मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|अमृतानुभव| अमृतानुभव अमृतानुभव अमृतानुभव प्रकरण दुसरे आतां उपायन... प्रकरण तिसरे ययांचेनि... प्रकरण चवथे आतां अज्ञान... प्रकरण पाचवे सत्ता प्रक... प्रकरण सहावे बापु उपेगी... प्रकरण सातवें येर्हवीं... प्रकरण आठवे तैसें आमुचे... प्रकरण नववे आतां आमोद स... प्रकरण दहावे परी गा श्र... अमृतानुभव अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा स्व-रचित ग्रंथ असून त्यात त्यांनी उपदेशपर तत्वज्ञान सांगितले आहे.या ग्रंथाला चिद्विलासानंद असेही नाव आहे. Tags : amrutanubhavdnyaneshwarअमृतानुभवज्ञानेश्वर अमृतानुभव Translation - भाषांतर प्रकरण पहिलें ऐसीं इयें निरुपाधिकें । जगाचीं जियें जनकें । तियें वंदिलीं मियां मूळिकें । देवो देवी ॥१॥ ऐसें जें निरुपाधिक उत्पादक आद्य अखिल जगताचें । द्वंद्व प्रकृति पुरुष कीं, वंदियलें चरणयुगुल म्यां त्याचें ॥१॥ जो प्रियूचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचिये सरोभरीं । चारुस्थळीं एका हारीं । एकांगाचा ॥२॥ निजरूपाच्या प्रेमें याणें स्वीकार शक्तिचा केला । एकचि रूप असोनी दृक्दृश्यद्वंद्वभास तैं झाला ॥२॥ आवडीचेनि वेगें । येकयेकां गिळिती आंगें । कीं द्वैताचेनि पांगें । उगळिते आहाती ॥३॥ स्वप्रीतीच्या योगें हीं दोघेंही परस्परां गिळिती । द्वैताच्या लोभानें पुनरपि दोघेंहि वेगळीं होती ॥३॥ जे एकचि नव्हे एकसरें । मा दोघां दोनीपण कैचें पुरे । काय नेणों साकारें । स्वरूपें जियें ॥४॥ एकाला एकपणा नाहीं तरि दोहिंला कसें द्वित्व । आकार असे याला कीं न तयाचें कळेचिना तत्त्व ॥४॥ कैसी खसुखाची आळुकी । जे दोनीपणें भिडोनि एकीं । नेदिती मा कौतुकीं । एकपण फुटों ॥५॥ स्वसुखाच्या लोभानें पावति ऐक्यासि सांडुनि द्वैत । कौतुकरसेंहि पळभर फुटूं न देती स्वकीय अद्वैत ॥५॥ हा ठावोवेर्ही वियोगभेडें । जें बाळ तरि जगायेवढें । वियालीं परी न मोडे । दोघुलेंपण ॥६॥ ऐशीं वियोगभीरु प्रसवति जगरूप बालक अखंड । ऐसें जरी तथापी त्याच्या दोघेपणासि नच खंड ॥६॥ आपुलिये आंगीं संसारा । देखिलिया चराचरा । परि नेदितीच तिसरा । झोंक लागों ॥७॥ आपण एक द्नष्टा दृश्यचि संसार उदकिं लाट जसी । यावांचुनि तिसर्याचा स्पर्श न लावून घेति अपणासी ॥७॥ जयां एका सत्तेचें बैसणें । दोघां येका प्रकाशाचें लेणें । जें आनादि एकपणें । नांदती दोघें ॥८॥ दोघें बैसति एका सत्तासनिं तींच त्यांसि आधार । एकत्वेंचि अनादी दोघां एकचि चिती अलंकार ॥