसा नाहीं पदार्थ जगतांत ।

परि रात्रीच्या विषयी आली त्या निरुपयोगिता खचित ॥६४॥

दिठी पाहतां काय न फवे । परी निदेतें तंव न देखवे ।

चेतातें न संभवे । म्हणोनियां ॥६५॥

दृष्टिस काय अगोचर परि पाहुं शके ती कधीं न निद्रेला ।

त्याचें कारण हें कीं येई शून्यत्व जागरीं तिजला ॥६५॥

चकोराचिया उद्यमा । लटकेपणाची सीमा ।

जरी दिहाचि चंद्रमा । गिवसूं वैसे ॥६६॥

पाहूं जाती दिवसा चंद्राला चक्रवाकपक्षि जरी ।

तरि त्यांच्या यत्‍नाच्या व्यर्थत्वा कोण सांग माप करी ॥६६॥

नुसधियेचि सांचा । मुका होये वाचकाचा ।

अंतराळीं पायांचा । पेंधा होय ॥६७॥

कोरीं पुस्तकपत्रें जो वाची तोचि खचित होय मुका ।

पायाचा धड गमनीं चाले जो पांगळा न म्हणवे कां ॥६७॥

तैसिं अविद्येसन्मुखें । सिद्धचि प्रतिषेधकें ।

उठलींचि निरर्थकें । जल्पें होती ॥६८॥

तेंवि अविद्येसन्मुख प्रतिषेध करावयासि जी केली ।

खटपट साक्षेपानें शब्दें सगळीच व्यर्थ ती गेली ॥६८॥

अंवसे आला सुधाकरू । न करीच काय अंधकारू ।

अविद्या नाशी विचारू । तैसा होय ॥६९॥

अंवसेचा जो हिमकर त्याची जोत्स्नाचि होय अंधार ।

तेविं अविद्या निरसुनि जाणावा सर्व व्यर्थ सुविचार ॥६९॥

नाना न निफजतेनि अन्नें । जेवणें तेंचि लंघणें ।

निमालेनि नयनें । पाहाताचि अंधु ॥७०॥

सिद्ध न केलें ऐशा अन्नातें सेवणेंचि लंघन तें ।

गतनयनें बघणारा अंधचि ही गोष्ट उघडची दिसते ॥७०॥

कैसिही वस्तु नसे । जैं शब्दाचा अर्थ हों बैसे ।

तैं निरर्थकपणें नाशे । शब्दही थिता ॥७१॥

अर्थ जया शब्दाचा कांहिंच वस्तू नसे असा होतो ।

तेव्हां अर्था घेउनि शब्द निरर्थकपणें लया जातो ॥७१॥

आतां अविद्याचि नाहीं । हें कीर म्हणों कायी ।

परि ते नाशितां कांहीं । नुरेचि शब्दाचें ॥७२॥

एवंच ही अविद्या नाहीं हें काय बहुत सांगावें ।

नाहीं हें ठरल्यावरि शब्दा आतां तिलोदका द्यावें ॥७२॥

यालागीं अविद्येचिया मोहरा । उठिलियाही विचारा ।

अंगाचाचि संसारा । होऊनि ठेला ॥७३॥

यालागिं अविद्येच्या समोर राहे उभा जरि विचार ।

तरि तिजसहीत त्याच्या देहाचा लोप होइ साचार ॥७३॥

म्हणोनि अविद्येचेनि मरणें । प्रमाणा येईल बोलणें ।

हें अविद्याचि नाहींपणें । नेदी घडों ॥७४॥

यासाठिं अविद्येच्या मरणें शब्दा प्रमाणता येई ।

ही गोष्ट घडों नेदी अपुल्या नाहींपणें अविद्या ही ॥७४॥

आणि आत्मा हन आत्मया । दाउनि बोल महिमेया ।

येईल हे साविया । विरुद्धचि ॥७५॥

तैसेंचि आत्मयातें दावुनि आत्म्यासि शब्दमहिम्यातें ।

पावेल हें विरुद्धचि दिसतें बघतां स्वयंप्रकाशातें ॥७५॥

आपणयां आपणासी । लागलें लग्न कवणें देसीं ।

कीं सूर्य अंग ग्रासी । ऐसें ग्रहण आहे ॥७६॥

कोणी तरि अपणासी अपुलेंची लग्न लाविलें ऐसें ।

देखोलें कीं कधिंतरि ग्रहणीं स्वांगाप्रती रवि ग्रासे ॥७६॥

गगन आपणयां निघे । सिंधु आपणया रिघे ।

कीं तळहात वोळघे । आपनपेयां ॥७७॥

