मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीगुंडामाहात्म्य| अध्याय एकविसावा श्रीगुंडामाहात्म्य अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय एकविसावा प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : gunda mahatmyaगुंडा माहात्म्य अध्याय एकविसावा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥ॐ नमोजी गणराया । तूंचि गणेश शारदामाया । तूंचि सद्गुरु भक्त ताराया । कुळस्वामि सद्गुरु भक्त ताराया । कुळस्वामिया प्रगटलासी ॥१॥वेदादि करितां तुझें वर्णन । अगम्य जाणोनि धरिलें मौन । असो पूर्वाध्यायीं गुंडा येऊन । करिती भजन स्वानंदें ॥२॥राजयोगी श्रेष्ठ या प्रांतीं । त्रिगुणात्मक हे त्रिमूर्ति । गुंडा श्रीधर साधुराय होती । ज्ञानवैराग्यभक्ति अवतार ॥३॥दत्तसांप्रदाई साधुराज । राम ध्याती श्रीधर विद्वध्वज । विठ्ठलउपासक गुंडामहाराज । साधिले निज तिघेही ॥४॥यांत गुंडाचे तीव्र विराग । म्हणोनि दोघेही इच्छिती संग । प्रतिवर्षीं श्रीधर सवेग । भेटती उद्योग त्यागुनी ॥५॥श्रीधर भेटीसी प्रतिवर्षी येती । केव्हां केव्हां गुंडाही तेथें जाती । एकदां अकाली वृष्टि निश्चिती । जाहली होती बहुत ॥६॥श्रीगुंडा कंदकूर्तीसि निघाले । उद्दालिकानदी भरुनि चाले । जय विठ्ठल म्हणोनि प्रवेशले । पायीं गेले पैलतीरा ॥७॥पावले श्रीधर गृहासमोरी । तेथें उभे रामलक्ष्मण द्वारीं । सीता अंगण झाडी भीतरीं । पाहोनि माघारी परतले ॥८॥जावोनि बैसले गंगातटीं । त्या कळल्या श्रीधरा गोष्टी । गुंडाकडे येऊनि उठाउठी । देतसे मिठी चरणासी ॥९॥तुम्ही न येतां या दीनधामीं । परस्परें कां येथें बैसला स्वामी । काय अपराध घडला म्हणून मी । समर्थ तुम्ही शिक्षा द्यावया ॥१०॥गुंडा तेव्हां न बोलेचि कांहीं । श्रीधर तळमळी त्या समयीं । म्हणे दृढ धरोनि गुंडापायीं । कृपाकर होयी स्वामी मज ॥११॥ श्रीधरासी गुंडा क्रोधें बोलत । अभागी खरा तूं होशी निश्चित । कष्टविसी अयोध्यादैवत । लाज मनांत न वाटे ॥१२॥श्रीधर म्हणे काय हें साचार । मज गृहीं राबतो रघुवीर । सद्गुरु मी नेणें हा समाचार । करुं विचार चला आतां ॥१३॥गुंडा म्हणे काय बोलसी गोष्टी । प्रत्यक्ष मीं हें पाहिलें दृष्टीं । अहा प्रभु तुज करितों कष्टी । चेतला पोटीं अग्नि येणें ॥१४॥हें ऐकतां श्रीधर घाबरले । सद्गद कंठ रोमांच दाटले । भक्तकैवारी राम प्रगटले । श्रीधराचें केलें समाधान ॥१५॥गुंडासी म्हणे हो श्रीरामराया । कोणा घालूं पाहसी ही माया । मी सर्व ही जाणतों सदया । पायाची पायां वहाण बरी ॥१८॥जरी विरागी ज्ञाता उत्कृष्ट । तरी तो काय देवाहून श्रेष्ठ । आम्ही भक्त तूं देव वरिष्ठ । करावी स्पष्ट सेवा तुझी ॥१९॥ऐसीच खरी ज्ञानोत्तरभक्ति । स्वपदप्राप्तीसीही हीच युक्ति । नको तुझें ज्ञान स्वर्ग कीं मुक्ति । भक्ति विरक्ति हेंचि पुरे ॥२०॥श्रीराम म्हणे पुरे आतां भाषण । श्रीधर बोलावी चाल येथून । श्रीधर उठोनि धरी चरण । नेला प्रार्थून देवासह ॥२१॥स्वानंदें ग्रामीं प्रयोजन केले । श्रीधर कीर्तना उभे राहिले । गुंडा ऐकोनि आनंद पावले । ग्रामासी आले पुढें तेव्हां ॥२२॥असो साधनसंपन्न कोणी एक । कंदकूर्तीसी ब्राह्मण भाविक । येवोनि श्रीधरासी देख । बोले नि:शंक ऐका तें ॥२३॥अहो महाराज संतमूर्ति । वैराग्य द्यावें कृपे मजप्रती । आलों मी आशा धरुनि चित्तीं । कथावें निश्चितीं काय तें ॥२३॥ऐसें ऐकतां विप्रवचन । श्रीधर विचारें सांगे खूण । वैराग्य न होय वाचे बोलून । वर्तल्यावीण सहसाही ॥२५॥वाचिलें जरी अनेक ग्रंथां । मननेंवीण ब्राह्मणा ते वृथा । यासाठीं ऐकावें आतां । उपाय तत्वतां विप्रवर्या ॥२६॥मी कधीं स्वप्नीं नेणें वैराग्य । गुंडामात्र वैराग्यें सभाग्य । तोचि तुज सांगावया योग्य । होसी आरोग्य भवव्यथीं ॥२७॥विप्र म्हणे अहो संतमूर्ति । माझी तुम्हापाशीं असे भक्ति । श्रीधर म्हणे ऐक ही युक्ति । शीघ्रगती जावें आतां ॥२८॥ऐसें ऐकूनि श्रीधरवचन । सत्वर आला तो ब्राह्मण । श्रीगुंडाचें घेऊनि दर्शन । राहिला जाऊन एक मास ॥२९॥परी गुंडासी क्षणैक विश्रांति । रीघ नाहीं पुसावयाप्रती । अखंड उद्योग नाम गाती । ध्यानीं वृत्ति जडली असे ॥३०॥प्रयत्न केले शक्य तेवढे । परी पुसावया सवड न घडे । म्हणोनि आला श्रीधराकडे । प्रार्थूनि पुढें कथी वृत्त ॥३१॥एक मास मी राहिलों तेथ । परी गुंडा कोणा कांहीं न बोलत । पुसूं म्हणोनि प्रयत्न अमित । करोनि निश्चित आलों मी ॥३२॥श्रीधर म्हणती स्वाभाविक । सांग त्यांची कशी वर्तणूक । ब्राह्मण म्हणे विधिपूर्वक । सांगतों नि:शंक वेगळाली ॥३३॥गुंडा अरुणोदयीं उठोन । करी स्नानसंध्यादेवतार्चन । बाराशें गायत्रीमंत्र जपून । पितृतर्पण करीतसे ॥३४॥मग पुराण वाचिल्यावरी । वीणा घेऊनियां मांडीवरी । मुखीं म्हणे रामकृष्णहरी । नाहीं क्षणभरी विश्रांति ॥३५॥ऐसा तीनप्रहरपर्यंत । भजनाचा अत्यंत गजर होत । परस्परें पाक करिती समस्त । आलिया तेथ अयाचिती ॥३६॥पाक सिध्द आहे सांगतां तंव । गुंडा करी नैवेद्य वैश्वदेव । घेती पंक्तिंत बैसूनियां सर्व । हरेराम नांव गाताती ॥३७॥ग्रासोग्रासीं भोजनकाळीं । सर्वही गाती हरिनामावळी । श्लोक होतां देती नामआरोळी । वेळोवेळीं सर्व जाण ॥३८॥अस्तमान पावेतों शेवट । हरिभजनाचा होय थाट । दर्शनासी येती श्रेष्ठश्रेष्ठ । कांहीं गोष्ट न बोले गुंडा ॥३९॥मग सर्वही पाद प्रक्षाळिती । संध्यावंदनादि सारिती । सवेंचि करिती मंगलारती । देवासी वाहती मंत्रपुष्प ॥४०॥मग पायीं घुंगरु बांधून । वीणा घेती सर्वही जण । आरंभ करिती चक्रीं भजन । नंतर जाण ज्ञानेश्वरी ॥४१॥कीर्तन करिती विप्र थोर । कित्येक गायन गाती सुस्वर । कित्येक उधळिती द्रव्य अपार । लक्षही त्यावर न देई गुंडा ॥४२॥कोण आणितो कोण खातो । कोण उपवासी कोण जेवितो । हा देतो किंवा गृहा नेतो । कोण पुसतो कोणा तेथें ॥४३॥कोणी घेतो श्रीगुंडाउपदेश । कोणी निंदिती सावकाश । कोणी सेवा करिती विशेष । कोणी त्रास देती लोक ॥४४॥गुंडाभजनीं मौन बसावें । केव्हांही पाहा तैसेंच असावें । कधीं पाहतां रिकामें नसावें । मीं केव्हां पुसावें काय कोणा ॥४५॥ऐसा फारच त्रास पावलों । म्हणूनि येथें परत आलों । कोणासी कांहीं न बोलिलों । जाऊनि झालों कष्टीमात्र ॥४६॥आतां दया करोनि या समयीं । सांगा मज तुम्ही तरी कांहीं । श्रीधर म्हणती तूं अभागी पाहीं । कळलें नाहीं कांहीं तुज ॥४७॥त्वांचि सूर्योदयापासून । गुंडावर्तन केलें कथन । परी कळलें नाहीं अजून । होसी पाषाण केवळ बापा ॥४८॥गुंडाची जी वर्तणूक होय । तें वैराग्य नोहे तर काय । पुन्हां राहिलास तुज संशय । यासी उपाय काय करुं ॥४९॥ऐसें ऐकतां श्रीधरवचन । अधोवदनीं पाहे ब्राह्मण । मनीं जाहला लज्जायमान । चालिला तेथून उठोनी ॥५०॥जी सत्पुरुषाची वर्तणूक सहज । तेंचि जाणा वेदाचें निजगुज । यासाठीं संतसमागमाचें काज । परमार्थबीज सत्संगें ॥५१॥निलंगे नगरीं एक वाणी । सदा प्रपंच व्यापार करोनि । मल्लपानामें पुण्यखाणी । हरिभजनीं रत राहे ॥५२॥तेथें एक पीरपाच्छावली । परमार्थीं ज्याची वृत्ती रंगली । ग्रामप्रदेशीं जागा केली । कीर्ति वाढली अत्यद्भुत ॥५३॥नित्य येवोनि मल्लपा तेथ । जें जें इच्छील योगी समर्थ । ते ते पुरवी त्यासी पदार्थ । कांहीं स्वार्थ न इच्छितां ॥५४॥असो एकदां पर्जन्यकाळीं । शत एक साधु तेथें दुकाळीं । येवोनि पीर पाच्छाजवळी । क्षुधित त्यावेळीं उतरले ॥५५॥निश्चक्र घडलें दिवस तीन । क्षुधेनें जाहले अचेतन । पीरपाच्छा कळवळोन । येती उठोन मल्लपापाशीं ॥५६॥म्हणती मल्लपा सायंकाळीं । गृहासी आली संतमंडळी । क्षुधेनें व्याकुळती सगळी । देई या वेळीं भोजना ॥५७॥साधु आहेत ते शंभर । ऐशी आज्ञा होतांच सत्वर । वेगीं आला दुकानावर । अर्ध रात्र साचार जाहली ॥५८॥मनीं म्हणे प्राण जावो अथवा राहो । परी साधूचा आज्ञाभंग न होवो । ऐसा दृढ धरोनि भावो । दुकानीं पाहों लागला ॥५९॥तों तेथें साहित्य नाहीं किंचित । चिमुटभर उसने न मिळत । म्हणे अर्धरात्र आली होत । आहे पडत पर्जन्यही ॥६०॥धैर्ये केला विचार एक । घरोघरीं निद्रिस्त लोक । एके दुकानीं नि:शंक । तांदूळ कणिक आणिली ॥६१॥उपसाहित्य आपले दुकानीं । होतें आणिलें तत्क्षणीं । मलंग सर्व साहित्य पाहूनी । जाहला मनीं संतुष्ट ॥६२॥सिध्द करवोनि तेव्हां पाक । तृप्त केले साधुलोक । उदयापूर्वीं आज्ञा घेऊनि देख । मल्लपा नि:शंक गृहा आला ॥६३॥कणिकतांदूळ भरोनि पोतीं । मल्लपा देत त्याची मागुती । आम्हीं कधीं दिली होती । साहु पुसती तयासी ॥६४॥येरु म्हणे रात्री करें आपुले । पोतीं भरलेलें सामान नेलें । तें उसनें मीं आणून दिलें । पाहिजे घेतलें अवश्य ॥६५॥साहु म्हणती हा किती जनीं । प्रामाणिक आहे सत्यवचनी । कार्यप्रसंगीं नेलें चोरुनी । मागुती आणूनि दिलें यानें ॥६६॥संतुष्ट केले सत्पुरुष । तेणें गेला तुजवरील चौर्यदोष । साहू पावले अतिसंतोष । पाहूनि यासी सत्यवादी ॥६७॥एकदां मलंग सदना आला । मल्लपासी बोलूं लागला । तुझा उपकार जाहला । काय याला देऊं आतां ॥६८॥एक तुझे पोटीं होईल हिरा । जैसा कां एकनाथचि दुसरा । तेणें महद्भाग्य येईल घरा । साधु खरा होय जगीं ॥६९॥ऐसें देऊनि आशीर्वचन । फल अर्पिले त्यालागून । तें करितां मल्लपा ग्रहण । पुत्र सुलक्षण जाहला ॥७०॥वीरप्पानामें होतसे थोर । भगवद्भजनीं अति सादर । दुकानांतही करी व्यापार । असे दानशूर भाविक ॥७१॥जो जें मागे तें त्यासी देत । तोटा होतां पिता गांजित । निर्भत्सिती लोक समस्त । खेदयुक्त कधीं नोहे ॥७२॥सदा चित्तीं वसे अनुताप । दनाधर्म करी अमूप । कानन सेवावें करी संकल्प । हरिरुप पाहों इच्छी ॥७३॥ग्रंथ एकनाथी ज्ञानेश्वरी । नित्यनिरंतर अवलोकन करी । गांजिती सर्व दुराचारी । परी अंतरीं अढळ जो ॥७४॥कोणी एक त्याचा स्नेहाळ । तळघरीं त्यासी दिधलें स्थळ । तेथें एक आवर्तन समूळ । केलें केवळ ज्ञानेश्वरीचें ॥७५॥घेऊनि ब्राह्मणाचा वेष । प्रतीति दावी त्यासी ईश । म्हणे गुंडाचा घेईं उपदेश । तेणें विशेष कार्य साधे ॥७६॥गुंडा हा केवळ जगद्गुरु । भक्तसखा भवभयतारुं । अनुग्रहें तरसी भवसागरु । हा निर्धारु प्रसाद माझा ॥७७॥