८॥ भेदु लाजोनि आवडीं । एकरसीं देत बुडी । तो भोगणया थाव काढी । द्वैताचा जेथ ॥९॥ तो भेद मग्न होतां एकरसीं लाज पावुनी हेर । स्वानंदसौख्यभोगीं शोधाया द्वैत येइ बाहेर ॥९॥ देवें संपूर्ण देवी । तियेविण कांहिंना त गोसावी । किंबहुना एकोपजीवी । एकमेकां ॥१०॥ देवें पूर्णत्वा ये देवी त्या तिजमुळेंचि देवपण । उपजीवन दोघांचे यापरि राहे परस्पराधीन ॥१०॥ कैसा मेळु आला गोडिये । जे दोघें न माती जगीं इये । कीं परमाणुहीमाजि उवायें । मांडलीं आहाती ॥११॥ संग परस्पर यांचा नित्य असुनि जंगि न मावती दोघें । अणुरेणूही व्यापुनि हें युग्म क्षणहि राहि न वियोगें ॥११॥ जिहीं एकएकावीण । न कीजे तृणाचेंहि निर्माण । जियें दोघें जीवप्राण । जियां दोघां ॥१२॥ एका सोडुनि एका तृणही करितां न येचि निर्माण । तत्प्रेम एवढें कीं परस्परां होति केवल प्राण ॥१२॥ घरवातें मोटकीं दोघें । जैं गोसावी सेजे रिगे । तैं दंपत्यपणे जागे । स्वामिणी जे ॥१३॥ अति निपुण जोडपें हें गृहकृत्यीं पुरुष जाय जरि शयनीं । प्रकृती जागी राहे यापरि संसार करिति ते मिळुनी ॥१३॥ जयां दोघांमाजि येखादें । विपायें उमजलें होय निदें । रितें घरवात गिळूनि नुसधें । कांहीं ना करी ॥१४॥ या दंपत्यामाजी दोघांतुनि एक होय जैं जागें । ग्रासुनि सर्व गृहासह उरवी अवशिष्ट कांहिं नच मागें ॥१४॥ दोहों अंगाची आटणी । गिंवसित आहाती येकपणीं । जाली भेदाचिया वाहाणी । आधाआधीं जियें ॥१५॥ एकपणें राहति हे ग्रासुनि अंगद्वयासि शिवशक्ती । भेदाच्या दृष्टीनें दो अंगी अर्ध अर्ध दिसताती ॥१५॥ विषो येकमेकांची जियें । जियें येकमेकांचीं विषयी इयें । जियें दोघीं सुखियें । जियें दोघें ॥१६॥ पुरुष प्रकृती होती परस्परांप्रति पहा विषय विषयी । योगें परस्परांच्या परस्परांला अतीव सुख होई ॥१६॥ स्त्रीपुरूषनामभेदें । शिवपण येकलें नांदे । जग सकळ आधाधे । पणें जिहीं ॥१७॥ स्त्रीपुरुषनामभेदें केवल पुरुषत्व एकलें नांदे । अर्धार्धांगें ज्याच्या सकलहि जग भासतें विविधभेदें ॥१७॥ दो दांडीं येक श्रुति । दो फुलीं येक द्रुति । दोहो दिवीं दीप्ति । एकीच जेंवि ॥१८॥ दो टिपरींचा एकचि नाद तसा वास दोन पुष्पांचा । तेंवि प्रकाश एकचि जेंवि असे दोन भिन्न दीपांचा ॥१८॥ दो ओंठीं येक गोठी । दो डोळां एकचि दिठी । तेविं दोघीं जिहीं सृष्टी । एकींच जेविं ॥१९॥ नयनद्वयिं एक दिठी दो वोठीं एकची निघे गोष्टी । पुरुषप्रकृतींपासुनि एकचि तैसीच जन्मली सृष्टी ॥१९॥ दाउनी दोनीपण । एक रसाचें आरोगण । करित आहे मेहुण । अनादि जें ॥