गगनचि गगना आलें सिंधुमधें सिंधुही तसा शिरला ।

तळहातें तळहाता धरिलें ये सत्यता न या बोला ॥७७॥

चराचरा पाणी पाजणी । करूं येईल एके क्षणीं ।

परी पाणियासी पाणी । पाजावें काई ॥७८॥

उदक करी जगताचें तृष्णाहरण प्रसिद्ध ही गोष्ट ।

परि पाण्यातें पाणी प्यालें हें स्वप्निंही नसे दृष्ट ॥७८॥

साठीं तीनशा दिवसां । माजीं येखादा होय ऐसा ।

जे सूर्यासीचि सूर्य जैसा । डोळा दावी ॥७९॥

न कुणीही आढळला दिवस असा एक तीनशें साठी ।

कीं सूर्यै सूर्याला केव्हांतरि देखिलें स्वतां दृष्टीं ॥७९॥

कृतांत जरी कोपेल । तरी त्रैलोक्य हें जाळील ।

वांचूनि आगी लावील । आगिसी काई ॥८०॥

जरि कोप ये कृतांता त्रैलोक्यातें क्षणांत जाळील ।

परि अग्नी अग्नीला लागे हें शक्य कोण मानील ॥८०॥

आपणपें आपणयां । दर्पणेंवीण धात्रया ।

समोर होआवया । ठाकी आहे ॥८१॥

अरशांत पाहिल्याविण आपण अपुल्या समोर होण्याला ।

शक्त नसे ब्रह्माही इतराचा काय पाड मग बोला ॥८१॥

दिठी दिठीतें रिघों पाहें । रूचि रुचीतें चाखों सुये ।

कीं चेतया चेतऊं ये । हें नाहींच कीं ॥८२॥

डोळा पाहे डोळा रुची रुचीलागिं केंवि ती चाखी ।

कीं जाग्याला जागा करि ऐसा कोण पाहिला लोकीं ॥८२॥

चंदन चंदना लावी । रंगु रंगपणा रावी ।

मोतीपण मोतीं लेववीं । ऐसें कैंचें ॥८३॥

रंग कधीं रंगविला चंदनकाष्ठासि गंध लावीले ।

मुक्तासि मुक्तमाला घालूनी अधिक काय दावीलें ॥८३॥

सोनेंपण सोनें कसी । दीपपण दीप प्रकाशी ।

रसपणा बुडी दे रसीं । हें कें जोडे ॥८४॥

सोनें कसासि लावी सोन्यावरि रस रसांत बुडि देई ।

दीपा दावी दीपचि या गोष्टी देखिल्या न स्वप्नींही ॥८४॥

आपुलिये मुकुटीं समर्था । चंद्र बैसविला सर्वथा ।

परि चंद्र चंद्राचिये माथां । वाऊं ये काई ॥८५॥

स्वशिरीं चंद्रा बैसवि ऐसा आहे समर्थ शंकर तो ।

परि अपुल्याची मस्तकिं बसूं शके काय हो निशाकर तो ॥८५॥

तैसा आत्मराजु जंव । ज्ञानमात्रचि भरींव ।

आतां ज्ञानें ज्ञानासी खेंव । कैसें दीजे ॥८६॥

तैसा घनदाटचि जो आत्मा केवल दुजें जिथें नाहीं ।

ज्ञानस्वरूप जें तें ज्ञानाला भेट दे कसी पाहीं ॥८६॥

आपुलेनि जाणपणें । आपणयातें जाणो नेणे ।

डोळ्या आपलें पाहाणें । दुवाद जैसें ॥८७॥

दृङ्‍मात्रचि जो केवल जाणूं नेणे कदापि अपणाला ।

डोळा देखे डोळ्या वाटे ही गोष्ट शक्य कवणाला ॥८७॥

आरिसा आपुलिये । अंगीं आपण पाहे ।

तरि जाणणें जाणों लाहे । आपणपयातें ॥८८॥

जरि आरसा निजांगा पाहूं शके हेंहि शक्य होईल ।

कीं अद्वय अव्यय हा बोधात्मा आपणासि जाणेल ॥८८॥

दिगंता पैलीकडेचें । धांवोनि सुरिया खोंचे ।

मा तियेसी तियेचें । अंग फुटे ॥८९॥

अरि दूर दिगंतिं असो त्याला धावूनि मारि तरवार ।

परि नाहीं देखियली कोणी जी छेदित स्वकीय शिर ॥८९॥

रसवृत्तीसी उगाणे । घेऊनि जिव्हाग्र शहाणें ।

परी कायी कीजे नेणें । आपणापें चाखों ॥९०॥

