श्रीमद् गोपाल गीत - पद्मपुष्प चौथे

मराठी जनास हे गीतोपनिषद, गीता ज्ञान प्राप्त व्हावे ह्या हेतुने गोपाळाने केलेले हे `गोपाल गीत'.


श्री योगेश्वर कृष्ण,
बोलीतसे अर्जुनाते ।
ऐके योग तू जीष्ण,
ज्ञान कर्म संन्यास ते ॥१॥ (श्री भगवान):-

विनाशी अशा ह्या योगे,
बोधिलासे, तो म्यां भानु ।
बोधिला मनुस सुर्ये,
इक्ष्वाकुस, रे त्या मनु ॥२/१॥

असा हा परंपरा प्राप्त,
राजर्षिये सर्वा, जाणिला ।
महत्योग हा परंतप,
कालांतरे नाश पावला ॥३/२॥

भक्त बा, तूं माझा सखाहि म्हणूनी,
मी हा आज, योग तुज निर्देशिला ।
योग तोची रे हा, असे पुरातन,
रहस्यची, जो उत्तम, सांगीतला ॥४/३॥

योगेश्वराते निरसन्या शंका,
अर्जुन सुज्ञ, पुसे, प्रश्न एका । (अर्जुन):-

आपुला असे जन्म, अद्यनुतन,
भानु तो तर, खूप पुरातन ।
जाणावे कसें मग तें हयातून,
आधि बोधिले सूर्या, हे तूं ज्ञान ॥५/४॥

संतोषित प्रतिप्रश्ने, तो कृष्ण,
बोल बोलिले अर्जुना, श्रीकृष्ण ॥ (श्री भगवान)

बहुत जन्मपूर्व,
माझे नी, तुझे ते, झाले रे ।
जाणतो मी ते सर्व,
न तूं ते, शत्रुतापना, रे ॥६/५॥

जन्म रहीत मी,
जीव र्‍हास हीन,
प्राणिमात्रा मी `देव' हो ।

अधिन प्रकृति,
सुस्थिर राहून,
जन्मतो मायेने स्वंयो ॥७/६॥

(वृत्त इंद्रवज्रा)
ती शुध्द `धर्मा' हरपे हि जेव्हां,
उत्कर्ष, त्या वाढ, अधर्मी जेंव्हा ।
तेव्हा तिथे मी, सृजुनी स्वत: तो,
रे, भारता, मी अवतार घेतो ॥८/७॥

रक्षण करण्या सुकृतांचे,
दुष्कृतांशी नाशण्या ।
युगा युगांत जन्मतो मी रे,
सुधर्म तो, संस्थापण्या ॥९/८॥

जन्मां आणि कार्या माझीया,
दिव्य मूळ जो, तयाचे जाणीतो ।
देह त्यागीता, जन्म न त्यां,
पावेची, अर्जुना मजप्रति तो ॥१०/९॥

स्नेह, भय मुक्त, क्रोधविरहीत,
आश्रीत मज एकरुप ती ।
ज्ञान, तप-रत, पावन, बहुत,
भावयुक्त ते, मज मिळती ॥११/१०॥

जैसे जे, मज रे, येती शरण,
तया तैसेची फल दे, मी पण ।
मनुष्यें, पार्था, मम ते वर्तन,
करती सर्वशा, अनुकरण ॥१२/११॥

सिध्दि इच्छुक जे कार्या,
इहलोकी भजती देवांते ।
मानुषी लोकें, कार्य-जा-,
सत्वरची पावती, `सिध्दिते' ॥१३/१२॥

गुणकर्म विभागेण मी,
निर्मिले चतुर्वर्ण ।
कर्ता तरी, कारण, न मी,
व्ययहीन मी, जाण ॥१४/१३॥

(वृत्त इंद्रवज्रा)
रे कर्म सारी, मज नाकृष्टे ती
कर्मफला, ना मज आस, रे ती ।
येणे परी जो मज जाणता रे,
कर्मेहि त्या बंधनि मुक्तता रे ॥१५/१४॥

पूर्विच्या हि, त्या मोक्ष इच्छुके,
जाणून ऐशी, केली कर्म ।
म्हणून तू तेची, कर्मा येके,
आचरी तू, तें पूर्वोत्तम ॥१६/१५॥

कर्म कोणते अकर्म कोणते ?
द्रष्टेहि ज्याते, मोहती जेथं ।
तेची कर्म मी, वदतो तुजं तें ।
जाणता होशी, अशुभा मुक्त ॥१७/१६॥

कर्मची ते बोधपात्र,
बोधपात्र, विकर्म हि पण ।
अकर्म हि बोधयोग्य,
कर्मबोध तो, बहु कठीण ॥१८/१७॥

करुनही सारी, जी कर्म,
अकर्म, देखे, कर्मात त्या ।
करीता वा, मूळी न कर्म,
कर्म दिसे, अकर्मी तया ॥१९/१८॥

पुरुष तो, बुध्दियुक्ता,
मानवांत सकला फक्त ।
कर्मा-प्रवृत्त सर्वता:,
म्हणविला तो योग युक्त ॥२०/१९॥

जयाचे कार्यारंभ सर्व,
फलेच्छा संकल्पे वर्जीत ।
फलेच्छु जयाची कर्म,
आत्मज्ञानेची दग्ध होत ॥
तयासची म्हणती सारे,
ज्ञानवंत मग पंडित ॥२१/२०॥

त्यागून कर्मफलासक्ति,
सदैव संतुष्ट, स्वतंत्र तो ।
कर्म-प्रवृत्त, कर्मा, तरी,
निष्क्रिय सकला, कर्मात तो ॥२२/२०॥

नसे चित्त विषयासक्त,
न आस हि, संग्रह सर्व, करण्याची ।
आत्मा ज्या, परीग्रह त्यक्त,
करीता, कार्य, शरीरी, दोष नसेची ॥२३/२१॥

प्रभु इच्छे, जे लाभते,
तयांतची संतुष्ट ।
सुख, दु:ख, द्वंद्वातिते,
आसूयाते हि मुक्त ॥२४/२२॥

असिध्दि वा सिध्दींत जो,
समभाव युक्त रे ।
करीता कर्म, जरी तो,
कर्म बध्दे परी मुक्त रे ॥२५/२२॥

(वृत्तभुजंग प्रयात)
अनासक्त सर्वात, तो संगमुक्ता,
सदा ब्रह्मज्ञानी, स्थिती प्राप्त चित्तां ।
तयें कर्म, यज्ञार्थ, आचारिताची,
समर्पित कर्मात संपूर्ण त्याची ॥२६/२३॥

ब्रह्मची तो, यज्ञकतो,
हवि ब्रह्म ते, ब्रह्माग्नीत टाकतो ।
ब्रह्म कर्मात लीन जो
ब्रह्मरुप तो, ब्रह्मपदीच जातो ॥२७/२४॥

कुणी उपासक, यज्ञयागें,
पुजीतीते, त्यां देवालागी ।
कुणी उपासक, ब्रह्माग्नीचे,
यज्ञे यजती, यज्ञलागीं ॥२८/२५॥

कुणी अन्य ते, संयमाग्नी ते,
यजती क्षोत्रादि, इंद्रिये पंच ।
कुणी आणिक इंद्रीयाग्नी ते,
हवती शब्दादि विषये संच ॥२९/२६॥

उजळूनी ज्ञानदिप ते,
आत्मसंयम-योगाग्नीते ।
आहुती देती सर्व कर्माच्या,
इंद्रियांच्या नी प्राणापानाच्या ॥३०/२७॥

व्रते तीव्र जे प्रयत्नशील,
यति ते यजति, यज्ञ कठोर ।
द्रव्य, तप, योग यज्ञ जैसा,
स्वाध्याय आणि ज्ञान यज्ञ तैसा ॥३१/२८॥

ते कुणी, आपाने प्राण यजती,
आपान, प्राणे तैसेची ती ।
रोधून प्राण, आपान-गति,
प्राणायामे, अन्य तत्पर ती ॥३२/२९॥

नियमूनी निज आहाराते,
आणखी कुणी अन्य ।
यजती ते, हवनी प्राणाते,
आपुले, पंच प्राण ॥३३/३०॥

सर्व हि ते जाणकार ज्ञानी,
जाणती यज्ञ ज्ञान ।
आहूती टाकती याग यज्ञीं,
पापास सर्व जाण ॥३४/३०॥

यज्ञ शेषामृतची जे भक्षती,
ब्रह्मसनातनासी ते पावती ।
मिळे न हा लोक, जो ना करी यज्ञ,
कुरुश्रेष्ठा, त्यां मग, अन्य कोठून ? ॥३५/३१॥

असे हे, बहुविध यज्ञ बारे,
ब्रह्ममुखात चालती सारे ।
कर्म प्रसव, जाण ते सर्वची,
जाणता, मोक्ष बा, तूं पावसी ॥३६/३२॥

यज्ञे `ज्ञान यज्ञ' सर्व श्रेष्ठ,
द्रव्य-यज्ञादिक यज्ञाहूनी ।
अखील कर्म, सर्व ती, पार्थ,
संपती `ज्ञान' ते, प्रदानुनी ॥३७/३३॥

नमन करुनी, तयां सर्वाभावे,
सेवा, तैसेची ज्ञानीया, मनोभावे ।
संवादूनी तें `तत्वज्ञान', त्यां जाण,
द्रष्टे ते, बोधितिल, रे, तुज ज्ञान ॥३८/३६॥

जाणतां ज्ञान जे, पांडवा, परी ।
मोहसी न ऐसा पुन्हा तूं कधी ।
भूते सर्व याते, पाहसी अंतरी,
जसी मी पाहतो, माझ्यात सारी ॥३९/३५॥

वृत्त इंद्रवज्रा)
सर्वाहि पापां करण्यांत घोर
मानू जरी तुज, तयांत महा ।
हया ज्ञान नौकेचि तरिसि पार,
कल्मष दु:खार्णव सर्वची हा ॥४०/३६॥

काष्ट समिधा, करी भस्म,
अर्जुना, भडकता जेवी अग्नी ।
ज्ञान-अग्नि तेवी सर्व कर्म,
प्रज्वलिता, जाळी कर्म बंधनी ॥४१/३७॥

(वृत्त इंद्रवज्रा)
ज्ञानासरीसे न (दुजे) पवित्र,
तें विद्यमाने, जगतांत हयारे ।
तो सिध्द योगी, करतो हि मात्र,
कालांतरे प्राप्त, स्वयंहि त्यारे ॥४२/३८॥

ज्ञान लाभ त्यां, श्रध्दे आसरा,
वंशेद्रिया, त्या ज्ञान तत्परा ।
लाभता तया ज्ञान अंतरी,
शांति उच्च पावे झडकरी ॥४३/३९॥

ज्ञानी न श्रध्दा, त्यां मूर्खा, अडाणी,
जीवां संशयी, त्या, सदैव हानी ।
नाहे लोक त्याला, न हि ते पर,
नसे सुखी कधी, संशय-खोर ॥४४/४०॥

टाकूनी योगे, बंधकर्म सारी,
सारीता, संशय, ज्ञाने अंतरी ।
अंतरी दृढ, आत्मवान तया,
तया न बांधती, कर्मे, धनंजया ॥४५/४१॥

म्हणूनीच तव, अंतस्थ रे,
संशय तो, अज्ञान संभूत ।
छेदूनी हा, ज्ञान खड्गाते,
आत्मयोगे उठी तूं, भारत ॥४६/४२॥

गोपालगीते अनुवादिले हे,
`श्रीमद्भगवद गीत यथार्थ सारे ।
भगवद्भावे पद्मपुष्प चौथे
गोपाल कृष्णा, गोपाळे वाहिले ॥४७/अ-४॥

ऐसे हे श्रीमद्भगवद गीत उपनिषदे ब्रह्मविद्येत,
योगशास्त्रे, श्रीकृष्णार्जुन संवादात
ज्ञानकर्मसंन्यास योगनामे श्रुत
हे गोपाळ रचित गोपाल गीत पुष्प चौथे
(श्लोक संख्या ४७)

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP