श्री भगवान् म्हणाले
निर्भयत्व मनःशुद्धि योग-ज्ञानी सुनिश्चय । यज्ञ निग्रह दातृत्व स्वाध्याय ऋजुता तप ॥ १ ॥
अहिंसा शांति अक्रोध त्याग सौजन्य सत्यता । अ-लुब्धता दया भूती मर्यादा स्थैर्य मार्दव ॥ २ ॥
पवित्रता क्षमा तेज धैर्य अद्रोह नम्रता । हे त्याचे गुण जो आला दैवी संपत्ति घेउनी ॥ ३ ॥
दंभ मीपण अज्ञान क्रोध दर्प कठोरता । लाभती गुण हे त्यास ज्याची संपत्ति आसुरी ॥ ४ ॥
सुटका करिते दैवी आसुरी बंध घालिते । भिऊ नको चि आलास दैवी संपत्ति जोडुनी ॥ ५ ॥
भूत-सृष्टि जगी दोन दैवी आणिक आसुरी । विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो ॥ ६ ॥
कृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन । न स्वच्छता न आचार जाणती ते न सत्य हि ॥ ७ ॥
म्हणती लटिके विश्व निराधार निरीश्वर । काम-मूलक हे सारे कोठले सह-कार्य ते ॥ ८ ॥
स्वीकारूनि अशी दृष्टि नष्टात्मे ज्ञान-हीन ते । जगताच्या क्षयासाठी निघाले रिपु हिंसक ॥ ९ ॥
काम दुर्भर सेवूनि मानी दांभिक माजले । दुराग्रह-बळे मूढ करिती पाप निश्चये ॥ १० ॥
अपार धरिती चिंता जी मेल्या हि सरे चि ना । गढले काम-भोगात जणू सर्वस्व मानुनी ॥ ११ ॥
आशेचे लेइले फांस काम-क्रोधांत तत्पर । भोगासाठी अधर्माने इच्छिती धन-संचय ॥ १२ ॥
हे आज लाभले आता तो जोडीन मनोरथ । हे आहे ते हि होईल माझे चि सगळे धन ॥ १३ ॥
मी मारिला चि तो शत्रु मारीन दुसरे हि जे । मी स्वामी आणि मी भोक्ता सुखी मी सिद्ध मी बळी ॥ १४ ॥
कुलीन मी चि संपन्न माझी जोडी कुठे असे । यज्ञ-दान-विलासी मी जल्पती अज्ञ मोहित ॥ १५ ॥
भ्रमले चित्त भेदूनि मोह-जालांत गुंतले । पडती विषयासक्त नरकांत अमंगळ ॥ १६ ॥
स्वयं-पूजित गर्विष्ठ धने माने मदांध ते । नावाचे करिती यज्ञ दंभाने अव्यवस्थित ॥ १७ ॥
अहंकारे बळे दर्पे काम-क्रोधे भरूनिया । माझा स्व-पर-देहांत करिती द्वेष मत्सरी ॥ १८ ॥
द्वेषी क्रूर असे पापी संसारी हीन जे जन । त्यांस मी टकितो नित्य तशा योनीत आसुरी ॥ १९ ॥
जोडूनि आसुरी योनि जन्मजन्मांतरी मग । माते न मिळता जाती उत्तरोत्तर खालती ॥ २० ॥
काम क्रोध तसा लोभ आत्म-नाशास कारण । तीन ही नरक-द्वारे टाळावी चि म्हणूनिया ॥ २१ ॥
तमाची ही तिन्ही द्वारे टाळूनि सुटला मग । कल्याण-मार्ग सेवूनि पावे उत्तम तो गति ॥ २२ ॥
जो शास्त्र-मार्ग सोडूनि करितो स्वैर वर्तन । न सिद्धि लाभते त्यास न वा सुख न सद्-गति ॥ २३ ॥
म्हणूनि आदरी शास्त्र कार्याकार्य कळावया । शास्त्राचे वाक्य जाणूनि इथे तू कर्म आचरी ॥ २४ ॥
अध्याय सोळावा संपूर्ण