सेवुनि विविध रसांतें म्हणवी रसनाग्र रसिक जगतीं या ।

शक्त नसे परि तेची आपण अपुल्या रसासि सेवाया ॥९०॥

तरी जिभे कायी आपुलें । चाखणें हन ठेलें ।

तैसें नव्हे संचलें । तेंचि तें कीं ॥९१॥

आत्मरसातें जिव्हा यद्यपि नोहे समर्थ चाखाया ।

स्वरसज्ञता तसे तिज कवण असा नर धजेल बोलाया ॥९१॥

तैसा आत्मा सच्चिदानंदु । आपणया आपण सिद्धु ।

आतां काय दे शब्दु । तयाचें तया ॥९२॥

तैसा सच्चित्सुख जो आत्मा केवल असे स्वतःसिद्ध ।

आतां मुळिंचें त्याचें त्याला देईल काय हा शब्द ॥९२॥

कोणाही प्रमानाचेनि हातें । वस्तु घेना नेघे आपणयातें ।

जें स्वयें असे आयितें । घेणें ना न घेणें ॥९३॥

कवण्या प्रमाणयोगें घेतां देतां न येचि वस्तू ही ।

ग्राह्य नसे ती जैसी आग्रह्यत्वहि तसेंचि तिज नाहीं ॥९३॥

म्हणोनि आत्मा आत्मलाभें । नांदऊनि शब्द शोभे ।

येईल ऐसा न लभे । उमसु घेवों ॥९४॥

यालागिं आत्मयाला देउनि आत्मत्व नांदवी इतुकी ।

शक्ती नाहीं शब्दीं मग याचा काय डौल सांगा कीं ॥९४॥

एवं माध्यान्हींचि दिवी । तम धाडी ना दिवो दावी ।

तैसी उभयतां पदवी । शब्द जाली ॥९५॥

यापरि माध्यान्हींचा दीप तमा निरसिना प्रकाशविना ।

दोहों पक्षीं तेंवी तीच गती प्राप्त होय शब्दा ना ॥९५॥

आतां अविद्या नाहींपणें । नाहीं तयेतें नाशणें ।

आत्मा सिद्धुचि मा कोणें । काया साधावें ॥९६॥

नास्तित्वाची मूर्ती नाश कराया अशा अविद्येचा ।

जगतीं या सिद्ध असे ऐसा तो कणव पूत मायेचा ॥९६॥

ऐसा उभयपक्षीं । बोलु न लाहे नखीं ।

हरपला प्रलयोदकीं । ओघ जैसा ॥९७॥

यापरि दोहीं पक्षीं आत्मत्वीं लाग नाहीं शब्दाचा ।

प्रलयोदकिं लोपतें पावे जैसा प्रवाह गंगेचा ॥९७॥

आतां बोला भागु कांहीं । असणें जयाच्या ठायीं ।

अर्थता तरी नाहीं । निपटूनियां ॥९८॥

जी वस्तु नेति श्रुति वर्णित ती न ठावि अर्थाला ।

जेथें अर्थचि नाहीं तेथें अवकाश काय शब्दाला ॥९८॥

बागुल आला म्हणतें । बोलणें जैसें रितें ।

कां आकाश वोळंबतें । तळहातीं ॥९९॥

बागुलबावा आला हा जेंवि असे निरर्थ कीं बोल ।

किंवा गगनाचें छत लोंबे हें बोलणें जसें फोल ॥९९॥

तैसीं निरर्थकें जल्पें । होऊनियां सपडपें ।

शोभती जैसें लेपें । रंगावरी ॥१००॥

त्यापरि जल्प निरर्थक वरवर कानासि लागती मधुर ।

चित्रपटावरि दिसते रंगविले दुरुन जेंवि चित्तहर ॥१००॥

एवं शब्दैकजीवनें । बापुडीं ज्ञानें अज्ञानें ।

साचपणें वनें । चित्रींचीं जैसीं ॥१०१॥

शब्दावरि जीं जगतीं ज्ञानाज्ञानें दिसोत सत्यपणें ।

चित्रपटीं लिहिलेलीं नयना भुलवीति जेंवि हरित वनें ॥१०१॥

या शब्दाचा निमाला । महाप्रळयो होंसरला ।

अभ्रासवें गेला । दुर्दिनु जैसा ॥१०२॥

वातें उडोनि जातां अभ्र तया सहचि जाय दुर्दिनही ।

तैसा शब्द लयाला जातां तत्क्षणिं महाप्रलय होई ॥१०२॥

॥ प्रकरण ६ समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP