सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण । पतीतपावन हरि एक ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिका वोळलें । आणूनि ठेविलें भीमातीरीं ॥ २ ॥
नलगती त्या सिद्धि करणें उपाधी । नित्य चित्तशुद्धि विठ्ठलनामें ॥ ३ ॥
कळिकालासि त्रास चित्तीं ह्रषिकेश । उगवला दिवस सोनियाचा ॥ ४ ॥
त्रिभुवनीं थोर क्षेत्र पैं सार । विठ्ठल उच्चार भीमातीरीं ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर निवाला सत्वर । नित्यता आचार विष्णुमय ॥ ६ ॥