२०॥ हें दंपत्य अनादि द्वैताचा दाखवूनि आभास । पुरुष प्रकृती दोघें सेवन करिती अखंड एक रस ॥२०॥ जे स्वामिचिया सत्ता । वीण असों नेणें पतिव्रता । जियेविण सर्व कर्ता । कांहींच ना जो ॥२१॥ पुरुष पतीविण कांहीं नाहीं प्रकृती सतीस मुळिं सत्ता । पुरुषहि प्रकृतीवांचुनि होऊं न शकेचि सृष्टिचा कर्ता ॥२१॥ जे कीं भर्ताराचें दिसणें । भर्तार जियेचें असणें । नेणिजती दोघें जणें । निवडूं जियें ॥२२॥ जीच्या योगें पतिचें दिसणें जीचें पतीमुळें असणें । मजला असाध्य गमतें परस्परांहूनि यांसि ओळखणें ॥२२॥ गोडी आणि गुळु । कापूर आणि परिमळु । निवडू जातां पांगूळु । निवाड होये ॥२३॥ कापूर आणि परिमळ एकचि तैसेचि गोडि अणि गूळ । एकांतुनि एकाला निवडाया बुद्धि होय पांगूळ ॥२३॥ समग्र दीप्ती घेतां । जेविं दीपचि ये हाता । तेविं जियेचिया तत्त्वतां । शिवचि लाभे ॥२४॥ घेऊं जातां दीप्ती समग्र हातासि येई दीप जसा । शक्तिस्वरूप तैसें शोधूं जाता शिवैकलाभ तसा ॥२४॥ जैसा सूर्य मिरवे प्रभा । प्रभे सूर्यचि गाभा । तेविं भेद गिळीत शोभा । एकीच जे ॥२५॥ शोभे रवि प्रभेनें आश्रय होवोनि तो स्वतां तिजला । तैसी शोभा एकचि उरते ग्रासुनि समग्र भेदाला ॥२५॥ कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक । तैसें द्वैतमिसें येक । बरवतसे ॥२६॥ प्रतिबिंबाचे द्योतक, बिंबचि प्रतिबिंब होय अनुमेय । मिथ्या प्रतिबिंब दिसे द्वैतव्याजें वसूनि रमणीय ॥२६॥ सर्व शून्याचा निष्कर्षु । तो जिया बाइला केला पुरुषु । जेणें दादुलेन सत्ताविशेषु । शक्ति जाली ॥२७॥ शुन्यातीत असे जो त्याला केलें पुरुष ज्या सतिनें । दिधलें शक्तित्त्व तिला सृष्टयर्थ तयें स्वकीय सत्तेनें ॥२७॥ जिये प्राणेश्वरीवीण । शिवींही शिवपण । थारों न शके ते आपण । शिवें घडिली ॥२८॥ ज्या आर्धांगीवांचुनि राहूं न शके शिवांत शिवपणही । तैशा महेश्वरें ही पतिव्रता नारी निर्मिली पाहीं ॥२८॥ ऐश्वर्यैसीं ईश्वरा । जियेचें आंग संसारा । आपलाही उभारा । आपणचि जे ॥२९॥ ऐश्वर्यासहित अशा या मायेनेंचि निर्मिलें ईशा । अपुली उत्पत्तीही केलि इनें काय हा बघ तमाशा ॥२९॥ पतीचेनि अरूपपणें । लाजोनि आंगाचें मिरवणें । केलें जगायेवढें लेणें । नामरूपाचें ॥३०॥ पतिरूप हीन पाहुनि भूषविण्या कीं निजांग लाजेनें । विविधस्वरूप सृष्टी केली रमणीय याच भाजेनें ॥३०॥ जेथें ऐक्याचा दुकाळा । तेथें बहुपणाचा सोहळा । जियें सदैवेंचिया लीळा । दाखविला ॥३१॥ ऐक्याचाच जिथें मुळिं दुष्काल तिथें बहुत्व ये कैसें । परि दाविलें विविध जग जीणें सौभाग्य प्रकृतिचें ऐसें ॥३१॥ आंगाचिया आटणीया । कांत उवाया आणिया जिया । स्वसंकोचें प्रिया । रूढविली जेणें ॥३२॥ स्वांगा उपसंहरुनी जीणें उदयासि आणिलें कांता । संकोचुनी स्वतांला नांवारूपासि आणि शिव कांता ॥३२॥ जियेंते पहावयाचिया लोभा । चढे द्रष्टृत्वाचिया क्षोभा । जियेतें देखत उभा । आंगचि सांडी ॥३३॥ जीच्या दर्शनलोभें याणें द्रष्टृत्व आणिलें अंगीं । बघणे सोडुनि देतां राहे अपुल्याचि ठायिं निःसंगी ॥३३॥ कांतेचिया भिडा । आवरला होय जगायेवढा । आंगवला उघडा । जियेवीण ॥३४॥ भीड धरुनि कांतेची जगताचें वस्त्र पांघरी शिव तो । कांतवियोग होतां भर्ता उघडाचि स्वस्थळीं बसतो ॥३४॥ जो हा ठाववेर्ही मंदरूपें । उवायिलेपणें हारपे । तो जाला जियेचेनि पडपें । विश्वरूप ॥३५॥ इतुकें सूक्ष्म तयाचें रूप असे कीं दिसे जणूं शून्य । कांताप्रेमभरानें तो झाला विश्वरूपचि वदान्य ॥३५॥ जिया चेवविला शिउ । वेद्याचे वोदनें बहु । वाढितोनिशिं जेऊं । धाला जो ॥३६॥ जागें करुनि शिवाला दृश्याचें अन्न वाढि जैं देवी । तीच्या सगट जगातें भक्षण करितांचि होय तृप्ति शवीं ॥३६॥ निदेलेनि भ्रतारें । जे विये चराचरें । जियेचा विसांवला नुरे । आंबुलेपणही ॥३७॥ निजला असतां भर्ता कांता त्याची चराचर प्रसवे । जेव्हां घेइ विसांवा लोपे तद्भर्तृताहि त्याचिसवें ॥३७॥ जंव कांत लपों बैसे । तंव नेणवे जियेच्या उद्दिशें । जियें दोघें आरसे । जियां दोघां ॥३८॥ तंव नेणिजे पुरुष हा लपला जंव प्रकृति वस्त्र पांघरुन । होती परस्परांचे द्योतक अरसेचि हे जणूं दोन ॥३८॥ जियेचनि आंगलगें । आनंद आपणापें आरोगूं लागे । सर्वभोक्ता परी नेघे । जियेविण कांहीं ॥३९॥ जीशीं होउनि युक्तचि भोगी आनंद आपणा शिवही । हा आसुनि सर्वभोक्ता भोगूं न शकेचि तिजविणें कांहीं ॥३९॥ जया प्रियाचें जें आंग । जो प्रिय जियेचें चांग । कालउनी दोन्ही भाग । जिवितें आहाति ॥४०॥ अर्धांगें होती परस्परांचीं कसे प्रकृतिपुरुष । मिसळुनि परस्परांमधिं करिती स्वानंदभोगपरिपोष ॥४०॥ जैसि का समीरासगट गति । कां सोनयासगट कांति । तैसी शिर्वेशीं शक्ति । आघवीच जे ॥४१॥ जेंवि समीरा सांडुनि गति नाहीं सांडुनी सुवर्णास । कांती नाहीं त्यापरि शक्ती नाहींच सोडुनि शिवास ॥४१॥ कां कस्तुरीसगट परिमळ । उष्मेसगट अनळ । तैसा शक्तिसीं केवळ । शिवचि जो ॥४२॥ किंवा कस्तूरीसह परिमळ कीं अग्नि उष्णतेसहित । तैसा शक्तीसह हा शंभुचि संदेह नाहिं बा यांत ॥४२॥ राति आणि दिवो । पातलिया सुर्याचा ठावो । तैसीं आपुला साची वावो । जियें दोघें ॥४३॥ दिवस आणि रात्री हें युग्म नसे ठाउकेंचि सूर्याला । तैसें आत्मस्वरूपीं ठाव नसे ईश शक्ति दोघांला ॥४३॥ किंबहुना तियें । प्रणवाक्षरीं विरूढतियें । दशेचींही वैरियें । शिवशक्ति ॥४४॥ एवं प्रणवाठाई विकार होवोनि सृष्टि उद्भवली । ही वार्ताचि न साहे कीं चिन्मात्रीं मुळीं न ती झाली ॥४४॥ हें असो नामरूपाचा भेद शिरा । गिळीत एकार्थचा उजिर । नमो तयां शिववोहरा । ज्ञानदेवो म्हणे ॥४५॥ त्या नामरूप भेदा ज्याची एकार्थता करी ग्रास । त्या शिवशक्तिद्वंद्वा ज्ञानेश्वर म्हणति मी नमीं त्यास ॥४५॥ जया दोघांचा आलिंगनीं । विरोनी गेलीं दोन्ही । आवघियाचि रजनी । दिठीची जे ॥४६॥ आलिंगनिं दोघांच्या दोघेही आटताति शिवशक्ति । दृष्टी जाय विरोनी जातां अस्तासि जेंवि दिवसपति ॥४६॥ जयांच्या स्वरूपनिर्धारीं । गेली परेसी वैखरी । सिंधूसीं प्रलयनीरीं । गंगा जैसी ॥४७॥ ज्याच्या स्वरूपनिश्वयिं परादिसह वैखरी विलय पावे । गंगेनें सिधूसह जेवीं प्रलयोदकीं गडप व्हावें ॥४७॥ वायु चळवळेंसीं । जिराला व्योमाचिये कुसी । आटला प्रळयप्रकाशीं । सप्रभ भानु ॥४८॥ जैसा व्योमिं लयातें पावे निजचळबळीसहित पवन । प्रळयप्रकाशिं किंवा होतो सविता प्रभेसहित लीन ॥४८॥ तेविं न्याहाळितां ययांतें । गेलें पाहणेनसीं पाहातें । पुढती घरवरौतें । वंदिलीं तियें ॥४९॥ न्याहळुनी बघतां ज्या द्रष्टा लोपेचि दर्शनासहित । त्या दिव्य दंपतीला माझें मस्तक सदा असो प्रणत ॥४९॥ जयांचिया वाहणी । वेदक वेद्याचें पाणी । न पिये परि सांडणी । आंगाचीही करी ॥५०॥ जाणूं जातां ज्यातें बिंदुहि त्या वेद्यसिंधुचा न मिळे । इतुकेंचि नव्हे किंतु ज्ञात्याचेंही समूळ अंग गळे ॥५०॥ तेथ मी नमस्कारा । लागिं उरों दुसरा । तरी लिंगभेद पर्हा । जोडूं जावों ॥५१॥ ऐशा ऐक्यस्थळिं जरि नमनालागीं उरेन दुसरा मी । तरि या सृष्टींत कुठें अधिक दिसे लिंगभेद या भूमीं ॥५१॥ परि सोनेंनसीं दुजें । नहोनि लेणें सोना भजे । हें नमन करणें माझें । तैसें आहे ॥५२॥ सोन्याहूनि निराळा नसुनी शोभवि जसा अलंकार । भिन्न न होउनि तैसा करिं शिवशक्तिस मी नमस्कार ॥५२॥ सांगता वाचेतें वाचा । ठाव वाच्य वाचकाचा । पडतां काय भेदाचा । विटाळ आहे ॥५३॥ वाचा कथि वाचेतें जेव्हां वाचकचि वाच्यही जैसे । मग तेथें भेदाचा सांगा तुम्ही विटाळ काय असे ? ॥५३॥. सिंधु आणि गंगेचि मिळणी । स्त्रीपुरुष नामाची मिरवणी । दिसतसे तरी पाणी । काय द्वैत होईल ॥५४॥ गंगासागरसंगमिं एक स्त्रीनाम पुरुषनाम दुजें । नामीं भेद दिसे जरि नच उदकीं तो द्वयांत एकचि जें ॥५४॥ पाहे पां भास्य भासकता । आपुला ठाई दावितां । एकपणा काय सविता । मोडित असे ॥५५॥ जो दावी भासकता आणि भास्यत्व आपुला ठांई । तेणें त्या सूर्याचा एकपणा काय मोडतो पाहीं ॥५५॥ चांदाचिया दोंदवरी । होत चांदणियाची विखुरी । काय उणें दीप्तीवरी । गिंवसों पां दीप ॥५६॥ चंद्राच्या बिंबावरि दिसतें जें नयनिं चंद्रिकावरण । चंद्राहुनि भिन्न नसे किंवा दीपहि नसेचि दीप्तिविण ॥५६॥ मोतियाची कीळ । होय मोतियावरी पांगुळ । आगळें निर्मळ । रूपा ये कीं ॥५७॥ मोत्यावरि जें राहे तेज तयावरिच जेंवि तें झळकें । मौक्तिकनैर्मल्यानें त्याचें सौदर्य अधिक तें फांके ॥५७॥ मांत्राचिया त्रिपुटिया । प्रणव काय केला चिरटिया । कींणकार त्रिरेघटिया । भेदावला काई ॥५८॥ प्रणवांत तीन मात्रा ज्या त्यांनीं प्रणव न त्रिविध झाला । रेषा तीन णकारीं ज्या तेणें विविधता नये त्याला ॥५८॥ ऐक्याचें मुदल न ढळे । आणि साजरेपणाचा लाभ मिळे । तरी स्वतरंगाचीं मुकुळें । तुरंबु कां पाणी ॥५९॥ मुळिंचें ऐक्य न ढळतां शोभा ये जरि विशेष पाण्याला । स्वतरंगाचीं पुष्पें लेण्यानें काय हान बा त्याला ॥५९॥ म्हणोन भूतेश भवानी । न करूनि शिनानी । मी निघालों नमनीं । तें हें ऐसें ॥६०॥ त्यापरि किवशक्ति जीं एकचि ज्यां अंत मध्य ना आदि । त्यांशी अभिन्न होउनि मीपण सांडूनि त्यांसि मी वंदीं ॥६०॥ दर्पणाचेनि त्यागें । प्रतिबिंब बिंबीं रिघे । कां बुडी दीजे तरंगे । वायूचा ठेला ॥६१॥ प्रतिबिंब बिंबिं शिरतें दर्पण एकीकडेसि सारीतां । कीं लाट बुडी मारी पाण्यांतचि वायु थांबला असतां ॥६१॥ नातरी निद जातखेंवो । पावे आपुला ठावो । तैसीं बुद्धित्यागें देवीदेवो । वंदिलीं मियां ॥६२॥ किंवा निद्रेंतुनि नर पावे उठतांचि आपुला ठाव । तेविं अहंबुद्धीतें टाकुनि मी वंदिं देवि अणि देव ॥६२॥ सांडुनी मीपणाचा लोभु । मिठें सिंधुत्वाचा घेतला लाभु । तेविं अहं देउनि मी शंभु । शांभवी जालों ॥६३॥ सांडुनि मीठपणाचा लोभ समुद्रत्व पावलें मीठ । तेविं अहंपण अर्पुनि शिवशक्तिशिं जाहलोंचि एकवट ॥६३॥ शिवशक्तिसमावेशें । नमन केलें म्यां ऐसें । रंभागर्भ आकाशें । रिघाला जैसा ॥६४॥ शिवशक्तिसमावेशें यापरि म्यां भक्तिनें नमन केलें । आकाशामधिं जैसें अंतर्नभ केळिचें जसें शिरलें ॥६४॥ ॥ पहिलें प्रकरण समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : August 22, 2025 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP