विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं । तिष्ठती कामारी मुक्तिचारी ॥ १ ॥
मुनिजनां सुख निरंतर लक्ष । भक्तां निजसुख देत असे ॥ २ ॥
पुंडलिकपुण्य मेदिनीकारुण्य । उद्धरिले जन अनंत कोटी ॥ ३ ॥
निरानिरंतर भीमरथी तीर । ब्रह्म हें साकार इटे नीट ॥ ४ ॥
नित्यता भजन जनीं जनार्दन । ब्रह्मादिक खुण पावताती ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर हरीरूप सर्व । नाम घेतां तृप्त आत्माराम ॥ ६ ॥