वीरप्पा कोणा न सांगे ही मात । दृढ अंत:करणीं धरिला हेत । विप्रानुग्रह वाणियाप्रत । दूषण प्रसाद होतां देती ॥७८॥करावी जंगमाची सेवा । हें विहित वाणियां सर्वां । मी तदुपदेश घेतां बरवा । आप्तबांधवां क्रोध चढे ॥७९॥नित्य ऐसा विचार करित । श्रीगुंडाचें आगमन इच्छित । देगलुराहूनि सद्गुरुनाथ । शिष्यांसहित निघाले ॥८०॥पंढरीसी जावया कारण । मार्ग धरिला निलंग्याहून । ग्रामस्थ तेथें घेती ठेवून । मुक्काम दोन तेव्हां झाले ॥८१॥वीरप्पानें एकांतीं गांठिलें । आम्रफल सद्गुरु करीं दिलें । दृढचरणीं मस्तक ठेविलें । पावन केलें पाहिजे म्हणती ॥८२॥सर्वसाक्षी तूं सद्गुरुराव । जाणसी सर्वांचे मनोभाव । अनुग्रह केला वीरासी तंव । दयार्णव गुंडानें ॥८३॥गुंडा आम्रफल मुखा लाऊनीं । स्वयें घाली वीरप्पा वदनीं । येरु ग्रहण करी तेच क्षणीं । ज्ञानवासरमणि उदेला ॥८४॥लोकांत कळली हे मात । कीं वीरप्पा गुंडा अनुगृहीत । तेव्हां वाणी मिळूनि समस्त । म्हणती अनुचित झालें हें ॥८५॥येरु नायके कोणाचें वचन । उगाच न करी कोणासी भाषण । सदैव गुरुची सेवा करुन । करी भजन गुंडासवें ॥८६॥गुंडासवें पंढरीसी गेला । जावोनि पृथक स्थळीं उतरला । एकांतीं भेटावें श्रीगुरुला । येत पूजेला अर्धरात्रीं ॥८७॥आम्रफलें गुरुसी अर्पून । शेष सेवी स्वानंदें करुन । श्रीगुरुनें करितां शयन । करी संवाहन सप्रेमें ॥८८॥नित्य गुंडाचे भोजन वेळीं । चोरुनि उभा खिडकीजवळी । श्रीगुरु वीरप्पाचे करकमळीं । प्रसाद तत्काळीं घालिती ॥८९॥जावोनि चंद्रभागेतटावरी । श्रीगुरुप्रसाद सेवन करी । ऐसें चालतां एके अवसरीं । कौतुक निर्धारी वर्तलें ॥९०॥वीरा आपुले बिर्हादीं असतां । गुंडा निघाले काल्याकरितां । पाचारा म्हणती वीरासी आतां । जाती तत्वतां शिष्य तेव्हां ॥९१॥एका मागोमाग तिघेजण । श्रीगुंडा धाडिती पाचारण । वीरप्पा देहावरी येऊन । पुसे वर्तमान हें काय ॥९२॥शिष्य म्हणती गोपाळपुरा । श्रीगुरु निघाले सहपरिवारा । तुमचें स्मरण जाहलें गुरुवरा । चलावें त्वरा करोनि ॥९३॥ऐसें ऐकतांचि सवेग । वीरा धांवे तेव्हां लगबग । श्रीगुरु गोपाळपुरा अव्यंग । जावोनि अभंग म्हणताती ॥९४॥श्रीसद्गुरु गुंडामूर्ति । उभे जेव्हां काल्याप्रति । तेव्हां हमामाहुंबरी निश्चिती । गुंडा खेळती हरीसवें ॥९५॥कृष्ण बळिराम गोप गायी । सर्वही खेळती ठायींठायीं । वेणुनादें जावोनि सर्वही । वृंद पाही उभा असे ॥९६॥दिव्य पताका लखलखीत । चामर श्रीहरीवर डोलत । ऐशा क्रीडानंदीं अवचित । वीरा धांवत पातला ॥९७॥वीराप्रती गुंडा पाहून । आपुल्या करीं धरिलें जाण । लवंगाकृति रौप्यसुवर्ण । वीरामुखीं पूर्ण घातलें ॥९८॥आपुले मस्तकाहूनि रुमाल । टोपीवरुन काढोनि तत्काळ । वीरामस्तकीं तेव्हां केवळ । बांधिला सबळ हालेनासा ॥९९॥आपुले कंठींची सुमनमाला । घातली करें वीरप्पाचे गळां । म्हणती या भजनाचा सोहळा । भोगी प्रेमळा येथूनी ॥१००॥म्हणूनि घातलें आपुले पाठीं । भजन जाहलें गजघाटीं । वीराचरणीं घालित मिठी । पाठ थापटी श्रीगुंडा ॥१॥ऐसा श्रीगुरुप्रसाद पावला । स्वानंदें काला पूर्ण जाहला । वीरा शंकित होय मनाला । मज घडला प्रमाद म्हणे ॥२॥श्रीगुरुगुंडावचनाप्रती । विलंब केला पापमती । त्रिवार पाचारण धाडिती । अभागी निश्चिती खरा मी ॥३॥कैचें ध्यान कैंचे पूजन । गुरुची अवज्ञा मजकडून । घडल्याचें प्रायश्चित्त घेऊन । देईन प्राण यथार्थ मी ॥४॥ऐसा निश्चय दृढ केला । चंद्रभागेच्या तटासी आला । महाविक्राळ डोह देखिला । प्रवेश केला त्यामाजीं ॥५॥प्रवेश होतां आकंठ जळीं । म्हणे आत्महत्या हे समूळीं । याचें प्रायश्चित्त गुरुजवळी । पुसावें यावेळीं जावोनी ॥६॥येवोनी श्रीगुरुसी पुसत । गुरुअवज्ञेचें काय प्रायश्चित्त । सद्गुरु म्हणती भजनीं निश्चित । एकाग्रचित्त करावें ॥७॥चार घटिकेचे जे भजन । तें करावे दोन वेळीं जाण । ऐसें ऐकूनि सद्गुरुवचन । करीत भजन दोन वेळां ॥८॥श्रीगुंडा जावोनि महाद्वारीं । भजन संपवूनि सत्वरीं । गृहासी जातां वाटे माझारी । जळोजी करी नमन त्यांसी ॥९॥म्हणे श्रीएकनाथषष्ठी । तुम्हीं करावी हे माझे पोटीं । म्हणोनि प्रसाद घातला ओटीं । लाही शेवटीं उधळावी ॥११०॥मग वीरप्पासी तोचि प्रसाद । देऊनि गुंडा बोलती शब्द । हें व्रत तूं चालवावें विशद । म्हणतां पद नमी वीरा ॥११॥वीरप्पा श्रीगुरुआज्ञा वंदून । गेला आपुल्या बिर्हाडालागून । वारंवार श्रीगुरुचरण । आठवोनि भजन करीतसे ॥१२॥काला करोनि गुंडा सत्वरी । ग्रामासी निघाले सहपरिवारीं । वीरप्पाही निघाले झडकरी । भजन गजरीं श्रीगुरुचें ॥१३॥श्रीगुरुचें भजन करीत । आले अंबेग्रामापर्यंत । श्रीगुरु विटंबना लोक समस्त । सांगती निश्चित वीरप्पासी ॥१४॥वीरप्पा म्हणे श्रीगुरुराया । अद्भुतशक्ति अंगीं असोनियां । तुम्हां काय झालें हो पळावया । श्रमविली काया वृथा तुम्ही ॥१५॥तुमचा नेणोनि अधिकार । लोकांनीं घेतला अपराधभार । धिक येतील असती नर । मूढ पामर अपवित्र ॥१६॥म्हणोनि वीणा गळां घातला । अंबें नगरीं प्रवेश केला । घेती देवीचे दर्शनाला । उभे भजनाला मंडपीं ॥१७॥भजनीं जेव्हां उभी मंडळी । आले ग्रामस्थ कुटिल ते काळीं । विटंबना आरंभिली सकळीं । पौरगण मेळी खल तेव्हां ॥१८॥पूर्वी आला होता याचा गुरु । त्याचा हा चेलाच कीं निर्धारु । वेषधारी येती पोट भरु । घाला येरु बाहेरी आतां ॥१९॥ऐसी निर्भत्सना करुन । भजनीं विक्षेप मांडिला गहन । वीरप्पा म्हणे आम्हां तुम्ही सर्वजन । काय कारण छळावया ॥१२०॥आम्ही भजन करितों स्वछंदें । तुम्हां कां वाईट वाटे या शब्दें । व्यर्थ आम्हां छळितां विनोदें । प्रपंचमदें भुलोनि ॥२१॥तेव्हां म्हणती तेथील छलक । तुम्ही साधु कैंचे मैंद लोक । नसतां परीक्षा दावा एक । सर्वांसी नि:शंक यासमयीं ॥२२॥मुकुंदराजाची जी समाधी । डोलवावी ती तुम्ही आधीं । नसतां विटंबना करुं प्रसिध्दी । काय ते बुध्दि ये तुमच्या ॥२३॥ऐसें ऐकतां त्यांचें वचन । तिकडे निघाले करीत भजन । मुकुंदाराजापाशीं येऊन । केलें नमन सप्रेमें ॥२४॥तो सत्पुरुष भक्तकैवारी । जयत्पाळ साधूतें छळितां निर्धारी । अवतार घेवोनि आले सत्वरीं । दंडिलें करीं राजासी ॥२५॥त्याने साधु बंदीं घातलें । दाणा दळावया लाविलें । ते सर्वही सोडविले । अद्भुत दाविलें महिमान ॥२६॥असो मुकुंदराज समर्थ । ज्यानें विवेकसिंधु केला ग्रंथ । वीरप्पानें भजन करितां तेथ । समाधि यथार्थ डोले तेव्हां ॥२७॥अद्भुत भजनीं नवल केलें । तेव्हां चक्राकार समाधि डोले । ग्रामस्थ सर्वही पाहूं लागलें । आश्चर्य मानिलें कृत्याचें ॥२८॥ज्या ज्या छंदें वीरा नाचत । तैसी तैसी समाधि डोलत । भजन संपूर्ण होतां निश्चित । समाधि निवांत राहीली ॥२९॥वीरा निघाला नमन करुन । ग्रामस्थ ठेवोनि घेती प्रार्थून । साहूशेटी मिळोनि जन । ब्राह्मण भोजन करिताती ॥१३०॥म्हणती आम्ही सर्वस्वी चुकलों । श्रीगुंडासी विटंबितें झालों । अनंत अपराधा पात्र बनलों । कुबुध्दया नाडलों स्वहितासी ॥३१॥असो जो कां दीनाचा सोंयरा । अवतरलासे जगदुध्दारा । तो गुंडा सहपरिवारा । जाय परस्परा ग्रामाकडे ॥३२॥वीरप्पा तेथून निघून । पातले तेव्हां औशालागून । आठवूनि श्रीगुरुचरण । करिती भजन अहर्निशीं ॥३३॥श्रोते श्रवण करोत आतां । पुढें अत्यंत रसाळ कथा । अखंडपदीं स्थापी समर्था । दीनानाथा नारायणा ॥३४॥इति श्रीगुंडामाहात्म्य निश्चिती । विप्रा वैराग्य आणि शापमुक्ति । कृपें वीरप्पा समाधि डोलविती । एकविंशति अध्याय हा ॥१३५॥॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥अध्याय २१ वा समाप्त. N/A References : N/A Last Updated : September 14, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP